रवींद्र आंबेकर
डॉ. दाभोलकर- कॉ. पानसरेंच्या हत्येनंतरही हिंदुत्ववाद्यांसमोरील आव्हाने संपलेली नाहीत. या दोघांच्या खुन्यांपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत, नजीकच्या काळात पोहोचू शकतील अशी शक्यताही कमी आहे. मधल्या काळातल्या सत्तांतराबरोबरच अच्छे दिन येतील असे वाटणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना दररोज कुणी ना कुणी टक्कर द्यायला उभा ठाकतोय. काल-परवा विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यांचाही विचार समाजाला घातक होता म्हणे! गोळ्या खूप आहेत आणि टार्गेटही… त्यामुळे हे कधी थांबणार, मारेकरी कधी पकडले जाणार वगैरे प्रश्न आता पडत नाहीत. बाकीच्यांना का पडतायत हेही एक कोडेच आहे. खरे तर टार्गेट्स न संपणे हा एक प्रकारे डॉ. दाभोलकर- कॉ. पानसरे- डॉ. कलबुर्गी यांच्या विचारांचा विजयच आहे. म. गांधींना मारल्यानंतरही टार्गेट्स संपली नाहीत, हा पण गांधींचा विजयच आहे…विवेकवादी नेत्यांना अशा पद्धतीने मृत्यू येणे हे सभ्य समाजाला साजेसे नाही. सत्ता कुणाचीही असो, असे प्रकार घडत असतात. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकालात दाभोलकरांचा खून होतो आणि भाजपच्या कालखंडात पानसरेंना संपवले जाते. समाजातील अतिरेकी
संघटनांना त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी तशी सर्व परिस्थिती सारखीच. उलट यापुढे जाऊन म्हणावे लागेल की सत्ता, प्रशासन, समाजकारणातील अनेकांचा अशा शक्तींना छुपा पाठिंबाही असतो. दाभोलकर-पानसरे ज्या मूल्यांसाठी लढले, त्यातील बराच कालखंड हा काँग्रेस राजवटीचा आहे. त्यामुळे या लोकांची लढाई ही सत्तेसोबत किंवा एका पक्षासोबत नसून समाजातील अपप्रवृत्तींच्या विरोधात होती, हे आधी मान्य करावे लागेल. कॉ. पानसरे हे जरी एका पक्षाचे काम करत होते, तरी त्यांच्या कामाची मान्यता सर्वच घटकांमध्ये होती. कलबुर्गी यांनी जे विचार मांडले, ते कुठल्या सत्तेच्या विरोधातले नव्हते. अंधश्रद्धा, शोषण, समानता, धर्माच्या नावाखाली होत असलेली लूटमार यावर त्यांची मांडणी होती. हे लोक कधी मारामारी करायला रस्त्यावर उतरले नाहीत, की दगड मारून त्यांनी कधी कुणाच्या काचा फोडल्या नाहीत. त्यांना धर्मसत्ताही ताब्यात घ्यायची नव्हती. फक्त काही प्रश्न विचारायचे होते.दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांनी नेमके काय केले म्हणून त्यांना मारले गेले असावे? आपापल्या विचारधारेशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केले. तसे अनेक लोक करतात.त्यांनी प्रश्न विचारले… असे प्रश्नही अनेक लोक विचारतात.त्यांनी प्रश्न विचारायला शिकवले… हेही अनेक जण करतात…त्यांनी सांगितले- माझ्या बुद्धीला ज्या गोष्टी पटतात, त्या मी स्वीकारतो… असे पण अनेकजण सांगतात.ते म्हणाले- माझी विज्ञानावर श्रद्धा आहे… हे म्हणाले- हा धर्मावर घाला आहे.ते म्हणाले- माणूस हा माझा धर्म आहे. हे म्हणाले- आम्ही सांगू तोच धर्म आहे. ते म्हणाले- माझ्या धर्माची चिकित्सा करण्याचा मला अधिकार आहे…. ठो…ठो…ठो…!धर्माने सांगितलेय अधर्म करणाऱ्यांना संपवा, पण लोच्या झाला. हा अधर्म वाढायलाच लागलाय. आता तर अनेक जण प्रश्न विचारू लागले आहेत…. किती लोकांना ठोकायचे? प्रश्नही संपलेले नाहीत. साले, असेच मेले असते तर गाजावाजा झाला नसता. कदाचित फ्युनरलला पण कोणी गेले नसते. बंदुकीच्या गोळीत घाबरवायची ताकदच नाही. हजारांच्या संख्येने हे प्रश्नवाले लोक बाहेर पडले आहेत. यांना काय कामधंदे नाहीत का? प्रश्न विचारणाऱ्यांची घरे कशी चालतात? फॉरेन फंडिंग येत असणार! फंड पण थांबवला, पण परत आहेतच रस्तावर हे… यांच्या डोक्यातच किडा आहे. तो फक्त भगवदगीता खातो… ठो… ठो…ठो…हा किडा काय मरत नाही. त्याने कुराण आणि बायबलही खायला सुरुवात केलीय… हुश्श…! गोळीचा असर होतोय बहुतेक. पण मधून मधून हा किडा परत येतो. ठो…ठो…ठो…सनातन्यांचे सध्या हाल सुरू आहेत. सारखे ठो…ठो…ठो…तरी किती करायचे? मंदिर, दर्गा, चर्च टाकले की दुकान सुरू. एक नारळ, हार, कुंकू, तांदूळ, फुलाची चादर, ढीगभर मेणबत्त्या… याला प्रश्न विचारणाऱ्यांच्या मूर्तींची पूजा पण सुरू झालीय मस्त. दुकानात चलबिचल सुरू झाली की, मध्ये मध्ये इतिहासाच्या पानावर रेघोट्या मारता येतात. त्यांच्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर पुन्हा ठो..ठो..ठो…! बरे प्रश्न विचारणारे हातात पोस्टर घेऊन येतात आजकाल… ओळखायला सोप्पे. यांच्यासारखे नाही, बालकवी बसवायचे… ठो ठो करायचे आणि धूम…!प्रश्न विचारणारे सल्ला देतात- विचारांचा सामना विचारानेच वगैरे… म्हणून कधीमधी सनातन प्रभात मधून सामना करायचा. पण हा मुकाबला कठीणच. विचाराचा समन्स विचारानेच…. पेपरमध्ये फोटो छापून अहिंसक मार्गाने फोटोवर फुल्ली मारायची. अहिंसा! मग प्रश्न विचारणारे चेकाळतात. पत्रके काढतात. मोर्चे काढतात. बोंबाबोंब करतात. आपण सहाच्या सहा लोड करायच्या… एकही प्रश्न न विचारता सुरू करायचे ठो…ठो…ठो…! लगेच पळून जायचे. साला, यांचे प्रश्नच संपत नाहीत. कशाला पडतात यांना हे प्रश्न? मांडवली केली तर नाही चालणार का? कुणीतरी पाद्री जादूच्या पाण्याने रोग बरे करतो आणि जादूच्या पाण्याने धर्मही बदलून टाकतो. तो बदलला की जगण्यासाठी राशनची व्यवस्थाही करतो. ज्याला जगण्यासाठी आरोग्य आणि राशन लागते, त्याच्यासाठी धर्म महत्त्वाचा नसतो. एखादा पीर-हकीम ताईत बांधून रोग दूर करतो-वेड घालवतो. एखादा मांत्रिक मंत्राने उपचार करतो. मुले-बाळे पैदा करून देतो. हे सगळे तांत्रिक-मांत्रिक नसून अडाणी समाजाचे डॉक्टर आहेत. या समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा मागीतल्या तर कुणाचा धर्म बुडतो? अडाणी लोकांची ही कहाणी…शिकलेल्या लोकांची थेरे तर विचारूच नका… रॉकेट उडवायच्या आधी बालाजीची पूजा, साडेसाती घालवण्यासाठी शनिला तेल टाकले तर यांचे काय जाते? पूल बांधायच्या आधी बोकड कापला तर यांचे काय नुकसान होते? गुप्तधनासाठी नरबळीचे शास्त्र आहे… आयला खरेच… सोप्पे आहे ना सगळे… घेणारा कुणीच प्रश्न विचारत नाही. कुणालाच प्रश्न पडत नाहीत. सगळे मस्त सुरू असते. काही प्रॉब्लेम आला तर राजकारण्यांना मध्ये टाकून धर्मबुडव्यांच्या विरोधात बोंब मारता येते. अगदीच प्रॉब्लेम वाढला तर आहेच विज्ञानाने दिलेले एक ठो…ठो यंत्र. दोन-चार गोळ्या घातल्या की सगळे ओके…प्रॉब्लेम इथेच झालाय. गोळ्यांनी ही माणसे मरतात, पण यांचा विचार जिवंत राहतो. त्याचा किडा इतरांच्या मेंदूत वाढायला लागतो. त्या किड्याला मारणारी गोळी अजूनपर्यंत मिळाली नाहीय. ती मिळत नाही तोपर्यंत ठो…ठो… गोळ्या चालवणाऱ्यांचा पराभवच होत राहणार.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्यासारखे विचारवंत गोळ्यांनी मारता येतात, पण त्यांचा विचार जिवंत राहतो. त्याचा किडा इतरांच्या मेंदूत वाढायला लागतो. त्या किड्याला मारणारी गोळी अजूनपर्यंत मिळाली नाहीय. प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी ठो…ठो… गोळ्या चालवणाऱ्यांचा पराभवच होत राहणार.
रवींद्र आंबेकर
लेखक ‘मी मराठी’ न्यूज चनेलचे चे संपादक आहेत