-मुकुंद कुळे
…
‘नेटफ्लिक्स’वर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बुलबुल’ सिनेमातील एका गाण्यावर संस्कृतिरक्षकांनी आक्षेप घेतला, त्यानिमित्ताने जुलै महिन्याच्या ‘मुक्त शब्द’ मासिकात प्रसिद्ध झालेला लेख…
…………………………………………………..
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध किंवा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पश्चिम बंगाल. सरंजामदारी-जमीनदारी पद्धती पूर्णपणे लयाला जाणं अजून बाकी असण्याचा तो काळ. अशा काळात बालिका बधू बुलबुलचं लग्न तिच्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठ्या असलेल्या जमीनदाराशी होतं. लग्न, शरीरसंबंध हे कळण्याचं तिचं वय नसतंच. सहाजिकच नवऱ्याशी भावबंध जुळण्याऐवजी तिचे भावबंध जुळतात, तिच्याशी खेळणाऱ्या, तिच्याच वयाच्या, नवऱ्याच्या धाकट्या भावाशी-सत्याशी, आपल्या दिराशी! वय लहान असताना कुठलंही नातं छान मोकळंढाकळं असतं, मात्र वय वाढतं, तसं नात्यातही बंधनं निर्माण होतात. तशीच ती बुलबुल आणि सत्याच्या नात्यातही निर्माण होतात. खरंतर नकळत्या वयापासून उमललेलं हे अबोध प्रेम, त्या दोघांपैकी थेट कोणीच व्यक्त करत नाही. त्यातही तिच्या दिराच्या मनात काही असतं की नाही कळत नाही. कदाचित त्याच्या दृष्टीने ती त्याची निव्वळ मैत्रीणच असते आणि राहतेही… परंतु तिच्या मनात मात्र त्याच्याबद्दल हळव्या भावना असतात आणि तिने त्याच्याकडे नाही, तरी आपल्या मनाशी त्याची कबुली दिलेलीच असते. म्हणूनच तिला सतत त्याच्या सहवासाची-भेटीची अपेक्षा असते… आणि तिची ही ओढच तिच्या जावेच्या (बुलबुलच्या नवऱ्याच्या जुळ्या भावाची बायको) नजरेतून सुटत नाही. त्यामुळेच एकदा बुलबुल उतावीळपणे सत्याला भेटायला जाते, तेव्हा ती तोंडाने एक गाणं गुणगुणते. ते गाणं खूपच सूचक असतं-
‘ओ की हो कोलोंकिनी राधा
कदम डाले बोशे आशे कनु हरामजादा…
माई तुई जोले ना जय्यो, माई तुई जोले ना जय्यो’
याचा अर्थ असा की- अग हे कलंकिनी राधा, तू पाणी आणायला जाऊ नकोस, तिथे त्या कदंबतळी तो हरामजादा म्हणजेच लबाड कृष्ण टपून बसलेला आहे.
या गाण्याच्या पार्श्वभूमीवर बुलबुल आणि सत्याच्या नात्याकडे पाहिलं; तर हे गाणं म्हणजे एकप्रकारे बुलबुलला दिलेला सावधगिरीचा इशाराच आहे, की तुझं लग्न झालेलं आहे आणि सत्या कितीही आवडला, तरी तो तुझा दिर आहे. तू भले त्याच्यावर मोहीत होशील आणि त्याच्या गळ्यात पडशील… पण त्याने त्याचं काहीच बिघडणार नाही, कलंकित मात्र तूच होशील!
बुलबुलची जाऊबाई कारस्थानी असते, तिला बुलबुल आणि सत्याचं नातं ठाऊक असतं, आणि त्यामुळे ती या गाण्याच्या ओळी कुत्सितपणेच आळवत असते. परंतु तिने अगदी सहज तोंडातल्या तोंडात गुणगुणलेल्या या दोन ओळी राधेप्रमाणेच बुलबुलचीही दिशा आणि दशा अधोरेखित करतात. मात्र एवढ्या सूचक असलेल्या या दोन ओळींवरूनच सनातन्यांनी अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या आणि नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बुलबुल’ सिनेमाविरोधात कहर माजवला. अनुष्काला ट्रोल करण्यापासून ‘बुलबुल’वर बंदी आणण्याची मागणी करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी केल्या. कारण त्यांचा आक्षेप आहे की- सिनेमातील या गाण्याच्या ओळीत राधेला ‘कलंकिनी’, तर कृष्णाला ‘हरामजादा’ म्हटलंय आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावल्यात…
… आणि असं असेल तर माझ्या दृष्टीने याचा अर्थ एवढाच की, या सनातन्यांना लोकभावना बिलकूल कळत नाहीत. त्यांनी एकदा आपल्या लोकवाङ्मयाची पानं नीट जाणीवपूर्वक चाळून बघावीत. तिथे त्यांना आपल्या देवतांविषयी लोकमानसाने धीटपणे व्यक्त केलेलं कायकाय सापडेल. आभिजात साहित्य आणि लोकसाहित्यात हाच फरक असतो!
रामायण-महाभारतासारखी आर्ष महाकाव्य असतील, किंवा कालिदासादी कवींनी संस्कृतात लिहिलेली विदग्ध खंडकाव्य-नाटकं असतील; या अभिजात साहित्याचं प्रयोजनच मुळी उत्तम अभिरुची घडवणं, आदर्शवाद मांडणं आणि नैतिकतेचे धडे देणं हे असतं. एकप्रकारे नीतिवान समाज घडवण्याचा ठेकाच अभिजात साहित्याने घेतलेला असतो. परिणामी मूळ कथा, आख्यान, उपाख्यान अशा अभिजात साहित्यकृतीच्या घाटातून वाचकांवर एकप्रकारे संस्कार केले जातात. महत्त्वाचं म्हणजे अभिजात साहित्यातील नायक-नायिका कायमच आदर्श असतात. परिस्थितीवश त्या चुकीच्या वागल्याच, तर त्यामागेही काही सूचकार्थ, पूर्वसंकेत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे दोष जाणार नाही, याची पुरेपूर तजवीज साहित्यकर्त्याने केलेली असते. परिणामी हे नायक-नायिका जनमानसात प्रतिदेव नव्हे, देव म्हणूनच प्रस्थापित होतात. कदाचित ती ही सर्वसामान्यांसारखी स्खलनशील माणसंच असतील, परंतु एकप्रकारे त्यांच्या प्रतिमेवर देवत्वाचा शेंदूर थापला जातो…
… आणि हा शेंदूर खरवडून काढण्याचंच काम एकप्रकारे लोकसाहित्य करत असतं. ते देव-देवतांना ‘लोक’ म्हणूनच सादर करतं. माणूस म्हणून असलेल्या सगळ्या कसोट्या लोकसाहित्य या देवदेवतांना लावतं. जे आपलं जगणं, तेच या देवदेवतांचं जगणं. जे लोक खातात, तेच त्यांचा देव खाणार आणि माणूस चरित्रहीन असेल, तर त्यांचा देवही तसाच असणार. या अर्थाने लोकसाहित्य-लोकवाङ्मय म्हणजे एकप्रकारे कायमस्वरूपी वास्तववादच आहे. या देवदेवतांना दोष देण्याचा त्यांचा कोणताही हेतू असतोच असं नाही, उलट तू आमच्यापेक्षा वेगळा नाहीस, असंच त्यांना सांगायचं असतं. म्हणूनच देवतांनाही आपल्या पातळीवर आणून, त्यांच्या माध्यमातून आपली सुखदुःख व्यक्त करण्या प्रयत्न त्या-त्या वेळच्या लोकमानसाने केला. त्यातूनच त्यांनी राम-कृष्णासकट, विठोबा-खंडोबापर्यंत सगळ्या देवदेवतांवर प्रेम केलं, परंतु वेळप्रसंगी त्यांना धारेवरही धरलं. कारण त्यांच्यासाठी ती सामान्य माणसंच होती. अलौकिक नाही, तर लौकिक व्यक्ती. म्हणून तर जनाबाई विठोबाला म्हणू शकली-
‘तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडा ल्याली
तुझे गेले मढे, तुला पाहून काळ रडे’
किंवा गर्भार सीतेला वनवासात पाठवल्याबद्दल, रामाला दोष देतानाही ग्रामीण आयाबाया म्हणतातच- ‘असे कितीक लवूबाळ जन्माला येतील, वध रामाचा करतील.’ अगदी रुक्मिणी-विठोबा-जनाई आणि म्हाळसा-खंडोबा-बाणाई यांच्या नात्याकडेही जनमानसाने प्रेमाचा त्रिकोण म्हणूनच पाहिलं. देव तसे वागले, म्हणून माणसं तशी वागली म्हणण्यापेक्षा; स्त्री-पुरुष या नैसर्गिक नात्यात कधीही काहीही घडू शकते आणि माणूस त्या—त्या वेळी कसा वागेल हे सांगता येत नाही, म्हणून त्या माणसांचे देवही त्यांच्यासारखेच वागतात किंवा वागले. म्हणूनच लोककथा आणि लोकगीतांनी समृद्ध असलेलं लोकवाङ्मय पाहिलं, तर त्यात देवांसाठी जशा ओव्या आहे, तशाच शिव्याही आहेत. त्याने हबकून जाण्याचं काहीच कारण नाही!
ज्या बंगाली गाण्यावरून संस्कृतीच्या ठेकेदारांनी आता रान उठवलंय, ते गाणंही बंगालमधलं प्रसिद्ध लोकगीतच आहे आणि वर्षानुवर्षं बंगालमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावर ते गायलं जात आहे. बंगाली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बाऊल या लोकपरंपरेतील ते एक प्रसिद्ध बाऊलगीत आहे. या पारंपरिक गाण्यात पुढे जे म्हटलंय त्याचा भावार्थ असा आहे की- हे राधे तू अशी नदीकाठी-बाजारात हिंडतेस ते तुला शोभत नाही. तू कदंबतळी जाऊ नकोस, तिथे कृष्णाने तुझ्यासाठी सापळा रचलेला आहे. तू तिथे जाशील नि अलगद त्याच्या सापळ्यात अडकशील आणि त्यामुळे तुझंच नाव बदनाम-कलंकित होईल… तेव्हा हे कोलोंकिनी राधा तू पाणी आणायला कंदबतळी जाऊ नकोस…!
महत्त्वाचं म्हणजे गेली किमान दोनेकशे वर्षं हे गाणं बंगालात खुल्या दिलाने म्हटलं जात आहे आणि आजवर त्याच्यामुळे कोणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत आणि तिथे यापुढेही दुखावल्या जाणार नाहीत. कारण तो राधा-कृष्णाच्या रासक्रीडेचाच एक प्रकार आहे. त्यात एकमेकांवर ज्या उत्कटपणे प्रेम केलं जातं, त्याच उत्कटतेने निंदाही केली जाते… आणि केवळ बंगालीच कशाला, ब्रज-मैथिलीपासून हिंदी-मराठी भाषेतही राधा-कृष्णाला दोष देणारी, नावं ठेवणारी गाणी आहेतच की! आपल्याकडे महाराष्ट्रात शुभकार्यप्रसंगी देवीचा गोंधळ घातला जातो. या गोंधळपरंपरेत सादर होणाऱ्या ‘जांभूळ आख्याना’तील राधाविलास गवळण बघितली, तर त्यात राधा-कृष्णाच्या शारीर संबंधाचे उल्लेख आढळतात. त्यात राधा, छोट्या कृष्णाला घरी घेऊन जाते आणि मोठं व्हायला सांगते. तिच्या मागणीनुसार कृष्ण मोठा होऊन त्यांचा संग रंगात आलेला असतानाच राधेचा नवरा अनय येतो आणि राधेची घाबरगुंडी उडते. मग ती कृष्णाला लहान होण्याची विनवणी करते. शेवटी राधा ही लग्न झालेली होती आणि म्हणूनच त्या काळात तिच्यावरही काही दोषारोप ठेवले गेले असतीलच. त्याशिवाय का
‘राधा-कृष्णाचं हे नातं, गावात होतोया बोभाटा
अनयाची राधा मोठी, कृष्णसखा ग धाकुटा’
अशी गाणी जन्माला आली असती? …आणि मुळात राधा-कृष्णाच्या नात्याला तरी नाव का ठेवा? राधा असेल वाढवयाची आणि कृष्ण असेल पौगंडावस्थेतला… पण त्यांचं नातं जुळूच शकतं की नैसर्गिकपणे! मग या लौकिक नात्याचं अलौकिकीकरण करून त्याला भक्तिभाव-आध्यात्माचं अवगुंठन कशासाठी चढवायचं? त्यांचं शारीर प्रेम आपण का मान्य करायचं नाही?
लोकमानसाने ते केव्हाच मान्य केलेलं आहे, म्हणून तर राधा-कृष्णाच्या नात्याकडे, त्यांच्या प्रेमाकडे संशयाने पाहणाऱ्या ओव्या-गाणी ढिगाने सापडतात… मुळात, यमुनेच्या पात्रात स्नानासाठी उतरलेल्या गोपिकांची वस्त्रं कदंबावर उंचावर नेऊन ठेवणारा आणि त्यांची गंमत पाहणारा कृष्ण लबाड-चावट होताच की! तसंच अनयाशी लग्न झालेलं असतानाही, कृष्णाला भेटायला जाणारी, त्याला समर्पित होणारी राधाही मोकळी होतीच की! मग राधेला ‘कोलोंकिनी’ आणि कृष्णाला ‘हरामजादा’ म्हटलं म्हणून गळे कशाला काढायचे?
मुळात राधेला ‘कोलोंकिनी’ आणि कृष्णाला ‘हरामजादा’ म्हणताना हे गीत रचणाऱ्या लोकगायकाचा आणि आजही ते आवडीने म्हणणाऱ्या कुणाचाही राधा किंवा कृष्णाला दोष देण्याचा मुळीच हेतू नाहीय; उलट हे गाणं म्हणजे राधा-कृष्णाच्या नात्यात रंगलेल्या रासक्रीडेचाच प्रगल्भ आविष्कार आहे… आणि लोकवाङ्मय म्हणजे नेहमीच काही भक्तांनी-लोकांनी केलेला थेट विद्रोह नसतो; देवतांची आपल्याप्रमाणे मनुष्यपातळीवर कल्पना करून त्यांच्यावर आपले भाव-इच्छा लादणं, हा त्यांचा एकप्रकारे व्यक्त होण्याचाही मार्ग असतो!
(लेखक नामवंत पत्रकार व लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत)
9769982424
नक्की ऐका – क्लिक करा -ओ की हो कोलोंकिनी राधा