आशिकी@30

-रमेश कुलकर्णी

साँसों की जरुरत हो जैसे… जिंदगी के लिये,
बस एक सनम चाहिये… आशिकी के लिये ।।

असं गुणगुणणारी पिढी आता पन्नाशीत पोहोचली आहे. ‘आशिकी’ला रिलीज होऊन ३० वर्षे झालीत. दणदणीत ‘ओपनिंग’ लाभलेला हा सिनेमा अनेक गोष्टींमुळे स्मरणात राहिला. ‘आशिकी’ सिनेमानिर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे. नव्वदीच्या दशकात म्युझिक अल्बमची मोठी क्रेझ होती. गुलशनकुमारच्या कॅसेट कंपनीने अल्बमसाठी तयार केलेली गाणी महेश भट्ट यांच्या ऐकण्यात आली. रिलीज होत असलेल्या म्युझिक अल्बमला त्यांनी थांबविले. तयार असलेल्या नऊ गाण्यांच्या अवतीभवती कथेचे वेष्टण चढविले गेले आणि त्यातून ‘आशिकी’चा जन्म झाला. चित्रपटाची लांबी एकूण १४८ मिनिटांची आहे. त्यात ४८ मिनिटांची फक्त गाणी आहेत. अशा या म्युझिकल धमाकेदार ‘आशिकी’ने नंतर इतिहास घडविला.

महेश भट्ट यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरचा हा चित्रपट आहे, असाही प्रचार त्या काळी झाला. ‘मैनें प्यार किया’च्या फ्रेश जोडीने केलेल्या ‘रेकॉर्डब्रेक’ कमाईमुळे ‘आशिकी’साठी फ्रेश चेहराच महेश भट्ट यांना हवा होता. युनिसेफकरिता काम करीत असलेल्या इंदिरा राय यांच्या घरी कामानिमित्त गेलेल्या महेश भट्ट यांनी दरवाजा उघडणारा त्यांचा पुत्र राहुल रायला ‘हीरो’ म्हणून फायनल केले. कुठल्यातरी पार्टीत गाठभेट झालेली अनू अगरवाल त्यांची ‘नायिका’ ठरली. सिनेमाचे फ्रेश चेहरे अशा अचंबित करणाऱ्या प्रसंगातून पडद्यावर आले. सिनेमा रिलीज करताना नवोदित हीरो-हीरोइनचे चेहरे पोस्टरसाठी योग्य वाटत नव्हते, म्हणून त्यावर ‘कोट’ (जॅकेट) टाकून त्यांना लपविण्यात आले. त्यालाही प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. चेहरे लपलेल्या या ‘कोट’ पोझवरही रसिकांनी भरभरून प्रेम केले. प्रेक्षकांना आवडलेल्या डायलॉग वा गाण्यासाठी पडद्यावर पैसे फेकण्याचा तो सुवर्णकाळ होता. प्रेक्षकांचे प्रेम मोजण्याचे ते एक मापन होते. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्ट्या, चीत्कार व पडद्यावरील फेकलेले चिल्लर पैसे सिनेमाचे यश-अपयश ठरवायचे. ‘आशिकी’ या फेकाफेकीच्या बाबतीत ‘श्रीमंत’ चित्रपट ठरला.

‘आशिकी’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांची आयुष्ये बदलून गेली. राहुल राय, अनू अगरवाल, दिपक तिजोरी रातोरात स्टार बनले. कुमार शानू, अनुराधा पौडवाल आघाडीचे गायक म्हणून प्रसिद्धिझोतात आले. म्युझिक डायरेक्टर नदीम-श्रवण सर्वाधिक ‘बिझी’ जोडी झाली. गुलशनकुमारच्या ‘टी सीरिज’ या कंपनीने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. एक करोडनंतर ‘टी सीरिज’ने कॅसेट विक्री मोजणे बंद केले होते, असे जाणकार सांगतात. परदेशात ‘आशिकी’ची मागणी वाढली, तसेच परदेशात आशिकीने प्रेक्षक पसंती व कमाईचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले. महेश भट्ट यांची दिग्दर्शक म्हणून नवी ‘इनिंग’ सुरू झाली. यशाचे सारे रेकॉर्ड ‘आशिकी’च्या नावावर जमा झाले. फिल्मी दुनियेतील सर्व नामांकित ‘अवॉर्ड’ची हक्कदार ‘आशिकी’ टीम बनली. मायबाप रसिक खूश झाला, तर आयुष्याचे सोने करून देतो याची प्रचिती ‘आशिकी’ने अनुभवली. नंतरच्या काळात ‘आशिकी’ टीम विशेषत: म्युझिक डायरेक्टरवर गाणे, लय, चाल चोरीचे आरोप झाले. आजतागायत चोरीच्या आरोपांची शृंखला सुरूच आहे.

‘आशिकी’ची सगळी गाणी ऐकण्यासाठी क्लिक कराhttps://bit.ly/2FZq6BR

‘आशिकी’ सिनेमाने प्रेक्षकांच्या अंतरंगात प्रवेश केला होता. प्रेक्षकांना भावविश्वात घेऊन जाण्याची यशस्वी कामगिरी चित्रपटाने केली होती. चित्रपटांशी समरस होण्याचा तो काळ होता. आपल्या आयुष्यातील व्यथा, वेदना, दु:खे विसरून चित्रपटात स्वत:ला बघणारी ती पिढी होती. भावना, संवेदनांचे माहात्म्य सांगणारा काळ होता. चित्रपट नावाचे गारुड डोक्यावर बसलेले जनताजनार्दन होते. चित्रपटांच्या कथा व त्यातील ‘सीन’ तोंडपाठ असण्याचे ते दशक होते. चित्रपटाच्या कथेवरील भाष्य व चर्चा हा आवडीचा विषय होता.‘आशिकी’मधील राहुल रायच्या विचित्र हेअर स्टाइलची त्या काळी मोठी क्रेझ होती. सगळ्या सलून दुकानदारांकडे या हेअर स्टाइलची प्रचंड मागणी वाढली होती. ‘आशिकी’ या सिनेमाविषयी अनेकांकडे किस्से व कहाण्यांचा भरमार मसाला निश्चित असावा. मागील आनंददायी आठवणींना उजाळा देताना चेहºयावर फुललेले हसूसुद्धा आजच्या कोरोनाकाळातील अस्वस्थेवर औषध ठरू शकेल. सिनेमा जगणारी ती पिढी आता वार्धक्याकडे झुकू लागली आहे; परंतु ‘आशिकी’ची तिशी साजरी करताना आपल्या तारुण्याचा प्रवास मनमुरादपणे लुटून येईल, एवढे मात्र निश्चित!

(लेखक दैनिक ‘पुण्यनगरी’च्या विदर्भ आवृत्तीचे महाव्यवस्थापक आहेत)

संपर्क : ९९२२९०१२६२

Dheere Dheere Se Meri Zindagi Mein Aana Full Video Song | Aashiqui | Anu Agarwal, Rahul Roy

Previous articleभीमबेटका: आदिमानवांचे आश्रयस्थान
Next articleभाकरी हवी की भक्ती ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here