हा दिशाभूल करणारा प्रकार ‘महाआघाडी’च्या ‘ठाकरे सरकार’ने सर्वोच्च न्यायालयात ‘राज्य सरकार’ची बाजू मांडण्यापूर्वी उघड केला पाहिजे होता. तथापि, सर्वच राजकीय पक्षांचे धोरण हे ‘मराठा तितुका खेळवावा आणि लोळवावा’ असेच असल्यामुळे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नवी जातीय समीकरण जुळवण्याचा- बिघडवण्याचा खेळ सुरू झालाय. असे खेळ राजकारणात अटळ असतात. हे लक्षात घेऊन ‘छत्रपती’ या नावाचा वापर टाळायला पाहिजे होता. तथापि, ‘छत्रपती’ ही राजकीय स्वार्थासाठी वापरायची आणि त्यासाठी ‘पळवापळवी’चा खेळ करण्याची बाब झाली आहे. हा खेळ त्यांचे ‘वंशज म्हणविणाऱ्यांनी’ थांबवला पाहिजे होता. पण तेच ‘छत्रपती’च्या जिरेटोपावर खासदारकीचा ‘तुरा’ लावून घेण्यासाठी या खेळात ‘गडी’ म्हणून सामील झाले आहेत. हे दोन्ही ‘छत्रपती’ शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या गादीचे वंशज आहेत. शिवरायांच्या रक्ताचे वा विचारांचे ते वंशज नाहीत. त्याची साक्ष राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राची विटंबना करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणात आणि ब.मो.पुरंदरेच्या ‘महाराष्ट्र भूषण’ प्रकरणात मिळाली आहे. या दोन्ही प्रकरणांच्या वेळेस शिवाजीराजे, संभाजीराजे, शाहूराजे यांच्या विचारांचे अस्सल मावळे सनातन्यांच्या नीच वृत्तीवर तुटून पडले होते. आणि हे दोन ‘छत्रपती’ ‘वरातीमागून घोडे धावावे’ तसे कधी इकडे तर कधी तिकडे, अशा उड्या मारीत होते. आता ‘मराठा आरक्षणा’बाबतही त्यांचे तेच चालले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिका ‘भाजप’ला पूरक असतात, अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे. पण त्यांच्या सामाजिक भूमिका, या पूर्णपणे व्यापक समाजहिताच्या आणि लोकशाहीवादी असतात, हे मान्य केलेच पाहिजे. त्यांनी ‘मराठ्यांना आरक्षण नाही, तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा,’ या भूमिकेचा समाचार घेताना उदयनराजेंना ‘बिनडोक छत्रपती’ म्हटले. उदयनराजेंचे ‘यूट्यूब’वरील व्हिडिओ पाहिले ; विशेष करून ‘बजाव डॉल्बी’ हा व्हिडिओ पाहिल्यास, त्यांच्या ‘बिनडोक’पणाची साक्षच मिळते. उदयनराजेंच्या तुलनेत अॅड. प्रकाश आंबेडकर कोल्हापूरच्या संभाजीराजे यांच्याबद्दल वावगं काही बोलले नाही.