जगण्यासाठी पैसा हवाच हे साहिरच्या मनात पक्कं रुजलं गेलं होतं. जरी त्यानं ‘यह दौलत के भूके रिवाजों की दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…’ असं ‘प्यासा’मध्ये लिहिलं असलं तरी या मुंबईच्या मायानगरीत, जिथं फक्त पैशाला किंमत आहे आणि बाकी सारं झूठ आहे अशा वातावरणात राहण्यासाठी पैसा मिळवायला हवा हे त्यानं पक्कं ठरवलं होतं. गेली दोन तपं त्याची अम्मी त्याच्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करत होती. तिला आता सुखाचे दिवस आणि आरामाचं जगणं द्यायचं होतं… म्हणून त्याला यशस्वी व्हायचं होतं आणि मिळणारं यश जमेल तेवढं एनकॅश करायचं होतं.
साहिरनं आपल्या स्थानाचा आणि यशाचा फायदा घेत सर्व फिल्मी गीतकारांसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणल्या. त्याबद्दल साऱ्या गीतकारांनी साहिरप्रति कृतज्ञ राहिलं पाहिजे.