दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा अजेंडा डाव्यांनी (पियूष गोयलांच्या भाषेतील माओवाद्यांनी नव्हे) हायजॅक केल्यामुळे हा डेडलॉक निर्माण झाला आहे. आंदोलकांनी डावपेचाचा भाग म्हणून सरकारला नमवण्यासाठी कायदे मागे घेण्याची मागणी केली होती; परंतु या कायद्यांत सुधारणा कराव्यात, अशी त्यांची सुरुवातीला लवचिक भूमिका होती. सरकारला नमते घ्यायला लावल्यानंतर तडजोडीचा जो प्रस्ताव आला, त्यात आणखी काही मागण्यांची भर घालून आंदोलकांनी मधला मार्ग काढायला हवा होता. कृषी सुधारणांना सरसकट विरोध न करता नव्या कायद्यांतील त्रुटी दूर करून ही कोंडी फोडणे आवश्यक होते. परंतु कायदे रद्द केल्याशिवाय पुढची बोलणी करणार नाही, अशी भूमिका डाव्यांनी घेतली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली 200 हून अधिक संघटना या आंदोलनात उतरल्या आहेत. या समितीत डाव्या पक्षांच्या शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यांनी कायदे संपूर्णतः रद्द करण्याची ठाम भूमिका घेतल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे आंदोलक संघटनांमध्ये फूट पाडण्यासाठी सरकारला आणखी एक संधी मिळाली.
रब्बी हंगामात गव्हाचे क्षेत्र कमी करण्यासाठी भाजीपालापिकांना प्रोत्साहन देणे, दक्षिण भारतात त्यांची वाहतूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे, गव्हाच्या निर्यातक्षम वाणांचे उत्पादन वाढवणे, गहू प्रक्रिया उद्योग उभारणे आदी धोरणात्मक निर्णयही घेतले पाहिजेत. तांदळाच्या बासमती व तत्सम वाणांचे हेक्टरी उत्पादन, पाणी व खतांची गरज कमी असते; पण त्यांना निर्यातीसाठी मोठी मागणी असते. परंतु देशात स्वस्तात तांदूळ उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण असल्याने विशिष्ट कोटा ठरवून या तांदळाच्या निर्यातीवर बंधने आणली जातात. मग पीकपद्धतीत बदल होत नसेल तर, त्याला शेतकरी जबाबदार आहेत की सरकार?
It’s true