आम्हाला जेवण करून यायला जवळपास दोन तास लागले होते परंतु ड्रायव्हर मात्र न कंटाळता आमची वाट पहात असलेला दिसला. त्याने आमच्या जेवणाची व खरेदीची विचारपूस केली व गाडी हॉटेलच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. आता मात्र सगळे रस्ते ओस पडले होते. तुरळक वाहतूक तेवढी दिसत होती. तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला. हिमालयातील लहरी हवामानाचा अनुभव जो की ऐकून होतो तो यायला सुरुवात झाली. थंडी, वारा, पाऊस सगळ्याचा एकदमच मारा सुरू झाला होता. गाडीत हीटर असल्याने हा मारा सुसह्य होता पण हॉटेल जवळ उतरताना मात्र आमची चांगलीच तारांबळ उडाली. थोडफार भिजतच रूम गाठली. रूममध्ये जातोय तोपर्यंत लाइट गेले. जनरेटर, इन्व्हर्टरचीही सोय उपलब्ध नव्हती फक्त मेणबत्तीचा सहारा होता. कपडे भिजल्याने हाडे गोठतील इतकी थंडी वाजत होती. बोलण्यासाठी तोंड उघडले की प्रथम दात वाजायचे व मग आवाज फुटायचा. आता ते आठवून हसू येते. पण त्यावेळी मात्र आमची भयंकर परिस्थिती झाली होती.
Very nice…. Marvlas.