धर्मांची याविषयीची एक बतावणी अशी की, या धर्मसंस्थापकांनी धर्म निर्माण केले नाहीत तर त्यांनी पूर्वीच अस्तित्वात असलेले धर्म संपादित व संग्रहित केले असे त्यांचे अनुयायी सांगतात. महावीरांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले तर बुद्धाच्या अगोदर 10 बोधिसत्त्व होऊन गेले असे म्हटले जाते. पैगंबराच्या अगोदरही सव्वा लक्ष प्रेषित अल्लाने पृथ्वीवर पाठवले असे सांगितले जाते. आपला धर्म पुरातन, अतिप्राचीन व ईश्वर वा मूळ सत्याच्या जवळचा आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
वेद हे जगातले पहिले मौखिक व लिखित ग्रंथ मानले जातात. त्यातही ऋग्वेद हा सर्वाधिक पुरातन ग्रंथ मानला जातो… तरीही वेदात चार्वाकांची निंदा आहे. ज्यांची निंदा करून त्यांना खोडून काढायचे ते प्रत्यक्षात समोर असल्याखेरीज ते कसे केले जाईल. ही बाबच चार्वाकांचे वेदांहूनही प्राचीन असणे सिद्ध करते. चार्वाकांच्या धर्माला आरंभी आद्यधर्म म्हटले ते यामुळेच.
धर्म सनातन आहेत, ते अनादी आणि अनंत आहेत या वचनाएवढे दुसरे असत्य वचन कोणतेही नाही… कारण जगातल्या प्रत्येक धर्माची जन्मतिथी वा जन्मकाळ सांगता येतो. तो लक्षात घेतला की धर्माआधीचा काळ कळतो. त्यात कोण असते? धर्म की त्यांनी जन्माला घातलेले ईश्वर? इतिहासाच्या ओघात काही धर्म व संस्कृती लोपही पावल्या. त्यांच्यासोबतच त्यांचे ईश्वरही काळाच्या पडद्याआड गेले. हे घडल्यानंतर मग शिल्लक काय राहिले?
ख्रिश्चन व मुसलमान या दोन धर्मांतली युद्धे तब्बल सातशे वर्षे चालून इस्तंबूलच्या पाडावाने थांबले. या लढाया दोन धर्मांत व राज्यांतच होत नसत. भारतात शैवांच्या व वैष्णवांच्या, जैनांच्या आणि बुद्धांच्या युद्धांच्याही नोंदी आहेत… शिवाय महाभारतासारखी युद्धे एकाच घराण्यातील भांडणांतून होत व त्यात ‘अठरा अक्षौहिणी’ बळी पडत.