माझ्या महिला सहकारी

पूर्वप्रसिद्धी – दैनिक ‘दिव्य मराठी’-  मधुरिमा पुरवणी

-प्रवीण बर्दापूरकर  

साधारण १९८२ पासून  वृत्तपत्रात मी वरिष्ठ पदांवर काम करायला सुरुवात केली . तेव्हापासून माझ्या  टीममध्ये किमान एक तरी महिला सहकारी असेच . महिला सहकाऱ्यांसोबत काम करणं हा नेहमी आनंद , शिकणं आणि नवनिर्मितीचा अनुभव आहे . महिला सहकाऱ्यांबाबत माझा दृष्टीकोन नेहेमीच संरक्षणात्मक राहिलेला आहे . सहकारी महिलांना कुणी पुरुष सहकाऱ्यांनं चुकून का असेना त्रास दिला तर , त्याला मी सणसणीत ‘धडा’ शिकवत असे . शिवाय कोणत्याही पदावरच्या कुणाही महिला सहकाऱ्याला अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता  रात्री ८ नंतर कधीही कार्यालयात मी थांबू दिलं नाही . परिणामी  ज्या संस्थेत आणि ज्या वरिष्ठासोबत काम करतो त्याच्याविषयी महिला सहकार्‍यांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला . त्यामुळे सहकारी महिला कायमच मुक्तपणाने काम करत .

माझी पहिली महिला सहकारी मंगला विंचुर्णे होती ; ती नंतर माझी पत्नी झाली.  ती आणि मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीचं काम एकत्र करत असूत . मंगला माझ्यापेक्षा निर्विवादपणे जास्त हुशार होती . मराठी आणि इंग्रजी भाषेवर तिचं विलक्षण प्रभुत्व होतं . संपादकीय संस्काराच्या बाबतीत तिला आव्हान देऊ शकेल असा कुणीही सहकारी आमच्यासोबत तरी त्या काळात नव्हता . त्यामुळे मंगलाकडून पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातच नव्हे तर कायमच  खूप काही शिकता आलं . खरं म्हणजे, नंतर पत्नी झालेल्या  मंगला विंचुर्णे नावाच्या एका महिला सहकाऱ्यानं मला सर्वार्थानं घडवलं ,  हे  मान्य करताना कुठलाही संकोच वाटत नाही .

निवासी संपादक होण्याच्या आधी  पाच–सहा वर्ष मी आवृत्तीच्या मुख्य कार्यालयापासून लांब नियुक्तीवर होतो . त्यामुळे तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञानात होणारे बदल माझ्यापर्यंत पोहोचलेले नव्हते . संगणकाच्या वापरामुळे मोठी क्रांती मुद्रण व्यवसायामध्ये झालेली आहे, हे नागपूरला गेल्यावर मार्च २००३ मध्ये  समजलं आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी काहीसा भांबावून गेलो .           सी-टू-पी , छायाचित्र अपलोड वा डाऊनलोड , छायाचित्राचा आकार  थेट संगणकावर कमी-जास्त करणं किंवा क्षणार्धात मजकूर वेगवेगळ्या टाइपमध्ये कन्व्हर्ट करुन घेणं  , आकार कमी-जास्त करुन घेणं  अशा अनेक बाबी माझ्यासाठी अद्भूतच होत्या .  त्या तंत्रज्ञानाबद्दल मला काहीही माहीत नव्हतं . पण सर्व सहकाऱ्यांनी त्या काळात मला सांभाळून घेतलं आणि प्रशिक्षित केलं. अर्थात त्यात मोठा वाटा बुजुर्ग नव्हे तर , तरुण महिला आणि पुरुष सहकार्‍यांचा आहे .

संपादकीय चमुचं नेतृत्त्व करत असताना नेहेमीच लक्षात आलं की , बहुसंख्य पुरुष सहकारी कामाच्या बाबतीत ‘बेतास  बात’ असतात ; अगदी मोजके सहकारी जीव ओतून काम करतात . ‘आपण भलं की आपलं काम भलं’ अशी  मानसिकता बहुसंख्य पुरुष सहकाऱ्यात सुरुवातीपासून  सातत्याने आढळून आलेली आहे . पण , इथे आवर्जून सांगावंस वाटतं की , महिला सहकाऱ्यांमध्ये मात्र जीव तोडून काम करण्याची जी वृत्ती आढळली ती बेजोड आहे . दुसरा एक भाग असा की , एकदा त्यांच्या आणि आपल्यामध्ये सुसंवाद निर्माण झाला , विश्वासाचं नातं निर्माण झालं की , महिला सहकारी जीव तोडूनच काम करतात असं नाही तर , त्यांच्या कामामध्ये येणारी कल्पकता विस्मयचकित करणारी असते . आपल्या मनात ज्या काही असतात त्या कल्पनांना मिळालेलं मूर्त स्वरुप मोठं देखणं असतं .

‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा आधी निवासी संपादक आणि नंतर संपादक झाल्यानंतर मला ज्या अनेक महिला सहकार्‍यांसोबत काम करता आलं त्यातील सोनाली कोलारकर सोनार,  राखी चव्हाण,  ज्योती तिरपुडे आणि भक्ती ओक-सोमण यांचा उल्लेख करायला हवा . हाच अनुभव विद्यमान सहकारी अर्चना अजय जोशी हिच्याही संदर्भात आहे , हे आवर्जून नोंदवायला हवं. सोनाली कोलारकर ही पर्यावरणशास्त्रातली पदव्युत्तर पदवी संपादन केलेली युवती . ‘विदर्भ रंग’ पुरवणीची  अनेक वर्ष ती संयोजक होती . तत्पूर्वी भरपूर लेखन केल्याचा अनुभव सोनालीच्या खात्यावर जमा होता . ज्योती तिरपुडे ही रानडे इन्स्टिट्यूटमधून शिकून पुण्याहून नागपूरला आलेली . राखी चव्हाण चंद्रपूरहून येऊन आमच्यासोबत जॉइन झाली आणि भक्ती ओक-सोमण तर मुंबईसारख्या महानगरातून नागपूरला आलेली होती . या चौघींची वयं , अनुभव तसंच कौटुंबिक , आर्थिक , सामाजिक आणि भौगोलिक सर्व पार्श्वभूमी वेगळी . पण , ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीमध्ये जे अनेक प्रयोग त्या काळामध्ये आम्ही करु शकलो त्याचं खूप मोठं श्रेय या चौघींना आहे . या चौघींमुळे मलाही खूप काही शिकता आलं . ते शिकणं जसं वेगानं येऊन आदळणारं तंत्रज्ञान व यंत्रज्ञान होतं , त्यासोबत समकालातील तरुणाई काय विचार करते या संदर्भात आलेलं  भानही होतं  .

जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेनंतर समाजाच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल झाला परिणामस्वरुप  जे व्यापक बदल मुद्रण क्षेत्रात झाले त्यामुळे वाचक आणि मुद्रीत माध्यमांचा परस्परांकडे  पाहण्याच्या  दृष्टीकोन , अपेक्षा आणि व्यवहारात खूप मोठा बदल झाला . वाचकांना नेमकं काय हवं असू शकेल ,  यांचा अंदाज घेऊन वृत्तपत्रामध्ये योग्य/आवश्यक  बदल अन्य पुरुष सहकाऱ्यांपेक्षा या चौघींसोबत जास्त प्रॉमिनंटली करता आले  . वेगवेगळ्या कार्यक्रम आणि उपक्रमातून वाचकांचा कल काय  आहे ? वाचकांना काय हवं आहे ,  हे जाणून घेऊन तसे अनेक  बदल आम्ही अंकात केले .  मी सूत्रं  स्वीकारली तेव्हा त्या आवृत्तीचा खप अतिशय कमी झाला होता पण , ती आवृत्ती बंद न करता पुढे जोमाने चालवावी असं ठरलं आणि व्यवस्थापनानं  सूत्रं माझ्याकडे दिली . सर्वच सहकाऱ्यांनी त्या काळात काही जीव तोडून काम केलं त्यामुळे त्या अंकाचा चेहरामोहरा जो बदलला तो वाचकांना अतिशय मोठ्या प्रमाणात भावला यात शंकाच नाही ; त्यात महिला सहकाऱ्यांचं  योगदान जास्त होतं . परिणामी आमचा खप झपाट्यानं वाढत गेला .

तरुण वाचक आकर्षित करण्यासाठी एक विशेष पान आणि तरुणांच्या भाषेमधला तो सगळा मजकूर , नवनवीन गॅझेट्सची माहिती हे तर आमचं बलस्थानच ठरलं . परंपरागत वाचकाला तरुणांची ती भाषा आवडत नसे  परंतु , त्या पानामुळे आम्हाला तरुण वाचक खूप मोठ्या प्रमाणात मिळाले , हे मान्यच करायला हवं . ‘विदर्भ रंग’ आणि ‘रविवार विशेष’ या दोन पुरवण्यांना या चौघींनी जे काही स्वरुप प्राप्त करुन दिलं आणि तेही कोणताही थिल्लरपणा न स्वीकारता , ते उल्लेखनीय होतं . ते स्वरुप इतकं वाचकप्रिय झालं की , आमची मुख्य पुरवणी असलेल्या ‘लोकरंग’च्या आधी वाचक आमच्या रविवार पुरवणीची , ‘विदर्भ रंग’ची अक्षरश: चातकासारखी  वाट बघू लागले . संपूर्ण  विदर्भाच्या कला , साहित्य , संस्कृती तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील विविध दालनांना ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व या चौघींनी मिळवून दिलं ; महिलांचा , शोषितांचा , आदिवासींचा आवाज म्हणून या पुरवण्यांना जी मान्यता मिळवून दिली त्याला तोड नाही . याचं कारण या चौघी जणी या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या होत्या . त्यामुळे अंक निर्मितीबाबत  ‘कास्मोपॉलेटिन’ संकल्पना अस्तित्वात आली आणि त्यातून आम्ही समाजाच्या विविध घटकांना जोडू शकलो . ज्योती तिरपुडेला सामाजिक चळवळी आणि राजकारणात खूप रस होता . राखी चव्हाणला  वृक्ष संवर्धन , पशू-पक्षी , वन जीवन अशा क्षेत्रांमध्ये रस होता . त्या तुलनेत भक्ती ओक-सोमण नवोदित होती पण , तिनंही सर्व फारच लवकर अवगत केलं . Complete Regional News Paper अशी आमच्या वृत्तपत्राची प्रतिमा निर्माण झाली आणि त्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी थेट झाला त्यामुळे व्यवस्थापनही खूष होतं !

महिला सहकाऱ्यांच्या संदर्भामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ,  कोणतेही बदल स्वीकारतांना बहुसंख्य पुरुष सहकारी थोडे ताठर असतात . आजवर मला जेवढ्या महिला सहकाऱ्यासोबत काम करता आलं त्या अनुभवावरुन सांगतो , महिला सहकारी मात्र बदल स्वीकारताना , याचा खरंच आपल्याला उपयोग होईल किंवा नाही अशी सावध चिकित्सक भूमिका आधी घेतात आणि योग्य वाटलं तर बदल बिनधास्तपणे  स्वीकारताना हटखोरपणा दाखवत नाहीत .  म्हणूनच  एक संपादक आणि लेखक  म्हणूनही  माझ्या थोड्या-बहुत असलेल्या यशाचा वाटा महिला सहकाऱ्यांचा आहे , ही कबुली देण्यात मला आनंदच वाटतो .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

Previous articleवैदिक धर्म आणि चार्वाक
Next articleदेवेन्द्र फडणवीस – ‘सेल्फ आऊट’ सामनावीर !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here