ममता बॅनर्जी यांचा राजकीय इतिहास संघर्षाचा आहे . डाव्या आघाडीशी प्रदीर्घ काळ संघर्ष करुन आणि त्यासाठी भाजपा-काँग्रेस असं ‘तळ्यात मळ्यात’ करुन ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगालमध्ये त्यांची सर्व शक्ती एकवटली आणि २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वप्रथम सत्ता प्राप्त झाली . नेमकं सांगायचं झालं तर ,३४ वर्षांचं डाव्या आघाडीचं सरकार पायउतार झालं . तेव्हा ममता बॅनर्जी यांचा हा संघर्ष नेत्रदीपक राजकीय आदर्श मानला जात होता . एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , पश्चिम बंगालमधलं राजकारण आणि सत्ताकारण हे नेहमी प्रतिष्ठेच्या मुद्दयावर चालतं . जसं आपल्याकडे निवडणूक आली की मराठीचा प्रश्न उफाळून येतो किंवा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उफाळून येतो , तसं पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण होत असतात . ममता बॅनर्जी यांनी देखील मी या ‘मातीची मुलगी‘ आहे असा जोरदार प्रचार करत २०११ च्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केलेला होता . आताही पश्चिम बंगालची कन्या मीच आहे अशी हाक त्यांनी दिली आहे आणि त्यांच्या या हाकेला जनता आता तरी चांगला प्रतिसाद देतेय असं दिसून येतंय .
आता भाजपकडे वळू यात – भाजप एक राष्ट्रीय आणि सर्वार्थानं बलदंड पक्ष आहे . पश्चिम बंगाल काबीज करण्याची भाजपची योजना जुनी आहे . भारताच्या पूर्व भागातील काही राज्यात भाजपनं सत्ता संपादन केलेली आहे . पश्चिम बंगाल राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीकोनातून प्रमुख राज्य आहे . याचं कारण या राज्यात लोकसभेच्या ४२ जागा आहेत . २०१९ च्या निवडणुकीत त्या ४२ पैकी १८ जागा जिंकण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि मतांची टक्केवारी जी आहे ४०. २ आहे त्यामुळे या निवडणुकीत सत्ता प्राप्तीची ईर्षा त्यांच्यात आहे . पण , भाजपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये पश्चिम बंगालमधे सतत चढ–उतार आढळून येतो . २०११ च्या निवडणुकीत भाजपला ४ टक्के तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मतांची ही टक्केवारी १० टक्क्यांवर आली ; ही चढ-उतार आव्हानात्मक आहे .