लिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१६

योजना यादव

बापूंनी डाळिंबाचा प्रत्येक दाणा वाटीत अलगद सोलला. एक-दोन कुजके दाणे बाजूला काढले. वाटी माझ्यापुढे धरली. तापाच्या झणक्यानं मी दिवसभर yojana yadavकाहीच खाल्लं नव्हतं. वाटी पुढं करत ते म्हणाले, डाळींब अख्खं खायचं. त्यातला एकही दाणा सोडायचा नाही. डाळिंबाच्या दाण्यातच एक दाणा असा असतो की तो खाल्ला की तुम्ही कधीच आजारी नाही पडत.
मग बापू, तुम्ही ते दोन कुजके दाणे बाजूला काढलेत. त्यातच तो असेल तर.
अरे, संजीवनीचा गूण असणारा दाणा कुजका कसा असेल ?
मला पटलं. पण तरीही अख्खं डाळींब काही खाता आलं नाही. बापूंनी निम्मं संपवलं. मग मी म्हंटलं, बापू आता तो संजीवनी दाणा तुम्ही खाल्ला की मी ते कसं कळेल ?
तर ते नुसतच कसंनुसं हसले.
तेंव्हा बापू घरीच असायचे. का ते मला फार कळायचं नाही. पण चार-पाच महिन्यात ते नीटचं कळालं. एके रात्री बापूंची शुद्ध हरवली. आई दातखीळ येऊन कोसळली. बापूंना दवाखान्यात हलवलं. आणि आईसमोर कांदा-चप्पल धरुन भानावर आणण्याचे प्रयोग सुरु झाले. बापूंचा ब्रेन ट्युमर अखेरच्या टप्प्यात होता. दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी बापू घरी आले. पांढऱ्या शुभ्र गाडीतून. चार-पाच जणांनी त्यांचा निस्तेज देह खाटावर आणून टेकवला. आईनं हंबरडा फोडला होता. बहिणी किंचाळत होत्या. एकदमच सगळ्या आत्या, मावश्या, मामे, गोळा झालेले. अख्खी गल्ली घरासमोर जमलेली. पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या लोकांचे जथ्येच्या जथ्थे घराकडं वळले होते. हार फुलं, गुलालानं अंगण माखलं होतं. दोन चुलत भाऊ अंगणात लाकडाची आडवी शिडी करत होते. मला नंतर थोडं मोठं झाल्यावर त्याला तिरडी म्हणतात ते कळालं. बापूंना खाटावरुन उचलून न्यायला चार माणसं आत आली. तर आईनं कालीचं रुप घेतलेले. त्यांना बापूंना हातच लावू देईना ती. मग मावश्यांनी तिला मागे ओढली. आई पुन्हा दातखीळ येऊन कोसळली. बापूंना उचलून त्या लाकडाच्या शिडीवर ठेवलं. पुन्हा त्यांच्यावर डोक्यापासनं पायापर्यंत पांढरं शुभ्र पांघरुन घातलं. आणि चौघांनी उचललं . मग बापू गेले. कायमचं. माझ्या आयुष्यातला पहिला पुरुष असं फसव्या गोष्टी सांगून निघून गेला.
त्यानंतर मी पाहिलेल्या बापूंपेक्षा त्यांच्या सुरस कथांनी निर्माण झालेली त्यांची प्रतिमाच डोळ्यांपुढे तरळत राहिली. आईचं आयुष्यभराचं दुःखं उफाळून आलं की ती बापूंच्या स्वभावातले खाचखळगे सांगायची. मुड चांगला असला की सगळ्या हळव्या गोष्टी. त्यामुळं बापू कधीतरी मला एकदम मायाळू आणि पुरोगामी वाटायचे. तर कधी पुरुषी. पण अक्कीनं , माईनं आणि राणीनं सांगितलेले बापू वेगळेच असायचे. माझा तरी गोंधळच उडायचा. एकाच माणसाची इतकी वेगवेगळी वर्णनं कशी असतात बुवा ? नंतर खूप वर्षांनी ते ही लक्षात आलं. की पुरुषासोबतचं नातं बदललं की त्याची वर्णनं पण बदलतात. आईला नवऱ्याकडून बाईला हवं असतं ते आणि तसचं आईला कधी मिळायचं तर कधी मिळायचं नाही. त्यामुळं तिच्या नजरेतली बापूंची प्रतिमा कालसापेक्ष होती, असं मीच कधीतरी ठरवलं. आणि माझ्या तीन-चार बहिणींनी सांगितलेली प्रतिमा मी जवळ केली. असही पोरीनं पोरीच्या नजरेतनंच बापाकडे पहायला हवं. बायकोच्या नजरेतनं लग्न झाल्यावर पहाणारच असतो की ? आणि अगदी लग्न नाहीच झालं आणि नवरा नावाचा प्राणी कसा असतो ते नाहीच कळालं तरी फार फरक पडत नाही, हे ही मी स्वतःला बजावलचं.
आम्ही पाच बहिणी आणि एक भाऊ. म्हणजे घरात आईला धरुन सहा बाया आणि एक छोटुला पुरुष. आमच्या या छोटुल्या पुरुषापुढं पुरुषांच्या धाकधपटशहाचा कसला आदर्शच नाही. त्यामुळे सिमोन द म्हणते तसं बाई जन्मत नाही घडवली जाते. तसं आमचं या छोट्या पुरुषाचं. तो माझ्याहून दोन वर्षांनी धाकटा. बापू गेले तेंव्हा मी आठेक वर्षांची आणि हा सहा वर्षांचा असेल. त्याचे पहिले धडेच असे बायांच्या गराड्यात सुरु झाले. सगळ्याच बायांचा त्याच्यावर अमाप जीव. पण माझं आणि त्याचं नातं मात्र भावा-बहिणीपेक्षा मित्र-मैत्रिणीचं जास्त. चादरीला भोकं पाडून रात्री टीव्ही पहाण्याचे उपद्व्याप असोत की सातवीत असतानाच्या त्याच्या पहिल्या प्रेमाची गुपितं असोत. सगळं माझ्यासोबत, माझ्यापाशी लपवून ठेवलेलं असायचं. पुरुष कायम मोठ्या स्वरात बोलतात, आदळाआपट करतात, दंगा करतात, बायकांवर आरडाओरड करतात, असले निकष आमच्या या पुरुषाला तो नवरा आणि बाप झाला तरी लागू झाले नाहीत. त्याला पाहून तर मला वाटतं की जगातला प्रत्येक पुरुष असा बायांच्या गराड्यात घडला जायला हवा, मग त्याचे बिघडायचे चान्सच रहाणार नाहीत. आमचा बंधुराजच बघा ना !? त्याला घरात कुणाच्या चेहऱ्यावर थोडीही दुःखाची छटा आलेली पहावत नाही. कुणी मोठ्या आवाजात बोललेलं आवडत नाही. मोठ्या बहिणीच्या एका हाकेत याची कामं पूर्ण होतात. पण त्यात तिच्या धाकापेक्षा तिच्याविषयीचा आदर असतो, हे त्याला आणि आम्हालाही पक्कं ठाऊक आहे. तसा तो सहा बायांच्या पदराखाली वाढलेला बाळचं. पण या पुरुषत्वाची भानगड मोठी गंमतीशीर असते बाबा. त्याच्या दहावीपर्यंत आम्हाला एक जीन्स बसायची. दहावीच्या सुटीत एका मावसभावाच्या लग्नात मी त्याचाच टी-शर्ट आणि जिन्स घालून मिरवत होते. बारावीत न जाने काय झालं. हा एकदमच ताडमाड झाला. दाटं मिसरुडं , आरुंद खांदे आणि एकदमच रुबाबदार झाला. मग एकदम तो पुरुषचं वाटायला लागला. आणि सहाही बायांना एकदम आधार वाटायला लागला. तो किती तयार होता माहित नाही, पण आमच्यातली प्रत्येक जन त्याच्याकडं जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी सज्जं झालेली. त्याला बिन-गेअरची सनी तर मी शिकवली. पण बघता बघता बाईक, बुलेट-बिलेट आणि तो चारचाकीपण चालवायला लागला. त्याला हे कसं जमत गेलं कुणास ठाऊक ? आणि मला का जमलं नाही ? मी त्याच्या आधी सनी शिकलेले पण तो माझी गाडी मागे टाकून कुठल्या कुठे पोचला ? मला अजूनही फक्त बटन स्टार्ट करता येणारी नॅन गिअरची गाडीच येते. सारखे प्रश्न पडतात, एका घरात, एका वातावरणात, एका आहारात वाढलेले आम्ही इतके वयाच्या ठराविक टप्प्यानंतर एका साचेबदध विभागणीत कसे विभागले गेलो. घरात पुरुष नसताना त्याच्यात या शारीर क्षमतेच्या करामती कुठून निपजल्या ? वयात येत असताना त्याच्याभोवतीचा मित्रांचा घोळका त्याला घडवत होता. शेजारीपाजारी छोट्या छोट्या गोष्टीतनं त्याच्यातल्या पुरुषत्वाची त्याला आठवण करुन देत होते. एकच अन्न खाऊन त्याच्या धमन्यांमध्ये जी ताकत होती ती माझ्यात उतरली नव्हती. पण मी परिस्थितीचं बाळकडू पिऊन मनाची ताकत वाढवलीय ते कळत होतं. पण साला , पुरुषात ते पण निसर्गदत्त असतं ,याचा प्रत्ययही घेतलाय मी. अशी किती गोष्टीत चढाओढ, तुलना केली मी त्याच्याशी. पण त्यापलीकडे मझ्या आयुष्यातला हा पुरुष , माझा भाऊ बंड्या पुरुषत्वाच्या तथाकथित निष्ठूरतेपसनं कोसो दूर आहे. त्याची चार वर्षाची पोरही ‘ ये बंड्या ‘ म्हणून त्याला धाक दाखवू शकते. तो कुणाला दबावाखाली ठेवू शकत नही. कुणावर हुकूमत गाजवत नाही. निव्वळ स्वतःची जबाबदारी समजून माणसं डोक्यावर वागवण्यापेक्षा त्याला सोबतीचा प्रवास महत्त्वाचा वाटतो. त्याला मी बाप, भाऊ, नवरा अशा साऱ्या भूमिकेत पाहिलयं. पण कुठल्याच नात्यात समोरच्या माणसाला फार तक्रारीची जागा त्यानं ठेवली नाही. अगदी झी मराठीच्या ‘होणार सून मी या घरची ’ मालिकेतला श्रीच आहे तो जणू. घरातल्या प्रत्येक बयेची स्वभाववैशिष्ट्य जाणणारा. प्रत्येकीला तिच्या कलानं समजून घेणारा.
माझ्या आयुष्यातली जडणघडणीतली बहुतांशी वर्ष बायांच्याच सहवासात गेलीत. त्यामुळं तथाकथित पुरुषसत्ताक कुटुंबांचा अनुभवच नाही. आईला आमच्या संमजस पणावर इतका विश्वास होता की तिनं कधी आमच्या कुठल्याच निर्णयात खोडता घातला नाही. पण त्याच वेळेला मी बरोबरीच्या मैत्रिणी पहायचे त्यांच्या साऱ्या कृतींमध्ये वडिलांचा दबाव जाणवायचा. वडिलांना चालत नाही म्हणून मनाजोगे कपडे घालायचे नाहीत. वडिलांना चालत नाही म्हणून मुलांशी बोलायचं नाही. असलं काही मुलींमध्ये पाहिलं की वाटायचं वडिल नावाचा प्राणी फक्त गोष्टी नाकारण्यासाठीच असतो की काय ? तेंव्हातर एकेकदा असही वाटायचं आपण खूप लहानपणी वडील गमावले म्हणून आपल्याला आपल्या मनासारखं जगता येतं आहे. आपणही त्याच धाकात वाढलो असतो तर आपल्यावरही सतत नजर रोखली गेलीय असं वाटलं असतं. आई कधी रागावली तर तसं बोलूनही दाखवायची. पण स्वातंत्र्य , मोकळेपण अनुभवायला मिळत असलं तरी त्यांच्या उणिवेनं आम्हा भावंडांवर अकाली जबाबदारीचं ओझही टाकलं होतं. आईची आर्थिक व्यवहारातली निपुणता आहे त्यात भागवण्याचं कसब शिकवत होती. त्यातनचं आत्मनिर्भतेचं महत्त्वही उमजत होतं. दुसरीकडं असही वाटत होतं की आपलाबाप असता तर सगळी जबाबदारी त्यानं उचलली असती. मुलींनी घर सावरायला काम केलेलं, कष्ट घेतलेलंही त्यांना चाललं नसतं. सहा –सात माणसांचं कुटुंब पोसायला कुतरओढ करत राहिले असते. खरतर ही पुरुषांवरची एक प्रकारची जबरदस्तीच नाही का ? कायम आपण खमके आहोत ते दाखवत रहायचं ? दुबळं, अशक्त, थकलेलं वाटूद्यायचं नाही. सातत्यानं स्वतःला सामर्थ्याच्या स्पर्धेत ओढत न्यायचं. महिना संपता संपता रित्या होणाऱ्या खिषाचं टेन्शन घेऊन अख्खं आयुष्य ढकलायचं. आमचे बापू कदाचित याच धागधुगीत लवकर गेले. पाच पोरी , त्यांची शिक्षणं, लग्नं, सगळ्या भावंडांचं अवलंबून असणं. जबाबदाऱ्यांची मोठीच्या मोठी साखळी होती त्यांच्यापुढं. जीवावर बेतेपर्यंत पेलली त्यांनी. स्वतःच्या अस्तित्त्वाची किंमत मोजून हे पुरुषपण सिद्ध करण्याची धडपड बहुदा प्रत्येक पुरुषाला करावी लागते. या अशा धडपडी पाहिल्या की पुरुषांच्या हातातली सत्ता, वर्चस्वाचा माज, असलं काही दिसतच नाही मला. खरतरं असल्या सत्तेच्या गुर्मीत असणारे पुरुष थोडकेच असतात, बाकी बहुसंख्य पुरुष कुटुंबाचा आधार होण्यासाठी झटणारेच असतात की ?
माझ्या आयुष्यातला तिसरा पुरुष मी दहावीत असताना आला. हे ध्यान मोठं गमतीशीर. दारात आला आणि त्याच्याच वयाच्या माझ्या बहिणीला त्यानं ‘बाळ’ म्हणून हाक मारली. माझा भाऊ आणि मी ते पाहून त्याच्या तोंडावरच खो-खो हसत सुटलो. आईनं हातात काठी घेईपर्यंत आमचं हसणं थांबत नव्हतं. स्वतःच्या वयाच्या पोरांना हा बाळ कसा म्हणत होता कोण जाणे !? हे पुरुषी मोठेपण किंवा समाजवादी मोठेपण असू शकतं असलं तेंव्हा कळत नव्हतं. तेंव्हा ते येडपटपणचं वाटत होतं. पण कसही का असेना , तो आला आयुष्यात. खरतर त्यानं त्या दिवशी आमच्या घराचं माप ओलांडलं. त्याच्याही नकळत. एक छोटा पुरुष आणि ढीगभर बायांच्या जगात त्यानं पाऊल ठेवलं. त्यानं घरात केंव्हा वडीलधारं स्थानं मिळवलं तेही कळालं नाही. त्यानं कुणाला थांगपत्ता न लागू देताच आमचं विशेषतः माझं पालकत्व घेतलं होतं. सोळा-सतरा वर्षांची तर होते मी. कवितेसारखं काहीबाही लिहिलेलं त्यानं थेट पेपरात छापून आणलं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महाग सॅंडल त्यानं मला आणली. माझी पहिलीवहिली स्वतःची जीन्सही त्यानचं आणली. सोळा वर्षाच्या पोरीची अशी काळजी घेणारा पुरुष आयुष्यात आल्यावर आणखी काय व्हायला हवं. तोच दिसायला लागला सगळीकडं. वेडावलेच एकदम. पुढच्या पाचेक वर्षात ते वेड वाढतचं गेलं. आणि दोनचार वर्षे टाईमपास करुन थेट बोहल्यावरच चढले त्याच्यासोबत. म्हणजे अगदी बोहल्यावर नाही. सत्यशोधक पद्धतीनं लग्न केलं त्याच्याशी. ती आयडीया त्याचीच. मला फक्त त्याच्या सोबत रहायचं होतं. ते लग्नातनं साध्य झालं तरी मला चालणार होतं. फक्त वैदिक पद्धतीनं , मुंडावळ्या-बिंडावळ्या बांधून, बैलपोळ्याचा बैल सजवल्यासारखं नको होतं. त्यानं सत्यशोधकचा मध्यम मार्ग काढला. त्यातही लग्नाचा खर्च चारा छावण्या आणि निराधार पोरांच्या आश्रमाला दिला. तोपर्यंत असही लग्नं होऊ शकतं, याची आमच्या शहरालाही कल्पना नसावी. पण त्यानं ते केलं.
खरतर माझ्या आयुष्यातला हाही पुरुष साच्यातला नव्हता. आईच्या हाताखाली स्वयंपाक शिकलेला. समाजसेवेचं बाळकडू घेऊन जन्मलेला. म्हणून नर्मदा आंदोलनापासून बाबा आमटेंसोबतही काम करुन आलेला. आमचं लग्न झालं आणि तो स्थिरावला. त्यानं पोर वयात सोडलेला घरोबा त्याला एकदमच हवाहवासा वाटू लागला. कष्ट करावे. पैसे साठवावे. घर बांधावं. पोर काढावं. वाढवावं. चांगला बाप होऊन दाखवावं. हा साचा त्यालाही सवयीचा झाला. आवडूही लागला. त्यानं त्याचं विश्वच त्यात पहायला सुरु केलं. मग त्याच्यातला तो चळवळ्या कार्यकर्ता कुठं दिसेनासा झाला. खरतर तो ही माझ्या भावाप्रमाणचं एकदम बदलताना मी पाहिला. कुटुंब ही प्राथमिक जबाबदारी असणारा.
माझ्या आयुष्यातला हा तिसरा पुरुष दाखल झाला. ती एका समाजवादी आणि व्यक्तीवाद्याची जोडी होती. माझा अवकाश माझ्यापुरता. त्याचं सामाजिक भान मात्र सदैव जागं. त्याच्यासोबत हिंडताना एखादी बाई तान्हुलं बाळं घेऊन एक-दोन रुपयाची भीक मागायला लागली की हा खिषातनं दहा-वीस रुपयाची नोट काढून द्यायचा. अशा रस्त्यावरच्या भटक्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी त्याच्यासोबतीत पाहिला. हे उदारपणही पुरुषांमध्येच अधिक असतं असं मला वाटतं. तेंव्हा मी भिकाऱ्यांकडे निरखून पहायचे . त्यांच्या ताटात पैसे टाकणाऱ्यांमध्ये नव्वद टक्के पुरुष असायचे. हे ही पुरुषांचं एकप्रकारचं जबाबदारीचचं भान आहे. जे मला अनिलमध्ये दिसलं. नवरा-बायको म्हणून आमच्यातलं नातं अगदी फार जगावेगळं नसेलही. पण पुरुषातल्या कनवाळूपणाचे अनेक अविष्कार मी त्याच्यात पाहिलेत. भाजीपाला घेताना तो दोन रुपयाची पेंढी तीन रुपयाला घेतो. त्याचं कारण विचारलं तर सांगतो, ‘दोन रुपयाच्या पेंढीतला एखादा रुपया तरी राबणाऱ्या हातांपर्यंत पोचायला हवा’. त्याच्या या छोट्या-छोट्या गोष्टींनी जगण्याबद्दलची दृष्टी बदलायला मदत केली. म्हणूनच मला त्याचं ‘नवरा’ असणं कधी अधिरेखित करावं वाटत नाही. त्याच्यातला माणूस त्याहून खूप मोठा वाटतो. आणि बाप तर त्याहून मोठा. लेकीला नऊ महिने पोटात वाढवलं नाही आणि अंगावर पाजलं नाही, इतक्या दोनच गोष्टी निसर्ग नियमामुळं तो करु शकला नाही. पण त्यापलीकडं मातृत्व-पितृत्वातल्या प्रत्येक योगदानाची तो समर्थ जबाबदारी पेलतो. इतकी की कधी कधी मी फक्त बघ्याच्या भूमिकेत असते. शारीरिक रचना आणि जडणघडणीमुळं बाई-पुरुषात स्वतंत्र गुण विकसित होतात. त्यावर दोघांच्या स्वभाववैशिष्ट्यांची विभागणी शक्य आहे. पण एरव्ही आपल्या आयुष्यातल्या माणसांची विभागणी आपण बाई-पुरुष अशी थोडीच करतो. त्याअर्थी आपल्या आयुष्यातला पुरुष आपण त्या नात्याच्या हळवेपणाच्या कक्षेतनं पहात असतो. भावनिक बंधांमधून त्याचं मोजमाप करत असतो. मग तो बाप, भाऊ असो वा नवरा. पुरुषाची भूमिका बदलली की त्याची वागण्याची पद्धत बदलते. मी अनेकदा माझ्या भावाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहाते, तेंव्हा तो मला भाऊ म्हणून अधिक भावतो. पण नवऱ्याला त्याच्या ‘नवरा’ आणि ‘बाप’ या भूमिकांमधून पहाते, तेंव्हा तो बापाच्या भूमिकेत प्रचंड ताकदीचा वाटतो. त्याची संगोपनाची पद्धत पाहिली की आपण याच्या पोरीला जन्म दिला आहे , याचं समाधान वाटतचं . पण कधी कधी हाच आपला बाप का नाही ? असही वाटतं. माझ्या आयुष्यात मुळातच ठार पुरुषी मानसिकतेचे पुरुष आलेच नाहीत. अगदी नवराही.
माझ्या आयुष्यातले हे अधोरेखित पुरुष . मी त्यांच्याविषयी किती गुळातल्या पाकासारखं लिहिलं आहे नाही !? त्यांच्या स्वभावात तथाकथित पुरुषातल्या तिखट बाजू नाहीतच का ? या पुरुषांमध्ये पुरुषी गूण नाहीत का ? हे मालकी भावनेनं कोरडे होत नाहीत का ? अर्थात होतात. पुरुषी म्हणून गणलेल्या आणि समाजानं घडवलेल्या स्वभावाची प्रतिबिंब यांच्यातही डोकावतातच. पण त्या स्वभावाचे किती लाड करायचे याचं भानही असायला हवं. माझ्या आयुष्यातल्या पुरुषांमध्ये ते भान आहे.
गर्दीत स्पर्शाला हपापलेले, शरीरबळाच्या जोरावर हिसकवून घेण्याची प्रवृत्ती असलेले, सत्तेनं माजलेले, पैशासाठी इमान विकणारे, राजकारणाच्या मस्तवाल गप्पा करणारे, बाईला दुय्यम लेखणारे पुरुषही मी पाहिलेत. अनुभवलेत. पण ते कधीच आयुष्याच्या एखाद्या कोपऱ्याचाही भाग झाले नाहीत. बाईच्या मनात एक अगदी तंतूमय चाळण असते. त्यातनं आत उतरायला कस लागतो. माझ्यासाठी ज्यांनी ही चाळण ओलांडली त्यातला प्रत्येक जन वेगळा आणि त्याच्या जागी परफेक्ट होता. तो तसा का होता ? किंवा खरचं एखादीच्या आयुष्यात अशी तक्रार न करण्याजोगी माणसं येऊ शकतात का ? या प्रश्नाची उत्तरं अगदी सोपी आहेत. ‘अपेक्षांची ओझी शक्य तेवढी कमी ठेवायची’ हे नात्याचं सूत्र ठेवलं की तक्रारीला जागा रहात नाही. आपल्या अपेक्षांचा विवेकी विचार करायला हवा. विशेषतः बाईनं. आयुष्यातल्या पुरुषांचं गुणांकन करताना तो माणूस म्हणून कमी पडतोय की आपल्या अपेक्षांचा रखवालदार म्हणून कमी पडतोय. याची परखड समिक्षा करता यायला हवी. नात्यातलं गिव्ह ऍण्ड टेक महत्त्वाचं आहे. आहेच. पण घेण्यादेण्यातला ताळमेळ साधता नाही आला की विद्रूपता येत जाते. त्यात प्रत्येक वेळी पुरुष चुकत नाही.
काटेकोर स्त्रीवादी मांडणीत अनेकदा तुलनेच्या फुटपट्ट्या इंचा इंचाचा हिशेब ठेवणाऱ्या असतात. मी ही तसे हिशेब ठेवलेत. मी चहा केला , तू कप उसळ. अशा बरोबरीतला विवेक नाकारता येत नाही. पण सहचर्याचे निकष याहून गहिरे असू शकतात. त्याला भावनिकतेचे विविधांगी स्तर असू शकतात. या साऱ्या शक्यतांचा विचार करुनच स्त्री किंवा पुरुषाच्या मुल्यांकनाचे पाठ अभ्यासावेत. नाहीतर झुकतं माप पडतं.
मला पुरुषांविषयी बोलताना फक्त पुरुषांविषयी बोलता येत नाही. किंवा बाईविषयी बोलताना फक्त बाईविषयी बोलता येत नाही. पुरुषाचं पुरुष असणं प्रतिक्रियात्मक असतं. तर बाईचं बाई असणं ही प्रतिक्रियात्मक असतं. ती सामाजिक जडणघडणीच्या साच्यातनं येणारी प्रतिक्रिया असेल . वा त्या त्या वेळच्या कालसापेक्ष विचारांची. समाज पुरुषाला पुरुष म्हणून घडवतो. त्याहून अधिक बिघडवतो. आणि बिघडलेल्या पुरुषांकडे बोट दाखवणाराही समाजच असतो. दुर्दैवानं तो समाजही पुरुषांनीच निर्माण केला आहे. तिथले आचारविचारांचे निकष , जबाबदाऱ्या त्यांनीच ठरवल्या आहेत. वरकरणी त्यांना हुकूमी दिसणारी व्यवस्था त्यांना जीवनसंघर्षाच्या लढाईत खोल गुंतायला लावते . म्हणून बळजबरी करणारा पुरुष मला सर्वात दूर्बल वाटतो. स्वतःच्या शारीर-मानसिक समाधानासाठी दुसऱ्यावर बळ वापरावं लागणं , याहून दुसरी हार काय असेल ? आपल्या आयुष्यातल्या पुरुषाला अशी बळजबरी करावी वाटू नये, यासाठी प्रयत्न करणं मला बाईची जबाबदारी वाटते.
आयुष्यातल्या पुरुषांविषयी लिहिताना नात्यातल्या पुरुषांकडे अग्रक्रम जाणं स्वाभाविक आहे. पण पुरुषाशी असणारं सर्वात सुंदर नातं कुठलं असेल तर मित्रत्वाचं. तिथलं मोजमापचं वेगळं. ज्याच्या खांद्यावर दोन अश्रू ओघळू द्यावे, पण अवलंबून न रहाता स्वतःचा स्वाभिमान जोपासता यावा, असा मित्र ही आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी. हे लिहिताना माझ्या डोळ्यासमोरुन काही चेहरा अलगत सरकत चाललेत. त्यांनी माझ्या आयुष्यातली त्यांची भूमिका नेमकी ओळखली आहे. ती स्विकारली आहे. त्याहून अधिकची ते अपेक्षा ठेवत नाहीत. आणि तरीही त्या नात्याबद्दल समाधानी आहेत. बाई-पुरुषातल्या नात्यात हे समाधान असणं, हीच प्रगल्भ नात्याची व्याख्या होऊ शकते. त्यासाठी आयुष्यातला प्रत्येक पुरुष मित्र व्हायला हवा…

-योजना यादव,
[email protected]
सौजन्य -मीडिया वॉच पब्लिकेशन

हे सुद्धा आवर्जून वाचा

पुरूष: रोस्टेड सॅण्डवीच–हिनाकौसर खान-पिंजार- http://bit.ly/2r5noTZ

कळालेल्या पुरुषाचा कोलाज-शर्मिष्ठा भोसले-  http://bit.ly/2qq4es1

पुरुष असाही! पुरुष तसाही!- हर्षदा परब – http://bit.ly/2quw8TN

पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडलाय, त्या पुरुषांसाठी- सानिया भालेराव- http://bit.ly/2r3YyUw

Previous articleकळालेल्या पुरुषाचा कोलाज
Next articleहिंदू व वैदिक धर्म वेगळे कसे?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here