बुद्धीच्या देशा…महाराष्ट्र देशा…

-साभार – गिरीश कुबेर, संपादक,‘लोकसत्ता’

तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख. अनेक बुद्धिप्रामाण्यवादी आणि सुधारणावादी चळवळकर्त्यांची, विचारवंतांची ही जन्मभूमी. देशातील अनेक पहिलेपणाच्या गोष्टी या भूमीत आकारास आल्या आणि मग त्या देशभरात पोहोचल्या. असं असताना आज महाराष्ट्रात तर्कवाद, वैचारिक अधिष्ठान यांचं वावडं का दिसत आहे? आपला समृद्ध वैचारिकतेचा, सुधारणेचा वारसा का लोप पावला? याचा आपण सर्वानीच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.*

राम गणेश गडकरी तथा ‘गोविंदाग्रज’ यांची वाङ्मयसंपदा कालातीत आहे. पण तरी त्यांनी ते ‘मंगल देशा, पवित्र देशा..’ हे ‘श्रीमहाराष्ट्रदेश गीत’ लिहिलं नसतं तर बरं झालं असतं का?

एक तर मराठी माणसाला बंगाल्यांसारखी संपूर्ण कविता पाठ नसते. आणि त्यामुळे गोविंदाग्रजांच्या कवितेतलं ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ इतकीच आणि इतक्यापुरतीच या कवितेची अनेकांना ओळख. आणि मग ते ‘राकट देशा’ मिरवणं वगैरे नेहमीचंच. तसा मराठी माणूस गोविंदाग्रजांना खरं ठरवण्याची एकही संधी वाया घालवत नाही. अगदीच कोणी कविताप्रेमी किंवा तत्सम असला तर त्याला पुढची फार फार तर ‘नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’ ही ओळ माहीत असते. या सगळ्यापलीकडे महाराष्ट्राची खरी ओळख आपण पूर्ण विसरून गेलो आहोत. हे आकारानं भव्य राज्य आपला साठावा वर्धापनदिन साजरा करत असताना या ओळखीशी नव्यानं ओळख करून घ्यायला हवी.

पारतंत्र्यात गाढ विसावलेल्या भारतात ‘तर्कवाद जागा करणारं देशातलं पहिलं राज्य’ ही महाराष्ट्राची खरी आणि अभिमानास्पद ओळख.

पेशवाईची अखेर होऊन शनिवारवाडय़ावर युनियन जॅक फडकायच्या आधी पाच र्वष युनायटेड किंगडमच्या- म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटने १८१३ साली ‘द ईस्ट इंडिया कंपनी अ‍ॅक्ट’ मंजूर केला. १८१३ चा चार्टर अ‍ॅक्ट म्हणून ओळखला जातो तो हा कायदा. त्यानुसार भारतीयांना आधुनिक शिक्षणासाठी उद्युक्त करण्याचा आदेश ईस्ट इंडिया कंपनीला दिला गेला. त्यासाठी वर्षांला एक लाख रुपयांची तरतूद राणीच्या सरकारनं केली. हे आश्चर्यकारक होतं. कारण त्यावेळपर्यंत भारतात स्थिरावलेले ब्रिटिश अधिकारी नेटिव्हांना अधिकाधिक पारंपरिक शिक्षणच कसं दिलं जाईल याचा विचार करत होते. अशा वेळी या आधुनिक शिक्षणाचा आग्रह ब्रिटिश पार्लमेंटनं धरला.

तो उचलून धरणारी पहिली व्यक्ती अर्थातच राजा राममोहन रॉय. हे नाव सगळ्यांना माहीत असतं. सतीची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करणारे वगैरे म्हणूनही आपल्याकडे या नावाचा दबदबा फार. त्या पहिलेपणाचा मान त्यांना द्यायलाच हवा. पण तरीही एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे रॉय आणि त्यांच्यानंतरचे बहुतांशी बंगाली सुधारक हे धर्मकेंद्री वा धर्मवादी होते. त्यामुळे रॉय यांची बंगाली परंपरा ही धर्माच्या अंगानेच गेली.

पण महाराष्ट्राचं (सुदैवाने) तसं झालं नाही. यात आदरानं घ्यायला हवं असं नाव म्हणजे बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६). ‘दर्पण’ या नियतकालिकाचे संपादक आणि मराठी पत्रकारितेचे अध्वर्यु या नात्याने ते अनेकांना माहीत असतात तसे. पण ‘दर्पण’ हे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात कमी महत्त्वाचं काम. बाळशास्त्री हे त्यापेक्षा कितीतरी मोठे होते. गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र ही शुद्ध विज्ञानाची अनेक अंगं आणि ती समजावून सांगण्यासाठी ग्रीक, लॅटिन, फ्रें च, अरेबिक, फारसी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि अर्थातच इंग्रजी इतक्या भाषांत पारंगत असा हा विद्वान एलफिन्स्टन महाविद्यालयात सहप्राध्यापक होता. ब्रिटिशांना त्यांच्या देशाचा इतिहास, इंग्रजी व्याकरण सुबोधपणे सांगणाऱ्या ग्रंथाचे लेखक बाळशास्त्री आणि गणित व शून्य यांचे महत्त्व सांगणाऱ्या पुस्तकाचेही लेखक तेच. इतकी चतुरस्र विद्वत्ता त्यांच्या ठायी होती. अनेक संस्थांची उभारणी त्यांनी केली. विचारशक्ती दीपवणाऱ्या त्यांच्या बौद्धिकांचा आनंद घेण्यासाठी आणि त्यातून नवीन काही समजून घेण्यासाठी शास्त्रीबोवांना ऐकण्यास अनेक मान्यवर नियमितपणे येत. त्यातील दोन नावं अनेकांना परिचयाची असतील. दादाभाई नवरोजी आणि भाऊ दाजी लाड. पण केवळ हेच काही बाळशास्त्रींचं मोठेपण नाही. इंग्रजी शिक्षणाचं कवतिक आणि समर्थन करतानाच ब्रिटिशांच्या करपद्धतीविरोधात, तसंच त्यांच्याकडून होत असलेल्या भारताच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात शास्त्रशुद्ध मांडणी करणारा हा देशातला पहिला अभ्यासक.

पुढे महात्मा फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई अशा एकापेक्षा एक तेज:पुंज महोदयांनी प्रशस्त केलेल्या समाजसुधारणेच्या मार्गाची मुहूर्तमेढ बाळशास्त्रींनी घातली. बालविवाहाविरोधात आणि विधवा-विवाहासाठी उठलेला हा पहिला मराठी आवाज. महाराष्ट्राने पुढे जो करकरीत बुद्धिवाद देशाला दिला आणि ज्या मुद्दय़ावर बंगाल आणि महाराष्ट्र यांची फारकत झाली, त्या तर्कवादाचे अर्वाचीन काळातील प्रवर्तक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. अवघ्या ३४ व्या वर्षी १८४६ साली ते निवर्तले.

पुढे त्यांनी दाखवून दिलेल्या बुद्धिवादाच्या मार्गाचे अनेक पथिक महाराष्ट्राला सुदैवाने लाभले. त्यांच्याच हयातीत उदयास येत असलेले भास्कर पांडुरंग तर्खडकर (१८१६-१८४७), त्यांचे ज्येष्ठ बंधू दादोबा पांडुरंग (१८४२-१८८२), त्याच तर्खडकरी माळेतले आत्माराम पांडुरंग (१८२३-१८९८), ‘लोकहितवादी’ नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख (१८२३-१८८२) अशी किती नावं सांगावीत? यातील प्रत्येकाचं कार्य इतकं मोठं आहे, की त्यावर स्वतंत्र लेख नव्हे, तर पुस्तक लिहिता येईल. यातले आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाजाच्या स्थापनेत होते. आणि त्यावेळी त्यांनी वैद्यकीतले सहविद्यार्थी भाऊ दाजी लाड यांच्या साह्य़ानं मुंबईत देवीच्या आजाराविरोधात लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. इतकंच नाही तर १८६८ साली अस्तित्वात आलेल्या ‘कंटेजियस अ‍ॅक्ट’ (साथीचे रोगप्रतिबंधक कायदा) मध्ये नोंदल्या गेलेल्या १४ व्या कलमाचं लेखन त्यांनी केलं होतं. हे तिघेही तर्खडकर बंधू हे हिंदू धर्मातल्या मागास प्रथांचे तितकेच कडवे टीकाकार होते. संमतीवयाचं प्रकरण खरं तर दूर होतं, पण त्यावेळी आत्माराम पांडुरंगांनी मुलींसाठी विवाहाचं वय २० असावं अशी मागणी करून भलतीच खळबळ उडवून दिली होती. हे असे तर्खडकर! आणि ‘ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्यांमधील अज्ञान हा सर्वात मोठा शाप’ असं कडकपणे मांडत, शेषशायी नागावर झोपणारा विष्णू, चंद्राला गिळंकृत करणारे राहू-केतू या ‘हिंदू ज्ञाना’ची यथेच्छ रेवडी उडवणारा बुद्धिवाद वयाच्या अवघ्या पंचविशीत दाखवणारे ‘शतपत्रे’कार गोपाळ हरी देशमुख ही महाराष्ट्राची परंपरा आहे.

ती अधिक सुदृढ आणि अधिक उंचीवर नेली जोतिबा-सावित्रीबाई फुले यांनी. वरील सर्व जण धर्मातील उणिवा दाखवत सुधारणा सुचवीत होते. पण महात्मा जोतिबा फुले (१८२७-१८९०) यांनी त्याहून पुढे जात धर्म-संकल्पनांत आमूलाग्र बदल सुचवला आणि ‘जात’ ही संकल्पनाच मोडीत काढण्याचा आग्रह धरला. खरं तर महिला सुधारणा, सती-प्रथाविरोध वगैरे मुद्दे राजा राममोहन रॉय यांनी कितीतरी आधी उपस्थित केले होते. पण तरी महिला शिक्षणाची आणि स्त्रियांच्या एकूणच पुनरुत्थानाची पहिली हाळी आणि त्याप्रमाणे कृती ही फुले पती-पत्नींनी केली. ख्रिश्चन मिशनऱ्यांची संस्था पाहिल्यावर महिलांसाठी आपणही असे भरीव काही करावे असे वयाच्या अवघ्या विशीत वाटणारे आणि जे वाटले ते आचरणात आणणारे फुले ही महाराष्ट्राची खरी परंपरा. स्त्रीशिक्षणाची परंपरा त्यांच्यामुळे- कलकत्त्यात नव्हे- पुण्यात सुरू झाली, हीदेखील महाराष्ट्राच्या साठीत आठवावी अशी बाब.

हे असं बरंच काही सुरू असताना जॉन विल्सन नामक एका स्कॉटिश ख्रिश्चन मिशनऱ्यानं मुंबईत आणखी एक मोठी शिक्षणसंस्था काढायचा घाट घातला. ती संस्था म्हणजे मुंबई विद्यापीठ. विल्सन महाविद्यालय ही या जॉनचीच निर्मिती. मुंबई विद्यापीठाच्या जन्मामुळे बुद्धिवंतांच्या निर्मितीला काहीएक शिस्त आली. अंधारलेल्या वातावरणात एकामागोमाग एक तारे-तारका उमलत जाऊन आकाशाच्या अंगणात चांदण्यांचा खच पडावा तसा महाराष्ट्र त्यावेळी होत होता. मुंबई विद्यापीठामुळे त्याला एक संस्थात्मक आकार आणि अर्थ मिळाला. विद्यापीठाचा जन्म १८५७ चा. भारतीयांच्या मनात पारतंत्र्याची जोखडं उलथून टाकण्याचा अंगार फुलू लागत असतानाच बौद्धिक स्वातंत्र्याचीही पहाट त्याचवेळी उगवावी, हा खचितच मोठा योग. त्यानंतर या मराठी मातीनं जे काही भरघोस असं बुद्धिवंतांचं पीक अनुभवलं, त्याची तुलना १५ व्या शतकातल्या युरोपीय रेनेसाँशीच काही अंशी होऊ शकेल. त्यातल्या फक्त नावांवर जरी नजर टाकली तरी आजही छाती दडपेल.

विष्णु परशुराम शास्त्री (१८२७-१८७६), रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५), नारायण महादेव परमानंद (१८३८-१८९३), महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१), विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२), काशिनाथ त्र्यंबक तेलंग (१८५०-१८९३), गणेश वासुदेव जोशी (१८५१-१९११), नारायण गणेश चंदावरकर (१८५५-१९२३), गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५), पंडिता रमाबाई (१८५८-१९२२), धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२), रखमाबाई अर्जुन (१८६४-१९५५), गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५), बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०).. असे शब्दश: अनेक. आणि या सर्व प्रज्ञावानांच्या मालिकेचे मेरुमणी डॉ. भीमराव रावजी आंबेडकर (१८९१-१९५६). या सर्व व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचा परिचय काहीएक किमान बहुश्रुत मराठीजनांना असतोच असतो. पण यांच्याखेरीज असे अनेक आहेत की त्यांची पुरेशी ओळख मराठीजनांना राज्याच्या साठीतही नाही.

टिळक-आगरकर देदीप्यमान असताना वयाच्या चोविशीत ‘किरण’ हे अर्थविषयक नियतकालिक काढणारे, रुसो-टर्की युद्धावर त्यावेळी स्तंभलेखन करणारे महादेव नामजोशी, अमेरिकेतील राईट बंधूंप्रमाणे विमानोड्डाणाचा प्रयत्न करणारे शिवकर बापूजी तळपदे, बॉलीवूडचे जनक धुंडिराज ऊर्फ दादासाहेब फाळके, देशात सर्कस ही कल्पना प्रत्यक्षात आणणारे विष्णुपंत छत्रे, सौर्यमालेचा अभ्यास करणारे गणिती केरो लक्ष्मण ऊर्फ केरोनाना छत्रे, ‘भारतीय  एडिसन’ असं ज्यांचं वर्णन केलं जातं आणि ज्यांच्या नावावर २०० हून अधिक शोध आहेत असे डॉ. शंकर आबाजी भिसे अशी अनेक तेजस्वी मराठीजनांची नावे सांगता येतील.

ही माती अशी आहे की कडव्या उजव्या विचारांनाही तिनं आसरा दिला आणि रॉयिस्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या डाव्या चळवळीचीही मशागत तिनं केली. ‘रॅडिकल ह्य़ुमॅनिझम’ या बंगाली बाबू मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विख्यात विचारधारेचा जन्म पुण्यातला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे, गोवर्धन व इंदुमती पारीख, गोविंदराव तळवलकर, ह. रा. महाजनी हे अलीकडचे काही नामांकित रॉयिस्ट. संघ-संस्थापक आणि संघ-स्थापनाही महाराष्ट्रातली. आणि कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे हेदेखील महाराष्ट्रातलेच. देशात राखीव जागांचा जन्म महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात

राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात झाला. सार्वजनिक गणपतींसाठी लोकमान्यांचे नेहमीच कौतुक होतं. पण ‘हे गणपती उत्सवाचं सार्वजनिकीकरण उद्याचा उच्छाद ठरेल’ असं ठणकावून सांगणारे केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे या मराठी मातीतलेच. (राजारामशास्त्री भागवत म्हणजे दुर्गाबाईंचे आजोबा. यांचाही टिळकांच्या गणपती सार्वजनिक करण्याला विरोध होता.) नारायण मेघाजी लोखंडे हे पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक याच राज्यातले.

हा सगळा इतिहास आठवायचा याचं कारण.. आपण कोण आहोत याची जाणीव आजच्या मराठी माणसाला व्हावी! एकेकाळी या देशाचं राजकीय आणि त्यानंतर बौद्धिक नेतृत्व महाराष्ट्राकडे होतं याचा विसर पडून आपल्याला चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि डॉ. आंबेडकर हे त्या- त्या काळात महाराष्ट्रातून देश घडवत होते. ते असं करू शकले, कारण महाराष्ट्र हे देशातल्या तर्कवादाचं केंद्र होतं. बुद्धिगामी समाज ही या राज्याची देशाला देणगी.

साठाव्या वर्धापनदिनी आता कोणता निर्धार करायचा असेल, तर महाराष्ट्राला ते स्थान पुन्हा मिळवून देण्याचा असायला हवा. गोविंदाग्रजांच्या त्याच कवितेत ‘भावभक्तिच्या देशा.. आणिक बुद्धिच्या देशा’ अशीही एक ओळ आहे. भावभक्ती खूप झाली. आता ‘बुद्धिच्या देशा’ कसं होता येईल याचा विचार व्हायला हवा. ते ‘मोडेन, पण वाकणार नाही’ वगैरे आता पुरे.

येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. तशात आज आपण करोनाग्रस्ततेच्या  भीषण संकटातून जात आहोत. राज्याचा हीरकमहोत्सव ‘साजरा’ करण्याची ही वेळ नसली तरी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाकडे विविध परिप्रेक्ष्यांतून दृष्टिक्षेप टाकणं गैर ठरणार नाही; ज्यातून आपल्याला भविष्यातील वाटचालीकरता खचितच ऊर्जा मिळू शकेल..

Previous articleएका अँकरचा मृत्यू आणि…..
Next articleसमाधिस्त होण्यासाठीच या चौकशा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. महाराष्ट्राचे वैभव काय असावे असे,या,लेखातून वाचकाच्या सहज लक्षात येते.धन्यवाद दुधे सर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here