(साभार: साप्ताहिक ‘साधना’)
……………………………………..
-सुरेश द्वादशीवार
लहान मुलाने जेवढ्या उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावीत, तेवढ्याच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्तांएवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.
कर्तृत्व आणि गुणवत्ता या लपणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांची दखल समाज घेतही असतो. मात्र समाजाची नजर त्याबाबत जरा जडच राहत आली आहे. त्यातून अलीकडच्या काळात या नजरेवर जातिधर्मांचे आणि पक्षविचारांचे रंगीबेरंगी चष्मे आले आहेत. त्यामुळे खूपशी गुणवत्ता बेदखल राहण्याचीच शक्यता वाढली आहे. त्यातून समाजाचे नेतृत्व करतो म्हणणाऱ्यांच्याही अहंता निबर असतात. आपल्याहून पुढे जाऊ शकणाऱ्यांना अनुल्लेखाने, बेदखलीने मारण्याची, पडद्याआड ठेवण्याची पराकाष्ठा या वर्गाकडून चालते. आपण एखाद्याला मोठे म्हटल्यानेच तो मोठा होतो, असा कुरूप आत्मविश्वास काहींच्या ठिकाणी असतो. मग ते तसे म्हणणे शक्यतो टाळत असतात.
नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचेच वर्तमानपत्र विदर्भात चालायचे. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्वसंपन्न पत्रकार! असे संपादकीय नमुने महाराष्ट्रभूने काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हा या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्वसंपन्न लेखक होता. ‘तुमची आजवर किती पुस्तके प्रकाशित झाली?’ या माझ्या प्रश्नावर अत्यंत सहजगत्या यदुनाथ म्हणाले, ‘दीडेकशे असावीत.’ त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लिम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अप्रसिद्ध पुस्तकेही त्यात होती. मात्र या माणसाचा मोठा विशेष, माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही होता.
महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली, याची यादी करायची ठरविली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेये, ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणाऱ्या यदुनाथांना ती मान्य होणारीही नसेल. थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई तीत येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेड्यापाड्यांत ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहानमोठ्या कार्यकर्त्यांची नावेही तीत येतात. या यादीतल्या साऱ्यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असे काही केले आहे याचे यदुनाथांनाच स्मरण नव्हते.
अध्यात्माच्या सगळ्या साधनेचे लक्ष्य आपल्यातला ‘मी’ पुसून टाकणे हे आहे आणि अध्यात्माची कोणतीही साधना न करता आपल्यातला मी पुसून टाकणे यदुनाथांना जमले होते. कुणातही मिसळून जाऊन त्यांचे होणे ही सिद्धी त्यांना साधली होती. विचारवंतांसोबतची बैठक असो, नाही तर तरुण शिबिरार्थींचे एखादे चर्चासत्र असो, ते तिथे सर्वांचे आपले असत. चर्चा किंवा वाद करणाऱ्यांची एक नित्य अनुभवाला येणारी गंमत अशी की चर्चा वा वादाचा विषय तीत खूपदा गौण होतो आणि त्यात भाग घेणाऱ्यांची व्यक्तिमत्त्वेच महत्त्वाची होतात. विषयाबाबतची आपली बाजू लढविण्यापेक्षा माणसांचा कल आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावीपण दुसऱ्यावर ठसविण्याकडे असतो. परिणामी चर्चेचा विषय हरवतो आणि व्यक्तिमत्त्वांचीच दंगल उभी होते. यदुनाथांशी वाद करावा असे ठरवून आलेल्या वा त्यांना वादात ओढू पाहणाऱ्या माणसांची याबाबत नेहमीच एक फसगत व्हायची. आपला वैचारिक आग्रह न सोडता यदुनाथ संथपणे बोलत असत. व्यक्तिगत खुमखुमी घेऊन येणाऱ्यांना मग वाद सुचत नसे. खूपदा येणारा अनुभव असा की वादाला म्हणून आलेला माणूस यदुनाथांचाच विचार वेगळ्या भाषेत त्यांना पटवून देताना दिसे आणि यदुनाथ तो शांतपणे ऐकून घेत असल्याचे पाहून आपण जिंकल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. अशा वेळी आपल्या विचाराच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष ही यदुनाथांची जमेची बाजू असे. काही काळापूर्वी पुण्यातल्या समाजवादी सुधारकांवर टीका करणारा माझा एक लेख प्रकाशित झाला. त्यात या मंडळींनी महाराष्ट्रात एक फुकटची वैचारिक दहशत उभी केली असल्याचे मी म्हटले होते. यदुनाथ त्याच संप्रदायात वावरणारे. त्यांना त्या लेखाचा राग येईलसे वाटले होते. पण यदुनाथ भेटले तेव्हा शांतपणे म्हणाले, ‘जे थोडे असतात त्यांना दहशतीचाच मार्ग अनुसरावा लागतो.’
साने गुरुजी हे सगळ्या समाजवादी मंडळींचे श्रद्धेचे ठिकाण आहे. यदुनाथ तर गुरुजींच्या अतिशय निकट वावरलेले. गुरुजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथसोबत केलेले. ‘इस्लामी संस्कृती’ या आपल्या पुस्तकात त्या संस्कृतीच्या सहिष्णुतेची आणि संपन्नतेची महती गुरुजींनी गायिली आहे. मुस्लिम इतिहासाचा अत्यंत चिकित्सक अभ्यास नरहर कुरुंदकरांनी केला होता. या इतिहासात वा संस्कृतीत सहिष्णुता कशी अभावाने आढळते याविषयीची त्यांची मते स्पष्ट होती. बहुधा या पुस्तकावरून यदुनाथांशी आपला वाद होणार ही अटकळ त्यांनी मनात बांधली होती. त्यांनी विषयाला तोंड फोडले. ‘इस्लामी संस्कृतीचं जे स्वरूप गुरुजी सांगतात ते इतिहास म्हणून खरं नाही.’ कुरुंदकरांना शांत करीत यदुनाथ म्हणाले, ‘ते स्वाभाविकच नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणं हा गुरुजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे, यापेक्षा गुरुजींना ती कशी जाणवली याचंच चित्र त्या पुस्तकात उमटलं असणार!’ आपला सगळा आवेग अनाठायीच होता, हे कुरुंदकरांना जाणवले. साने गुरुजींविषयीची केवढीही गाढ श्रद्धा मनात असली तरी त्यांच्या संतमनाचे भाबडेपण आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या मर्यादा यदुनाथांना अगोदरच ज्ञात होत्या. आपल्या श्रद्धास्थानाचे सामर्थ्य आणि दुबळेपण यांची डोळस जाणीव असणारे मन त्यांना लाभले होते. आपल्या मनात ज्यांच्याविषयी श्रद्धा आहे, त्या थोरांच्या मर्यादा लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र त्याबाबत त्यांना कठोरही होता आले नाही. त्या मर्यादांच्या मागे असणाऱ्या भावनात्मक अडचणींची चिकित्सा करण्यावरच त्यांचा भर अधिक राहिला. अशा मर्यादांचे समर्थन करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधी केला नाही.
यदुनाथांचा आणि आनंदवनाचा स्नेह अतिशय पुराणा होता. बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर म्हणत. त्यांच्या सगळ्या योजना, प्रकल्पांत यदुनाथ आरंभापासून अखेरपर्यंत बरोबरीने भाग घेत. पण तिथेही आपले अस्तित्व पुसून टाकत ते सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेने वावरत. आनंदवनाच्या एका मित्र मेळाव्याच्या वेळी प्राचार्य राम शेवाळकर आणि मी रात्रीचे गप्पा मारीत एका खोलीत बसलो होतो. बाजूलाच एक पाहुणे तोंडावर पांघरूण घेऊन गाढ झोपी गेलेले दिसत होते. मी जरा चेष्टेच्या सुरात शेवाळकरांना म्हणालो, ‘नानासाहेब, तो स्वप्नांचा सहोदर येऊन दाखल झाला बरं का.’
त्यावर त्या बाजूला झोपी गेलेल्या पाहुण्याने तोंडावरचे पांघरूण दूर करीत म्हटले, ‘हो, आणि तो जागाही आहे बरं का.’ आणि उडालेल्या हशात तेथले सगळे दिलखुलासपणे सामील झाले.
बाबा आमट्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि इम्फाल ते द्वारका अशा काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत यदुनाथ तिच्या आखणीपासून यात्रेच्या सांगतेपर्यंत अग्रभागी होते. मात्र बाबांनी सरदार सरोवर प्रकरणात घेतलेली भूमिका त्यांना अमान्य होती. त्या भूमिकेला यदुनाथांनी जाहीरपणे विरोध करणे त्या दोघांच्याही जवळ असणाऱ्या कोणालाही आवडणारे नव्हते. या प्रकरणात धरणविरोधकांची केवळ एकच बाजू लोकांपुढे ठेवली जात आहे हे जाणवताच यदुनाथांनी सरदार सरोवर व्हावे, असे गुजराती लोकांना का वाटते हे सांगणारी एक प्रदीर्घ मुलाखतच मला दिली आणि तीत धरणविरोधकांचे सगळे युक्तिवाद उखडून टाकले. पण त्यांचा हा विरोध धरणाबाबतच्या भूमिकेएवढाच मर्यादित राहिला. पुढे एका कविश्रेष्ठाने जेव्हा बाबा आमट्यांनी सरदार सरोवराचा पिच्छा सोडून गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला जाहीररीत्या दिला तेव्हा त्याला उत्तर देताना यदुनाथांनी लिहिले, ‘सगळी कामे एकट्या बाबांनीच का करावीत? त्यांतली काही तुम्हीही का करू नयेत?’ वैचारिक भूमिकांबाबतचा हा संयम सांभाळणे अनेकांना अवघड होते. त्यासाठी आयुष्यभराच्या व्रतस्थतेचा रियाज लागतो. यदुनाथांनी आपल्या जन्मभराच्या भटकंतीत तो सांभाळला होता. नाही तर माणसांना नशेसारख्याच भूमिकाही चढत असतात. यदुनाथांना लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला दिसले नाही. आक्रमक होणे ही त्यांची प्रकृती नव्हती. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती आणि त्या प्रसन्न ठामपणाचा संबंध विचारांशी होता, अहंतेशी नव्हता.
गाडीत भेटावे आणि एखाद्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे यदुनाथ नकळत आयुष्यात येत आणि कायम मुक्कामाला राहत. त्या राहण्यात पाहूणपणाचा उपचार नसे. घरच्या माणसाचे आपलेपण असे. ‘तू खूप दिवसांत काही लिहिलं नाहीस’ असा मला तगादा करतानाच, ते माझ्या पत्नीला म्हणत, ‘काय करतो आताशा हा रिकाम्या वेळात? जरा त्याच्याकडून लिहून घे.’ नेमाने पत्र पाठवीत. मी उत्तराचा कंटाळा केला तरी त्यांची पत्रे येतच राहत. त्यातून सोबतीचा, पाठिंब्याचा दिलासा मिळत राही.
यदुनाथ थत्त्यांचे व्यक्तिमत्त्व गर्दीत हरवणारे होते. खादीच्या जाड्याभरड्या कपड्यातील हा साधा माणूस आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही करीत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कोणते तेजोवलय वा दीप्तिमान आभा नव्हती. आणीबाणीच्या परीक्षापर्वात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने जो एकाकी लढा दिला त्यामुळे त्यांच्याभोवती काही काळ असे वलय उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आणीबाणीच्या दमनचक्रापुढे अनेक गर्जणाऱ्या तोफा थंड पडल्या. स्वातंत्र्य, समतेच्या नावाने एरव्ही भीमदेवी थाटात बोलणारे व लिहिणारे, आणीबाणीचे आणि त्या काळातील दमनाचे स्तुतिपाठक बनलेले महाराष्ट्राने पाहिले. विरोधक म्हणविणाऱ्यांनी तडजोडीच्या शहाण्या जागा शोधल्या आणि भल्याभल्यांनी शरणागतीची पांढरी निशाणे हलविली. या काळात तुरुंगाबाहेरच्या मुक्या निषेधाला वाचा देण्याचे काम साऱ्या मराठी मुलखात ज्या थोड्या माणसांनी केले त्यात यदुनाथ थत्ते साऱ्यांच्या पुढे होते.
हे करायला त्यांना कोणी सांगितले नाही. ते करणे हा त्यांचा प्रकृतिधर्म होता. आयुष्यभर जी ध्येये प्राणपणाने जपली, त्यांच्यावरच्या संकटाच्या वेळी उभारावयाचा संघर्षही प्राणपणानेच लढवावा लागतो. त्यासाठी व्यक्तिजीवनच नव्हे तर प्रसंगी संस्थांचे जीवनही धोक्यात घालावे लागते. ज्या संस्था ध्येयांसाठी जन्माला येतात त्या आपल्या मूळ प्रेरणांपायी खर्ची पडल्या तरी चालतील. मूळ ध्येयवाद वाऱ्यावर सोडून संस्था सांभाळणाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची टिमकी मिरवायची असते, पराक्रमावर हक्क सांगायचा नसतो. ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकावर त्या काळात बंदी यायची. सरकार जमानत म्हणून मोठी रक्कम मागायचे. स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे ही रक्कम दर हप्त्याला यदुनाथांच्या स्वाधीन करीत. साधना बंद पडले तेव्हा ‘जनता’ सुरू झाले आणि ‘जनता’वर बंदी आली तेव्हा आणखी नवे नाव घेऊन ते पत्र पुन्हा प्रकाशित झाले. यदुनाथांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी जो लढा आणीबाणीत दिला त्याचा गौरव करताना पु.ल. म्हणाले, ‘संपादक म्हणून जे दिव्य लोकमान्यांनी केले तेच नंतरच्या काळात यदुनाथने पत्करले.’
यदुनाथांनी नंतर अल्पावधीत हे वलय मिटवून टाकले आणि सामान्य कार्यकर्त्यांत व आपल्यात येऊ पाहणारे अंतर प्रयत्नपूर्वक नाहीसे केले. असामान्यांच्या मोठेपणाचे आकर्षण त्यांनाही होतेच. असामान्य व्यक्तीविषयीचा श्रद्धाभावही त्यांच्या मनात होता. मात्र अनेक मोठ्या माणसांचा एक विशेष असा की त्यांचे मोठेपण इतरांना ओझ्यासारखे सतत वाहावे लागत असते. त्यांतल्या अनेकांना हे असे दुसऱ्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवणे मानवतही असते. आपल्या मोठेपणाचे ओझे कोणालाही जाणवायला नको असेल तर ते अगोदर स्वतःच्या अंगावरून उतरून ठेवावे लागते. ते तसे उतरवून ठेवण्याची असामान्य कलाच यदुनाथांना अवगत होती. उपचाराचे अंतर एकदा संपले की यदुनाथ दूरचे राहत नसत आणि मग त्यांचे मोठेपणही उरत नसे. ते प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलत आणि तसेच वागत. मग यदुनाथ सगळ्यांचे मित्र होत. साधना नावाच्या भारदस्त पत्राचा इतिहास घडविणारा संपादक, आंतरभारतीचा महत्त्वाचा आधार, महाराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत पसरलेल्या शेकडो युवक चळवळींचा मार्गदर्शक प्रणेता आणि शेकडो पुस्तकांचा लेखक इ…इ.. सगळे विस्मृतीत जाई. फक्त यदुनाथच तेवढे मागे उरत.
यदुनाथ जेवढे साधे दिसत तेवढ्याच साधेपणी ते बोलत अन् लिहीतही. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला अलंकारांचा सोडा, साध्या तेल-पावडरीचाही सोस नव्हता. तरीही त्यांचे बोलणे प्रभावी होते. त्यांचा सहजसाधा शब्द थेट काळजापर्यंत जायचा. हा माणूस हातचे राखून बोलत वा लिहीत नव्हता. साधे पत्र लिहावे तेवढ्या साधेपणी पुस्तकाचा मजकूर ते लिहीत अन् तेवढ्याच सहजपणे तो हातावेगळा करीत. पण साधेपणाच दुर्मिळ होत असलेल्या या काळात त्यांच्या या अलंकारशून्य सहजतेत निखळ माणुसकीचा साक्षात्कार व्हायचा आणि श्रोते त्यांच्या व्याख्यानात तल्लीन व्हायचे. त्यांनी सांगितलेले सारे ऐकायचे अन् त्यांनी गायला सांगितले तर ते गायचेदेखील.
प्राथमिक शिक्षकांच्या एका राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन त्यांनी केले. अधिवेशनाच्या मंडपात पंधरा हजारांवर शिक्षक जमले होते. व्यासपीठावर मंत्री, अधिकारी, विचारवंत, समाजसेवक अशी गर्दी. यदुनाथांनी व्याख्यानाच्या मध्येच एक कोरस म्हणायला सुरुवात केली आणि सगळ्या अधिवेशनाला आपल्या मागून ते म्हणायला सांगितले. मला क्षणभर भीती वाटली. यदुनाथांचा आवाज गायकाचा नव्हता. त्याला गोडव्याचा फारसा स्पर्शही नव्हता. आपल्या सहजसाध्या आवाजात श्लोक म्हणावा तसे त्यांनी कोरस म्हटले आणि तिथल्या प्रत्येकाने ते त्यांच्या मागून म्हणत सारा मंडप दणाणून टाकला. एका शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलांना उद्देशून ते म्हणाले, ‘भारत हा माझा देश आहे, असं रोज म्हणता ना? मग तो असा दरिद्री, अर्धपोटी आणि बेकार का, हे आपण स्वतःला विचारणार की नाही? सगळे भारतीय माझे बांधव म्हणता तर मग हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा उच्चवर्णीय असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही?…’ ती सगळी चिमुकली प्रजा यदुनाथांच्या प्रश्नांनी अंतर्मुख आणि हतबल होऊन गेली. या कमावलेल्या, जोपासलेल्या विनम्र साधेपणामागे साधुगिरीचा सोस नव्हता. साऱ्यांना जवळचे वाटावे हाही हव्यास नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली एक व्यापक बैठक होती. मानवी जीवनाचे अत्युच्च विकसन म्हणजे विचारांचे शासन होय, अशी यदुनाथांची धारणा होती. जेव्हा दंडशासनाची जागा विचारांचे शासन घेईल तेव्हा मानवी संस्कृती ही विकासाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचलेली असेल. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची चिंता वाहणाऱ्यांना हे आवाहन सतत डोळ्यांसमोर ठेवावे लागेल. शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे.
यदुनाथांची श्रद्धा अशी की, शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिद्ध व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुद्धा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचे भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दाचे भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे कीड-कीटकदेखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर हे हृदयपरिवर्तनाचे आवाहन आहे. हृदयपरिवर्तनासाठी त्याला भावेल अशाच शब्दांत विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळ्या आतषबाजीतून येणारे दीप्तिमान झोत आणि शब्दांच्या समईतून प्रगटणारा मंद प्रकाश या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी, मंगलमय.
रूसो म्हणाला होता, ‘तुमच्या एकाही शब्दाशी मी सहमत नसलो तरी तुमचे म्हणणे मांडण्याचा तुमचा अधिकार कायम रहावा म्हणून मी लढायला मागेपुढे पाहणार नाही.’ ही भूमिका वैज्ञानिक आहे आणि कोणताही वैज्ञानिक आपल्याला अंतिम सत्य गवसले असल्याचा दावा करीत नाही. आजची कल्पना हे उद्याचे सत्य ठरू शकते आणि आजचे सत्य हा सत्यशोधनाच्या मार्गावरील फक्त एक टप्पाच ठरू शकतो. सापेक्ष सत्याच्या आधारे प्रयोग करीत राहणे आणि प्रयोगांती नवे सत्य समोर आले तर त्याचा उमदेपणाने स्वीकार करणे ही वैज्ञानिक भूमिका आहे.
यदुनाथ विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि विज्ञाननिष्ठा हे त्यांचे जीवनव्रत होते. ज्ञान हा अनंतकाळापर्यंत वाहणारा सनातन प्रवाह आहे. तो कोणत्याही ग्रंथापाशी थांबत नाही व गुरू केवढाही मोठा असला तरी तो ज्ञानाचा पूर्णविराम ठरत नाही, ही विज्ञाननिष्ठ मनाची भूमिका आहे. म्हणूनच ‘जगातील सगळी ग्रंथालये जाळून टाका; कारण सगळे ज्ञान कुराणात आले आहे,’ ही मागणी या मनाला जशी मान्य होणार नाही तसे ‘सगळे ज्ञान वेदांत आले असल्याने त्यावरच्या निष्ठाच तेवढ्या अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या आहेत’ ही श्रद्धाही त्याला भावणारी नाही. व्यास आणि बुद्ध हे ज्ञानाचे पूर्णविराम नाहीत आणि मार्क्स आणि गांधींजवळही ज्ञानाचा प्रवाह थांबणारा नाही. आपल्या श्रद्धास्थानांना ज्ञानाचे अंतिम निकष मानून थांबणारे लोक ज्ञान वाढवीत नाहीत. आपापल्या श्रद्धास्थानांचे ते फक्त देव्हारे माजवीत असतात. त्यात ज्ञानोपासनेपेक्षा महंतगिरीच बलवत्तर असते. कोणताही विज्ञाननिष्ठ माणूस अशा महंतगिरीचा उपासक असणार नाही. गुलाल उधळला काय आणि नीळ उधळली काय, अखेर दोन्हींतल्या अंधश्रद्धेचे कूळ एकच असणार.
यदुनाथ थत्त्यांची विज्ञानोपासना अशी खणखणीत बुद्धिवादाच्या अधिष्ठानावर उभी होती. आठव्या शतकातल्या क्युरेश जमातीतले काही प्रश्न निकालात काढण्यासाठी सलिवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर काही सुधारणा सुचवितात. तो काळ धर्माच्या भाषेत बोलणारा असल्यामुळे आपला विचार तो धर्माच्या परिभाषेत सांगतो आणि हाडामांसाच्या माणसाचे म्हणणे कुणी ऐकत नाही म्हणून हा विचार अल्लाने आपल्या दूतांकरवी माझ्यापर्यंत पोहोचविला असे म्हणतो व त्यातून इस्लामचा जन्म होतो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकातल्या वैदिक धर्मातील हिंसाचाराला विरोध करण्यासाठी त्या हिंसेमागच्या प्रेरणांनाच सिद्धार्थ आव्हान देतो. हे आव्हान तेव्हाच्या धर्माच्या परिभाषेत येते. ते बुद्धमुखातून येते आणि नव्या धर्माचे प्रवर्तन सुरू होते.
तत्कालीन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा तत्कालीन भाषेतून झालेला प्रयत्न हे सर्व धर्मांचे जन्मकारण आहे आणि तसेच ते समजून घेतले पाहिजे. विसाव्या शतकाचे निकष जसे पैगंबराच्या किंवा बुद्धाच्या काळाला लावता येत नाहीत तसे कुराण व स्मृतींच्या कायद्याच्या आधारे विसाव्या शतकातले प्रश्नही सोडविता येणार नाहीत. हा विज्ञाननिष्ठ बुद्धिवादातून साकारणारा सेक्युलॅरिझम आहे. यदुनाथ अशा सेक्युलर विचाराचे कृतिशील कार्यकर्ते होते. ‘एक गाव एक पाणवठा’ ही बाबा आढावांची चळवळ असेल किंवा मुस्लिम सुधारणावादाचा हमीद दलवाईंचा भव्य प्रयत्न असेल, यदुनाथ अशा कामांचे दायित्व स्वतःहून शिरावर घेत आणि आपले काम म्हणून त्यासाठी झिजत. मात्र करड्या बुद्धिवादाने वा चिकित्सक सेक्युलॅरिझमने यदुनाथांना रूक्ष किंवा कोरडे बनविले नाही. जीवनातील ऋजुता आणि गोडवा यांच्याशी आपले नाते त्यांनी तेवढ्याच हळुवारपणे जपले. म्हणून लहान मुलांसाठी त्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेत पुस्तके लिहिणे त्यांना जमले. साहित्य संमेलनांमधून उद्याच्या या वाचकांचा म्हणजे बाल वाचकांचा विचार होत नाही याचा त्यांना राग यायचा आणि तरुण मुलामुलींच्या मनांची जपणूकही त्यांना साधायची.
बुद्धिवादाने त्यांना अश्रद्ध बनविले नाही, उलट त्यांच्या जीवनातील सगळ्या श्रद्धा बुद्धिवादाने डोळस केल्या. व्यक्तिपूजेचे स्तोम न माजविणारे ममत्व त्यांना साधले आणि त्या ममत्वाला आपल्या चिकित्साबुद्धीवर मात करू न देणारा आत्मसंयमही त्यांना जमला. मराठी बुद्धिवादाला अलिकडच्या काही दशकांत अहंतेचा विकार जडला आहे. इथला प्रत्येक बुद्धिवादी हा एक स्वतंत्र तिरशिंगराव आहे आणि इतरांकडे पुरेशा तुच्छतेने पाहणारा तुच्छतावादीही आहे. आपला बुद्धिवाद सतत गर्जून सांगणाऱ्या अनेकांची एक आणखीही गंमत असते. त्यांच्या बुद्धिवादात त्यांच्या स्वतःच्या बुद्धीखेरीज इतरांच्या बुद्धीला मान नसतो. अशी तापदायक माणसे आपल्या बुद्धीच्या बेटांवर एकेकटीच आरामात राहतात आणि इतर कोणी आपल्याजवळ येणार नाही अशी स्वतःच व्यवस्थाही करतात. यदुनाथांचा बुद्धिवाद असा स्वयंकेद्री नव्हता. मुळात त्यांचा प्रयासच स्वतःचे असे केंद्र मोडीत काढण्याचा होता. म्हणून त्यांचा बुद्धिवाद खुपणारा नव्हता, तो माणसे जोडणारा होता. यदुनाथांच्या पायात अखंड घुमणारे एक चक्रीवादळ होते. ते त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यांतून सतत घुमवीत होते. माणसे, प्रेरणा, संस्था आणि स्वप्ने दाखवीत होते. या देशाच्या भविष्याचे अंकुर जपत, फुलवत आणि वाढवत यदुनाथ देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत अखंडपणे फिरत. त्यासाठी त्यांना बोलवावे लागत नसे. त्या अंकुरांचा सुवास थेट त्यांच्यापर्यंत निमंत्रणासारखा पोहोचत असे.
कोणत्याही ‘आदरणीय’ शब्दाच्या वाट्याला अवमूल्यनाखेरीज काही येऊ नये असा हा दुर्दैवी काळ आहे. या काळात मूल्यनिष्ठा हा खरे तर जाणकारांच्या कुचाळीचा आणि उपहासाचा विषय. अशा वेळी मूल्यांवरची ज्याची निष्ठा प्रामाणिक असेल त्याला दरक्षणी आपल्या सच्चाईची किंमत चुकवावी लागते आणि चुकवता आली नाही तर तिच्या कर्जाचे ओझे आयुष्यभर अंगावर वागवावे लागते. यदुनाथ थत्ते हा माणूस हे मोल चुकवीत होता आणि ते चुकविल्यानंतर त्याचा भार अभिमानाने ओढतही होता. अशा माणसाला कसलीही जाहिरात न करता अपरिग्रहाचे व्रत घ्यावे लागते आणि त्याची उपासनाही आयुष्यभर करावी लागते. यदुनाथांना आयुष्याच्या उत्तरार्धात घर मिळाले तेही पत्रकारांसाठी कॉलनी झाली त्यात. त्यातले श्रीमंतीचे एकमेव लक्षण त्यांच्याजवळच्या ग्रंथांच्या संग्रहाचे.
फिरत जगणे ही यदुनाथांची साधना. या साधनेचेच त्यांना वेड राहिले. त्यापुढे साध्याचा मोहदेखील त्यांना कधी थांबवू शकला नाही. ते ज्यांना श्रद्धास्थानी मानत त्या गांधींनीही म्हटले होते, ‘साधनांची काळजी करणेच तेवढे आपल्या हाती असते.’ माणसे जोडत हिंडणाऱ्या यदुनाथांची ‘माणसे’ हीच मिळकत आणि श्रीमंती होती. त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची माहिती ज्यांना आहे त्यांनाच तिचे मोल कळणारे आहे. मतभेद मान्य, पण मतभेद करणाऱ्या माणसाचा दुरावा अमान्य, असा हा ध्यास आहे. एखादे माणूस तुटले आणि दूर गेले की त्यातून येणारे रितेपण अशा माणसांना सतत छळत असते. शिवाय ही गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादितही नसते. आपण आपल्या मानलेल्या माणसांनी एकमेकांपासून दूर झालेलेही त्यांना चालत नसते.
यदुनाथांना जीवनाची चांगली बाजूच तेवढी पाहता आली. माणसांचे विकार माणूस म्हणून क्षम्य असल्याचे मत त्यांनी अभ्यासपूर्वक बनवले होते. म्हणून महात्म्यांनाही क्षुद्र होताना पाहून त्यांना त्याचा धक्का बसत नसे. ‘अरे, शेवटी मोठा झाला तरी तो माणूसच’ असा त्यांचा अभिप्राय असे आणि ‘त्याचे विकार त्याच्यापाशी, तुला आणि मला त्याची चांगली बाजूच महत्त्वाची वाटली पाहिजे,’ हा वर उपदेश. जीवनाकडे पाहण्याचा विधायक वगैरे म्हणतात तो हाच दृष्टिकोन असावा. गांधी ज्याला सत्याग्रहाची साधना म्हणायचे तीही हीच असावी. त्यांच्यासोबत पंजाबच्या दहशतग्रस्त ग्रामीण भागातून फिरत असतानाची गोष्ट. अमृतसरजवळच्या तरणतारण या शिखांच्या पवित्र क्षेत्री त्यांचा मुक्काम होता. तेथे मी त्यांना भेटलो आणि मग फतेहाबाद, अमृतसर, वाघा, बियास, फिरोजपूर, होशियारपूर अशी आमची फिरस्ती सुरू झाली. प्रत्येक गावात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराधांच्या कुटुंबात आम्ही जात होतो. त्यांचे सांत्वन करणे आमच्या ताकदीबाहेरचे होते. पण त्यांना मिळणारी सरकारी मदत वेळच्यावेळी आणि पुरेशी मिळते की नाही, त्यातल्या अडचणी कोणत्या याची माहिती आम्ही घेत होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगत होतो.
मला हा तात्पुरत्या मलमपट्टीचा व आमच्याच मानसिक समाधानाचा उपक्रम वाटत होता. त्यातून कोणताही मूळ प्रश्न निकाली निघत नाही असे वाटत होते. एकदा मी हे यदुनाथांना सांगितले तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ‘जे प्रश्न सरकारांना सोडवता येत नाहीत ते आपल्या हाती निकालात निघावेत ही आकांक्षा बाळगणे हेच मुळात चुकीचे.’
मी म्हणालो, ‘मग आपल्या पायपिटीला अर्थ कोणता?’ यदुनाथ म्हणाले, ‘यातून आपण काही शिकलो की नाही? जे शिकलो ती उपलब्धी. आपल्या प्रयत्नांनी इतरांची जाण किती वाढते याहूनही आपली जाणीव विस्तारते की नाही हे पाहणे महत्त्वाचे.’
गांधी म्हणाले होते, ‘सत्याग्रह कोणाही विरुद्ध नसतो, कशाही विरुद्ध नसतो आणि काही मिळवायचे म्हणूनही नसतो. तो आत्मसामर्थ्य वाढविण्याचा मार्ग आहे.’ यदुनाथजींची आयुष्यभराची पायपीट ही गांधीजींचा असा सत्याग्रही होण्याची होती.
याच दौऱ्यात एकदा मी त्यांना चेष्टेने विचारले, ‘पंजाबच्या भूमीवर शहीद-बिहीद होण्याचं तर तुमच्या मनात नाही?’ त्यावर प्रसन्न हसत ते म्हणाले, ‘खुळा की काय, अरे आपल्यावर गोळी झाडायला अतिरेक्यांना वेडबिड लागलं का? आपली गोळी कोणावरही वाया दवडू नये एवढं त्यांना चांगलं समजतं!’
यदुनाथ फिरत राहिले. तरुणांना भेटत अन् बोलत राहिले. मित्र जमवण्याचे व्यसन त्यांनी अखेरपर्यंत जोपासले. कोणतीही ठोकळेबाज विचारसरणी न सांगता ते स्वतंत्र विचारांचे मार्ग सांगत राहिले. माझ्या स्वभावापायी यदुनाथांसारखी माणसे नुसतीच जोडणे मला जमले नाही. पण मला अंतरलेली माणसे पुन्हा माझ्याजवळ आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल मी पाहिली आहे. आपल्या विस्तारलेल्या परिवारातली माणसे नेहमी भेटावीत, त्यांचे परस्परसौहार्द कायम असावे आणि आपण जसे एखाद्याला प्रोत्साहनाने फुलवतो तसे त्यांनीही करावे ही त्यांची इच्छा असे.
एखाद्या लहानशा स्टेशनावर अंधाऱ्या रात्री गाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती रॉकेलचा उंच दिवा घेऊन एक कामगार गाडीच्या चाकांवर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हाती तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. यदुनाथ थत्त्यांची आठवण झाली की मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकांत तेल ओतणारा तो माणूस आठवतो. सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी असते आणि अशी माणसे आपल्याजवळची असणे हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. केव्हाही येणारा असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवणारा, त्यात प्रकाशकणांची पेरणी करणारा आणि आला तसाच नकळत निघून जाणारा असतो.
(सुरेश द्वादशीवार हे नामवंत लेखक आणि विचारवंत आहेत)
9922928221
सुरेश द्वादशीवार यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सुरेश द्वादशीवार– type करा आणि Search वर क्लिक करा.