वास्तव आणि स्मृतींच्या गोंधळात जगण्याचा अर्थ सांगणारा – “द फादर”:

नीलांबरी जोशी

सहजच समोर नजर जाते.. दिवाणखान्यातल्या रॅकवर ठेवलेलं एक घड्याळ दिसतं.. जरासं जुनाट भासणारं ते घड्याळ पाहून क्षणार्धात मन ज्या दुकानात ते घड्याळ घेतलं तिथे पोचतं.. “अॅंटिक लुक असणारं ते घड्याळ चालेल का? आत्ता आपल्याकडे इतके पैसे नाहीत अशा वस्तूंची खरेदी करायला” असे संवाद आठवतात. नंतरच्या ४० वर्षांमध्ये ते घड्याळ टिकलं याचं अप्रूप मनात येतं आणि येणा-याजाणा-यांनी त्या घड्याळाचं केलेलं कौतुक आठवतं.. ओठांवर एक मंदस्मित तरळतं..

स्वयंपाकघरात चहा करायला यावं तर एक जरासा टवका गेलेला मग दिसतो.. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला नव-यानं काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून हिरमुसल्यावर त्यानं हा फुलांच्या नक्षीचा मग दाखवल्यावरची डोळ्यातली चमक आठवते.. पाच वर्षांपूर्वी गेलेल्या नव-याच्या आठवणीनं डोळ्यात पाणी तरळतं..

बेडरुममध्ये फोटोफ्रेम दिसते.. सगळ्या कुटुंबाच्या फोटोत छोटा नील त्याच्या आईच्या मांडीवर बसलेला दिसतो.. कौमुदी, जावई आणि नील यांचे अमेरिकेतल्या नवीन घरातले मागच्याच आठवड्यात फोटो आलेले असतात.. मनातून आनंद होतो.. आता कधी जाणं होणार परत ? असा विचार मनात तरळून जातो..

बाहेर बागेत असताना अचानक आलेल्या पावसानं लहानपणी शाळेतून परत येताना रमतगमत भिजत आल्याच्या आणि आईनं काळजीनं खसाखसा केस पुसल्याच्या आठवणी दाटतात..

आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात अशा आठवणी क्षणोक्षणी दाटत असतात.. अनेक भावना आणि त्या भावनांच्या असंख्य छटांचा फेर आपल्याभोवती असतो. पण त्या सगळ्या आठवणी आहेत, आत्ता ते घडत नाहीये याचं भान जागृत असतं..

पण जर..

ते भान संपलं तर? आठवणी आहेत हे न समजता आपण त्या प्रसंगात, त्या काळात तिथे आहोत असं समजून भोवतालच्या लोकांशी तसं वागायला लागलो तर? मुलगी समोर असताना आपल्या मनात बालपण असल्यानं मुलीला आपण ओळखणारच नाही, भोवतालच्या वस्तू आणि आईवडिलांच्या घरातल्या वस्तू यांचा मेळ लागणार नाही. खिडकीतून दिसणारं दृश्य अपरिचित भासेल आणि अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होतील.

हे “असं झालं तर?” याचं एक कातर चित्र “द फादर” हा चित्रपट समोर उभा करतो. अपरिहार्य, अनादि, अनंत असणा-या मृत्यूचं अनेकांना भय वाटतं. पण वास्तव आणि स्मृतींची दुनिया यांचा गोंधळ उडाला तर जगण्याचा अर्थ काय? असे प्रश्न “द फादर” निर्माण करतो.

“अल्झायमर – डिमेंशिया” या विकारावर आधारित मोहनलालनं रंगवलेल्या व्यक्तिरेखेचा “थनामात्रा”, डॉ. मोहन आगाशे यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखेवरचा “अस्तु”, अभिताभचा “ब्लॅक”, The notebook, On golden pond.. असे अनेक चित्रपट आहेत. नसिरुद्दीन शहानं काम केलेल्या “द फादर” या नाटकाचे काही प्रयोग झाले होते. त्याच नाटकावर २०२१ साली ६ आॉस्कर नामांकनं मिळवणारा “द फादर” हा चित्रपट आधारित आहे. “द क्राऊन”मधल्या इंग्लंडच्या राणीच्या भूमिकेनं गाजलेल्या Olivia Colman हिनं “द फादर”मध्ये एका असहाय्य मुलीची भूमिका केली आहे.

“सायलेन्स आॉफ द लॅंबज” या १९९१च्या चित्रपटानंतर तब्बल ३० वर्षांनंतर वयाच्या ८३व्या वर्षी अॅंथनी हॉपकिन्सला “द फादर”साठी दुसरं आॉस्कर का मिळालं असावं याचं उत्तर या चित्रपटातला त्याचा अभिनय देतो.. !

मागच्या आठवड्यात हा चित्रपट पाहून एमिली डिकनसनची कविता आठवली होती..

I’m Nobody! Who are you?

Are you – Nobody – too?

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here