तिरुअनंतपूरम -सर्वांत श्रीमंत पद्मनाभस्वामी मंदिराचे शहर

-राकेश साळुंखे

तिरुअनंतपूरम ही केरळची राजधानी . आधुनिक इमारती आणि मोठमोठे मॅाल्स असलेले हे  शहर  पद्मनाभस्वामी मंदिराच्या बंद खोल्यांमध्ये सापडलेल्या संपत्तीमुळे जास्त प्रसिद्धीस आले आहे.  त्रावनकोर संस्थानची ही राजधानी होती. त्रिवेंद्रम असेही पूर्वी म्हटले जात होते. तिरुअनंतपूरम म्हणजे अनंताचे शहर होय . स्कंदपूरणात याचा उल्लेख ‘अनंतपुरी ‘असा आलाय . ‘अय’ राजवंश हा या शहरावर राज्य करणारा सुरवातीचा वंश .इसवी सनपूर्वी १००० च्या दरम्यान सलोमान राजाची  जहाजे  येथील पूवर (poovar) बंदरात आली  होती. त्या  काळातही  येथील बंदरातून मसाल्याचा व्यापार चालत होता . विज्जींजम ही ‘अय’ राजवटीची राजधानी होती.

राजा रविवर्मा यांनी काढलेले चित्र

अशा या पुरातन इतिहास असलेल्या या शहरात जाण्यास मी  खूप उत्सुक होतो.  मला मुख्यतः राजा रवी वर्मा यांच्या चित्राचे संग्रहालय, तसेच तेथून जवळच असणारे त्यांचे गाव व तेथील वाडा पाहायचा होता . प्रथमतः त्या गावात गेलो तेव्हा एक मजेशीर प्रसंग घडला . माझ्या बरोबर तेथील माझा एक भाचा सोबत होता. तो व मी राजा  रवी वर्मांच्या वाड्यात असलेल्या संग्रहालयात गेलो तेव्हा एंट्री तिकीट काढताना काऊंटरवर असलेली मुलगी माझ्या भाच्याशी वाद घालत  होती. मी काय झाले  विचारले असता तो म्हणाला  की, ‘तुम्ही फॉरेनर आहात  व ती फॉरेनरसाठी  असणारे (10 पट महाग) तिकीट घ्यावे लागेल, असं म्हणत आहे . त्यावेळी आधारकार्ड  नव्हते . मी माझ्या जवळ असणारे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले. त्यानंतरच आम्हाला भारतीय व्यक्तींसाठी असलेले तिकीट देवून आत सोडण्यात आले.  मात्र आत निराशा  झाली . तेथील सर्व चित्रे ही रवी वर्मानी काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती होत्या . एकही ओरिजिनल चित्र नव्हते. त्यांचा वाडा बघून काहीसा निराशेनेच बाहेर आलो.

         येथे मी दुचाकी व बसने सर्वत्र फिरलो. येथे सार्वजनिक वाहतूक सेवेत चांगली  शिस्त आढळते. महिलाना विशेष सन्मान दिला जातो. बसमध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या आसनावर पुरुष बसत नाहीत.  बाकड्यावर एकटी स्त्री बसली असेल तर तिच्या शेजारी कुणी अनोळखी पुरुष बसत नाहीत. आणखी एक वैशिष्ट म्हणजे येथील बसच्या खिडक्याना जाळी किंवा काचा नसतात. अपवाद एसी बसचा . पण त्या खुल्या खिडकीतून सामान आत टाकून किंवा स्वतः आत घुसून जागा पकडताना मला तिरुअनंतपूरमच्या अनेक भेटीत आढळले नाही.

    या शहराची स्वच्छता विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर उतरल्याबरोबरच प्रकर्षाने लक्षात येते . केरळची घरे, किंवा छोट्या मोठ्या हवेल्या एकदम आकर्षक व सुंदर आणि वैशिट्यपूर्ण रचनेच्या असतात. येथील पद्मनाभ स्वामी मंदिर मोठे असले तरी फार भव्य किंवा संपत्तीचे प्रदर्शन करणारे वाटत नाही. किंबहुना हे  मंदिर जगातील श्रीमंत प्रार्थनास्थळांपैकी एक आहे, असेही वाटत नाही . मंदिर कोणताही भपका नसलेले आणि आपले प्राचीनत्व जपणारे आहे. एक मात्र खटकते, येथे शर्ट काढून व लुंगी नेसूनच आत प्रवेश मिळतो.  गोपुर व आतली शेषशायी विष्णूची  मूर्ती सुंदरच ! बाहेरच्या दुकानातून या मूर्तीच्या छोट्या प्रतिकृती विकत मिळतात. हे  मंदिर दाट वस्तीत असल्याने मला तरी निवांत , मन:शांती देणारे  वाटले नाही. मंदिराच्या बाहेर जी हॉटेल्स आहेत त्यामध्ये केरळीयन पद्धतीचे केळीच्या पानावरचे  जेवण मिळते. सडया किंवा राइस सांबर असते. जाड असा राईस असतो त्यांचे नाव  ‘मट्टा  राईस’ आहे. तो पचायला मात्र बिलकूल हलका असतो . साऊथला  गेल्यावर  जे चपाती ,भाकरी ,तंदुरी रोटी खाण्याचा हट्ट  न धरता लोकल पदार्थांशी  जुळवून घेतात, त्यांना खाण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. अन्न  जड नसल्याने पचनाचीही तक्रार बिलकूल उद्भवत नाही. केरळच्या  हॉटेलमध्ये पाणी कोमट आणि पोटॅशियम परमॅंगनेट मिसळून दिलेले असते. त्यामुळे त्या पाण्याचा रंग जांभळा असंतो. सुरवातीला हे  वेगळे वाटते. पण शक्यतो मिनरल वॉटरच प्राधान्याने पिण्यास वापरावे. केरळमध्ये दाट घनतेच्या लोकवस्तीमुळे पाणी प्रदूषित आहे.

     तिरुअनंतपूरमला अनेक सुंदर समुद्र किनारे लाभलेले आहेत. कोवालम व जवळील वर्कला हे दोन बीच जास्त प्रसिद्ध आहेत . वर्कलाला  जाताना दुतर्फा असणाऱ्या माडातून  जाणारा रस्ता खूपच सुंदर अनुभव देणारा आहे . कोवालम बीच चे तीन भाग पडतात. त्यात असणारे लाइट हाऊस पॉइंटला भेट द्यावी. हा बीच तसा गर्दीचा आहे, त्यामुळे आकाराने मोठा असूनही त्याला टाळून मी तुलनेने छोटा पण स्वच्छ अशा वर्कला बीचवर जाणे जास्त पसंत  करतो . कोवलम बीच जवळील हॉटेलमध्ये जेवणाचा एकदा योग आला . तेथे पूर्णपणे केरळीयन  पद्धतीचे सडया जेवण होते. हॉटेल एका काश्मिरी माणसाने चालवायला घेतले होते, तरीही तो उत्कृष्ट सडया जेवण देत होता. त्याला विचारले की काश्मिरी पद्धतीचे जेवण का देत नाही,त्यावर तो उत्तरला की येथे येणाऱ्या पर्यंटकाना हे जेवण जास्त आवडते. त्याने पूर्वी कश्मिरी पद्धतीचे जेवण देण्याचा अयशस्वी प्रयोग करून बघितल्याचेही  सांगितले. मला हाच अनुभव ब्रातिस्लावा या सेंट्रल युरोपातील स्लोवानियाच्या राजधानीत आला होता . तेथेही एक काश्मिरी पंजाबी रेस्टारंट चालवत होता. त्यालाही प्रतिसाद मिळत नव्हता.  फिलिपिन्समध्ये मात्र एका काश्मिरी हॉटेलात चांगले काश्मिरी जेवण शाही थाटात  मिळाले होते.

तिरुअनंतपूरम येथून खाली कन्याकुमारीकडे जाताना गोल्डन बीच वर जाऊन पुढे जावे. तेथे बॅकवॉटरचाही अनुभव घेता येतो . येथून  कन्याकुमारी दोन तासाच्या अंतरावर आहे . कन्याकुमारी पाहून परत तिरुअनंतपुरमला येऊन विमान किंवा ट्रेननी परतीचा प्रवास करून आपण सुंदर आठवणी घेऊन घरी येतो.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleवास्तव आणि स्मृतींच्या गोंधळात जगण्याचा अर्थ सांगणारा – “द फादर”:
Next articleगमती जमती पहिल्या विदेशवारीच्या!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here