सुरेश द्वादशीवारांचे ‘तुझ्यासवे तुझ्याविना’ : एकाकीपणातून जन्माला आलेले स्वकथन

 

-प्रमोद मुनघाटे

राज्यशास्त्राचे व्यासंगी प्राध्यापक, प्रभावी वक्ता,  धाडसी पत्रकार, शैलीदार संपादक व चिंतनशील लेखक म्हणून महाराष्ट्राला प्रा. सुरेश द्वादशीवार यांची ओळख आहे. ‘तुझ्यासवे तुझ्याविना’ हे त्यांचे पुस्तक अलीकडेच साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. ‘आत्मकथन’पर लेखन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. आपल्या वाट्याला आलेल्या अनेक भूमिका निभावताना आपण कुठे, कसे व का वागलो, ह्याचे हे एकप्रकारे आत्मपरीक्षण आहे. आयुष्यात पेललेली आव्हाने, भेटलेली माणसे आणि व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवरील नातेसंबंधातील कडू-गोड प्रसंग यांचा एक धावता चित्रपटच या लेखनातून द्वादशीवार उभा करू पाहतात. या लेखनाचा पत्रात्मक ‘फॉर्म’ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो जाणीवपूर्वक त्यांनी निवडला आहे, असे लक्षात येते.

‘तुझ्यासवे तुझ्याविना’ या पुस्तकात त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. जया द्वादशीवार यांना उद्देशून लिहिलेली ३१ पत्रे आहेत. पत्रात्मक निवेदनात लेखकाला अनेक प्रकारचे स्वातंत्र्य घेता येते. एखाद्या सार्वजनिक घटनेमागील बरेचसे अज्ञात तपशील खासगीत सांगता येतात. आपल्या कर्तृत्वाच्या किंवा अपयशामागील अनेक अडचणी-संकटे सांगता येतात. काही कटू प्रसंगामुळे आयुष्यभर सलणारी एखादी वेदना किंवा नातेसंबंधातील काही हळव्या जागा व दुखऱ्या नसाही जवळच्या व्यक्तीला पत्रातून सांगता येतात. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अशा घटनांमागील  अपराधभाव शमविण्यासाठी आपली बाजूही मांडता येते. हे सर्व द्वादशीवार यांनी या पुस्तकात केले आहे.

डॉ. जया द्वादशीवार चंद्रपूर येथे इंग्रजी विषयाच्या शिक्षिका होत्या आणि पुढे प्राध्यापक झाल्या. मार्च २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले. कमला दास या इंग्रजीतील अतिशय वादग्रस्त कवयित्रीचे साहित्य आणि त्यांचे आयुष्य, अशा काहीशा वेगळ्या विषयावर त्यांना पीएच. डी. ची पदवी मिळाली होती. त्यासाठी प्रा. जयंत परांजपे या इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या, मराठी समीक्षकाचे त्यांना मार्गदर्शन मिळाले होते.  अलीकडेच ‘Quest for Identity:  A thematic Study of The Poetry of Kamla Das’ हे त्यांच्या प्रबंधावरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. नाटककार महेश एलकुंचवार यांनी या पुस्तकाचा पुरस्कार केला आहे. प्रा. जयाताई द्वादशीवार चंद्रपूरच्या एका बँकेच्या अध्यक्षपदीही होत्या. यावरून द्वादशीवार यांना जयाताईंचा लाभलेला बौद्धिक सहवास किती समृद्ध असेल याची कल्पना येते. द्वादशीवारांची राजकीय पत्रकारिता व चळवळीतील सहभाग, संपादक म्हणून नागपुरात वास्तव्य, यामुळे दीर्घकाळ जयाताईं आणि द्वादशीवार समांतर आयुष्य जगत होते. केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर, मानसिक पातळीवरही अनुभवास आलेल्या पराकोटीच्या एकाकीपणातून हे लेखन जन्माला आले, असे हे पुस्तक वाचत असताना सारखे जाणवत राहते. सारे आयुष्य असंख्य लोकांच्या गराड्यात आयुष्य घालावणाऱ्या मोठमोठ्यांना  देखील एकाकीपणाची वाळवी कशी पोखरत राहते हे सांगण्यासाठी द्वादशीवारांनी ‘एकाकी’ हे एक पुस्तकच लिहिले आहे. ‘तुझ्यासवे तुझ्याविना’ ही त्यांच्या त्या चिंतनातून बाहेर पडण्याचाच एक मार्ग होय, असे मला वाटते. आणि त्यांनी ज्या अपेक्षेने जयाताईंना उद्देशून ही पत्रे लिहिली आहेत, त्यामागील त्यांची तळमळ व संवादाची असोशीही जाणवते.

प्रा. द्वादशीवार यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. अलीकडच्या काळात त्यांनी भाषणातून व लेखनातून केलेली गांधी-नेहरू यांची मांडणी गाजली आहे. तत्त्वविचार मांडणारी त्यांची पुस्तके लोकप्रिय झालेली आहेत. मुळात द्वादशीवार राज्यशास्त्राचे प्राध्यापक. पण राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, साहित्य आणि साहित्य संघटन अशा ज्या ज्या क्षेत्रात द्वादशीवार यांनी प्रवेश केला, त्या त्या क्षेत्रात वरच्या पातळीवर त्यांनी लीलया संचार केला आहे.  या सर्वच क्षेत्रातील सर्वोच्च स्थानावरील व्यक्तींशी त्यांचा आलेले संबंध, अनेक अवघड प्रसंगी त्यांनी केलेली शिष्टाई, या गोष्टी मुळातून वाचण्यासारख्या आहेत. त्यातून देशाचे आणि राज्याचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र हे बहुकेंद्री कसे असते, आणि द्वादशीवार यांच्यासारखा चंद्रपूरसारख्या राज्याच्या एका टोकावरच्या गावातील प्राध्यापक-लेखक-पत्रकार  अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आणि आपल्या कर्तुत्वाच्या  पाऊलखुणा कशा उमटवतो, ह्याचे दर्शनही या पुस्तकातून घडते. या निमित्ताने गेल्या अर्धशतकातील महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणातील अनेक घटनांमागील बऱ्याच अज्ञात गोष्टी वाचकांना स्तिमित करणाऱ्याही आहेत.

द्वादशीवारांचे बालपण काहीसे वेगळे व अभावग्रस्त होते. त्यांचे वडील गांधींवर निष्ठा असलेले स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले ध्येयवादी शिक्षक होते. पण एका बँकेच्या कथित अफरातफरीच्या आरोपात त्यांना तुरुंगवास होतो. त्याच काळात त्यांचे बहिण-भाऊ, आई-आजोबा अशा तेरा जणांचा मृत्यू होतो. पंधराव्या वर्षी त्यांच्या खांद्यावर घराची जबाबदारी येते. बाजारात भाजी विकून गुजराण करण्याचा प्रसंग येतो. अशा स्थितीत शिक्षण घेत असतानाच १९६२ मध्ये अहेरीचे आदिवासी नेते राजे विश्वेश्वरराव त्यांना साप्ताहिक ‘गोंडवाना’ चालवायला देतात. इथून त्यांच्या राजकीय जाणिवांचा मार्ग प्रशस्त होतो. १९६७ पासून ते आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’मध्ये स्तंभलेखन करू लागतात, आणि त्याची परिणती पुढे त्यांच्या आणीबाणीतील तुरुंगवासात होते. पण त्यापूर्वी अनेक भावनिक व कौटुंबिक गुंतागुंतीच्या घटनांमधून त्यांचे जयाताईंशी लग्न होते. लग्नापूर्वी आणि त्यानंतर द्वादशीवारांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचे व त्यांची मैत्रीचे जे विपूल संदर्भ अनेक पत्रात येतात, तेही त्यांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तित्वाचे अविभाज्य अंग असल्याचे दिसते. त्याचवेळी त्यांनी ‘तरुण भारत’ साठी केलेल्या आसाम, इम्फाळ, मणीपूर आणि पंजाब येथील राजकीय वार्तांकन, कुणाही नव्या उमेदवारी करणाऱ्या पत्रकाराने मुळातून या पुस्तकातून वाचण्यासारखे आहे. तरुण वयातील पत्रकार म्हणून द्वादशीवारांचे तेथील राजकारणाचा अभ्यास आणि दाखवलेले धाडस अचंबित करणारे आहे. विशेषतः १९८४ मध्ये सारा पंजाब हिंसाचाराने धगधगत असताना सुवर्णमंदिरात त्यांनी संत भिन्द्रानवाल्याची त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचा प्रसंगही या पुस्तकात विस्तृतपणे कथन केला आहे.

सुरेश द्वादशीवार यांच्यासोबत प्रा. प्रमोद मुनघाटे

द्वादशीवारांच्या पत्रकारितेचा प्रारंभ तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या थेट विरोधातच होता. १९६२ च्या  सार्वत्रिक निवडणुकांपासून ते कॉंग्रेसविरोधी आघाडीत सक्रीय झाले होते. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरात जनसंघाच्या उमेदवाराचा झंजावाती प्रचार केला. पुढे १९७८च्या विधानसभेच्या वेळी द्वादशीवारांना जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीतच स्थान देण्यात आले. ते ज्या ‘गोंडवाना’ व ‘तरुण भारत’ या वर्तमानपत्रात लिहित होते, ती जनसंघ आणि संघाचीच समानार्थी नावे होती. १९७५ मध्ये बिहारमध्ये कॉंग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले. इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्व मोठी वर्तमानपत्रे सरकारविरोधात लिहित होती. या पार्श्वभूमीवर जयप्रकाश नारायण यांचे राष्ट्रीय नेतृत्व उभे राहिले. २५ जूनला आणीबाणी घोषित करण्यात आली आणि १३ डिसेंबर १९७५ रोजी द्वादशीवारांना अटक होऊन त्यांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात झाली.

नाशिकच्या जेलमध्ये द्वादशीवारांना १४ महिन्यांचा जनसंघ, संघ, समाजवादी आणि काही संघटना-चळवळीतील नेते-कार्यकर्त्यांचा जो सहवास लाभला, त्याचे या पुस्तकातील अनुभवकथन फार रोचक आहे. तिथे झालेली बौद्धिके, वादविवाद, माणसांचे भेटलेले नमुने यावरून त्या काळातील महाराष्ट्रातील इंदिरा गांधींच्या तथाकथित हुकुमशाहीविरुद्धच्या भावना काय होत्या आणि समाजवादी-पुरोगामी मंडळीचे देशाच्या प्रश्नांविषयी आकलन कसे होते, ह्याचे नमुनेदार चित्र या अनुभवकथनातून उभे राहते. अनंत भालेराव, मोहन धारिया बापू काळदाते, गंगाप्रसाद अग्रवाल, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे यांच्याशी द्वादशीवारांचा जो संबंध आला तो त्यांची पुढील राजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील वाटचाल समृद्ध करणारा कसा ठरला, तेही पुढील पत्रांवरून वाचकांच्या लक्षात येते.

एखाद्या लेखकाच्या-कार्यकर्त्याच्या  थोरपणाचे लक्षण म्हणजे, तो जिथे जन्म घेतो-वाढतो, त्या भूमीची स्थानिक लोकतत्त्वे त्याला त्याच्या व्यक्तीमत्वात स्वाभाविकरीत्या मुरवता आली पाहिजेत. त्याशिवाय त्याच्या कर्तृत्वाला मौलिकता प्राप्त होऊ शकत नाही. द्वादशीवारांचे व्यक्तित्व चंद्रपूर-गडचिरोलीच्या अरण्यात आणि तेथील आदिवासींमध्ये सहज घडते गेले आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात  अहेरीचे आदिवासी नेते राजे विशेश्वरराव आले. आदिवासींचे प्रश्न प्रस्थापित भ्रष्ट सरकारविरोधातील राजकीय लढाई, याचे भान त्यांना त्यातून आले आहे.  त्यातूनच त्यांची ‘हाकुमी’ (१९८९) सारखी कादंबरी निर्माण झाली. या कादंबरीतील नक्षलवाद्यांचे त्यांनी केलेले चित्रण काहीसे वादग्रस्त ठरले. पण त्यामागे त्यांचे स्थानिक प्रश्नांचे किती मुलभूत आकलन आहे, हे या पुस्तकातील काही पत्रांवरून जाणवते. ‘लाल सलाम’ हा ‘हाकुमी’वरील तशा प्रकारचा एकमेव सिनेमा आहे, असे मला वाटते. जयाताई आणि द्वादशीवार यांना स्वतःचे अपत्य नसले तरी तरी त्यांनी कितीतरी जणांचे पालकत्व कसे स्वीकारले आणि त्यांच्या त्या पाल्यांनी ते कसे सार्थकी लावले, हे त्यांच्या जवळच्यांना माहितच होते. या पुस्तकात  ते अनुषंगाने आले आहे.

‘हाकुमी’चा नायक कन्ना मडावी हे काल्पनिक नाव नाही. द्वादशीवारांच्या घरी तो शिकला. एमबीबीएस होऊन तो आता गडचिरोली जिल्ह्यात रुग्णसेवा करीत आहे. पण तो डॉक्टर व्हायच्या आधीच द्वादशीवारांनी आपल्या कादंबरीत त्याची कथा सांगून टाकली होती. पुढे नव्वदनंतर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात नक्षलवाद्यांचा हिंसाचार वाढला, तेव्हा २००७च्या मार्च महिन्यात त्यांनी आसरअली-देवरी-गडचिरोली दोन-अडीचशे लोकांसह पंचवीस दिवसांची एक लोकयात्रा काढली होती. आपला मार्ग हिंसेचा नाही आणि आपण एकटे नाहीत, सारा देश आपल्यासोबत आहे, हे त्या हिंसाग्रस्त आदिवासींना जाणवून देण्यासाठी ही यात्रा होती. या पुस्तकातील हा सगळा वृतांत वाचताना द्वादशीवार यांच्या राजकीय-सामाजिक जाणिवेमागील वैचारिक निष्ठा जशा लक्षात येतात, तसे त्यांच्या आयोजनातील कल्पकता आणि लोकसंग्रहही लक्षात येतो. त्यातून द्वादशीवार हा पुस्तकाच्या किंवा वर्तमानपत्राच्या पानावर न मावणारा लेखक-पत्रकार आहे, हे अधिकच अधोरेखित होते.

द्वादशीवारांच्या आयुष्यातून ‘आनंदवन’ आणि ‘आदिवासी’ या दोन गोष्टी वगळल्या तर त्यांचे सामाजिक-राजकीय कर्तृत्वाचे आणि साहित्याचे आकलन पूर्ण होऊ शकत नाही. बाबा आमटे आणि आनंदवन यांच्याशी त्यांच्या संबंधात फार चढउतार व गुंतागुंत दिसते. आमटे परिवार, त्यांचा संस्थात्मक विस्तार, त्यांचे व्यक्तिगत ताणेबाणे यातील महाराष्ट्राला काही अलक्षित गोष्टी द्वादशीवारांच्या या लेखनातून प्रथमच पुढे आल्या आहेत.  या गोष्टी मुळात जयाताईंच्या आणि त्यांच्या व्यक्तिगत भावजीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्या ओघाओघात येतात, हेही लक्षात घेतले पाहिजे. बाबा आमटे यांचे कवित्व असो की पुढे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात द्वादशीवारांनी काढलेल्या लोकयात्रेबद्दलचा बाबांचा खोचक प्रतिसाद असो, थोर माणसांच्या तऱ्हेवाईक स्वभावाचे मासले, या पुस्तकात जागोजाग दिसतात. परिणामी आनंदवनच्या संचालक समितीचा विश्वस्त बनण्याची विनंती द्वादशीवारांनी कशी अमान्य केली आणि जयाताईंनी त्या निर्णयाची कशी पाठराखण केली, हेही संदर्भ महत्त्वाचे ठरतात.

द्वादशीवारांच्या मूल्यनिष्ठा, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका आणि त्यांचे लेखन यांच्यात जी एकात्मता आढळते, त्याचे सुटे सुटे पदर या पुस्तकातील वेगवेगळ्या पत्रांमधून स्पष्ट होतात, ज्यातून त्यांचे    एक सुसंगत व्यक्तित्व वाचकाच्या पुढे उभे राहते. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे द्वादशीवार बारा वर्षे निवासी संपादक होते, तर लोकमतचे ते सतरा वर्षे संपादक होते. या काळात त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणी, महाराष्ट्राचे सर्वच मुख्यमंत्री, पवार-राणे आणि शरद जोशी सारख्या चळवळीतील नेत्यांशी कसा संबंध आला ते मुळातून वाचण्यासारखे आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्र असो की राजकीय सत्ताकारण असो, वरवरच्या चकाकत्या पृष्ठभागाच्या आत  मोठी माणसे अविश्वास आणि असुरक्षिततेच्या दुर्गंधीयुक्त दलदलीत कसे जगत असतात, ह्याचे अनेक अनुभव द्वादशीवार त्यांच्या विशिष्ट शैलीत सांगतात. ते सतरा वर्षे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि पाच वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. त्याच वेळी एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांची भ्रमंती सुरू होती. वैचारिक पुस्तके, कादंबऱ्या आणि ललितलेखनही चालू होते. पत्रकार, लेखक आणि साहित्य संस्थांचे संघटक म्हणून त्यांच्या भूमिका कशा एकमेकांत गुंतलेल्या होत्या आणि त्यातून त्यांना आलेले महाराष्ट्रातील थोर लेखकांचे अनपेक्षित अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत. विशेषतः साहित्य संमेलने व त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या संबंधित प्रकार उबग आणणारे व त्या क्षेत्राविषयी चिंता वाढविणारे आहेत.

द्वादशीवारांची या पुस्तकाची कथनशैली त्यांच्या भाषणांप्रमाणेच ऐसपैस पण प्रासादिक आहे. अनेक भूमिका एकाच वेळी जगण्यामुळे असेल, ते जे कथन करतात त्यात एकाचवेळी अनेक व्यक्ती व घटनाप्रसंगांची सरमिसळ होते, त्यामुळे बहुसंदर्भी निवेदनातील अनेक तपशील वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.  त्यांच्या कादंबऱ्या असोत, की त्यावरील चित्रपट असोत, त्यामागील त्यांच्या निर्मितीच्या कहाण्या सामान्य वाचकांना पुष्कळदा कोड्यात टाकणाऱ्या वाटतात. उदा. ‘अलकनंदा’ या कादंबरीची नायिका आणि ‘तांदळा’ या काहीशा गूढ कादंबरीवरील चित्रपट. या कादंबरीवर तेंडुलकरांनी लिहिलेली पटकथा व राजदत्त यांचे दिग्दर्शन कसे बाजूला पडते आणि ते नव्याने कां व कसे पूर्ण होते, हे सांगताना द्वादशीवार ‘तांदळा’ च्या मिथकाची उकल करतात, ती त्यांच्याच शब्दात वाचनीय वाटते. त्यांच्या काही कादंबऱ्या राजकीय आणि तात्त्विक स्वरूपाच्या आहेत. एखादा गंभीर व सैद्धांतिक विषय, निव्वळ घटना-प्रसंगांच्या माध्यमातून ते एकाचवेळी विविध पातळीवरील वाचकांना बांधून ठेवतात. म्हणूनच त्यांच्या बहुआयामी आयुष्यामागील ताणेबाणे त्यांच्याच शब्दात या पुस्तकात अधिकच वेधक झाले आहेत.

एरवीच्या पठडीतील आत्मचरित्राच्या स्वरूपात द्वादशीवारांना हे आत्मवृत्त सांगता आले असते. ते त्यांच्या समृद्ध जगण्याला न्यायही देऊ शकले असते. पण एकाकीपणातून मुक्त होण्याच्या असोशीतून वाचकांपेक्षा त्यांना आपल्या पत्नीशी संवाद करण्यात, त्यांच्या मनस्वी स्वभावाला अधिक योग्य वाटले असावे, असे वाटते.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078

‘तुझ्यासवे तुझ्याविना’ पुस्तक घरपोच बोलविण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा  https://amzn.to/3ueWWCi

………………

-साधना प्रकाशनाच्या खालील पत्त्यावर संपर्क साधूनही आपण हे पुस्तक मागवू शकता

साधना प्रकाशन , ४३१, शनिवार पेठ , पुणे -४११०३०

संपर्क क्रमांक -०२०-२४४५९६३५, ७०५८२८६७५३

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here