चटका लावणार्‍या अजरामर प्रेमकथा

अविनाश दुधे

 

लैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, सोहनी-महीवाल हे जगभरातील प्रेमिकांचे ‘कुलदैवत.’ जगभरातील प्रियकर-प्रेयसी यांच्या नावांचा गजर करत एकमेकांना प्रेमाची ग्वाही देत असतात. एकमेकांसोबत आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेत असतात .प्रेमिकांच्या दुनियेत ही सारी नावं अमर झाली आहेत.

                                                                                                                         खुदा अगर मुझसे मांगे,  तो मै अपनी जा तक दे दूंगा

                                                                                                                          मगर कसम खुदा की, वो मुझे तुझसे जुदा ना करे

या पद्धतीने आयुष्य जगलेली आणि संपविलेली ही जोडपी प्रत्येक पिढीतील प्रेमिकांचे आदर्श राहिले आहेत. मात्र या गाजलेल्या प्रेमी जोडप्यांची कहाणी  अनेकांना माहीत नसते. आज १४ फेब्रुवारी. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने या प्रेमिकांच्या या अजरामर कथा..

                                                                                                                                   लैला-मजनू

सातव्या शतकात मध्य अरबस्थानात प्रत्यक्ष घडलेली लैला-मजनूची कहाणी जगभरातील प्रत्येक प्रेमिकांच्या हृदयात कोरली गेली आहे. प्रेमात पडलेल्या कुठल्याही जोडप्याला ‘लैला-मजनू’ संबोधले जाते., एवढी ही कहाणी प्रेमिकांच्या जीवनाशी तादात्म्य पावली आहे. अरबांच्या भटक्या जमातीतील लैला ही अतिशय सुंदर तरुणी होती. तिचं खरं नाव अल अमिरिया . तिच्याच जमातीतील क्वाईस बिन अल मुल्लवाह हा तरुण लहान असतानापासून तिला ओळखत होता. किशोरवयात पदार्पण करण्याअगोदरच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मुल्लवाह हा अतिशय उत्तम कविता करत असे. त्याने तिच्या प्रेमात पडल्यावर असंख्य कविता केल्या. वयात आल्यानंतर या दोघांनी लग्नाचा विचार केला. तिने सांगितल्याप्रमाणे त्याने लैलाच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा दर्शविली. मात्र त्याची ही मागणी ठामपणे फेटाळून लावण्यात आली. अरबी परंपरेत हे असं प्रेमात पडणं वगैरे बसत नाही. शिवाय तू आमच्या बरोबरीचा नाही, असे सांगून त्याला नकार देण्यात आला. या निर्णयामुळे लैला बंडखोरी करू शकते, हे लक्षात घेऊन वडिलांनी तिचे लग्न तातडीने अल थकवी नावाच्या सुंदर तरुण व्यापार्‍यासोबत लावून दिले. यामुळे मुल्लवाहला प्रचंड धक्का बसला. लैलाच्या लग्नाची बातमी मिळताच तो कोसळलाच. शुद्धीवर आल्यानंतर ओक्साबोक्सी रडायला लागला. काही काळातच तो वेडय़ासारखा वागायला लागला. वाळवंटात वाटेल तसा भटकू लागला. आपल्याच तंद्रीत रेतीमध्ये बोटाच्या साहाय्याने कविता लिहायला लागला. त्याची ही स्थिती पाहून लोकांनी त्याला ‘मजनू’ संबोधण्यास सुरुवात केली. इकडे लैलाची स्थिती वेगळी नव्हती. तिचं लग्न झालं खरं, पण तिचं सारं लक्ष मजनूत होतं. तिनं मजनूला विसरावं म्हणून तिचा नवरा तिला घेऊन इराकमध्ये राहावयास आला. मात्र मजनूच्या विरहाने कासावीस झालेली लैला काही दिवसांतच आजारी पडली आणि लगेच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंब हादरून गेली. ही बातमी मजनूला सांगण्यासाठी त्याचे मित्र त्याला शोधत होते. पण तो गायब होता. शेवटी अनेक दिवसानंतर तो एका कब्रस्थानमध्ये लैलाच्या कबरीजवळ मृतावस्थेत आढळला. त्या कबरीजवळच्या दगडांवर त्याने लैलावर असंख्य कविता कोरून ठेवल्या होत्या. ही माहिती बाहेर येताच संपूर्ण अरबस्थानात त्यांच्या परस्परांवरील निस्सीम प्रेमाची चर्चा सुरू झाली. पुढे पर्शियन साहित्यात त्यांच्या प्रेमावर असंख्य कथा, कविता, नाटकं रचण्यात आली. जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे चित्रपट निघाले. हे दोघेही जिवंत असताना एकमेकांचे होऊ शकले नाहीत. मात्र त्यांची कहाणी अमर झाली आहे.

                                                                                                                                          हिर-रांझा

पंजाबच्या घराघरांत प्रत्येकाला तोंडपाठ असणारी ‘हिर-रांझा’ची कहाणीही अशीच चटका लावणारी आहे. हिर ही सध्याच्या पाकिस्तानच्या झांग या भागातील जाट कुटुंबातील अतिशय देखणी तरुणी. तिच्या सौंदर्याची पंचक्रोशीत ख्याती पसरलेली. धिडो रांझा नावाचा चिनाब नदीकाठच्या तख्त हजारा या गावचा तरुण कुटुंबातील कटकटीने वैतागून घर सोडतो आणि योगायोगाने हिरच्या गावात राहायला येतो. रांझा हा अतिशय सुरेख बासरी वाजवायचा. त्याच्या बासरीतील स्वर्गीय सूर ऐकून माणसंच काय, प्राणीही डोलायचा लागायचे. स्तब्ध व्हायचे. त्या स्वराने मोहित होऊन हिर त्याच्या प्रेमात पडली. तिने आपल्या वडिलाला सांगून आपल्या घरची गुरे राखण्याचं काम रांझाला दिलं. दोघेही नजीक येताच त्यांचं प्रेम बहरण्यास सुरुवात झाली. सार्‍यांच्या नजरा चुकवून ते दोघे एकमेकांना भेटायला लागले. मात्र प्रेम फार काळ लपून राहत नाही. काही दिवसातच गावात त्यांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली. हिरचे काका कायदो यांनी एक दिवस त्यांना चोरून भेटताना पकडले. झालं. तिथेच त्यांच्या प्रेमाला नजर लागली. काही दिवसांतच तिच्या कुटुंबाने तिचं लग्न सईद खेरा या तरुणासोबत लावून दिलं. या बातमीने रांझा उद्ध्वस्त झाला. वेडापिसा होऊन तो पंजाबात भटकायला लागला. याचदरम्यान त्याची भेट बाबा गोरखनाथ यांच्याशी झाली . हिरच्या लग्नामुळे संसाराबद्दलची त्याची आसक्ती संपलीच होती. त्याने साधू होण्याचा निर्णय घेतला. ‘अलख निरंजन’चा नारा देत तो सगळीकडे भटकंती करत राहिला. मात्र हे प्रकरण असं संपायचं नव्हतं. भटकता-भटकता एक दिवस तो हिरच्या सासरच्या गावात आला. दोघांनाही काही दिवसातच एकमेकांची माहिती मिळाली. जुनं प्रेम लगेच उफाळून आलं. हिरला विवाहित असल्याचा आणि रांझाला संन्यास घेतल्याचा विसर पडला. दोघांच्या भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या. काही दिवसांतच ते हिरच्या माहेरी पळून आलेत. शेवटी त्यांचं एकमेकांवरील अफाट प्रेम पाहून हिरच्या आईवडिलांनी तिचा तलाक करून रांझासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या काकाला हे मान्य नव्हतं. त्यांनी लग्नाच्या दिवशी अन्नपदार्थामध्ये विष मिसळलं. लग्नविधी होण्याअगोदरच विष मिसळलेला लाडू खाल्ल्याने हिरचा मृत्यू झाला. जवळच असलेल्या रांझाने तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ते शक्य झालं नाही. आपली हिर दुसर्‍यांदा आपल्यापासून हिरावली गेली आहे, हे लक्षात येताच रांझाने हिरने खाल्लेल्या विषयुक्त लाडूचा उरलेला भाग खाल्ला आणि स्वत:चाही देह त्यागला. तेव्हापासून हिर-रांझा हे पंजाबातील प्रेमिकांचे दैवत झाले आहे. आज एवढय़ा वर्षानंतरही झांग येथील हिर-रांझाच्या स्मृतिस्थळावर हजारो तरुण-तरुणी येतात. तिथे मन्नत मागतात. या दोघांच्या स्मरणार्थ दरवर्षी तिथे मोठी यात्रा भरते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांत असलेल्या पंजाबची तरुणाई तेथे अलोट गर्दी करते. या दोघांच्या कथेवर भारत आणि पाकिस्तानात मिळून तब्बल नऊ चित्रपट निघाले आहेत.

                                                                                                                                         सोहनी-महीवाल

अशीच चुटपूट लावणारी सत्य प्रेमकहाणी ‘सोहनी-महीवाल’ची आहे. 18 व्या शतकात करवनसराई या पाकिस्तानच्या सीमेवरील गावात एका कुंभार कुटुंबात सोहनी नावाची अतिशय देखणी तरुणी राहत असे. तिला प्रेमाने सारे ‘टुल्ला’ म्हणत असे. ती आपल्या वडिलाला माठ, सुरई व मातीचे इतर भांडे तयार करण्यात मदत करत असे. मातीच्या भांडय़ावरील नक्षीकाम करण्यात ती खूप कुशल होती. एके दिवशी उझबेकिस्तानातील शाहजदा इज्जत बेग हा तरुण व्यापार्‍याच्या निमित्ताने सोहनीच्या गावात येतो. बाजारपेठेत फिरत असताना त्याला सोहनी दिसते. तिच्या सौंदर्याने तो थक्क होतो. खिशात असेल-नसेल तेवढी सोन्याची नाणी काढून तो सोहनीच्या दुकानातील सारी मातीची भांडी विकत घेतो. काही दिवसांतच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला शाहजादा आपल्यासोबतचे नोकरचाकर आणि इतर लोकांना उझबेकिस्तानात परत पाठवून देतो. त्यानंतर तो सोहनीच्या वडिलांकडे असलेल्या म्हशी व इतर गुराढोरांना चरायला नेण्याचे काम पत्करतो. त्यामुळे गावात त्याचे नाव ‘महीवाल’ पडते. मात्र काही दिवसातच या दोघांच्या प्रेमाची बातमी गावभर पसरते. एका कुंभार कुटुंबातील मुलगी बाहेरच्या माणसाच्या प्रेमात पडते हे सहन होण्याजोगं नव्हतंच. लगेच तिचं लग्न लावून देण्यात येऊन तिची रवानगी गावाबाहेर करण्यात येते. तिचं लग्न होताच महिवालची अवस्था मजनूसारखीच होते. मात्र हार न मानता तो तिच्या सासरच्या गावी जातो. तिच्या गावाबाहेर नदी वाहत असे. नदीच्या पलीकडच्या टोकावर तो झोपडी बांधून राहायला लागतो. सोहनीला याची माहिती मिळताच त्यांचे सूर पुन्हा जुळून येतात. ती दररोज भल्या पहाटे त्याला भेटायला नदीच्या प्रवाहातून त्या टोकावर जाण्यास सुरुवात करते. यासाठी ती मातीच्या चांगल्या खरपूस भाजलेल्या मोठय़ा मडक्याचा वापर करत असे. मात्र काही दिवसातच तिच्या कुटुंबाला ती आपल्या प्रियकराला भेटायला जाते, हे समजते. या चोरटय़ा प्रेमप्रकरणामुळे चिडलेली तिची नणंद एके दिवशी तिचं नेहमीचं मडकं लपवून ठेवते आणि त्या जागेवर कच्चं व्यवस्थित भाजलं न गेलेलं मडकं ठेवते. पहाटेच्या अंधारात सोहनीच्या ते लक्षात येत नाही. ती नेहमीप्रमाणे नदीच्या प्रवाहात प्रवेश करताच ते कच्चं मडकं विरघळायला लागतं. सोहनी प्रवाहासोबत वाहायला लागते. समोरच्या काठावरून हे पाहत असलेला महीवाल लगेच नदीच्या पात्रात धाव घेतो. मात्र नदीचा वेगवान प्रवाह त्या दोघांनाही जलसमाधी देतो.तेव्हापासून हिर-रांझाप्रमाणेच हे जोडपंही प्रेमिकांचं आदर्श बनलं आहे. सिंध प्रांतात अजूनही या दोघांची प्रेमकहाणी अतिशय आदराने ऐकविली जाते. अनेक लोकगीत या दोघांवर रचण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या शहादादपूर या गावात सोहनीच्या स्मृतिप्रीत्यर्थ मकबरा उभारण्यात आला आहे.

                                                                                                                                       रोमिओ-ज्युलिएट

शेक्सपिअरची अतिशय गाजलेली ही प्रेमकहाणी आहे. इटलीतील व्हेरोना या शहरातील कॅप्युलेट व मॉटेग्यू प्रतिष्ठित उमराव कुटुंबातील रोमिओ व ज्युलिएटची ही शोकांतिका आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या मनीषा कोईराला व विवेक मुशरानच्या ‘सौदागर’ या सिनेमाशी काहीशी मिळतीजुळती ही कहाणी आहे. या दोन कुटुंबांमध्ये टोकाचं हाडवैर असते. अनेकदा त्यांच्यात रक्तरंजित संघर्ष झालेला असतो. एक दिवस लॉर्ड कॅप्युलेट शहरातील मान्यवरांसाठी एक जंगी पार्टी आयोजित करतो. अर्थातच त्या पार्टीचं आमंत्रण मॉंटेग्यू कुटुंबातील कोणालाचं नसतं. मात्र रोमिओचे मित्र वेशांतर करून त्या पार्टीत जाण्यासाठी रोमिओचं मन वळवितात. या पार्टीत पहिल्यांदा रोमिओ-ज्युलिएट भेटतात. दोघेही एकमेकांकडे एवढे आकर्षित होतात की, पहिल्याच भेटीत ते प्रेमात पडतात. लगेच लग्न करायचंही ठरवितात. मात्र जेव्हा त्यांना एकमेकांच्या कुटुंबाबद्दल संपूर्ण माहिती मिळते तेव्हा आपल्या दोन कुटुंबांचं अजिबातच जमत नाही, हे लक्षात येताच दोघेही हादरतात. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी ते लॉरेन्स नावाच्या धर्मगुरूची मदत घ्यायचे ठरवितात. लॉरेन्स अतिशय गुप्तपणे त्यांचं लग्न लावून देतो. मात्र लग्न झालं तरी दोघेही आपापल्या कुटुंबातच राहतात. एक दिवस रोमिओ, त्याचा मित्र मफ्यरुसिओ व ज्युलिएट हे लॉरेन्सकडे जात असताना तिचा चुलतभाऊ टायबार्डला ते दिसतात. टायबार्ड ज्युलिएटला जाब विचारतो. या वेळी तुफान वादावादी व काही वेळातच हाणामारी होते. यात मफ्यरुसिओ मारला जातो. त्यामुळे चिडून रोमिओ टायबार्डला मारतो. शेवटी हे सर्व प्रकरण तेथील राजाकडे जाते. तिथे आपल्या मुलीने रोमिओसोबत लग्न केले आहे, हे माहीत नसलेली ज्युलिएटची आई रोमिओला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी करते. ज्युलिएटची परिस्थिती मोठी विचित्र होते. मात्र माझ्या मित्राला मारल्यामुळे मी टायबार्डला मारलं, या युक्तिवादामुळे रोमिओला मृत्युदंडाऐवजी राज्यातून हद्दपार करण्याची शिक्षा दिली जाते. नंतर काही दिवसांतच ज्युलिएटचे वडील तिचं लग्न पॅरिस या देखण्या तरुणाशी निश्चित करतात. ती पुन्हा लॉरेन्सकडे धाव घेते. तो तिला सल्ला देतो की, तू वडिलांना विरोध करू नको. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी तू तीन-चार दिवसांसाठी बेशुद्ध होशील आणि लग्नसमारंभ लांबणीवर पडेल. असं औषध मी तुला देतो. ठरल्याप्रमाणे ज्युलिएट ते औषध घेते आणि बेशुद्धीत जाते. मात्र इकडे हद्दपारीत असलेल्या रोमिओला ज्युलिएटचा मृत्यू झाला आहे, अशी बातमी मिळते. तो धावत येतो. येताना तो ज्युलिएटच राहिली नाही, तर आपण काय जगायचं म्हणून विषाची बाटली घेऊन येतो. तिच्या देहाचं दर्शन घेऊन तो तिच्या ओठाचं चुंबन घेतो आणि लगेच विष घेऊन स्वत:ला संपवितो. मात्र काही क्षणातच ज्युलिएट शुद्धीवर येते. काय झालं आहे, हे समजताच ती रोमिओच्या ओठाचं चुंबन घेते आणि चाकूने स्वत:ला खुपसून घेऊन आत्महत्या करते. प्रचंड हळहळ लावणारी ही प्रेमकहाणी आहे.

                                                                                                                                      

(लेखक ‘मीडिया वॉच’ या अनियतकालीकाचे संपादक आहेत)

भ्रमणध्वनी – 8888744796

Previous articleपत्रकारिता विकायला काढलीय!
Next articleऐ जिंदगी गले लगा ले !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here