–प्रवीण बर्दापूरकर
“अमुक-तमुक पक्षाचा विजय म्हणजे तमुक पक्षाला निवडणूक जिंकण्यात आलेलं अपयश आहे” , अशी भोंगळ विधानं करण्यात आपल्याकडचे बहुसंख्य राजकीय विश्लेषक तरबेज आहेत . तसंच काहीसं बहुसंख्य राजकीय नेत्यांचही झालेलं आहे . वस्तुस्थिती काय आहे याची कोणतीही तमा न बाळगता देशाचं राजकारण कवेत घेण्याचा प्रयत्न हे नेते करत असतात . पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन (महा)राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत भाजपला पर्याय उभा करण्याची केलेली भाषा या भोंगळचं उत्तम उदाहरण आहे . जे काँग्रेसमधून वेगळे झाले तरी ज्यांचा राजकीय संसार काँग्रेसला वगळून उभाच राहू शकलेला नाही त्यांना हे समजतच नाहीये की , आपल्या देशात भाजपला पर्याय काँग्रेसला वगळून उभाच राहू शकत नाही तरीही, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी केलेली भाषा म्हणा की , त्या दिशेने सुरु केलेले प्रयत्न म्हणजे मतांची विभागणी दोनपेक्षा जास्त विरोधकात होऊन त्याचा लाभ शेवटी भाजपालाच व्हावा अशी तर खेळी नाही ना ? अशी शंका निर्माण झाली आहे .
राजकीय परिस्थिती लक्षात न घेण्याचा भोंगळपणा स्वाभाविकच वस्तुस्थितीला धरुन कसा नसतो याची अनेक उदाहरणं सांगता येतील . इथे हा मुद्दा ममता बॅनर्जी यांच्या निमित्तानं निर्माण झालेला असल्यानं नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचंच उदाहरण घेऊ . विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या सत्तेत येण्याचं भाजपचं स्वप्न ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तणृमूल काँग्रेसनं उधळून लावलं हे खरं आहे . तृणमूल काँग्रेसच्या जागातही गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा चारने वाढ झाली हेही खरंच आहे पण , याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये खरंच भाजपचं पानिपत झालं आहे का ? या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही हेच वस्तुस्थितीला धरुन आहे , याचा विसर आपल्या देशातले ( पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारे सर्व नेते आणि त्यांचे ) राजकीय पक्ष तसंच बहुसंख्य राजकीय विश्लेषकांना पडलेलं आहे . पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झालेला नाही , हेच निकालाची आकडेवारी सांगते . गेल्या निवडणुकीत भाजपाचे केवळ तीन सदस्य पश्चिम बंगालच्या विधानसभेत होते . या निवडणुकीत तो आकडा तब्बल ७७ वर पोहोचलेला आहे . म्हणजे भाजपचं संख्याबळ ७४ नी वाढलं आहे आणि ही वाढ मुळीच दुर्लक्षणीय नाही . शिवाय दावे आणि काँग्रेसला नेस्तनाबूत करत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान प्राप्त केलं आहे मात्र नेमकं , याच वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणं , हे मान्य करण्याचं धाडस राजकीय पक्ष आणि विश्लेषकातसुद्धा नाहीये किंवा त्यांच्या आकलनात भोंगळपणा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे . ही आकडेवाडी लक्षात घेतली आणि त्या आधारे मांडणी सुरु केली की , या देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत ; अन्य राजकीय पक्षांचं अस्तित्व प्रादेशिक आहे , हे मान्य करावं लागतं !
मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी ज्या काही गाठीभेटी घेतल्या त्या अपेक्षितच होत्या आणि त्यापैकी शरद पवार वगळता एकही मान्यवर ‘मास बेस्ड’ नेता नाही . ममता आणि त्यांनी गाठीभेटी घेतलेल्या सर्वांना भाजपाच्या विरोधात बळकट पर्याय उभा करायचा आहे आणि ते योग्यच आहे . कोणत्याही लोकशाहीत देशात सत्ताधारी आणि/किंवा प्रबळ पक्ष विरुद्ध एखादा पर्याय उभा करण्यात काहीही गैर नाही . उलट ती एक राजकीय गरजच असते . पूर्वी आपल्या देशातल्या राजकीय पक्षांना काँग्रेस विरुद्ध पर्याय उभा करावा असं वाटायचं , आता भाजपच्या विरोधात या हालचाली सुरु आहेत . एकूणच खूपशी एककल्ली आणि अरेरावीकडे झुकणारी राजवट बघता भाजप विरुद्ध उभं राहणाऱ्या पर्यायाचं स्वागतच करायला हवं मात्र , असा पर्याय उभा करताना वस्तुस्थितीचं भान बाळगायलाच हवं . काँग्रेसला वगळून असा पर्याय उभा करण्यात येत असेल तर त्यासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ याशिवाय दुसरी कोणतीही प्रतिक्रियाच नाही , हे ममता बॅनर्जी आणि हा पर्याय उभारणाऱ्या सर्वांनी लक्षात घायलाच हवं .
काँग्रेस सध्या मुळीच एकसंध नाही . जनमनावर असलेली काँग्रेसची पकड ढिली झालेली आहे , सलगच्या पराभवामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि नेत्यातही नैराश्य आलेलं आहे आणि हा पक्ष ‘निर्नायकी’ अवस्थेतही आहे . हे सर्व खरं असलं तरी काँग्रेस हाच एकमेव पक्ष देशव्यापी आहे आणि तोच पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ शकतो हे वास्तव नाकारताच येणार नाही . अनेकांना कितीही कटू वाटलं तरी , सोनिया आणि राहुल गांधी यांच्यातच असलेली देशव्यापी नेतृत्वाची क्षमता ; कोणत्याही नेत्यात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हेच निखळ सत्य आहे . श्रीमती सोनिया गांधी आता थकल्या आहेत त्यामुळे नेतृत्वाचा हा क्रूस आता राहुल गांधी यांनाच वाहून न्यावा लागणार आहे .
भाजपाच्या विरुद्ध तयार होणाऱ्या संभाव्य आघाडीत एकही नेता देशव्यापी नाही , हेही लक्षात घेतलं पाहिजे . एखाद्या राज्यातील विजय म्हणजे देशव्यापी नेतृत्वाची मान्यता देणारा वज्रलेख मिळाला हा भ्रम आणि अहंकारही आहे ; हे म्हणजे काठीचे वार करुन पाणी कायमचं दुभंग करण्याचं स्वप्न पाहण्यासारखं आहे . शिवाय काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे देशभरात किमान २० ते २२ टक्के मतांचा आधार नाही . भाजपच्या विरुद्ध एकत्र येण्याची भाषा करणारे सर्वच पक्ष प्रादेशिक आहेत . ममता बॅनर्जी , मुलायमसिंह यादव , मायावती यांच्यासारखे मोजके अपवाद वगळता अन्य कोणात्याही पक्षात स्वबळावर राज्यात सत्ता निर्माण करण्याची क्षमताही नाही आणि तरीही शरद पवार , चंद्राबाबू नायडू यांच्यासह हे सर्व नेते पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत ; म्हणजे केंद्रात सत्ता येण्याआधीच पदासाठी साठमारी आहे ! अन्य राज्यात हे नेते आणि त्यांच्या पक्षांनी जे काही प्रयत्न केले त्यातून थोडाफार मायावती वगळता अन्य कुणाच्या हाती फारसं काही लागलेलं नाही . मायावतींना मध्यप्रदेश , राजस्थान , हरिया णा अशा काही राज्यांत विधानसभा निवडणुकीत कधी तरी का असेना पाच-दहा जागा नक्कीच मिळालेल्या आहेत . बाकीच्या नेत्यांना तसं अपवादात्मक यशही कोणत्याच निवडणुकीत मिळालेलं नाही . २०१४ च्या दिल्ली विधानसभा निवडणुका लढवण्याचा फुगा ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेसनं माध्यमात चांगल्यापैकी फुगवला होता पण , अण्णा हजारे यांनी तो फुगा कसा टचकन फोडून टाकला हे अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे . (महा)राष्ट्रवादीचे समर्थक गोवा आणि गुजरातमधल्या एकेका जागेचे दाखले देण्याचा प्रयत्न करतील पण , त्या यशाचं श्रेय पक्षाचं नव्हे तर त्या उमेदवारांचं होतं हे विसरता येणार नाही . हे सर्व लक्षात घेता काँग्रेसला बाजूला ठेवून ममता बॅनर्जी आणि ( त्यांच्या काँग्रेसबद्दलच्या विधानापासून नेहेमीप्रमाणे सावध लांब उभं राहण्याची भूमिका घेणारे आणि १९७८पासून महाराष्ट्रावरची काँग्रेसची पकड सैल करण्यास सुरुवात करणारे ) शरद पवार नेमकं काय साध्य करु इच्छितात , याबद्दल शंका निर्माण होते .
युपीए कुठे आहे , असा प्रश्न विचारणाऱ्या ममता बनर्जी हे विसरतात की , याच युपीएच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाचे त्यांच्यासकट सहा मंत्री होते आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतही अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात आपण मंत्री होतो याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये . दोन्ही डगरीवर हात ठेवण्याची राजकीय कसरत करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात लढताना काँग्रेस शिवाय पर्याय उभा करण्याची केलेली भाषा हे त्यांच्या अहंकारी चंचलपणाला शोभणारी आहे ; ते मुंगेरीलालचं स्वप्न रंजनच म्हणायला हवं .
आपल्या अस्तित्व आणि ( मर्यादित का असे ना उरलेल्या ) शक्तीबद्दल अशी शंका का उपस्थित झाली , याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा . गेली दोन वर्ष या पक्षाला कायमस्वरुपी नेतृत्व नाही , जे काही कथित नेतृत्व आहे ते सक्रिय नाही आणि सोनिया व राहुल गांधी वगळता कुणीही देशव्यापी नेता या पक्षाकडे नाही ही वस्तुस्थिती आहे . काँग्रेसच्या झालेल्या या स्थितीला हेच नेते जबाबदार आहेत पण , ती जबाबदारी उचलून अचेतन होत चाललेल्या काँग्रेसमध्ये जीव फुंकावा असे यापैकी कुणालाही वाटत नाही , ही खरी शोकांतिका आहे . राहुल गांधींच्या नेतृत्वाला पर्याय नाही ही वस्तुस्थिती मान्य करुन या नेत्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करावं हाच देशाच्या राजकारणातून काँग्रेसला ‘एलिमिनेट’ करू पाहणाऱ्या या सर्व मुंगेरीलालच्या स्वप्नरंजनांवर पर्याय आहे ; तो पर्याय स्वीकारण्याची सुबुद्धी कॉंग्रेस नेत्यांना सुचो !
शेवटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी शिष्टाचार म्हणूनही ममता बॅनर्जी रुग्णालयात गेल्या नाहीत ; घरी जाऊन केवळ शरद पवार यांनाच भेटल्या , संकेत समजून घेण्यासारखा आहेच !
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९
…………………………………………………………………………………………