आठवणींना शाप असतो न विसरण्याचा!

-प्रणाली देशमुख 

ए ऐक ना !

बघ मी काय आणलय , पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत त्याने अलगद मोगऱ्याचा गजरा बाहेर काढला . तिच्या डोळ्यात लगेच चमक आली . हम्म आज इरादा काय आहे स्वारीचा . काही नाही गं… ते देवळात गेलो तिथे फुलं घेतली देवासाठी बाजूला एक मुलगी गजरे  विकत होती . नाटकाला जायचं ठरलय ना आपलं चल वळ  जरा , मी माळतो . खिडकीतून हवेची झुळूक येत होती आणि तिच्या पांढऱ्याशुभ्र चंदेरी बटा गालावर अवखळ मिरवत होत्या .

खोली मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळत होती .

आठवतंय तुला पहिल्या भेटीत मी ओंजळीत तुझ्यासाठी मोगऱ्याची फुलं आणली होती . मोगऱ्याच्या सुगंधाने तुही मोहरली होती . मी वेडा विचारात पडलो नक्की , निरागस , निष्पाप , निर्मळ कोण मोगरा की तू ?

मग मोगऱ्याच्या बहाण्याने मला संधी मिळायची तुझ्याशी बोलायची . तुला माझ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं . ओंजळीत  फुलं दिसली की फुललेल्या मोगऱ्याला बघून नकळत तुझ्या नाजूक ओठांची पाकळी खुलायची .

तू माळलेल्या गजऱ्याच्या मदमस्त सुगंधाने तुझा केशसंभारही दरवळायचा . तुला दिल्यावर दोन फुलं मी माझ्यासाठी जपून ठेवायचो . खिडकीशेजारी  टेबलावर ठेवलेल्या फुलांच्या सुगंधाने मला तू माझ्या आसपास जाणवायची . नाजूक शुभ्र पाकळ्या अन्  इवलसं हिरवट देठ असलेल्या मोगऱ्याला बघून माझी जळफळाट व्हायची .

ए मोगऱ्या ती माझी आहे बरं का !

त्याला खडसावून सांगायचो . शेवटी चार वर्ष फुलं वाहिल्यावर तू प्रसन्न झालीस . माझा मोगऱ्याचा अभिषेक सफल झाला होता .

माप ओलांडून तू माझ्या घरी आली . आता अंगणातल्या मोगऱ्यावर फक्त तुझाच अधिकार होता . झाडाच्या कुशीत निजलेल्या

कळ्या पहाटे उजाडायचा आधीच अर्धवट

पापण्या उघडून बघायच्या . हलकीशी

वाऱ्याची झुळूक आली की पाळण्यावर हिंदोळे

घेणाऱ्या अल्लड मुलीसारख्या झुलायच्या .

केशरी फेटा बांधून आलेल्या त्या तेजोमय तपस्वीचे दर्शन झाले की  कळ्या न्हाऊन माखून फुलून यायच्या . अंगणात सडा , रांगोळी घालतांना त्यांची कुचबूच चालायची . अगदी वर्गात बाई नसतांना जशी मुलं टवाळक्या करतात तशीच .

बघ ना ! गाव सोडला इथे फ्लॅटमध्ये ना अंगण ना मोगरा . म्हणून आज मुद्दाम तुझ्यासाठी हा गजरा आणलाय . चल आटोप पटकन नाटक सुरु होईल आणि सुनबाई  ऑफिसातून येईल चाबी त्या वेलकम मॅटच्या खाली ठेव ….निघायचं ना !

मला माहितेय गं ह्या मोगऱ्याला बघून माझाही मोगरा फुलतो , खरंय ना !

हो खरंय हो ! मी माळलेल्या मोगऱ्याच्या  सुगंधाने एक माणूस अजूनही माझ्यावर भाळतो , खरंय ना !

ती जगाचा निरोप घेऊन दहा वर्षाआधीच गेली . नाटक बघायला जातांना ती जिना उतरतांना पडली

आणि नाटक तिथेच संपलं .

आणि तो मात्र तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मोगऱ्याचा गजरा तिच्या फोटोवर वाहतो अन् लाफ्टर क्लब च्या मित्रांना एकच कथा प्रत्येक वर्षी सांगतो . कथा संपली की सगळे जोरजोरात हसायला

लागतात तोही वेडा डोळ्याच्या ऐवजी ओठांनी रडून

घेतो ….

“कसं आहे आठवणींना शाप असतो न विसरण्याचा! “

Previous articleजी.ए.कुलकर्णी : एक अरभाट साहित्यिक!
Next articleमॅरेथॉन…लंगोटी यार आणि गोवा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here