विदर्भाचा आधारवड

 

-अविनाश दुधे

गिरीशभाऊ गांधी आणि माझी पहिली भेट २००८ मध्ये झाली. तेव्हा मी दैनिक ‘लोकमत’ चा अमरावती जिल्हा प्रमुख होतो. ‘लोकमत’ चे तेव्हाचे नागपूर शहर आवृत्ती संपादक बाळासाहेब कुळकर्णी यांनी आमची ओळख करून दिली होती. पहिल्या भेटीतच गिरीशभाऊंचे स्निग्ध , प्रसन्न , आश्वासक व्यक्तिमत्त्व मनात घर करून राहिलं . त्यानंतर गेल्या १४ वर्षात भाऊंच्या खूपदा भेटी झाल्यात. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभला . काहीवेळा प्रवासही घडला . खासगी गप्पांच्या मैफिलीत त्यांना जवळून समजून घेता आले . त्यांच्या आयुष्याचा प्रवासही समजून घेता आला .

  गिरीशभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक लक्षवेधी आणि विलोभनीय पैलू आहेत. एक सुसंस्कृत, कुटुंबवत्सल माणूस , उत्कृष्ट संघटक , उत्तम आयोजक , पर्यावरणप्रेमी, वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तम माणसं शोधण्याची दृष्टी असलेला हिरेपारखी, उत्तम वाचक, समीक्षक असं खूप काही त्यांच्याबद्दल सांगता येईल . मात्र मला त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट वाटत असेल तर ती म्हणजे – हा माणूस संकटातील साथीदार आहे . त्यांच्या सहवासातील कोणीही असो , त्याची जात , पात , विचारधारा कुठलीही असो …तो अडचणीत आहे कळलं, तर गिरीशभाऊ हमखास धावून येणार . त्यांना शक्य ती सारी मदत करणार . त्यांच्या सर्व  क्षमता वापरून समोरच्या व्यक्तिला त्यातून बाहेर काढणार . हे करताना कुठेही उपकार केल्याचा भाव नसतो . आपला माणूस आहे , त्याच्यासाठी शक्य ते केलंच पाहिजे , या आग्रहाने ते हे करतात . मी विदर्भ- महाराष्ट्रातील अनेक असे मान्यवर व वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते व सामान्य माणसंही पाहिलीत , ज्यांना अडचणीच्या काळात गिरीशभाऊ ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिलेत . त्यांच्यापैकी अनेकजण कृतघ्न निघालेत , पण तरीही भाऊंच्या तोंडातून त्या व्यक्तीबाबत कधीही वावगा शब्द निघत नाही . आपण आपलं काम करायचं , बाकी कोण कसा वागतो , ही खंत बाळगायची नाही , असं त्यांचे वागणं असते . सार्वजनिक जीवनात काम करताना माणसं कशी जपायची असतात, याचा वस्तुपाठ गिरीशभाऊंनी घालून दिला आहे.

प्रचंड सकारात्मकता (Positivity) हे  गिरीशभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिट्य . निराशेचे , अपयशाचे , अपेक्षाभंगाचे अनेक अनुभव त्यांच्या वाट्याला आलेत . मात्र ते कटू अनुभव ते उगाळत बसत नाही . त्यांची रोजची सकाळ नवीन उत्साहाने , नवीन कल्पनांनी फुलून आली असते . कोणाबद्दल वाईट बोलताना , गॉंसिपिंग करताना मी त्यांना कधीही पाहिले नाही. इतर कोणी तसे करत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर त्याबद्दलची नाराजी ठळकपणे दिसते . चांगुलपणा  आणि चांगल्या माणसांची ओढ ही त्यांच्यात कायम असते . माणसांचे अनेक कटू अनुभव आल्यानंतरही त्यांची चांगुलपणाबद्दलची ओढ काही संपत नाही . चांगल्या, सर्जनशील  माणसांना शोधणे, त्यांना ताकत देणे , त्यांचा गौरव करणे , हे  गिरीशभाऊंना मनापासून आवडते . विदर्भाच्या सामाजिक ,सांस्कृतिक , शैक्षणिक व इतरही क्षेत्रात आज जी आघाडीची , प्रस्थापित नावे आहेत , त्यांना त्यांच्या संघर्षाच्या , उमेदीच्या काळात गिरीशभाऊंनी भरपूर ताकत दिली आहे .

  माझा अनुभव सांगतो. ‘लोकमत’ च्या अमरावती आवृतीत माझा ‘मीडिया वॉच’ हा स्तंभ खूप गाजत होता . राजकीय घडामोडींवर मी करत असलेले रोखठोक विश्लेषण वाचकांना खूप आवडत होतं. स्तंभाला १०० आठवडे झाल्यानंतर त्या सर्व लेखांचे ‘मीडिया वॉच’ या नावाने पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय माझ्या मित्रमंडळाने घेतला.  गिरीशभाऊंनी त्या कार्यक्रमाच्या प्रकाशनासाठी जेष्ठय संपादक मधुकर भावेंना आमंत्रित केले  . ते स्वतः त्यांना घेऊन आले. अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी प्रकाशन समारंभाला   उपस्थित होते . वाचकांच्या अलोट गर्दीत कार्यक्रम पार पडला.

 . त्या कार्यक्रमात बोलताना गिरीशभाऊंनी ‘पत्रकारांनी अविनाशसारखंच रोखठोक लिहायला हवं. भूमिका घेण्याची हिंमत दाखवायला हवी’, असे सांगितले . कार्यक्रमात त्यांनी माझं मनापासून कौतुक केलं . लगेच १०० पुस्तकांची ऑर्डर दिली. त्याचे संपूर्ण पैसे लगेच पाठवलेत . त्यानंतर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना माझे पुस्तक ‘सप्रेम भेट’ म्हणून त्यांनी पाठवले. सोबत ‘बघा हा तरुण पत्रकार कसा लिहितोय, असे पत्रही त्यांनी पाठवलीत . हे  गिरीशभाऊंचे वैशिट्य आहे . एखाद्याचं ते केवळ तोंडदेखलं कौतुक करत नाही . वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांजवळ ते दिलखुलास कौतुक करतात. आणखी उंच भरारी घेता यावी, यासाठी नवनवीन platform उपलब्ध करून देतात .

माझा कौतुकसोहळा आटोपल्यावर खासगीत त्यांनी मला सावध केलं . ते म्हणाले , ‘अविनाश, तुझं रोखठोक लिहिणे , लोकांना ते आवडणं नक्कीच कौतुकाचा विषय आहे . पण पत्रकार लोकप्रिय होणे , हे कुठल्याही वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला आवडत नाही . तुझा ‘मीडिया वॉच’ हा स्तंभ वाचकप्रिय आहे तू हेच नाव टायटल म्हणून आरएनआयकडे रजिस्टर कर. अडचणीच्या काळात तुझ्याजवळ व्यक्त व्हायला तुझे स्वतःचे माध्यम असेल.’

   माझ्याबाबत पुढे काय होणार आहे , हे त्यांना तेव्हा दिसत असावं .पुढे काही वर्षातच माझी नोकरी केली. मी निराशेत गेलो . मात्र गिरीशभाऊंचा सल्ला आठवून मी ‘मीडिया वॉच’ हे टायटल रजिस्टर केलं. अनियतकालिक म्हणून सुरुवात केली . लगेच दिवाळी अंकही काढण्यास सुरुवात केली . मधली काही वर्ष आणखी एका दैनिकात नोकरी केली . मात्र काही वर्षात तीही नोकरी गेल्यावर नोकरीच्या मागे न लागता मी  ‘मीडिया वॉच’ वर लक्ष केंद्रित केलं. काही काळातच वेब पोर्टलही सुरु केलं . आता पुस्तक प्रकाशन क्षेत्रातही मी पाऊल टाकलं आहे. आज माझ्या हक्काचं एक स्वतःचं माध्यम आहे. माध्यम क्षेत्रातील माणसं ‘मीडिया वॉच’ बद्दल कौतुकाने बोलतात. मला स्वाभिमानाने जगता येतं आहे , याचं श्रेय गिरीशभाऊंनी त्यावेळी दिलेल्या अनमोल सल्ल्याला आहे.

  माझ्यासारख्या अनेकांना भाऊंनी नेमका सल्ला दिला आहे. आवश्यक तिथे साथ दिली आहे . त्यामुळेच त्यांचा परिवार विदर्भ –महाराष्ट्रात सर्वत्र पसरला आहे . त्यांचं नागपूरचे ‘वनराई’चे कार्यालय वेगवेगळ्या क्षेत्रातील नव्या –जुन्या माणसांनी कायम गजबजलेलं असतं. तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातील, विविध विचारांची माणसं गर्दी करून असतात. कोणाला कुठल्या तरी संमेलाच्या आयोजनात मदत हवी असते , कोणाला पुस्तक प्रकाशन करून घ्यायचे असते , कोणाला अमुक नेत्याकडून तमुक काम करून हवं असतं , कोणाला वैद्यकीय मदत हवी असते . जेवढी माणसं तेवढी कामे . त्यामुळे विदर्भ साहित्य संघापासून , आंबेडकरी चळवळीपर्यंत , शेतकरी संघटनेपासून  कामगार नेत्यांपर्यंत सर्वांना गिरीशभाऊंची मदत हवी असते.  गिरीशभाऊही सारख्याच आत्मीयतेने सर्वांना मदत करतात .

  संकटाच्या काळात भक्कमपणे साथ देण्यासोबतच ‘दातृत्व’ हा भाऊंच्या व्यक्तिमत्वातील विशेष गुण. आपल्या आयुष्यात किती लोकांना किती अर्धिक मदत केली, हे त्यांचं त्यांनाही सांगता येणार नाही. वैयक्तिक मदत करण्यासोबत समाजातील श्रीमंत व प्रस्थापितांच्या दातृत्वशक्तीला आवाहन करून त्यांच्याकडून चांगल्या कामासाठी , चांगल्या उपक्रमासाठी आणि गरजू व्यक्तींसाठी मदत मिळविणे ही गिरीशभाऊंची खासियत . ज्यांच्याजवळ पैसा आहे , साधनं आहेत , त्यांनी समाजासाठी झटणाऱ्या , आपल्या ज्ञानाने , कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या लोकांसाठी खर्च केला पाहिजे . हा  त्यांचा प्रयत्न असतो . त्यामुळेच मारवाडी फाउंडेशनकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर , प्रबोधनकार ठाकरे या महामानवांच्या नावाचे मोठ्या रकमेचे पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या मान्यवरांना दिले जातात . याशिवाय त्यांच्या  वेगवेगळ्या संस्था –संघटनांकडून भाऊ दरवर्षी जे पुरस्कार देतात , ती रक्कम २० -२५ लाखाच्या घरात जात असावी . मिळालेल्या पैशाचा योग्य उपयोग होत आहेत , ही खात्री पटल्याशिवाय धनाढ्य माणसं पैसा देत नाही . भाऊ या विषयात कमालीचे पारदर्शक असतात . कुठलाही कार्यक्रम आटोपल्याबरोबर ज्याच्याकडून देणगी , मदत आणली असते त्याला सविस्तर हिशेब पाठवला जातो . सार्वजनिक पैसा हा अतिशय नेकीने आणि जबाबदारीने वापरला पाहिजे , याबाबत  ते आग्रही असतात . समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व समाजातून पैसा मिळवण्याची क्षमता असणारा माणूसच सामाजिक , सांस्कृतिक चळवळीचा नेता होऊ शकतो . गिरीशभाऊ हे त्यांच्या या क्षमेतेमुळेच गेल्या कित्येक वर्षापासून विदर्भाचे एकमेव सांस्कृतिक नेते आहेत .

    लोकशाही मूल्यांबाबतचा आदर आणि भारतीय संविधानावरची अविचल निष्ठा, हे गिरीशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचं आणखी एक वैशिट्य. त्यामुळेच अनेक मोठ्या नेत्यांच्या चुका ते हिमतीने त्यांना सांगतात . त्यांच्या या परखडपणामुळेच त्यांची राजकीय कारकीर्द अल्पजीवी ठरली असावी . खरं तर राजकारण हा त्यांचा पिंडच नाही. समाज उभारणीच्या नवनवीन कल्पना सुचणे आणि त्या प्रत्यक्षात आणणे , हे त्यांना अधिक भावतं. आज वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांचा तो प्रवास नेटाने सुरु आहे . आपल्यासारखं वेगवेगळ्या कल्पनांनी भारून जावून , समाजाच्या व्यापक हिताचे काम करणारे, आपलं काम पुढे नेऊ शकतील, असे  साथीदार आपल्याला मिळाले नाहीत, हे  त्यांचे शल्य आहे. मात्र गिरीशभाऊंसारखी माणसंच आज दुर्मीळ झालीत. कुठल्याही क्षेत्रात नेटाने , समर्पितपणे काम करणारी माणसं आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उरलीत. त्यामुळेच  गिरीशभाऊंचे वेगळेपण, मोठेपण ठसठशीतपणे जाणवतं. आज समाज कमालीचा विखारी झाला असताना , एकमेकांबद्दल टोकाचा अविश्वास निर्माण झाला असताना विविध विचारांच्या माणसांमध्ये संवादाचा , सौहार्दाचा पूल बांधू शकणारा गिरीशभाऊंसारखा माणूस म्हणूनच खूप मौल्यवान ठरतो.

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

(अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा किंवा www.avinashdudhe.com वर क्लिक करा)

Previous articleजिव्हाळ्याची सावली !
Next articleराष्ट्रीय स्वयंसेवक संघ: किती खोल, किती पसारा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here