ॲड. किशोर देशपांडे : सामाजिक जाण व भान असलेलं व्यक्तिमत्त्व

 

ॲड. वसुसेन देशमुख

प्रसिद्धीझोतात राहण्याची इच्छा तशी सर्वांनाच असते आणि त्याकरिता एकप्रकारची चढाओढच सुरू असते. विशेषतः ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, अशा लोकांना प्रसिद्धीझोतात राहण्याचे कारणही असते आणि संधीही. परंतु आपल्या आसपास असे काही मोजके लोकं असतात, ज्यांच्याजवळ अमाप प्रतिभा असूनही त्यांना प्रसिद्धीची आस किंवा हव्यास नसतो. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ॲड. किशोर हरिहर देशपांडे. प्रथमदर्शनी अतिशय सरळ, साधं नि संयमी वाटणारं हे व्यक्तिमत्त्व तितकेच गंभीर, प्रतिभाशाली, विवेकी, संवेदनशील आणि खंबीर आहे याचा प्रत्यय त्यांच्या सहवासातून प्राप्त होतो.

कुशाग्र तार्किक बुद्धी, सूक्ष्म आकलनशक्ती, दांडग्या वाचनास चिंतनाची जोड, मराठी व इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि सखोल वैचारिक बैठक असे सारे गुण असूनही ॲड. देशपांडे यांच्या एकंदर वागणुकीत कमालीची सहजता आहे. आपल्या गुणांचे नि प्रतिभेचे ते उगाच कुठलेही प्रदर्शन मांडत नाहीत अथवा बडेजावपणा मिरवत नाहीत आणि तरीसुद्धा सरांच्या स्वभावात कुठलाही मिळमिळीतपणा नाही. मुळात अतिशय खंबीर व करारी असे हे व्यक्तिमत्त्व आहे.

पेशाने वकील म्हणून सर्वपरिचित असणारे देशपांडे सर हे एक सामाजिक जाण व भान असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. वकिलीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देशपांडे सर हे सामाजिक चळवळीत सक्रीय होते. तरुण असताना महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांच्या सर्वोदयी विचारसरणीने प्रेरित होऊन सरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पायी फिरून तळागाळातील लोकांच्या समस्या समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगोदर विनोबांच्या ‘तरुण शांती सेनेत’ व नंतर जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनीत’ त्यांनी बरेच काम केले. विशेषतः या काळात त्यांनी पुष्कळ भारतभ्रमण केले आणि देशातील सामाजिक रचना, जातिव्यवस्था व त्यातून निर्माण होणारे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. देशामध्ये १९७५ साली लागलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी सुमारे १३ महिन्यांचा तुरुंगवास देखील भोगला!

ऐन उमेदीतील तब्बल दहा वर्षे सामाजिक चळवळीत कार्य केल्यानंतर, साधारण १९८४ सालापासून सरांनी आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात केली. अतिशय महत्वाची बाब म्हणजे वकिलीचा सुरू केल्यानंतर सरांनी आपल्या पूर्वायुष्यातील सामाजिक कार्याचं कोणतंही भांडवल कधीच केलं नाही. माझ्या आकलनानुसार वाचन व लिखाणात रमणाऱ्या देशपांडे सरांचा वकिली हा मूळ पिंड नाही; परंतु हाती घेतलेले काम हे प्रामाणिकपणे व जबाबदारीने करायचे या सवयीमुळे त्यांनी मागील ४० वर्षांच्या आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एक नैतिक उंची प्राप्त केली आहे. आपल्या तत्त्वांशी आणि नितिमत्तेशी कुठलीही तडजोड न करता पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत राहून पक्षकारांचे हित जोपासणे, या गोष्टीला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं. तसेच एखादी केस जिंकण्यासाठी त्यांनी कधीही न्यायालयाची दिशाभूल केली नाही. स्वतःकडे आलेल्या केसमधील कच्चे दुवे आणि कमजोर मुद्दे हे त्यांनी न्यायालयापासून कधीही लपविले नाहीत; किंबहुना एखादी कायदेशीर तरतूद ही स्वतःकडे असलेल्या केसमधील तथ्यांच्या विरुद्ध असल्यास प्रसंगी त्यांनी ते प्रांजळपणे न्यायालयासमोर स्वीकारले.

मराठी व इंग्रजी भाषांवर कमालीचे प्रभुत्व असूनही न्यायालयीन प्रकरणांमध्ये त्यांनी कायम साध्या, सोप्या, सरळ, सुटसुटीत भाषेचा वापर केला. न्यायालय म्हणजे वकिलांनी आपले भाषाकौशल्य दाखवायचे ठिकाण नव्हे, याचे त्यांना व्यवस्थित भान होते; म्हणूनच तिथे वापरायची भाषा ही सर्वसामान्य लोकांना समजणारी अशी सोपी व सुटसुटीत असावी, यावर नेहमीच त्यांचा आवर्जून भर राहिला आहे. कमालीचा साधेपणा या सरांच्या विशेष गुणातच त्यांच्या वरील भूमिकेचा उगम आहे.

कायद्याची सर्वच तत्त्वे ही पुस्तकांमध्ये मिळत नसून, अनेक तत्त्वे ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी वेळोवेळी पारित केलेल्या न्यायनिर्णयांमधून विकसित होतात. सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांमधील तत्त्वांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. कायद्याच्या परिभाषेत अशा तत्वांना ‘प्रिसेडेंट’ असे म्हणतात. आपल्या प्रकरणाला लागू पडणारे योग्य प्रिसेडेंट शोधून ते न्यायालयासमक्ष मांडणे हा वकिलीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या केसमधील तथ्यांना लागू पडणारे प्रिसेडेंट शोधण्यावर देशपांडे सरांचा विशेष भर असायचा आणि ते शोधण्याची जबाबदारी ही बहुतांश वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ज्युनिअर वकिलांवर रहायची. याकामी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर नेहमी म्हणायचे – “Every fact has its precedent, you just have to search for it.” त्यांच्या उपरोक्त वाक्यावरून सरांची कामाप्रती असणारी निष्ठा व जिद्द प्रतीत होते.

सरांना असणारी कायद्याची जाण, कायद्यातील तरतुदींवर त्यांची असणारी पकड, कायद्याच्या तरतुदींचा अर्थ लावण्याचे (Interpretation) त्यांच्याकडे असणारे कसब या सर्व गुणांमुळे अमरावती जिल्हा न्यायालयात सरांच्या शब्दाला विशेष मान प्राप्त झाला आहे. अगदी तेथील न्यायाधीशांना सुद्धा कोणत्याही कायदेशीर मुद्द्यावर काही अडचण आल्यास ते सरांचा आवर्जून सल्ला घ्यायचे. अमरावती जिल्हा न्यायालयातून इतरत्र बदली झालेल्या आणि पदोन्नती मिळालेल्या न्यायाधीशांचा निरोप समारंभ आयोजित करणे, ही येथील वकील संघाची एक परंपरा राहिली आहे. अशा अनेक निरोप समारंभांमध्ये न्यायाधीशांनी किशोर देशपांडे सरांच्या नावाचा व त्यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांचा आवर्जून उल्लेख केला आहे. अशाच एका समारंभात पदोन्नती मिळालेल्या अमरावतीच्या तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी – “Adv. K. H. Deshpande was like a legal encyclopaedia for me” असे गौरवोद्गार काढले होते. यावरूनच सरांनी वकिलीच्या क्षेत्रात गाठलेली उंची लक्षात येते.

वैचारिक स्पष्टता आणि निस्वार्थी व प्रेमळ स्वभाव या गुणांमुळे सरांची ‘वकिलांचे मार्गदर्शक’ अशीदेखील ख्याती आहे. त्यांच्या ऑफिसमधील नवोदित वकिलांखेरीज इतर अनेक वकील मंडळीसुद्धा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये सरांचे नेहमीच मार्गदर्शन घेतात. वकिलीचा व्यवसाय करताना पुष्कळदा क्लिष्ट कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात आणि पुढील मार्ग सापडत नाही. अशावेळी अनेक वकिलांना सरांचा आधार वाटतो कारण अतिशय गुंतागुंतीचे वाटणारे प्रश्नसुद्धा सर अगदी सहजपणे सोडवितात. त्यामुळे अनेक वकिलांकरिता अचूक मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणारे हक्काचे ठिकाण म्हणजे ॲड. किशोर देशपांडे.

सरांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे खटले हाताळले आहेत. हिंदू वारसाहक्क कायद्यांतर्गत येणारे वाटणीचे दावे, कराराच्या पूर्ततेसंबंधीचे दावे, मृत्यपत्रासंबंधीचे दावे, भूसंपादन कायद्याखाली येणारी प्रकरणे, लवाद प्रकरणे यांसारख्या विषयांमध्ये सरांचा विशेष हातखंडा आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अमरावती शहरालगत असणाऱ्या नांदगावपेठ M.I.D.C. येथे उभारलेल्या औष्णिक विद्युत प्रकल्पाकरिता सिंचनाचे पाणी वळविण्याचा निर्णय तत्कालीन महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्यावेळी माजी आमदार बी. टी. देशमुख, प्रभाकरराव वैद्य, सोमेश्वर पुसतकर यांच्या सहकार्याने सरांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलेला कायदेशीर लढा हा सर्वश्रुत आहे.

कोरोनाकाळात लागलेल्या टाळेबंदीपासून सरांनी स्वतः न्यायालयात जाणे बंद केले आहे. वयाची सत्तरी गाठल्यानंतर सरांनी स्वेच्छेने निवृत्त होण्यामागे, नवोदित वकिलांना संधी मिळावी हासुद्धा एक उदात्त हेतू आहे आणि तरीसुद्धा पूर्णतः कामकाज बंद न करता सर हे आपल्या ऑफिसमधूनच त्यांच्या सहकाऱ्यांना व इतर नवीन वकिलांना मार्गदर्शन करत असतात. सरांच्या निष्पक्षपाती आणि निर्भीड स्वभावामुळे अनेक पक्षकार तसेच वकिलांनी परस्परसंमतीने त्यांची काही प्रकरणांमध्ये लवाद (Arbitrator) म्हणून नेमणूक केली आहे.

मागील सुमारे ४० वर्षांपासून वकिली करताना सरांनी सामाजिक भानसुद्धा जपले आहे. जातीयवादाचा प्रचंड तिटकारा असणाऱ्या देशपांडे सरांनी आपल्या जीवनात त्याला कधीच थारा दिला नाही. कुठल्याही जातीच्या व्यक्तीमधील केवळ गुणांवर भर देऊन ते आयुष्यभर प्रत्येकाला सोबत घेऊन चालले आहेत. किंबहुना याच कारणामुळे समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये त्यांची मित्रमंडळी व चाहते आहेत. सामाजिक तथा वैयक्तिक जीवनातदेखील सरांनी धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, समानता, उदारमतवाद यांसारख्या पुरोगामी तत्त्वांना विशेष महत्त्व दिले आहे. तसेच समकालीन सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आपले विचार हे अतिशय परखडपणे व निर्भिडपणे मांडत आले आहेत. वेळप्रसंगी उचित भूमिका घेण्यामध्ये त्यांनी कधीही कच खाल्ली नाही – मग ती भूमिका बहुमताच्या विपरीत का असेना! “सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता” या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे सर आयुष्यभर जगले आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या एका भजनात म्हणतात:

“जो सत्याविण शब्द‌ न बोले सहजहि कोणासी, 

मित्रा कर मैत्री त्यासी.

सहनशीलता सरळवृत्तिची, वागणूक ज्याची ।

अपुले दुःख न वदे कुणाला, चिंता इतरांची ।।

चरित्र निर्मळ, राहणी साधी, निंदी न कवणासी ।

दिनचर्या सततची योग्य ती, हाव न मानाची ।।

हीन दीनाची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची ।

मित्रा कर मैत्री त्यासी ।।

मानवी जीवनात ज्या आदर्शांची अपेक्षा राष्ट्रसंतांनी केली आहे, ते सर्व आदर्श अंगिकारून जगणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ॲड. किशोर देशपांडे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व यंदा वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहे. त्याबद्दल त्यांना उदंड व सुदृढ आयुष्य लाभो आणि हा दीपस्तंभ असाच तेवत राहो हीच सदिच्छा.

(लेखक युवा पिढीतील अभ्यासू वकील आहेत.)

९९७०३५६१२०

   

Previous articleधनंजय चिंचोलीकर नावाचा बब्रुवान रुद्रकंठावार…
Next articleबोडोलँण्ड
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here