-मधुकर भावे
देशाचे गृहमंत्री श्री. अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर येऊन गेले. ‘लालबागच्या राजाचे दर्शन’हा एक मुंबई भेटीचा कार्यक्रम होता. पण मुख्य कार्यक्रम मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीकरिता ते आले होते. त्यांनी त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगून टाकले की, ‘शिवसेनेला भुईसपाट करा….’ बरोबर महिन्यापूर्वी त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरपणे सांगून टाकले होते की, ‘भाजपाविरोधातील प्रत्येक राज्यातील सगळे विरोधी पक्ष आम्ही संपवून टाकू. आणि प्रत्येक राज्यात भाजपाचेच राज्य असेल.’
देश पातळीवर आणि राज्य पातळीवर केवळ भाजपाचेच राज्य ठेवायचे आणि विरोधकांना संपवून टाकायचे हा कार्यक्रम नड्डा यांनी जाहीर केला. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘मुंबईतून शिवसेनेला भुईसपाट’ करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. दोन्ही कार्यक्रम भाजप पक्षवाढीसाठी फार महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. परंतु अडचण अशी आहे की, नड्डा किंवा शहा यांच्या सांगण्यावर देशातील सगळेच लोक मतदान करतील अशी ग्वाही तेही देवू शकत नाहीत आणि प्रत्येक राज्यातून विरोधक संपवायचे किंवा मुंबईतून शिवसेनेला भुईसपाट करायचे, अशी या दोघांची इच्छा असली तरी शेवटी या देशातील आणि मुंबईतील मतदार याचा निर्णय करणार आहे. दिल्लीतून पक्षाध्यक्ष किंवा मुंबईतून गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याबरोबर तसे काही घडेल, अशी लोकशाहीत व्यवस्था नाही. त्याकरिता निवडणुक व्हावी लागेल. मतदान व्हावे लागेल, मतमोजणी होईल, मग निकाल जाहीर होतील त्यावेळी ‘सर्व राज्यांतून विरोधक हद्दपार झाले की नाही’ याचा हिशोब नड्डा यांना मांडता येईल. त्याचप्रमाणे ‘मुंबईतून शिवसेना भुईसपाट झाली की नाही’, याचा निर्णयही महापालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर निकाल लागेल आणि त्या निकालानंतरच ‘भुईसपाट’चा िनर्णय ठरेल.
फार जुना संदर्भ आहे…. १९६६ साली इजिप्तचे त्यावेळचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर यांनी घोषणा केली होती की, ‘इस्त्राईल या देशाला आम्ही भुईसपाट करून टाकू….’ त्यांचा मूळ शब्द होता…, ‘वूई वील डिस्ट्रॅाय इस्त्राईल’ जगातील बहुसंख्य वृत्तपत्रांनी नासेर यांच्या घोषणेला प्रचंड प्रसिद्धी दिली. पण नासेर यांना इस्त्राईल हा देश नष्ट करता आला नाही. नड्डा आणि शहा यांच्या निवेदनांनाही फार मोठी प्रसिद्धी मिळाली. प्रत्येक वृत्तपत्रांचे शीर्षक वेगळे आहे. कुणी ‘भुईसपाट’ शीर्षक दिले…. कोणी ‘पाठीत खंजीर खुपसल्याचे’ शिर्षक दिले. टाईम्स ऑफ इंडियाने ‘Betrayer Uddhav mustn’t go unpunished, says Shah’असे शिर्षक दिले. शिवाय या शिर्षकाला साक्ष म्हणून गणपतीबाप्पांचा एक मोठा फोटोही बातमीत टाकला. देशातील अनेक राज्यांतील निवडणुका अजून व्हायच्या आहेत. त्यामुळे नड्डा यांचे भाकित किती खरे ठरते, या करिता २०२४ पर्यंत थांबावे लागेल. मुंबई महापालिकेची निवडणुक नजीकच्या काळात आहे. गुजरातचे अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. आणि मुंबईत येऊन त्यांनी मराठी माणसांची संघटना असलेल्या शिवसेनेला भुईसपाट करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे शहा यांचा शब्द मुंबईतील मतदार किती झेलतात… की, तो खाली पडतो…. हे थोडे दिवसांनी समजू शकेल.
मात्र, एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे की, प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे हे लोकशाहीत अभिप्रेत आहे. मात्र, अमूक पक्षाला ‘भुईसपाट’ करू किंवा ‘सर्व राज्यांतून विरोधी पक्षांना संपवून टाकू’, ही भाषा लोकशाहीला मान्य होणार नाही. ती कोणीही करो… मतदारांना ते अजिबात मान्य होणार नाही. हा अधिकार नड्डा आणि शहा यांचा नाही. तो सामान्य मतदारांचा आहे. तो अधिकार एखाद्या नेत्याने ‘आपला अधिकार आहे’ असे समजून आदेशवजा भाषणे करणे, हेच मूळात लोकशाही विरोधात आहे. ‘आमचा पक्ष मजबूत करू… आम्ही बहुमत मिळवू….’ ही भूमिका लोकशाहीत सभ्य आणि सुसंस्कृत मानली जाते. ‘विरोधकांना संपवून टाकू…. किंवा आमक्याला भुईसपाट करू….’ ही भाषा मतदारांचे अधिकार आपल्या हातात आहेत, असे समजून केलेली भाषा आहे. तसे व्यवहारात घडतेच असे समजण्याचे कारण नाही. ५०-६० वर्षांतील अशी अनेक उदाहरणे अशी आहेत की, याच मतदारांनी चमत्कार केलेला आहे. आजच्या काळात मीडिया हाताशी आहे, पैसा हाताशी आहे, एवढ्या कारणांमुळे हवं ते घडवू शकतो, इतक्या स्वस्तपणे मतदारांना गृहित धरू नये…. देशातील मतदार शांतपणे गेल्या १०-१२ वर्षांचा हिशोब करत आहे. त्या सामान्य मतदारांचे मुख्य प्रश्न पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत. सत्तेवर कोणीही बसा…. पण, स्वत:च्या सत्ताकारणात गुरफटवून घेवून, सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांना मतदार जागेवर आणू शकतो, असे यापूर्वीचे दाखले आहेत. त्यामुळे टोकाची भाषा मतदाराला मान्य होत नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये सगळ्यात उपेिक्षत कोण असेल तर हा सामान्य मतदार आहे. त्याचे प्रश्न वेगळे आहेत. महागाईचे आहेत… बेरोजगारीचे आहेत…. वाहतुकीचे आहेत…. सर्वच बाजुंनी त्याची कोंडी झालेली आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना एक महत्त्वाची गोष्ट गेल्या दहा वर्षांत सर्व शासकीय अहवालांनी मान्य करून टाकली आहे की, विशिष्ट वर्गांची श्रीमंती झपाट्याने वाढली आहे आणि त्याच वेगाने गरिब अधिक गरिब आणि हताश, असहाय्य झाला आहे. सगळी शहरे तुंबलेली आहेत. ग्रामीण भागात रोजगार नाहीत. प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा झाली होती. गेल्या ८ वर्षांत १६ कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते. कारणे काही असतील पण, व्यवहारात १६ कोटी नव्हे तर जवळपास १० कोटी तरी रोजगार गेले. शहरांची वस्ती गेल्या दहा वर्षांत २५-३० टक्क्यांनी वाढली. बेकायदा अतिक्रमणे वाढली. बेकायदा इमारती वाढल्या. त्यांना अभय दिले गेले. त्या जागांचे दर कोटी-कोटींच्या पुढे गेले. सामान्य माणसांना न परवडणाऱ्या सर्व गोष्टी गेल्या दहा वर्षांत आकडेवारीनुसार सिद्ध करता येतील. मग भलं कोणाचं झालं? या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायलाही सत्ताकरणाच्या साठमारीत कोणालाच वेळ नाही.
धर्म- जात याच्या उन्मादावर वातावरण निर्मिती केली जात आहे. मुख्य प्रश्नांपासून दूर जाऊन भावनेवर आरूढ व्हायचे, या भूमिकेतून वातावरण निर्मिती सुरू आहे. परवा मुंबईत बेस्टच्या एका बसवर एक पोस्टर पाहिले.. या पोस्टरवर लिहिले आहे की…. ‘आपले सरकार आले…. हिंदूंच्या सणांवरील विघ्न दूर झाले….’ त्यात गणपतीबाप्पांचा फोटो…. मोदीसाहेब… शहासाहेब…. फडणवीस साहेब…. यांचे फोटो, इथपर्यंत ठीक आहे…. पण ज्अतिशय अक्कल हुशारीने बसवर लावलेल्या पोस्टरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो कुठे दिसला नाही. वातावरण निर्मिती कशी करायची… याचे जणू एक विद्यापीठ भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी सुरू केलेले आहे. काँग्रेसजवळ एवढी हुशारी कधीच नव्हती. प्रख्यात गीतकार शैलेंद्र यांची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे… राज कपूरच्या एका चित्रपटात त्यांनी एक छान गाणे दिले आहे.
‘सबकुछ सिखा हमने….
ना सिखी होशियारी…
सच है दुनियावालो…
हम हैं अनाडी…’
सध्याची काँग्रेसची अवस्था अशीच आहे. ही प्रसारमाध्यमांची साधने कशी वापरायची, हे काँग्रेसला कधीच कळले नाही. ही साधने काँग्रेसनेच राजीव गांधी राजवटीत निर्माण केली. पण, त्याचा कसा राजकीय उपयोग करता येतो, हे भाजपा दाखवून देत आहे. लोकांना कशाततरी गुंतवून ठेवायला पाहिजे. हा राजकीय नेतृत्त्वाचा मोठा कार्यक्रम असला पाहिजे. तेही आमच्या काँग्रेसवाल्यांना समजले नाही. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ कितीही प्रामाणिक आणि मनापासून असली तरी, त्याचा परिणाम दोन वर्षे टिकायला पुरी पडेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. कारण अलीकडे अशा प्रामाणिक कार्यक्रमांचे महत्त्व समाजालाही वाटेनासे झालेले आहे. उद्या महात्मा गांधी प्रत्यक्ष अवतरले आणि लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले तरी ते पराभूत होतील. कारण आजच्या लोकसभेच्या निवडणुकीचा एका उमेदवाराचा खर्च बघून ते उपोषणालाच बसतील. आणि मला मतं टाकू नका, असे सांगतील. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा पराभूत झालेच होते.
वातावरण बदलले जात आहे. लोक अतिशय शांतपणे हे सगळं पहात आहेत.. वाचत आहेत. ऐकत आहेत.. त्यामुळे या देशात मजबूत विरोधी पक्ष हवा की नको… तसेच आजच्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत बसवायचे की, विरोधक म्हणून बसवायचे याचा निर्णयही मतदारांनाच करायचा आहे. ‘मुंबईत शिवसेना हवी की नको’… याचा निर्णयही मतदारच करणार आहेत. कोणाला आवडो न आवडो …. शिवसेनेचे कोणी असो नसो…. सामान्य माणसांची भावना स्पष्टपणे अशी आहे की, ‘मुंबईत शिवसेना असायलाच हवी.’. अर्थात ती कोणाची शिवसेना? असा आज निर्माण केलेल्या प्रश्नाचे उत्तर कोर्टाने द्यायचे असले तरी त्याचे खरे उत्तर शेवटी मतदारच अतिशय चाणाक्षपणे देणार आहेत. माध्यमांनी कुणाची हवा कशी बनवावी हा त्या माध्यमांचा प्रश्न आहे. पण माध्यमे मतदारांवर फार मर्यादित परिणाम करतात. सामान्य मतदार सगळ्यात चाणाक्ष आहेत. आणि लोकशाहीचा खरा रखवालदार तोच मतदार आहे. माध्यमांनी हवा तयार केली. घोषणा तयार केल्या. त्यामुळे फार मर्यादित परिणाम घडतो. जर माध्यमांचाच प्रभाव महत्त्वाचा मानला आणि ते म्हणतील त्या प्रमाणेच होणार, असे गृहीत धरले तर आशिया क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचा संघ पराभूत होणे शक्यच नव्हते. कारण सर्व माध्यमांनी अशी काही हवा केली होती की…. ‘एकही सपना… एशियापर छाना….’ ‘ब्लू टीम की कमाल….’ घोषणांचा कारखाना माध्यमांकडे आहे. पण व्यवहारात काय घडतेय ते आपण पाहिले. जे क्रिकेटमध्ये आहे. तेच राजकारणात आहे. चित्र जसं रंगवले आहे तसेच मतदार घडविल, हे कधीही गृहीत धरून चालू नये. क्रिकेटमध्ये तळाचा संघही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकतो, हे आपण पाहतोच… राजकारणातही तसे होऊ शकते. शेवटी मतदार सर्वश्रेष्ठ आहेत. त्या सामान्य मतदारापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. हीच तर भारतीय लोकशाहीची सगळ्यात शक्तीमान अशी रचना आहे. त्यामुळे श्री. नड्डा असोत… किंवा श्री. शहा असोत… पक्षाच्या प्रचाराकरिता त्यांची निवेदने काही असली तरी मतदारांना एवढे गृहित धरू नका. ‘भुईसपाट’ची घोषणा निकाल जाहीर झाल्यानंतर करता येईल…. एवढी घाई करू नका….
सध्या एवढेच….
(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)
9869239977