बिंब-प्रतिबिंब – कवितांमधून उलगडणारे चित्रपट..!

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)

-नीलांबरी जोशी

जब जब दर्द का बादल छाया, जब गम का साया लहराया

जब आंसू पलकों तक आया, जब ये तनहा दिल घबराया

हमने दिल को ये समझाया, दिल आखिर तू क्यों रोता है..

दुनिया में यही होता है..

ये जो गहरे सन्नाटे हैं, .वक्त ने सब को ही बांटे हैं

थोड़ा गम है सबका किस्सा, थोड़ी धूप है सब का हिस्सा

आंख तेरी बेकार ही नम है, हर पल एक नया मौसम है

क्यूं तू ऐसे पल खोता है, दिल आखिर तू क्यूं रोता है.

“जिंदगी ना मिलेगी दोबारा” या चित्रपटातली जावेद अख्तर यांची ही कविता चित्रपटातल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्याबद्दल भाष्य करतेच पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अगणित क्षणांशी ती निगडित आहे. हिंदी चित्रपटांमध्ये दिलीप चित्रे यांची अर्धसत्य ही कविता चित्रपटाच्या शीर्षकाबरोबरच त्यातल्या नायकाच्या आयुष्यातल्या हिंदोळणार्‍्या मन:स्थितीशी पूर्णपणे जुळणारी आहे. तसंच हरिवंशराय बच्चन यांची “तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ” ही कविता “अग्निपथ” चित्रपटातल्या नायकाच्या संघर्षाशी सुसंगत आहे. “अविष्कार” हा बासू भट्टाचार्य यांचा राजेश खन्ना / शर्मिला टागोर यांच्या अभिनयानं गाजलेला चित्रपट. या चित्रपटातल्या ज्ञानदेव अग्निहोत्री यांच्या कविता खूप अर्थपूर्ण आहेत.

इंग्रजी चित्रपटांमध्येही असंख्य ठिकाणी कवितांच्या ओळींचा समर्पक वापर केलेला दिसतो. उदाहरणार्थ, फ्युनरल ब्लूज ही डब्ल्यू एच आॉडेनची कविता “फोर वेडिंग्ज अॅंड अ फ्युनरल” या चित्रपटात वापरली आहे. “इटर्नल सनशाईन इन द स्पॉटलेस माईंड” या चित्रपटाच्या शीर्षकात अलेक्झांडर पोपच्या Eloisa to Abelard या कवितेतली ओळ वापरली आहे.

मात्र ही उदाहरणं चित्रपटातल्या एखाद्या प्रसंगापुरती मर्यादित आहेत. संपूर्ण चित्रपट एखाद्या किंवा अनेक कवींच्या कवितांमधून उलगडत जातो असे काही चित्रपट मनाला चटका लावून जातात. त्यापैकी एक महत्वाचा चित्रपट म्हणजे “सोफीज चॉईस”.

या चित्रपटात स्टिंगो हा तरुण लेखक १९४७ मध्ये ब्रुकलिनला आपली पहिली कादंबरी लिहिण्यासाठी येतो. सोफी या तरुणीबरोबर त्याची मैत्री होते. सोफीचा प्रेमिक असतो नाथन. सोफी हिटलरच्या छळछावण्यांमधून वाचलेली असते. तिला त्या सगळ्या आठवणी त्रास देत असतात. नाथन हा स्किझोफ्रेनिक असल्याचं आणि तो सोफीला त्रास देत असल्याचं स्टिंगोच्या लक्षात येत जातं.

चित्रपटाच्या नावातला “सोफीज चॉईस” हा काय प्रकार असतो? तर होलोकॉस्टमध्ये असताना सोफीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन छोटी मुलं असतात. तिच्या दोन मुलांपैकी एकाला गॅस चेंबरमध्ये पाठवायची तिला निवड करायची असते. जर तिनं निवड केली नाही तर दोन्ही मुलं गॅस चेंबरमध्ये जाणार असतात. तेव्हा सोफीला मुलीला गॅस चेंबरमध्ये पाठवायचा निर्णय घ्यावा लागतो. या तिच्या चॉईसमुळे तिचं पुढचं संपूर्ण आयुष्य कोलमडत जातं.

या चित्रपटात एमिली डिकनसनची Ample make this bed ही ३४ शब्दांची कविता वापरली आहे. ही कविता या चित्रपटात वापरणं हे किती चपखल आहे हे सतत दिसतं.

Ample make this Bed —

Make this Bed with Awe —

In it wait till Judgment break

Excellent and Fair.

Be its Mattress straight —

Be its Pillow round —

Let no Sunrise’ yellow noise

Interrupt this Ground —

ही कविता aubade या प्रकारात मोडते. म्हणजे काय? तर “दिल को लगा हुआ था डर आौर सवेरा हो गया (वह दिन कहॉं गये बता)”, “इस रात के हर पल से रातेंही उभर आये (सिमटी हुई यह घडियॉ)”, “उठ जायेगी शब की महफिल- नूर ए सहर के सुनके नकारे (ढलती जाये रात)..” या सर्व गाण्यांमधल्या या ओळी “पहाट झाल्यानंतर आपण दुरावणार” या प्रेमिकांच्या धास्तीचं वर्णन करतात. फ्रेंच भाषेतला Aubade हा शब्द त्यासाठी इंग्रजीतही वापरला जातो.

“सोफीज चॉईस”मध्ये सोफी आणि नाथन यांना एकमेकांबरोबर रहायचं आहे. पण त्यांना ते वास्तव जगात आपापल्या भूतकाळामुळे जमत नाही. शेवटी ते मरण पावतात तेव्हाच “आपण विलग होऊ याची त्यांना वाटणारी धास्ती” संपते.

ख्रिश्चन धर्मात “जजमेंट डे” या शब्दाचा कायमस्वरुपाचा मोक्ष आणि एक परिपूर्ण जग असा ढोबळमानानं अर्थ होतो. हे त्या धर्मात असलेल्या पुनर्जन्म, मोक्ष, पुनरुत्थान अशा कल्पनांशी निगडित आहे. एमिलीच्या कवितेत ख्रिश्चन धर्माची प्रतीकं नेहमीच दिसतात. त्यामुळे ती In it wait till Judgment break, Excellent and Fair ही प्रतीकं या ओळींमध्ये वापरलेली आहेत.

दोन प्रेमिकांना चिरस्वरुपी एकत्र आणणारी एक – Excellent and Fair – सकाळ या अर्थानं एमिलीनं या कवितेत Let no sunrise’ yellow noise, Interrupt this ground हे शेवटच्या ओळीत लिहिलं आहे. असं प्रेमिकांनी एकत्र येणं मृत्यूनंतरच शक्य आहे असं सोफी आणि नाथन यांना वाटत असतं. लौकिक दुनियेतही रोमिओ-ज्युलिएटपासून “एक दूजे के लिये”मधल्या जोडप्यापर्यंत सगळ्यांना मृत्यू हीच प्रेमाची सुरुवात वाटते. रिसरेक्शन-पुनरुत्थान हे मृत्यूनंतरच होतं, ही ख्रिश्चॅनिटीमधली संकल्पना. A perfect end for a new beginning हे तत्व असल्यामुळे Make this Bed with Awe — हे शब्द कवितेत येतात. मृत्यूला आनंदानं कवटाळणं असा अर्थ एमिलीला अभिप्रेत आहे.

सोफी आणि नाथन ज्या पध्दतीत एकमेकांच्या बाहुपाशात मरण पावलेले दिसतात त्या अर्थानंही ही कविता “सोफीज चॉईस”मध्ये समर्पक आहे.

या कवितेतला Ample शब्द हा सेन्शुअस आहे. “भरपूर” या अर्थानं आलेला हा शब्द  पु.शि. रेगे यांच्या “पुष्कळा” या कवितेची आठवण करुन देतो.

एमिलीच्या कवितेतली मोठी शय्या (Ample bed) ही प्रेमिकांमधला शरीरसंबंध व्यक्त करते. पण ख्रिश्चन धर्मात प्युरिटान लोकांमध्ये विवाह ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. विवाहबाह्य संबंधांची अखेर मृत्यूतच होणार असा विश्वास तिथे दिसतो. एमिलीनं त्याही अर्थानं ही कविता शरीरसंबंधांपासून मृत्यूपर्यंत विस्तारत नेली आहे.

सोफी आणि नाथन यांच्यातलं प्रेम विवाहबाह्य आहे इतका मर्यादित अर्थ चित्रपटात मात्र नाही. सोफीला वाटणारा अपराधीपणा आणि नाथनचा स्किझोफ्रेनिया यामुळे जगातले शारीरिक आनंद कितीही चांगले असले तरी मृत्यू हा त्यांना त्यांच्या चिरदाह वेदनेचा उचित अंत वाटतो.

चित्रपटात या अर्थानं ती कविता येते.

तसंच, Be its Mattress straight — Be its Pillow round —

या दोन ओळींमध्ये मॅट्रेस म्हणजे शरीर, जे मृत्यूनंतर ताठ, सरळ असेल आणि त्यातला मेंदू वर्तुळाकार स्थिर आणि मुख्य म्हणजे शांत असेल. तसंच या ओळीत मेंदू वर्तुळाकार असेल अशी कल्पना करुन वर्तुळाच्या रेषेला अंत नसतो या प्रतीकानं “शरीर मरतं, मेंदू नव्हे.. ” हेदेखील कवितेत सांकेतिक पध्दतीत येतं.  सोफी आणि नाथन यांना मृत्यूनंतर तरी स्थिर म्हणजे विचारांचा कोलाहल नसलेला मेंदू प्राप्त व्हावा या अर्थानं आपण चित्रपटात या ओळी वापरल्या आहेत.

चित्रपटात सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोघांनाही जगातला त्रास असह्य झालेला दिसतो. इथे सुरेश भट आठवतात, “इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”

चित्रपटात, एमिली डिकनसनच्या पुस्तकाबद्दल लायब्ररीत सोफी विचारणा करते असा एक प्रसंग आहे. या प्रसंगाआधी वर्गात तिचे प्रोफेसर जी कविता शिकवतात ती देखील एमिलीची मृत्यूवरचीच कविता आहे.

Because I could not stop for Death –

He kindly stopped for me –

The Carriage held but just Ourselves –

And Immortality.

या कवितेतली Immortality सोफीला हवीशी वाटत असते. नाथन तिला त्यानंतर भेटतो. दोघांनाही एमिलीच्या कविता आवडतात. पण पहिल्या भेटीतच तो तिला Ample make this bed.. हीच कविता वाचून दाखवतो. एमिलीच्या Hope सारख्या कविता तो वाचून दाखवत नाही. दोघांच्या पहिल्या भेटीतल्या कवितेतच दिग्दर्शकानं त्यांचा अटळ असा मृत्यूरुपी अंत सूचित केला आहे.. !

एमिली डिकनसनच्या कवितांचा समर्पक वापर असलेला अजून एक चित्रपट म्हणजे “वाईल्ड”.

हा चित्रपट शेरिल स्ट्रेड हिच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर आधारित आहे. शेरिलच्या आईच्या मृत्यूचा शोक तिच्या मनातून अजिबात जात नाही. तेव्हा ती ११०० मैलांचा दुर्गम “पॅसिफिक क्रेस्ट ट्रेल” चालत पार करायचा ठरवते. मोहावे डेझर्टपासून सुरु होणारा तिचा हा प्रवास आत्मशोधाचा प्रवास कसा ठरतो ते पुस्तकात आणि चित्रपटात दिसतं. शेरिलच्या बाबतीत विचार, चिंतन, मनन हे टप्पे एकटीनं चालताना आपोआप घडत जातात.

११०० मैलांचा शेरिलचा हा चालायचा प्रवास एमिली डिकनसनच्या कवितेनं सुरु होतो. ती ही कविता आपल्या नोंदीत वारंवार वापरते.

If your Nerve, deny you—

Go above your Nerve—

He can lean against the Grave,

If he fear to swerve—

शेरिलची आई बॉबी हिनं तिच्या दारुड्या, मारहाण करणार्‍्या वडिलांना सोडून एकटीनं मुलांचा वाढवलेलं असतं. आपल्या मनावरच्या आणि शरीरावरच्या जखमा ती सतत लपवत असते. या संदर्भात या चित्रपटात एड्रियन रीच या कवयित्रीची कविता वापरली आहे. ती अशी :

Living in the earth-deposits of our history

Today a backhoe divulged out of a crumbling flank of earth

She died a famous woman denying

her wounds..

denying.. her wounds came from the same source as her power..

या कवितेतल्या शेवटच्या ओळी मारी क्युरी हा महान संशोधिकेला उद्देशून लिहिलेल्या आहेत. पण त्या बॉबीला तितक्याच लागू होतात. मारी क्युरीदेखील सिंगल पॅरेंट होती. तिच्या काळात तिनं अलौकिक धैर्यानं लावलेला रेडिअमचा शोध हे एक आश्वर्य होतं. रेडिएशनमुळे त्रास होऊन वयाच्या ६६व्या वर्षी ती एका विचित्र आजारानं मरण पावली. पण तिच्या संशोधनामुळर कॅन्सरवरच्या उपचारांचा मार्ग खुला झाला. आपल्या कामाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो आहे हे तिला कळत असूनही ते घाव ती लपवत राहिली. तिच्या यशाचा मार्ग आणि तिच्या अंगावरचे घाव हे तिच्या संशोधनातूनच उगम पावले होते. शेरिलची आई बॉबी हिचं आयुष्यदेखील याच प्रकारचं असतं. चांगले वाईट दोन्ही अनुभव तिनं खुल्या मनानं स्वीकारलेले असतात. आपल्या जखमा हेच बॉबीचं सामर्थ्य होत जातं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

‘“”वाईल्ड” या चित्रपटात ११०० मैलांचा ट्रेल पार केल्यानंतर शेरिलच्या मनावरचं ओझं कमी होत जातं. आयुष्य म्हणजे काय याचा तिच्यापुरता अर्थ तिला समजत जातो.

आयुष्यात भटकताना आयुष्याचा अर्थ लागत जातो हे समोर आणणारा आणि त्यासाठी शेक्सपिअरच्या एका अजरामर कवितेचा संदर्भ असलेला अजून एक चित्रपट म्हणजे “नोमॅडलॅंड”.

हा चित्रपट फर्न या मध्यमवयीन स्त्रीचा आहे. फर्न अमेरिकेत ज्या छोट्या गावात रहात असते तिथली महत्वाची कंपनी बंद पडल्यावर ते गावच बंद पडतं. फर्न तिथल्या ज्या शाळेत इंग्रजी विषयाची शिक्षिका असते ती शाळाही बंद होते. एकूण त्या गावचा पोस्टल कोडच बंद होतो. फर्नचा नवराही मरण पावतो. फर्नचं आयुष्य ज्या गोष्टींभोवती गुरफटलेलं होतं, त्या सगळ्याच गोष्टी संपून जातात.

मग फर्न एका भल्यामोठ्या व्हॅनमध्ये सगळं सामानसुमान भरुन भटकंतीला निघते. अधूनमधून एखाद्या गावात मिळेल ती नोकरी करते. भटक्यांचे जिप्सी कॅंपस् असतात तिथे अशा प्रकारे जगण्याची काही कौशल्यं शिकून घेते. वरवर पहाता हा चित्रपट अमेरिकेतली बेरोजगारी, लोकांचं बेघर होणं, जगण्यातली सुरक्षितता कमी होणं यावर भाष्य करतो असंही वाटतं. मात्र या सगळ्या कालप्रवाहाला, समाजाला मागे टाकून फर्न शांतपणे आपलं भटकं आयुष्य सुखात जगते आहे. समाजाच्या चौकटींबाहेर जगणार्‍्या माणसांबरोबर चौकटीत राहिलेली एक व्यक्ती कसं जुळवून घेते या थीमवर “नोमॅडलॅंड” चित्रपट आधारित आहे.

या चित्रपटात व्यक्तिरेखा उलगडत जाणं, अमेरिकेतल्या काही राज्यांमधलं वातावरण समोर येत जाणं आणि फर्नच्या प्रवासातलं भावजीवन उलगडत जाणं हे कवितेसारखंच आहे. सरळसोट कथेपेक्षा तिच्या प्रत्येक मूडचं आणि अनुभवांचं सौंदर्य समोर येत जातं. कवितेत जसे अनेक पदर असतात तसे चित्रपटाला अनेक प्रतीक, संकेतचिन्ह वापरली आहेत. त्यातून खोल अर्थ कळत जातो.

क्लोई झाओ या दिग्दर्शिकेचा क्लोई झाओचा हा चित्रपट म्हणजे समाजव्यवस्था आणि काळ यात माणसं कुठे आणि कशी बसतात किंवा बसत नाहीत यावरचं एक भाष्य आहे. शेक्सपिअरचं सॉनेट १८ हे या अर्थानं या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. फर्न एकदा वाटेत ही कविता पूर्णपणे म्हणते तो प्रसंग खास आहे.

या प्रसंगात अॅरिझोनामधल्या एका कॅंपवर भेटलेला एक तरुण भटक्या फर्नला वाटेत भेटतो. तो तिच्यापेक्षा वयानं लहान आहे. पण भटकेपणाचा अनुभव कोणाला जास्त आहे? हा प्रश्न इथे समोर येतो. या दोघांमधले संवाद आपल्याला विचारात पाडतात.

फर्न त्याला प्रश्न विचारत जाते. “तुझं कोणी आहे का? तुझे आईवडिल कुठे आहेत? तुला गर्लफ्रेंड आहे का?” यातून त्याला गर्लफ्रेंड असल्याचं समोर येतं. तेव्हा फर्न त्याला गर्लफ्रेंडला कसं खुष करायचं याबाबत काही सल्ले देते. या संवादात कवितेचा संदर्भ येतो. तसंच या संवादातून कविता हा काही खास लोकांसाठीचा प्रकार नाही तर कविता प्रत्येकासाठी असते हे लक्षात येतं.

ड्रिफ्टर : मी तिला पत्रं लिहितो.

फर्न : अरे वा, स्मार्ट आहेस..

ड्रिफ्टर : पण तिला कशात रस वाटेल त्याचा अंदाज लावून मला लिहिता येत नाही

फर्न : तू कधी कविता लिहायचा प्रयत्न केला आहेस?

ड्रिफ्टर : नाही. तुला माहिती आहेत का काही कविता?

फर्न : मी माझ्या लग्नाच्या आणाभाका घेताना जी कविता त्यात गुंफली होती ती चालेल का? मी तेव्हा तुझ्याच वयाची असेन.

ड्रिफ्टर : नक्कीच. ऐकवशील का?

फर्न : हं.. पहाते आठवते का ती कविता

फर्न जी कविता सुचवते ती शेक्सपिअरची कविता असते.

Shall I compare thee to a summer’s day?

Thou art more lovely and more temperate:

नोमॅडलॅंडची थीम ही कालप्रवाहावर आधारित आहे. आणि शेक्सपिअरची ही कविताही काळाबद्दल भाष्य करते.

So long as men can breathe or eyes can see,

So long lives this, and this gives life to thee.

या कवितेत प्रेम आणि चिरकालीन सौंदर्य आहे. चित्रपटात फर्ननं एकेक करुन सगळं गमावणं, तिची चिकाटी, बदलत्या जगात अर्थ शोधत रहाणं हे कवितेतून व्यक्त झालं आहे. या  कवितेच्या शेवटच्या दोन ओळींमधला लाईफ हा शब्द चित्रपटात फ्रान्सिस मॅकडरमॉट ही फर्नचं काम करणारी अभिनेत्री विशिष्ट प्रकारे जोर देऊन उच्चारते. त्यातून ती स्मृतींचं महत्व अधोरेखित करते. तिच्या आयुष्यातल्या स्मृतींवर ती जगते आहे आणि आनंदात आहे. लोक भूतकाळात जगताना त्यातले तणाव, दु:ख, अपमान आठवून जगतात तेव्हा “भूतकाळात न जगता आत्ताच्या क्षणात जगा” असा संदेश उपयोगी असतो. पण स्मृतींचं एक सुखद जग डोक्यात साठवून आनंदानं जगता येतं हा संदेश फर्न देते आहे.

४०० वर्षांपूर्वी लिहिलेली शेक्सपिअरची कविता इतक्या समर्थपणे आज भाष्य करते हीदेखील काळाची एक किमयाच आहे.

नोमॅडलॅंड या चित्रपटात अधूनमधून कविता आहेत हे खरं. तितकाच हा चित्रपटही काव्यमय आहे. कवितेची वैशिष्ट्यं काय असतात ? असं पहायला गेलं तर भावना उचंबळून आणणारी, शब्दांचं सौंदर्य जाणवून देणारी, विस्कळीत भासणार्‍्या शब्दसमूहाला एक अर्थ प्राप्त करुन देणारी – ती कविता अशा अनेक गोष्टी सुचत जातात.

मात्र सत्य आणि कल्पित यांच्याशी खेळणारी, प्रतीकं मांडणारी आणि कोणतीही प्रस्थापित संकल्पना झुगारुन देणारी ती कविता असंही म्हणता येतं. असा विचार केला तर नोमॅडलॅंड हा एक काव्यमय चित्रपट आहे. आयुष्यात जोडीदाराबरोबर सुखानं नांदण्याचा आनंद अनुभवल्यानंतर आता आयुष्याच्या उरलेल्या कथेत फर्न आपली भूमिका निभावते आहे. स्त्रियांचे मध्यमवयीन आणि वृध्दापकाळातले अनुभव पुरुषांपेक्षा फार वेगळे असतात. त्यात त्यांच्या शरीरात आणि मनात खूप वेगळं काही घडत असतं. निसर्ग, मागे पडणारी झाडं, बदलते ऋतू, बर्फातली जीवघेणी थंडी, वाटेत दिसलेल्या झर्‍्यात सहजतेनं केलेलं स्नान अशा प्रतीकांमधून फर्नमधले बदल चित्रपटात समोर येतात. तिच्यात झिरपत जाणारी शांतता आपल्यात झिरपत जाते.

लुडोव्हिको ऐनादी याचं साथ करणारं संगीत आणि जोशुआ रिचर्डस या सिनेमॅटोग्राफरच्या फ्रेम्स या सगळ्या काव्यमय प्रवासाला मोलाची मदत करतात. या अर्थानं हा चित्रपट म्हणजे संवादात्मक, संगीतात्मक आणि दृश्यात्मक कविता आहे.

नोमॅडलॅंडमधली नायिका भटक्याचं आयुष्य जगते आणि “ब्रिजेस आॉफ मॅडिसन काऊंटी” या चित्रपटातल्या फ्रान्सेस्काच्या आयुष्यात एक भटक्या येऊन तिचं आयुष्य हलवून टाकतो.

“ब्रिजेस आॉफ मॅडिसन काऊंटी” या चित्रपटात रॉबर्ट किंकेड या “नॅशनल जिआॉग्राफिक” या मासिकासाठी काम करणार्‍्या फोटोग्राफरला मॅडिसन काऊंटीमधल्या काही विशिष्ट पुलांचे फोटो काढण्याचं काम पूर्ण करायचं असतं. आपली प्रवासी गाडी घेऊन तो तिथे पोचतो. शेतं आणि शेताशेजारची घरं असा निसर्गरम्य प्रदेश असलेल्या त्या ठिकाणी रॉबर्टला एक पूल सापडत नाही. मग तो वाटेत एका मध्यमवयीन स्त्रीला – फ्रान्सेस्काला रस्ता विचारतो. फ्रान्सेस्काचा नवरा आणि दोन मुलं शहरात एका स्पर्धेसाठी आठवड्याभरासाठी गेलेली असतात. ती आपल्या शेताशेजारच्या घरात रहात असते.

चित्रपटात एरवी फ्रान्सेस्कानं रॉबर्टला रस्ता सांगून टाकला असता आणि कथा तिथे संपली असती. पण दोघांना एकमेकांकडे पाहून आत काहीतरी हलल्यासारखं वाटतं. एका अनामिक ओढीनं दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात. इटलीत वाढलेल्या फ्रान्सेस्काचा नवरा, मुलं सगळं ठीकठाक चालू असलं तरी तिच्या हृदयाची तार छेडणारं असं कोणी तिला कधी भेटलेलंच नसतं. इटलीतल्या नेपल्समधून अमेरिकेत लग्न होऊन आलेली ती आतून एकाकी असते. तिच्या आवडीनिवडींकडे कधीच कोणी लक्ष दिलेलं नसतं. रॉबर्ट तिच्याशी त्याच्या जगभरातल्या अनुभवांबद्दल, संस्कृतींबद्दल बोलतो. ते ती चमकत्या डोळ्यांनी आणि ओथंबलेल्या मनानं ऐकत रहाते. नंतरचे दोन तीन दिवस “सांसोंसे भी करीब मेरे आ गया कोई” असं वाटण्याइतके एकमेकांच्या जास्त जवळ येत जातात.

आयुष्याच्या वळणावर एखादं तरल स्वप्न अलगद लाभावं आणि ते स्वप्न म्हणूनच चिरकाल टिकावं असं कोणाला वाटत नाही? असंच एक स्वप्न रॉबर्ट आणि फ्रान्सेस्का पहातात. पण मात्र नंतर आपण वेगळं व्हायचं, तेच दोघांसाठी श्रेयस्कर आहे असं ठरतं.

तसं ठरल्यानंतरही चार दिवसांनंतर “तो” तिला एका रस्त्यावर ती नव-याबरोबर गाडीत असताना भेटतो. तिच्या गाडीसमोर आपली गाडी थांबवतो. पावसाळी, धुरकट वातावरणात तो त्याच्या गाडीतल्या आरशाभोवती तिनं दिलेलं लॉकेट अडकवतो. ते तिला दिसत असतं. त्या क्षणी आयुष्य उधळून द्यावं असं वाटत असूनही आपल्या नव-याबरोबर असलेल्या फ्रान्सेस्काची असह्य वेदना आपल्याला कॅमे-यात दिसते. आणि केवळ हावभावांनी “त्याची” वेदनाही जाणवून आपल्याला घुसमटल्यासारखं होतं. दोघं एकत्र येत नाहीत. पण आयुष्यभर त्या आठवणी जपतात. रॉबर्ट आपल्याकडचं सगळं मृत्यूसमयी तिला पाठवून देतो. फ्रान्सेस्काचा नवरा वृध्दापकाळानं गेल्यानंतर काही काळ ती एकटी जगते. परत एकदा त्या पुलांवर भटकते. तिच्या मृत्यूनंतर तिनं ही कहाणी लिहून ठेवलेल्या वह्या तिच्या मुलांना सापडतात. त्यांच्याकडून भूतकाळात घडलेली ही विलक्षण प्रेमकथा आपल्यासमोर उलगडत जाते.

या चित्रपटात भटक्या, एकाकी असणारा रॉबर्ट किंकेड जेव्हा त्यातल्या फ्रान्सेस्काच्या प्रेमात पडतो तेव्हाचा क्लिंट इस्टवूडचा अभिनय हेलावून टाकणारा आहे. मेरिल स्ट्रीपनं साकारलेली दोन मुलांची जबाबदार आई आणि रॉबर्टच्या प्रेमात आसुसून पडलेली प्रेमिका बघणं हा एक वेगळा आनंद आहे. त्या दोघांमध्ये असणारं नातं ज्या माणसाला समजू शकतं त्याला स्त्रीपुरुषांमधल्या नात्यांमधल्या भावबंधाला असणा-या असंख्य बाजू कळू शकतील.

या चित्रपटात फ्रान्सेस्काच्या हातात विल्यम बटलर यीटसच्या कवितांचं पुस्तक सतत दिसतं. त्यातल्या The Song of Wandering Aengus या कवितेचा उल्लेख दोघांच्या संवादात होतो. या कवितेत, एक माणूस जंगलात फिरायला जातो. तिथे एका फांदीपासून गळ तयार करुन नदीत एक ट्राऊट मासा पकडतो. त्या ट्राऊट माशाचं रुपांतर एका सुंदर तरुणीत होतं. पण ती धुक्यात अदृश्य होते. तो माणूस उरलेलं आयुष्यभर तिला शोधत फिरतो. The Song of Wandering Aengus या कवितेचं हे सार आहे. फ्रान्सेस्काच्या हातात यीटसच्या कवितांचं असलेलं पुस्तक आणि या कवितेचा संवादातला उल्लेख हा योगायोग नाही. या चित्रपटाच्या कथेशी ही कविता मिळतीजुळती आहे.

यीटसच्या कवितेसारखी फ्रान्सेस्का जणू रॉबर्टच्या आयुष्यातून अदृश्य होते, आयुष्यभर तिचा तो शोध घेतो. यीटसच्या कवितेतली  , “Because a fire was in my head,” ही ओळ वाचून कुसुमाग्रजांची तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी, त्याच्या निखार्‍्यात कधी तुला जाळणार नाही या ओळी आठवतात. रॉबर्ट अगदी तस्संच प्रेम फ्रान्सेस्कावर आयुष्यभर करतो.

या चित्रपटात रॉबर्ट लॉर्ड बायरन या कवीच्या एका कवितेचाही रॉबर्ट उल्लेख करतो. “Childe Harold’s Pilgrimage” या बायनरच्या कवितेतल्या “There is a pleasure in the pathless woods, / There is a rapture on the lonely shore, / There is society, where none intrudes, / By the deep sea, and music in its roar: / I love not man the less, but Nature more…”. या ओळीँमधून निसर्ग, एकटं भटकणं त्याला किती प्रिय आहे हे समोर येतं. मॅडिसन काऊंटीभोवतीचा निसर्ग फ्रान्सेस्कालाही प्रिय आहे. दोघांचे भावबंध आतून जुळण्याचं ते महत्वाचं कारण आहे. “प्लेजर इन पाथलेस वूडस” या ओळीमधून आयुष्याच्या वाटा नेतील तिकडे जात आनंद शोधावा असं काहीसं तत्वज्ञानही बायरननं मांडलं आहे.

विल्यम बटलर यीटसच्या कविता हाच जिच्या अभ्यासाचा विषय आहे त्या नायिकेच्या आयुष्यावरचा चित्रपट म्हणजे “द लॉस्ट डॉटर”. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच निळ्या समुद्राशेजारचं स्वप्नवत नेटकं अपार्टमेंट दिसतं. आपल्याच तंद्रीत हरवलेली ती दिसते. वातावरणात कधी लख्ख सूर्यप्रकाश. कधी अचानक येणारं वादळवारं आणि पाऊस असं सतत दिसतं. तिच्या मनातल्या भावनांचे तरंगही तसेच असतात. कधी ओठांवर लख्ख हसू. तर कधी डोळ्यात दाटलेले अश्रू आणि गिळलेला हुंदका. मनातली तगमग आणि घुसमट. कधी ती एकदम ताठपणे चुकीच्या गोष्टींवर तक्रार करणारी तर कधी जुन्या आठवणी समोर आल्यानं हळवेपणानं एकदम कासावीस झालेली अशी दिसते.

यातली “ती” म्हणजे  या चित्रपटाची नायिका लेडा. ४८ वर्षांची प्राध्यापिका. आपल्या अभ्यासाचा विषय असलेल्या इटालीतल्या एका निवांत ठिकाणी ती सुट्टीवर आलेली असते. त्याच ठिकाणी सुट्टीवर आलेल्या एका कुटुंबाशी तिची ओळख होते. त्यातल्या निना नावाच्या पंचविशीतल्या तरुणीबरोबर मैत्रीदेखील होते. निनाची छोटी मुलगी असते एलेना. तिला पाहून लेडाला सतत आपल्या मुली, त्यांचं बालपण, त्यांच्याबरोबर घालवलेले आणि न घालवता आलेले क्षण, प्रसंग आठवत रहातात..! वर्किंग मदर, आयुष्य रसरसून जगायला आतुर असलेली एक स्त्री या आयुष्यभर निभावलेल्या भूमिकांमध्ये लेडाची जगातल्या असंख्य स्त्रियांप्रमाणेच होरपळ झालेली असते. त्यात लेडा खूप बुध्दिमान असते. यीटसच्या कविता हा तिच्या अभ्यासाचा विषय असतो. comparative literature या विषयात पारंगत असलेल्या तिला बौध्दिक गरजा तितक्याच मोह घालतात..

या सगळ्यात लेडा काय कमावते ? काय गमावते? वयाच्या पन्नाशीला आल्यावर तिला कोणत्या गोष्टींबद्दल अपराधी वाटतं? अशा अनेक गोष्टी या चित्रपटात उलगडत जातात. एक आई म्हणून लेडाच्या मनातल्या गुंतागुंतीच्या भावना आॉलिव्हिया कोलमनच्या चेहर्‍्यावर पहिल्यापासून सतत उमटलेल्या दिसतात.

या चित्रपटाचा यीटसच्या दोन कवितांशी थेट संबंध आहे. त्यातली पहिली कविता म्हणजे “लेडा अॅंड द स्वान”. ग्रीक पुराणकथांमध्ये लेडा ही स्पार्टाची राणी. टायनाडेरस या राजाची पत्नी. देवांचा राजा झ्यूस हा तिच्यावर Swan – हंसाच्या रुपात येऊन बलात्कार करतो. त्यातून हेलेन, कॅस्टर आणि पोलॉक्स या तीन अपत्यांना लेडा जन्म देते. सौंदर्यवती म्हणून आजतागायत प्रसिध्द असलेली हेलेन नंतर मेनेलॉस या स्पार्टाच्या राजाची बायको होते. पॅरिस आॉफ ट्रॉय – अलेक्झांडर तिचं अपहरण करतो. ट्रोजन वॉर हे जग बदलून टाकणारं युध्द हेलेनमुळे होतं.

लेडावरच्या हिंसेतून जन्म घेतलेल्या हेलेनमुळे ट्रोजन वॉरचा जन्म झाला असा या कवितेचा एक अर्थ. दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यावर, आपल्या निर्णयांवर, आपल्या भवितव्यावर आपलं किती नियंत्रण असू शकतं? सत्ता किंवा कोणतीही बाह्य घटना आपल्याला हवं तसं जगू द्यायला मज्जाव करत जाते हा या कवितेचा दुसरा अर्थ. जो द लॉस्ट डॉटरमधल्या लेडाच्या आयुष्याला लागू होतो.

या दृष्टिकोनातून अमेरिकन लेडा ग्रीसमध्ये(च) सुट्टीला आलेली का दाखवली आहे याचं उत्तरही मिळतं..!

The Second Coming या यीटसच्या कवितेत जीझस परत एकदा पृथ्वीवर येईल या ख्रिश्चन धारणेबद्दल उल्लेख आहेत. त्यातल्या things fall apart; the center cannot hold या ओळींचा उल्लेख लेडा एका कॉन्फरन्समध्ये करते..! तिला जणू तिच्या संसारात काय घडणार आहे ते कळायला लागलं आहे असं या कवितेतून सुचवायचं आहे.

कवितेच्या अनेकानेक व्याख्या असल्या तरी आपापल्या मर्यादित विचारकक्षांच्या बाहेर जाऊन विचार करता येणं.. ही किमया कविता करु शकते. कवितांमधून उलगडणारं चित्रपटाचं विश्व असंच अमर्यादित आहे..!

(नीलांबरी जोशी या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ , ‘माध्यमकल्लोळ’ , ‘कार्पोरेटकल्लोळ’, ‘मनकल्लोळ’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत.)

[email protected]

8411000706

 

 

Previous articleठाकरे ब्रँडचं काय होणार ?
Next articleप्रतिभा आणि प्रतिमा!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here