(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
-सुनील तांबे
प्रागज्योतिषपूर हे गुवाहाटीचं प्राचीन नाव. प्रागज्योतिषपूरचा राजा नरकासुर. श्रीकृष्णाचा नातू, अनिरुद्ध नरकासूराच्या मुलीच्या प्रेमात होता. नरकासूराला हा रिश्ता पटला नाही. त्याने अनिरुद्धाला तुरुंगात डांबलं. त्याला सोडविण्यासाठी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर बोडो होता. गुवाहाटी शहरातल्या प्रागज्योतिका एम्पोरियम खरेदीसाठी गेलो होतो. दुकानाचं नाव प्रागज्योतिका असं का? अशी विचारणा केली तेव्हा एका महिला विक्रेतीने मला ही माहिती दिली.
Welcome to the Bodoland, the land of mighty Ghatotkacha, Son of Bhim and Hidimba,
हे गाणं तिच्या स्मार्टफोनवर तिने मला ऐकवलं. आजचं डिमापूर म्हणजे प्राचीन हिडिंबपूर. बोडोंच्या राज्याची राजधानी होती ती. हिडिंबेशी भीमाचा एक विवाह झाला होता. भीमापासून तिला झालेला पुत्र घटोत्कच, ती म्हणाली. महाभारतातलं हिडिंबा हे पात्र विलक्षण आहे. पांडव, द्रौपदी आणि कुंती वनवासात होते. अरण्यातून जाताना, भीमाने कुंतीला खांद्यावर घेतलेलं असतं. भीमाच्या सौंदर्याने मोहित होऊन हिडिंबा त्यांच्यामागून चालू लागते. कुंती तिला विचारते, तू आमचा पाठलाग का करत आहेस? हिडिंबा म्हणते, ‘मला तुझ्या मुलाकडून भोग हवा आहे.’ कुंती भीमाला सांगते, ‘जा तिची इच्छा पूर्ण कर.’
त्यानंतर हिडिंबा महाभारतातून अदृश्य होते. तिला ना पांडवांच्या इस्टेटीमध्ये रस असतो ना भीमासोबतच्या साहचर्यात. ती समर्थ असते नवर्याशिवाय जगायला.
बोडोंच्या राज्यावर आक्रमण केलं अहोमांनी. बोडोंची पळापळ झाली. काही लोक आजच्या मिझोरामकडे पळाले, काही लोक ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेला तर काही आणखी कुठे. बोडो, कचारी हे सर्व एकच आहेत, तिने आणखी माहिती दिली. दुसर्या दिवशी सकाळी मी टॅक्सीने उदालगुडीला रवाना झालो. ड्रायव्हरचं नाव होतं फुकन. तो स्वतःला अहोम वंशीय समजायचा. समोरच्या टेंपोकडे पाहात तो म्हणाला, तो टेंपोही उदालगुडीला जातोय. त्या सर्व बायका बोडो आहेत. तुम्हाला कसं समजलं त्या बोडो स्त्रिया आहेत, मी विचारलं. त्यांच्या साड्यांवरून, तो उत्तरला. बोडो महिलांच्या साड्या छातीपर्यंत असतात. अनेक महिलांनी अंगावर एक शेला पांघरला होता. या पोषाखाला दोखोना म्हणतात. हा त्यांचा पारंपारिक पोषाख आहे. बहुसंख्य महिला, विशेषतः गावाकडच्या याच पोषाखात असतात.
बोडोलँण्डमध्ये शिरल्यावर दोखोना नेसलेल्या बायका दिसू लागल्या. तरुण वा शहरी मुली पंजाबी सूट, -टीशर्ट्स अशा आधुनिक पोषाखात होत्या. मात्र बहुसंख्य महिला दोखोना नेसलेल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाताची आणि तागाची शेतं होती. नारळी-पोफळीच्या बागा होत्या. केळी आणि फणसही भरपूर. आंबा मात्र अपवादानेच दिसला. घरांच्या अंगणात आणि परसात भाज्या, कोंबड्या, एखादं तळं, तळ्यात बदकं. त्याशिवाय डुकरंही पाळतात.
घर म्हणजे तीन-चार घरांचा समूह असतो. एका घरात बैठकीची खोली आणि निजायची खोली असते. त्याशिवाय सामानाच्या पेट्या. सैपाक घर वेगळं असतं. बहुतांश घरात आजही सैपाक चुलीवर केला जातो कारण गॅस परवडत नाही. सैपाक घरात एक वॉटर फिल्टर असतो. म्हणजे पाण्याच्या टाकीत वाळू असते. विहीरीचं वा नदी-ओहोळाचं पाणी अशा प्रकारे गाळून घेतलं जातं. या घरांच्या मध्ये भरपूर मोकळी जागा वा अंगण असतं. सामान्यतः कुटुंबप्रमुख ज्या घरात राहातो तिथे म्हणजे अंगणाच्या ईशान्येकडच्या कोपर्यात शिजू नावाचं झाडं असतं. बाथू धर्मात हे झाडं पवित्र मानलं जातं. या झाडाच्या भोवती बांबूच्या कापट्यांचं कुंपण असतं. या गोलाकार कुंपणाला बांबूच्या पाच आडव्या पट्ट्या असतात. पंचमहाभूतांचं ते प्रतीक मानलं जातं. शिजू म्हणजे तिधारी निवडुंग. त्याला थुवर, तिधारी थोर अशीही नावं मराठी शब्दकोशात सापडली. बोडो भाषेत बा म्हणजे पाच. त्याशिवाय तुळशीचं रोपही असतं. रोज सकाळ-संध्याकाळ या झाडाची पूजा केली जाते. तिथे दिवा लावतात. त्याशिवाय एक वेदी असते. वेदीचा दगड गोल वा वर्तुळाकार असतो. स्थैर्य आणि भूमीचं प्रतीक मानलं जातं त्याला. कोंबडीचं अंड हे जननाचं प्रतीक असतं. यथासांग पूजा करताना कुटुंब वा गाव गोळा होतं. प्रार्थना करतं. ही पूजा गाव प्रमुख वा पुजार्याच्या नेतृत्वाखाली पार पडते. त्यावेळी मांस आणि मद्य यांचा नेवैद्य दाखवला जातो. या प्रसंगी संगीत, नृत्य, मंत्र पठण होतं. शिजूचं झाडं आणि वेदी हे घराचं, कुटुंबाचं सामाजिक, सांस्कृतिक केंद्र असतं. संगीत आणि नृत्य यांच्याशिवाय बाथू धर्म पूर्ण होत नाही. बाथू धर्मात अनेक उत्सव आहेत. बहुतांशी उत्सव हे ऋतुचक्र आणि पीकपाण्याशी संबंधीत आहेत. बोडो भाषा, गाणी, संगीत, वाद्य, नृत्यं म्हणजेच बोडो संस्कृतीचं जतन-संगोपन यामधून बोडो अस्मिता आणि समाजाची एकजूट साधण्यात बाथू धर्माने कळीची भूमिका निभावली आहे. विसाव्या शतकाच्या आरंभी बोडोंमध्येही धर्मसुधारणेची एक लाट आली होती. त्यावेळी ब्रह्मा या निराकार-निर्गुण शक्तीचा समावेश बाथू धर्मात झाला. त्याशिवाय महादेवही आला. पुढे हजारो बोडोंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. मात्र आजही बोडो भाषा, पोषाख, संगीत आणि नृत्य बोडो अस्मितेशी एकरुप आहेत. ख्रिस्ती बोडोही त्यांचं पालन करतात.
सामान्यपणे प्रत्येक घरात एक हातमाग असतो. बहुतांश महिला त्यांची वस्त्रं दोखोना आणि शेला याच हातमागावर विणतात. पिवळा, हिरवा आणि लाल हे रंग विशेष लोकप्रिय आहेत. प्रत्येक दोखोनावरील नक्षी, रंग, वीण याला सांस्कृतिक संदर्भ आहेत. पाहुण्याचं आगतस्वागत करताना एक शेला त्याच्या गळ्यात घातला जातो. हिरव्या वा लाल रंगाचा. अलीकडे दोखोमा असो की शेला, मिलमध्ये विणले जातात. मात्र आठवडी बाजारात हातमागावरची ही वस्त्रं आजही विकायला असतात. एका महिलेने सांगितलं, ‘एक दोखोमा विणायला तीन दिवस लागतात आणि सूत व अन्य खर्च मिळून ६०० रुपये होतात. मात्र बाजारात विकायचं तर फारतर हजार रुपये मिळतात.’ गरीबी एवढी आहे की आपली वस्त्रं घरी विणणं परवडतं. कारण माग बांबूचा असतो आणि प्रत्येक घरात तो असतोच. एरी आणि मूगा या रेशमाच्या किड्यांचं पालन आणि त्यांच्यापासून रेशमाचा धागा काढण्यातही बोडो कुशल आहेत. असममधील रेशीम उत्पादनात बोडोंचा वाटा मोठा आहे. एरी आणि मूगा ह्या रेशीम किड्यांचं पालनपोषण मलबेरी सिल्कसारखं नाही. मूगा रेशीम सोनेरी रंगाचं असतं. या रेशमाची वस्त्रं विणण्यातही बोडो स्त्रिया कुशल आहेत.
गुवाहाटी ते उदालगुडी हे अंतर अडीच तासांचं आहे असं मोनजिब मोचाहारी या चुलतमित्राने सांगितलं होतं. मात्र रस्ता एवढा खराब होता की अनेक किलोमीटरपर्यंत कारचा स्पीड ताशी १५ किलोमीटर होता. बीटीसी (बोडोलँण्ड टेरिटोरिअल कौन्सिल) एरियातले रस्ते खराब आहेत. कौन्सिलचे सभासद पैसे खातात, असं फुकन म्हणाला.
“२००३ साली बोडो टेरिटोरिअल कौन्सिल स्थापन झाली. तोपर्यंत बोडोंच्या गावात जायला रस्ते नव्हते, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्रं, सिंचन इत्यादी पायाभूत सुविधा गावापर्यंत पोचल्या नव्हत्या,” मोनजिब मोचाहारी म्हणाले. बोडोलँण्ड डेव्हलपमेंट फौंण्डेशनचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. उदालगुडीला या संस्थेचं मुख्य कार्यालय आहे. बोडो, कचारी, बोडो-कचारी, मेश अशा विविध नावांनी ओळखले जाणारे सर्व समूह एकच आहेत. त्यांची भाषा, संस्कृती, जीवनशैली एकच आहेत. प्रदेशानुसार थोडेफार फरक आहेत. काही बोडो समूह उत्तर बंगालमध्ये आहेत तर काही ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात तर काही पार मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आहेत, असं ते म्हणाले. बोडो टेरिटोरिअल कौन्सिलमध्ये चार जिल्ह्यांचा समावेश होतो. कोक्राझार, चिरांग, बक्सा आणि उदालगुडी. या जिल्ह्यांमध्ये बोडोंची संख्या अधिक आहे.
बोडो गावामध्ये केवळ बोडोंचीच वस्ती असते. वाणी, सुतार, शिंपी, मेकॅनिक इत्यादी बिगर बोडो असतात. मात्र त्यांना गावाचं सभासद वा नागरिक मानलं जात नाही. पारंपारिक ग्रामपंचायतीत इथे त्याला व्हिलेज कौन्सिल म्हणतात, त्यांना प्रतिनिधीत्व नसतं. बंगाली भाषक मुसलमानांचं वेगळं गाव असतं. तिथे एकही हिंदू वा बोडो वा असमी सापडणार नाही.
आजच्या असमवर अहोम राजघराण्याची सत्ता होती. सुमारे सहाशे वर्षं. त्यांनी मुघलांचा अनेकवेळा पराभव केला होता. त्यावेळीही विविध समुहांची वेगवेगळी गावं होती. असमी आणि बोडो यांच्यातला मुख्य फरक होता शेतीचा. बोडोंची शेती—मार्च-एप्रिल च्या सुमारास जमिनीवरचं जंगल कापायचं, मे महिन्यात ते जाळायचं, पावसाळा सुरु झाला की जमिनीत छिद्र पाडून बी पेरायचं आणि पायाने त्यावर माती ढकलायची. त्यानंतर शेतीची केवळ राखण करायची. नंतर थेट कापणी. असमी म्हणजे अहोम लोक नांगराचा वापर करून शेती करायचे. त्यासाठी बैल पाळावे लागतात, त्यांना शेतीकामं शिकवावी लागतात. जमिनीची मशागत करावी लागते, निंदणी, खुरपणी करावी लागते. साहजिकच नांगराने केलेल्या शेतीतून वरकड उत्पन्न मिळतं. ते बाजारात विकून अन्य वस्तू घेता येतात. अहोम मूळचे चीनच्या युनान प्रांतातले. १३ व्या शतकात म्यानमारमधून पटकाई पर्वतरांग (आराकान असंही म्हणतात या पर्वतरांगेला) ओलांडून त्यांनी ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात राज्य स्थापन केलं. नांगराचा वापर करून शेती करण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं होतं. ब्रह्मपुत्रा खोर्यातील त्यावेळचे राजे वा सत्ताधारी यांच्यापेक्षा तंत्रविज्ञानात ते थोडेफार प्रगत होते. त्याशिवाय राजनीतीतही कारण त्यांनी आजच्या म्यानमारमधल्या काही भागातही आपली सत्ता स्थापन केली होती. परराज्यात वा परदेशात राज्य स्थापन करताना काही समूहांशी संघर्ष केला तरीही काही समूहांशी मैत्री करावी लागते, संघर्ष आणि संमीलन हातात हात घालून चालतं हे ज्ञान त्यांना होतं. म्हणून तर त्यांनी बोडोंना मागे रेटलं, त्यांचा पराभव केला. त्यामुळे बोडो अधिक दुर्गम भागात म्हणजे लोअर आसाममध्ये गेले. मोठ्या शहरांपासून दूर स्वायत्त गावं त्यांनी वसवली. दरवर्षी पाऊस यायचा त्याशिवाय हिमालयात उगम पावणारे शेकडो नदी-नाले यांच्या पाण्यावर त्यांना दरवर्षी दोन पिकं घेता यायची. त्याशिवाय शिकार, पशुपालनही होतंच. मात्र शेतीचं नव तंत्रज्ञान म्हणजे नांगराचा वापर करायला बोडोंनी सुरुवात केली १९३० च्या सुमारास. साहजिकच बंगाली, असमी यांच्यापेक्षा बोडोंची शेती आतबट्ट्याची म्हणजे पोटापुरती ठरली.
असम ताब्यात आल्यावर ब्रिटिशांनी चहामळ्यांच्या लागवडीला उत्तेजन दिलं. कारण ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचं प्राधान्य होतं महसूलाला. चहाच्या व्यापारावर कंपनीची मक्तेदारी होती. चहामळ्यांसाठी कवडीमोल दराने जमिनी देण्यात आल्या. चहाच्या पानांवर प्रक्रिया करणारी यंत्रं इंग्लडमधून यायची. त्यामुळे व्यापार वाढला. ब्रिटीशांच्या मागोमाग मारवाडी तिथे पोचले. आजही असमची बाजारपेठ मारवाड्यांच्या हाती आहे. सरकारी नोकर्या, शाळा-महाविद्यालयातले शिक्षक म्हणून बंगाली आले. चहामळ्यात काम करायला आजचा झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा या प्रांतातून मोठ्या प्रमाणावर आदिवासींना आणण्यात आलं. चहामळ्यावर काम करणं ही वेठबिगारी वा गुलामीच होती. त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी पूर्व बंगालातील मुसलमानांना असममधली जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन देण्यात आलं. चहामळ्यातल्या कामगारांनीही आपली गावं वसवली, बंगाली हिंदू आणि मुसलमानांनी आपली गावं वसवली. असममधील विकासाला गती मिळाली. मात्र या भानगडीत सर्वाधिक जमीन बोडोंची गेली. कारण त्यांच्याकडे असलेली जमीन लागवडीखाली आणण्यासाठी लागणारं भांडवल आणि तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. परिणामी १९३० च्या दशकातच असममध्ये असमी विरुद्ध बंगाली असा संघर्ष सुरु झाला होता.
नेपाळ आणि भूतान यांच्यामध्ये सिक्कीम राज्य आहे. त्याखाली बांग्लादेश आहे. याला म्हणतात सिलीगुडी कॉरिडॉर. त्याची रुंदी केवळ २१ किलोमीटर आहे. ईशान्य भारतातल्या सर्व आठ राज्यांना जोडणारा हा खुष्कीचा मार्ग आहे. सिलीगुडी कॉरिडॉरच्या पलीकडील सर्व राज्यांतील संस्कृती समूहांची वा निमसमूह समाजाची आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख असे सर्व धर्म या प्रदेशात आहेत. मात्र मूलभूत अस्मिता वा ओळख समूहाची आहे. प्रत्येक समूहाची भाषा, संस्कृती वेगळी आहे. तिथली जातिव्यवस्थाही मुख्य भारतीय भूमीसारखी बंदिस्त नाही, बर्यापैकी सैल आहे. यापैकी एकाही राज्यात अस्पृश्यता नाही. मुख्य भारतीय भूमीतील समूह काही प्रमाणात अस्पृश्यता पाळतात परंतु तो काही तिथल्या समाजरचनेचा मुख्य प्रवाह नाही.
आदिवासी कोणाला म्हणायचं ही देखील तिथली समस्या आहे. पिढ्यान् पिढ्या चहामळ्यांवर काम करणारे मुख्य भारतीय भूमीतील संथाल, मुंडा इत्यादी आदिवासींना तिथे परके मानलं जातं. त्यांना आदिवासी म्हणतात परंतु अनुसूचित जाती-जमातींमध्ये त्यांचा समावेश नाही.
टोळीप्रधान समाजात दुसर्या टोळीबद्दल अविश्वास, संशय आणि भय असतं. टोळ्यांमधला संघर्ष सहजपणे हिंसक वळण घेतो. आपल्या प्रदेशात आपली लोकसंख्या वाढली तरच आपला निभाव लागेल, आपला विकास होईल अशी धारणा असते. त्यामुळे बोडो विरुद्ध बंगाली मुस्लीम, बोडो विरुद्ध टी-ट्राईब म्हणजे चहामळ्यात काम करणार्या लोकांची गावं, बोडो विरुद्ध असमी, असे हिंसक संघर्ष १९८० च्या दशकात सुरु झाले. असममध्ये जवळपास प्रत्येक समूह या संघर्षात होरपळून निघाला आहे. असमी असो की बंगाली—हिंदू वा मुसलमान, तिवा असोत की कचारी वा बोडो, शेकडो लोक ठार झाले आहेत. गावा-गावात त्यांची स्मारकं दिसतात. बोडो असोत की बंगाली मुस्लिम वा टी-ट्राईब सर्व समूह कमालीचे गरीब आहेत. त्यांची शेती बव्हंशी पोटापुरती आहे. औद्योगीकरण अत्यल्प, जॉबलेस ग्रोथ जोमदार त्यामुळे आपआपल्या समूहाची जमीन मालकी, तिचा विस्तार आणि आपल्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांवर आपल्या समूहाचं नियंत्रण यासाठीचा संघर्ष समाजजीवनाच्या केंद्रस्थानी आहे. हे केवळ अस्मितेचं राजकारण नाही त्याचा संबंध रोजच्या जगण्याशी आहे.
रात्री उदालगुडीच्या एका हॉटेलात मुक्काम केला. उदालगुडी टाऊन वा छोटं गाव आहे. नव्या जिल्ह्याचं मुख्यालय. त्यामुळे बहुसंख्या सरकारी-निम सरकारी अधिकारी-कर्मचारी यांची आहे. त्यांना सेवा पुरवणारे ई-रिक्षा वा टमटमवाले, दुकानदार, लाँड्री, न्हावी आणि हेअर ड्रेसर वा सलोन, हॉटेलं, कंत्राटदार इत्यादी. गावाची लोकसंख्या चार-पाच हजार असावी. मी ज्या हॉटेलमध्ये होतो त्या हॉटेलचं रेस्त्रां गच्चीवर होतं. रात्री साडेनऊ वाजता एक मुलगी आली आणि तिने म्हटलं जेवणाची ऑर्डर देता का? मी म्हटलं मी रेस्त्रांमध्येच येईन. गच्चीवर गेलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. घनघोर पाऊस होता. रेस्त्रांमध्ये पाच-सहा मुली होत्या. त्या नाचत होत्या, रील्स बनवत होत्या. ऑर्डर घेणार्या, खाद्यपदार्थ आणून देणार्या, व्यवस्थापक सर्व मुली होत्या. मी एकटाच पुरुष होतो त्या रेस्त्रांमध्ये. नाचणार्या, रील्स बनवणार्या मुली, रेस्त्रांच्या स्टाफ असलेल्या मुली सर्वजणी आपआपल्या घरी जाणार होत्या. रात्र, घनघोर पाऊस यापैकी कशाचंही म्हणजे कोणाही पुरुषाचं त्यांना भय वाटत नव्हतं. त्याक्षणी मला समजलं की मी बोडोलँण्डमध्ये आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, लातूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, दिल्ली असो वा पटना किंवा बंगलोर असो की चेन्नई कुठेही मुलींसाठी असं निर्भय वातावरण नाही.
मोनजिब सोबत भैराबकुंडला गेलो. भैराबकुंड उदालगुडीपासून १५-२० किलोमीटरवर आहे. भूतानमधून येणार्या दोन नद्या—भैराबी आणि धानसिरी यांचा संगम इथे होतो. इथून भूतानमध्ये चालत जाता येतं. भूतान आणि अरुणाचल प्रदेश या स्थळी असमला भिडतात. असममधला हा लोकप्रिय टुरिस्ट स्पॉट आहे. जून महिना होता. कमालीचा उकाडा आणि दमटपणा. मुंबई परवडली अशी हवा. भैराबकुंडला मात्र गार वारा वाहात होता. भूतान आणि अरुणाचल प्रदेशातील हिमालयाच्या डोंगररांगा काळ्या ढगांना डोक्यावर मिरवत होत्या. असममधून येणारे मोसमी वारे या पर्वतरांगांना भिडले की वर जाऊ लागतात. जसे वर जातात तसं तापमान थंड होतं. या वार्यांमधील बाष्पाचे ढग बनतात. हे वारे येतात थेट केरळवरून. बंगालचा उपसागर, बांग्लादेशाचं मैदान आणि मेघालयाचं उंच पठार पार करून ते असममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्यात शिरतात. आणि हिमालयाच्या पर्वतरांगांना धडकतात.
भैराबकुंडला पर्यटकांची गर्दी होती. धानसिरी नदीच्या खळाळत्या प्रवाहात लहानथोर, स्त्री-पुरुष बागडत होते. भूतान, अरुणाचल प्रदेश, असम यांच्या सरहद्दीवर घनदाट जंगल आहे. पासपोर्ट, आधारकार्ड नसलेले हत्तींचे कळप भूतानमधून भारतात येतात, इनर लाईन परमिट नसताना अरुणाचल प्रदेशात जातात. नदीच्या बाजूनेच त्यांचा वहिवाटीचा रस्ता आहे. संध्याकाळी, रात्री वा पहाटे या रस्त्यावर हत्ती हमखास दिसतात, मोनजिब म्हणाले.
मोनजिब तिशीचा तरुण आहे. गुवाहाटी विद्यापीठाचा पदवीधर, मास मीडियाचा कोर्सही त्याने केला. तो बोडो आहे. त्याचा एक भाऊ बोडोलँण्डच्या मागणीसाठी सशस्त्र संघटनेत सामील झाला होता. दोन गटांच्या चकमकीत मारला गेला. धानसिरी नदीच्या पात्रातील एका दगडावर बसून बीयरचे घुटके घेताना मोनजिब त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगत होता. सुरक्षा दलांचे जवान गावात, घरात घुसायचे. सशस्त्र संघटनांचे सैनिक गावात आश्रय घ्यायचे. बोडोंची सहानुभूती, बांधिलकी अर्थातच बोडोलँण्डला. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुगीच्या दिवसांत गावा-गावामध्ये बॅरिकेड्स उभारल्या जायच्या. भाले, कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन तरुण रात्रभर गस्त घालायचे. बोडो, टी-ट्राईब, बंगाली मुस्लिम सर्वच गावांमध्ये ही स्थिती होती. टी-ट्राईब्ज आणि बंगाली मुसलमान यांच्यावर बोडोंचा कमालीचा रोष होता. या लोकांनी आपली जमीन हडपली अशी त्यांची धारणा होती. बोडोंची सशस्त्र दलं त्यांच्या गावावर हल्ला करायची. कापणीला आलेलं पीक जाळून टाकायचं. घर पेटवायची. चहामळ्यातील कामगारांच्याही सशस्त्र संघटना होत्या. आदिवासी कोब्रा मिलिटरी ऑफ असम, ऑल आदिवासी नॅशनल लिबरेशन आर्मी, बिरसा कमांडो फोर्स, आदिवासी पीपल्स आर्मी, संथाल टायगर फोर्स. दोघांकडेही रायफली, ऑटोमॅटिक कलाशनिकोव रायफल्स, काडतुसं, ग्रेनेड्स, स्फोटकं अगदी आरडीएक्सही असायची. सरकारी सुरक्षा दलं, पोलीस हेही बोडोंच्या निशाण्यावर होते. यादवी युद्धच सुरु होतं काही दशकं. यादवी युद्धात सीमारेषा सतत बदलत असतात. प्रत्येक गाव एक स्वतंत्र किल्ला बनतो. अशा परिस्थितीत मोनजिबने गुवाहाटीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. तोपावेतो २००३ साली बोडो टेरिटोरिअल कौन्सिलची स्थापना झाली. चार जिल्ह्यांचा कारभार या कौन्सिलच्या हाती आला. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँण्ड या सशस्त्र संघटनेने शस्त्रं खाली ठेवली आणि बोडोलँण्ड डेव्हलपमेंट फौंण्डेशन या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. भूतान आणि अरुणाचल प्रदेशातील अरण्यांमध्ये या संघटनेची ठाणी होती. सशस्त्र संघटनेच्या मुख्यालयाची जागा बोडोलँण्ड डेव्हलपमेंट फौंण्डेशनला देण्यात आली. ज्या इमारतींमध्ये शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा साठवला जायचा, सैनिकी प्रशिक्षण दिलं जायचं त्या इमारती आता बोडो तरुण-तरुणींना विविध व्यवसायांचं, कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी वापरल्या जाऊ लागल्या. मोनजिबच्या अंदाजानुसार नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँण्ड आणि बोडोंच्या अन्य सशस्त्र संघटनांपैकी १०-१२ हजार तरुणांकडे अजूनही शस्त्रं आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम संस्थेने हाती घेतला आहे. त्यांना विविध व्यवसायांचं – शेती, पशुपालन, रेशीम उद्योग, वाहन दुरुस्ती इत्यादी, प्रशिक्षण दिलं जातं. “आम्ही फारतर एक-दीड हजार तरुणांसाठी काम करतो, या आशेच्या किरणाचा नजिकच्या भविष्यात प्रकाशाचा झोत होईल अशी उमेद बाळगून आम्ही काम करत आहोत”, मोनजिब म्हणाला.
संध्याकाळी उदालगुडीच्या उपेंद्रनाथ ब्रह्मा पार्कमध्ये गेलो. एसी कारमधून बाहेर आल्यावर उष्मा जाणवत होता. अंग घामेजून गेलं. ही बाग चांगलीच औरसचौरस पसरली होती. सुंदर आणि स्वच्छ. ऐसपैस तळं होतं. विविध फुलांचे ताटवे, झाडं, बसायला बाकं. मुलाबाळांनी, तरुण-तरुणींनी बाग फुलली होती. बागेत एक छान कॅफेटेरिया होता. सहज मेन्यूकार्ड पाह्यलं. नूडल्स, मोमो, थुपका यांचे विविध प्रकार होते. पास्ता आणि आलू पराठा यांचीही नोंद होती. मात्र लोकांची पसंती नूडल्स, मोमो आणि थुपका यांना होती. मिल्क टी, लेमन टी, ग्रीन टी, रेड टी असे चहाचे प्रकार होते. सर्वाधिक पसंती रेड टी आणि ग्रीन टी ला होती. त्यांच्या खाद्यपेयांचं घट्ट नातं तिबेट आणि चीनशी आहे. भारताशी नाही.

ऐंशीच्या दशकात असम आंदोलन सुरु झालं. बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालेल्या, घुसखोर बांग्लादेशींची नाव मतदारयादीतून काढून टाकण्याची मागणी असममधील असंतोषाच्या केंद्रस्थानी होती. या आंदोलनाचं नेतृत्व केलं ऑल असम स्टुडन्ट्स युनियन (आसू) या संघटनेने. बांग्लादेशी मुसलमान आणि हिंदू असा भेद आसूने केला नव्हता. जे बेकायदेशीरपणे असममध्ये राहात आहेत त्या सर्वांना हाकलून द्या अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र त्यात अडचण होती. बेकायदेशीर बांग्लादेशी कुणाला म्हणायचं हा जटील प्रश्न होता. स्वातंत्र्याच्या आधीपासून बंगालमधून असममध्ये लोक येत होते. जमिनी लागवडीखाली आणत होते. त्यामुळे १९५१ हे आधारभूत वर्षं धरायचं की १९६१ की १९७१ असा पेच होता. मात्र संपूर्ण ईशान्य भारतात एक-दोन तेल शुद्धीकरण कारखाने वगळता पायाभूत उद्योग नव्हते. त्यामुळे रस्ते, पूल, सिंचन इत्यादी पायाभूत व्यवस्थांही अपुर्या होत्या. त्यामुळे विदेशी नागरीकांना हाकलून देण्यासोबत स्वतंत्र असम, स्वतंत्र बोडोलँण्ड या मागण्यांनीही जोर धरला. त्यातूनच नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँण्ड या सशस्त्र संघटनेची स्थापना झाली. १९८१-८३ या काळात उपेंद्रनाथ ब्रह्मा ऑल बोडो स्टुडंट युनियनचे उपाध्यक्ष होते. १९८६ मध्ये ते या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. बोडो भाषा-संस्कृती यांचं जतन-संगोपन-संवर्धन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनेने बोडो राज्याच्या मागणीचा पुरस्कार केला. त्यांचा सशस्त्र लढ्यावर विश्वास नव्हता. ते शांततामय मार्गाने या मागणीसाठी संघर्ष करू पाहात होते. त्यांच्या मागणीचं पर्यवसन पुढे बोडो टेरेटोरिअल कौन्सिलच्या स्थापनेमध्ये झालं. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचा बळी घेतला. उपेंद्रनाथ ब्रह्मा यांना बोडोलँण्डचे राष्ट्रपिता म्हणून गौरवण्यात आलं. उपेंद्रनाथ ब्रह्मा पार्कमध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
१९९३ साली बोडोलँण्डसाठी स्वायत्त प्रशासन मंडळाच्या स्थापनेची घोषणा झाली. संविधानाच्या सहाव्या अनुसूचीनुसार या मंडळाला स्वायत्तता देण्यात आली. प्रत्यक्षात कौन्सिलची स्थापना २००३ रोजी झाली. मात्र अनेक बोडो संघटना त्यावर समाधानी नव्हत्या. त्यामुळे त्यांचा संघर्ष सुरुच राह्यला. २०२० रोजी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बोडो संघटना यांच्यामध्ये करार झाला. बोडोलँण्ड टेरिटोरिअल कौन्सिलचे अधिकार वाढवण्यात आले. चार जिल्ह्यांना लागून असलेल्या अन्य जिल्ह्यांतील बोडो गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. डोंगराळ प्रदेशातील बोडोंना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचं केंद्र सरकारने मान्य केलं. ‘द हिंदू’ या वर्तमानपत्राने या ऐतिहासिक कराराची सविस्तर बातमी दिली. सदर बातमीनुसार बोडोलँण्डच्या संघर्षात आजवर २ हजार ८२३ नागरिक, २३९ सुरक्षा दलांतील सैनिक आणि ९३९ सशस्त्र बोडो अतिरेकी ठार झाले. या सर्व करारांमध्ये ऑल बोडो स्टुडन्ट्स युनियन या विद्यार्थी संघटनेने कळीची भूमिका पार पाडली.
बोडोंच्या स्वायत्त मंडळाप्रमाणेच दिमा-हसाओ, कार्बी अंगलाँग या समूहांनाही स्वायत्त जिल्हा मंडळं मिळाली आहेत. या सर्व मंडळांना भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा भक्कम आधार आहे. या मंडळांच्या निवडणुका होतात. केंद्र आणि राज्य सरकारांकडून त्यांना निधी मिळतो, या प्रदेशातील अनेक सरकारी विभाग- उदा. कौशल्य विकास, रेशीम उत्पादन आणि वस्त्रोद्योग इत्यादी या मंडळांकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या मंडळांचा मुख्य कार्यकारी सभासद (चीफ एक्झिक्युटिव मेंबर) हा या मंडळांचा मुख्यमंत्रीच असतो. त्याशिवाय राभा हसोंग, मिसिंग, तिवा, देऊरी, थेंगल, सोनोवाल कचारी या समूहांच्या गावांच्या कारभारासाठी राज्य सरकारच्या कायद्यानुसार स्वायत्त मंडळं मिळाली आहेत.
संविधानातील सहाव्या अनुसूचीचं श्रेय निकोलस रॉय आणि गोपिनाथ बोर्दोलोई या दोन नेत्यांना द्यायला हवं. गोपिनाथ बोर्दोलोई हे असमचे मुख्यमंत्री आणि निकोलस रॉय हे मेघालयातले नेते. या दोघांनी संविधान सभेमध्ये सहाव्या अनुसूचीचा आग्रह धरला. ईशान्य भारतातील मूळ निवासींना भारताच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी, त्यांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी, त्यांच्या भाषा व संस्कृतीच्या परिपोषाची हमी देण्यासाठी म्हणजेच या समूहांना स्वायत्तता देण्यासाठी सहावी अनुसूची गरजेची आहे असं या दोघांनी संविधान सभेच्या गळी उतरवलं. संविधान सभेनेही त्याला मान्यता दिली. असम करार, बोडो करार, मिझोराम करार किंवा आज नागा राष्ट्रवाद्यांसोबत चाललेल्या वाटाघाटी या सर्वांचा आधार संविधानातील सहावी अनुसूची व अन्य तरतुदी आहेत. असम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या चार राज्यांमध्ये विविध समूहांसाठी अशी स्वायत्त मंडळं स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे अस्मितेचे, संस्कृतीच्या जतन-संगोपन-संवर्धनाचे प्रश्न सुटलेले नाहीत मात्र ते सोडवण्याचं राजकारण लोकशाही चौकटीत करण्यासाठी संस्थात्मक आधार निर्माण झाला आहे. भारतीय संविधान सभेचे नेते दूरदर्शी होते. रुढार्थाने भारतीय नसलेल्या विविध समूहांना भारतीय नागरिकत्वाचे सर्व हक्क मिळतील आणि त्याशिवाय काही विशेष हक्कही असतील याची तरतूद त्यांनी संविधानातच केली होती.
(लेखक नामवंत पत्रकार व अभ्यासक आहेत)
९९८७०६३६७०








