■ प्रवीण बर्दापूरकर
महाराष्ट्रातले एक जेष्ठ राजकारणी दत्ता मेघे यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं . वय झालं होतं आणि ( राज्यपालपद वगळता ) आयुष्यात जे काही करायचं होतं-नव्हतं ते सगळं करुन झालेलं होतं . गेल्या आठवड्यात एका सायंकाळी दत्ता मेघे शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाले . ते कोणत्या पक्षाचे होते याला काही अर्थ नाही . कारण माणूस म्हणून दत्ता मेघे सहृदयी होते . राजकारणात राहूनही दत्ता मेघे यांनी सहृदयीपणा निगुतीनं शेवटचा श्वास घेईपर्यंत जपला , हेच महत्त्वाचं आहे . राजकारणात अशा पद्धतीने जगणारी माणसं फार थोडी असतात म्हणूनच ती कायमची स्मरणात राहतात .
दत्ता मेघे यांची ओळख झाली ती मुंबईत , ते राज्यमंत्री असताना म्हणजे १९७९ यावर्षी . राजकारणात आणि त्यातही सत्तेच्या दालनात दत्ता मेघे तेव्हा नवखे होते ; माझ्याही पत्रकारितेची ती जेमतेम सुरुवात होती . राजकारणात असूनही हा माणूस पुरेसा बेरकी आणि बनेल नाही , हे पहिल्याच भेटीत लक्षात आलं . तेव्हा मी चिपळूणला ‘सागर’ या दैनिकात होतो आणि नजीकच्या भविष्यकाळात नागपूरला ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात रुजू होणार होतो , हे मी सांगितलं तेव्हा दत्ता मेघे म्हणाले , ‘नागपूरला आलात की फोन करा . काही गरज लागली तर नक्की मदत करेन .’ तेव्हा झालेली ही ओळख पुढे चांगल्या मैत्रीत रुपांतरित झाली . सगळं जग त्यांना ‘दत्ताभाऊ’ म्हणून ओळखायचं , मीही त्यांना मग दत्ताभाऊ म्हणून ओळखू लागलो . दत्ताभाऊंना आमदार , खासदार , मंत्री असताना आणि नसतानाही पाहिलं ; नुसतं पाहिलं नाही तर जवळून अनुभवलंही . ते कोणत्या पदावर आहेत किंवा नाहीत त्यामुळे कोणताही फरक पडलेला नसायचा . दत्ताभाऊ जसे होते तसेच वागायचे . खामल्यातील त्यांच्या घरच्या दरबारातील गर्दीला कधी ओहोटी लागल्याचं स्मरत नाही .
राष्ट्रीय पातळीवरच्या सर्वपक्षीय नेत्यांपासून ते नागपूरच्या गल्लीतल्या पंटर पुढाऱ्यापर्यंत असं कुणीही दत्ता मेघे यांच्याकडे भेटणं शक्य शक्य असायचं . पुढे त्या घराचा खूप मोठा विस्तार झाला ,घर अवाढव्य झालं . घर वाढलं म्हणून दत्ता मेघे आणि त्यांच्या घरातले अन्य सदस्य बदलले नाहीत . त्यांच्याही आगत-स्वागतात व्यापक बदल होत गेले . पूर्वीच्या घरी पहिल्या मजल्यावर एका खोलीत आमच्या मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबतच्या बैठका होत असत . पुढे या बैठका मेघेंच्या विस्तारित घरात एका छोट्या टॅंकच्या शेजारी सुरु झाल्या , एवढाच काय तो बदल . दत्ताभाऊंचा स्वभाव दिवसाचे २४ तास राजकारण करावं , असा मुळीच नव्हता . दिवसभर राजकारण झालं की संध्याकाळी शुचिर्भूत होऊन चार मित्र जमवावे आणि जगण्याचा रसिकपणे आस्वाद घ्यावा असा त्यांचा रिवाज होता . हा रिवाज दत्ताभाऊंनी एखादा वसा पाळावा तसा पाळला ; त्यात अनेकांना सहभागी करुन घेतलं .दत्ता मेघे राजकारणात राहूनही बेरके आणि बनेल नव्हते हे खरं असलं तरी , धोरणी मात्र नक्की होते . ते आधी काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांची निष्ठा शरद पवार यांच्यावर होती . दत्ता मेघे राष्ट्रवादीत गेले तरी त्यांची निष्ठा शरद पवार यांच्यावरच कायम राहिली . पुढे शरद पवार यांनी दूर सारल्यावरही ( त्याचीही एक हकीकत आहे ! ) ही निष्ठा मुळीच पातळ कशी झाली नाही हे चांगलं ठाऊक असणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मी एक आहे .
नागपूर , मुंबई, अकोला , दिल्ली , जबलपूर , भोपाळ अशा अनेक ठिकाणी दत्ता मेघे यांच्यासोबत मी प्रवास केला . हा प्रवास काही अर्थातच मुक्यांनं होत नव्हता तर साहजिकच भरपूर गप्पा होत . लहानपणची गरिबी जशी दत्ता मेघे आवर्जून सांगत तशी त्यांची शरद पवारांवरील निष्ठाही सांगत . ‘एक वेळेस साहेब मला सोडतील पण मी त्यांना सोडणार नाही’ असं त्यांनी अनेकदा म्हंटल्याचं स्मरतं . घडलं तसंच , शरद पवार यांनी दत्ता मेघे यांना दूर सारलं . पण , दत्ता मेघे यांच्या मनात शरद पवार यांच्या विषयी भक्तीभाव ओतप्रोत भरलेला होता . २०२१४नंतर ते भारतीय जनता पक्षात गेले मात्र , मनानं ते शरद पवारांचेच भक्त राहिले . शरद पवारानंतर त्यांच्या मनात नितीन गडकरी , अटलबहादूर सिंग आणि गिरीश गांधी यांना अपरंपार जागा होती . पुढे त्यांचा विश्वास नितीन गडकरींवर जास्त जडला . अर्थात याचा अर्थ त्यांच्या मनात अटलबहादूर सिंग आणि गिरीश गांधी यांच्या विषयीचे महत्व कमी झालेलं होतं , असं मुळीच नाही .
दत्ता मेघे यांनी विदर्भात आणि त्यातही नागपूर तसंच वर्धा जिल्ह्यात शिक्षण संस्थांचं जाळं विणलं . शिक्षण संस्था कसल्या , तो शिक्षणाचा केलेला अतिशय दर्जेदार व्यवसायात होता . दत्ता मेघेंच्या कामाचा हा विस्तार केवळ शिक्षण संस्थांपुरता मर्यादित नव्हता तर सहकारी बँक , सूतगिरणी अन्य उद्योग या क्षेत्रातही तो पसरलेला होता . इतक्या मोठ्या साम्राज्याचे धनी असूनही दत्ता मेघे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घमेंड नव्हती . मुंबई असो का दिल्ली , नागपूर ,वर्धा…आलेल्या प्रत्येकाशी चार शब्द बोलणं आणि त्याची जी काही समस्या असेल तर ती सोडवणं हा दत्ता मेघे यांचा ‘डीएनए’ होता . आपल्याला फार उच्च शिक्षण घेता आलं नाही पण , उच्च शिक्षणाची संधी समाजातल्या प्रत्येकाला मिळावी अशी सदिच्छा दत्ता भाऊंच्या मनात कायम दरवळत असे . त्यांनी किती लोकांना मदत केली आणि त्याची वाच्यता कशी केली नाही , याचा एक साक्षीदार मीही आहे . ‘अमुक एक माणूस गरजू आहे त्याला तुमच्याकडे पाठवतो आहे’ असं भाऊंना सांगितलं की मग ते प्रवेशाचं काम असो की आर्थिक सहाय्य दत्ता मेघे यांनी त्यांना भेटायला आलेल्या कोणाही गरजू माणसाला रिकाम्या हाताने पाठवलं नाही .
एक प्रसंग सांगायला हवा ‘लोकसत्ता’ची नागपुरातून प्रकाशित होणारी विदर्भ आवृत्ती सुरू झाली तेव्हा बारावीच्या परीक्षेचे निकाल देताना गुणवंत विद्यार्थ्यांचे भाराभर फोटो छापण्याची प्रथा होती . तसं न करता काही गरजू मुलांच्या मुलाखती प्रकाशित कराव्या आणि केवळ पहिल्या पाच गुणवंतांची मनोगतं प्रकाशित करावी असे मी ठरवलं . पहिल्या वर्षी त्यातील काही मुलांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षणात भावी शिक्षणात येणाऱ्या संभाव्य आर्थिक अडचणींविषयी सूतोवाच केलेलं होतं . ते वाचल्यावर दत्ता भाऊंनी मला फोन केला आणि ‘यापैकी पाच खरेखुरे गरजू विद्यार्थी निवडा आणि त्यांना माझ्याकडे पाठवा त्यांना हव्या त्या अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देतो’ अशी ऑफर दत्ताभाऊंनी दिली ; एवढंच नाही तर ती पाळलीही . पुढे तीन-चार वर्षानंतर ते काम करायचा मला कंटाळा आला आणि ती योजना बंद पडली . या गरजू मुलांना वैद्यक , फार्मसी , अभियांत्रिकी अशा विविध शाखात दत्ता मेघे यांनी एक पैसा न घेता प्रवेश दिले आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होईल हे बघितलं . त्याआधीही अशी गरजू मुलं-मुली दत्ताभाऊकडे मी पाठवत होतोच . धनाअभावी शिक्षण न घेऊ शकणार्या विद्यार्थ्यांसाठी जी कळकळ दत्ता मेघे यांनी सातत्यानं दाखवली , त्यासाठी प्रशंसनीय हा शब्द थिटा आहे .
बरं , अशी मदत दत्ता मेघे काही एका दोघांसाठी करत होते अशातला भाग नाही . दारी आलेल्या प्रत्येकासाठी मग तो ओळखीचा असो अथवा नसो , त्यानं कुणाचा संदर्भ आणलेला असो अथवा नसो , दत्ता मेघे यांनी त्यांचा हात कधी आखडता घेतला नाही . दात्याचा तो हात गरजूंना कायम देत राहिला तरी मेघे यांनी मात्र या केलेल्या मदतीचा कधीच कुणाकडेही उच्चार केला नाही .
संस्था उभारताना दत्ता मेघे यांनी कोणती कंजुषी दाखवल्याचं किंवा जात , धर्म आड आणल्याचं कधी घडलं नाही . त्यांच्या शिक्षण संस्थात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नोकरी करत राहिले . विद्यार्थ्यांबाबतही त्यांचा दृष्टिकोन असाच होता . संस्थेच्या उभारणीमध्ये ‘जे जे उत्तम असेल ते ते’ आपल्या संस्थेत असलं पाहिजे , असा त्यांचा कायमच कटाक्ष राहिला . त्यासाठी खर्च किती होतो आहे आणि तो आवश्यकतेपेक्षा जास्त आहे का , याचा विचार कधी दत्ता मेघे यांनी केल्याचं कधीच दिसलं नाही . त्यामुळे अगदी अलीकडच्या दहा-पंधरा वर्षांच्या आधीपर्यंत दत्ता मेघे सर्वर्थानं ‘सधन’ या वर्गात नव्हते . जे काही धन संस्थेतून मिळत होतं त्या व्यतिरिक्त कर्ज काढून त्यांनी उत्तम दर्जाच्या संस्थांची उभारणी केली . त्यामुळे दत्ता मेघे यांची संस्था म्हणजे उच्च दर्जा हे समीकरण आपोआपच तयार झालं . या संदर्भात एक अनुभव आवर्जून सांगावा असा आहे . शिक्षण संस्था उभारण्याच्या काळात दत्ता मेघे राजकारणात सक्रिय होते . ही घटना घडली तेव्हा ते राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते आणि मी ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद ब्युरोला तेव्हा होतो . बँक कर्मचाऱ्यांचा नेता असलेला देवीदास तुळजापूरकर हा माझा जुना मित्र . त्यानं एक दिवस महाराष्ट्रातल्या कोणत्या राजकारण्याकडे राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जाची किती थकबाकी आहे याची यादी मला दिली . त्या यादीत विदर्भातील दत्ता मेघे आणि श्रीकांत जिचकार अशी दोन नावं माझ्या ओळखीची होती . बातमी अर्थातच खळबळजनक होती . ती दिल्यावर जी काय चर्चा व्हायची ती झाली . दोनेक दिवसानं दत्ता मेघे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ‘तुम्ही म्हणता ती थकबाकी आता माझ्यावर नाही गेल्याच आठवड्यात ती सर्व थकबाकी मी भरुन टाकलेली आहे . त्यासाठी मी वेगळं कर्ज काढलं होतं पण , हा काही तुम्हाला सांगायचा मुद्दा नाही ,’ सांगायचं तात्पर्य हे की , सरकारमध्ये राहून सरकारचे पैसे बुडवावे असा दृष्टिकोन दत्ता मेघे यांच्यामध्ये कधीच आढळला नाही . अर्थात सवलतीच्या दरात शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी सरकारकडून जमिनी धोरणीपणानं मिळवल्या हेही तेवढेच खरं .
पावणे सहा फूट उंची , शिडशिडीत शरीरयष्टी , गर्द सावळा रंग , तरतरीत नाक आणि हिवाळा वगळता पांढरे स्वच्छ कपडे , असं दत्ता मेघे यांचं व्यक्तीमत्व होतं . त्यांचा स्वभाव तसा मृदू होता . फार काही कुणावर चिडावं कुणाला अद्वातद्वा बोलावं किंवा कुणाचा अपमान करावा , अशी त्यांची वृत्ती नव्हती .फारच चिडले तर समोरच्याला ‘तू आता इथून जा बाबा’ असं ते सौम्य स्वरात सांगत . त्यांचा एक स्वीय सहाय्यक होता त्याचं नाव सोडून द्या पण , तो बरीच वर्ष दत्ताभाऊ सोबत होता . दत्ताभाऊ त्याच्यावर प्रचंड विसंबून असत . भाऊंच्या त्या विसंबून राहण्याचा त्यांनं बऱ्यापैकी गैरफायदा घेतला हे लक्षात येऊनही दत्ता मेघे कठोर कधी झाले नाहीत . त्याच्या गैरफायद्याबद्दलच्या दोन-तीन कथा त्यांनी शेअर केल्या होत्या . पुढे मात्र तो सहाय्यक हाताबाहेर सुटला ; त्याला आमदार होण्याची स्वप्न पडू लागली . दत्ता मेघे यांनी जेव्हा त्यांचा थोरला मुलगा सागर याला विधान परिषदेवर पाठवायचं ठरवलं तेव्हा तो सहाय्यक फारच चिडला . मेघे यांचा आधार घेऊन त्याला त्या जागी जायचं होतं . त्यावरुन त्यांना मेघे यांच्याशी बराच वादही घातला अखेर दत्ता मेघे यांनी त्याला अलगद बाजूला काढलं आणि प्रकरण संपवलं .
एक फारच वैयक्तिक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही आमच्या कन्येला मेघे यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेत एमबीए साठी प्रवेश हवा होता . त्यासाठी आम्ही शैक्षणिक कर्ज काढलं आणि फी भरली . दोनेक दिवसांनी सागर मेघेचा मेघेचा फोन आला . त्यानं विचारलं , ‘काका सायली तुमचीच मुलगी ना ?’ मी हो म्हणून सांगितल्यावर तो म्हणाला , ‘तिची फी तुम्ही मुळीच भरायला नको होती . मी ते पैसे परत पाठवतो . उद्या हे जर बाबांना कळलं तर बाबा मला खूप रागावतील .’ सागरला मी म्हणालो माझ्या शब्दाखातर इतर अनेकांना दत्ताभाऊंनी भरपूर मदत केली आहे , अजूनही करतात . मला माझ्या कन्येची फी भरण्यासाठी कर्ज काढावं लागलं तरी ते फेडण्याची क्षमता माझ्यात आहे . बाबा तुला रागवणार नाही याची खात्री मी देतो आणि त्यासाठी लगेच येऊन त्यांच्याशी बोलतो . ’त्याप्रमाणे मी गेलो आणि भाऊंना काय घडलं ते सांगितलं . मी शुल्क भरणे भाऊंना काही आवडलं नाही . त्यबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण , त्याचबरोबर माझ्या भूमिकेचंही स्वागत केलं .
२०१२ मध्ये मी नागपूर सोडलं आणि दिल्लीला गेलो तेव्हा दत्ताभाऊ लोकसभेचे सदस्य होते . दिल्लीतही आमच्या भरपूर भेटी होत असत . संध्याकाळच्या मैफिली रंगत असत . त्या आठवणी खूप आहेत. २०१५ मध्ये परत आल्यावर मी नागपूरही सोडायचं सोडून तेव्हाच्या औरंगाबादला ( आता छत्रपती संभाजी नगर ) स्थायिक व्हायचं ठरवलं . हे सांगायला दत्ता मेघे यांच्याकडे गेलो . मी नागपूर सोडण्याची कल्पना त्याना मुळीच रुचली नाही . तेव्हा मी त्यांना सांगितलं की औरंगाबादला माझं घर आहे त्यावर भाऊ म्हणाले, ‘ ते घर विका . नागपूरला या . इथे मी तुम्हाला एक घर घेऊन देतो . पाच-दहा एकर शेतीही घेऊन देतो . ती करा आणि आमचे सल्लागार म्हणून इथेच रहा . या शहराला आणि मलाही तुमची गरज आहे’. दत्ता मेघे यांची माणसं जोडून ठेवण्याची शैली ही अशी होती आणि त्यांनी अशी अनेक माणसं वेगवेगळ्या निमित्ताने त्यांच्या संस्थेसोबत जोडून ठेवलेली होती . ती यादी बरीच मोठी मोठी आहे .
दत्ता मेघेंच्या कामाची शैली ‘सॉफ्ट’ म्हणता येईल अशा पद्धतीची आणि सकारात्मक होती . कुणाचंही काम करायचं ठरवल्यावर ज्या माणसाकडे त्याला पाठवायचं त्याला आधी फोन करायचा आणि कोण माणूस पाठवतो आहे तसंच त्याचं काम काय आहे , याची कल्पना देण्याची दत्ताभाऊंची पद्धत होती . औरंगाबादला स्थायिक झाल्यावर माझ्या एका नातेवाईकाला त्यांच्या संस्थेत नोकरी हवी होती . त्यासाठी मी दत्ताभाऊंना फोन केला त्यांनी सांगितलं ,’आता संस्थेच्या कामातून मी जवळजवळ निवृत्त झालो आहे सागर सगळं बघतो . तुम्ही दहा मिनिटांनी सागरला फोन करा , तोपर्यंत मी त्याला तुमचा फोन येणार आहे आणि काय काम आहे ते सांगून ठेवतो .’ सागरला फोन केला तर तोपर्यंत दत्ताभाऊंचा फोन सागरला गेलेला होता . लवकरच जागा निघणार आहेत आणि त्याची जाहिरात येणार आहे याची माहिती सागरनं लगेच दिली आणि अर्ज पाठवल्यावर आपण बोलू असं आश्वस्त केलं . माझ्या त्या आप्ताला पुढे दिल्लीत नोकरी मिळाल्यामुळे दत्ता मेघे यांच्या शिक्षण संस्थेत जाण्याची वेळच आली नाही हा भाग वेगळा पण , दत्ता मेघे यांची कामाची शैली ही अशी होती
१९७९ साली आमची ओळख झाली , मग घसट वाढली आणि २०१५ हळूहळू आमच्यातला संपर्क कमी कमी होत गेला . पत्रकारितेच्या साडेचार दशकांच्या काळात दत्ता मेघे यांच्यासारखा सहृदयी राजकारणी अपवादानेच पाहण्यात आला . आणखी एक म्हणजे , पाय जमिनीवर ठेवून लोकांशी वागणं हाही त्यांचा दुर्मीळ गुण होता . अशी माणसं राजकारणात फार अपवादानं पाहायला मिळतात . दत्ता मेघे त्यापैकी एक होते . माणसं काळाच्या पडद्याआड जातात…उरतात त्या त्यांच्या आठवणी . दत्ता मेघे गेले पण , त्यांच्या असंख्य आठवणी माझ्या मनात आहेत . त्यांच्याविषयी खूप लिहिता येईल पण , ते लिहिलेलं त्यांच्यातला सहृदयी माणूस कसा वैपुल्यानं व्यापक होता हे सांगण्यासाठी अपुरं आहे .
दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)
+919822055799









