इतिहासातील कौटुंबिक सत्ता संघर्ष

 

प्रा. डॉ. गोविंद मा.तिरमनवार

मानव जातीच्या इतिहासात सत्ता आणि वर्चस्वासाठी आपसात संघर्ष झाल्याची अनेक उदाहरणे सापडतात. सत्ता, अधिकार आणि प्रभाव मिळविण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नातून व्यक्ती, कुटुंब, गट, राज्य आणि राष्ट्रात संघर्ष होत आलेत. अनेकदा सत्ता ,अधिकार, आणि प्रभावासाठीच्या संघर्षाला हिंसक रूप प्राप्त झाल्याचे दाखले इतिहास देतो. भारत याला अपवाद नाही. प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या भारतीय इतिहासात सत्ता व अधिकारासाठी व्यक्ती, कुटुंब, गट आणि राज्यात मोठ्या प्रमाणात संघर्ष घडून आलीत. अनेक कुटुंबे किंवा राजघराण्यातील सत्ता संघर्ष तर रक्तरंजित ठरला.  भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच आहे. सोबतच तो सत्ता संघर्षांनी भरलेला आहे. साधारणतः भारतात उत्तर वैदिक कालखंडात जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली.जनपदांच्या उदयातून पुढे सार्वभौम सत्ता आकारास आल्या. जनपदांच्या उदयापासून ते आजतागायत राज्या राज्यात आणि एकाच घराण्यातील व्यक्तींमध्ये सत्तेसाठी संघर्ष घडून आलेत. 

प्राचीन भारतीय राजघराण्यातील कौटुंबिक सत्तासंघर्ष :-

हिंदूंमध्ये उत्तराधिकाऱ्याच्या बाबतीत कोणताही स्पष्ट नियम नव्हता. मात्र राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा गादीवर बसेल ही धर्म व समाज मान्य परंपरा चालत आलेली होती. या  परंपरेनुसार राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा सर्वसाधारणपणे गादीवर बसत असे. परंतु काही राजांनी आपल्या हयातीतच आपल्या कर्तबगार व पराक्रमी मुलाला आपला उत्तराधिकारी घोषित केल्याची उदाहरणे इतिहासात सापडतात. बऱ्याचदा शौर्य व लष्करी शक्तीवर उत्तराधिकारी ठरत असल्याने संघर्ष अपरिहार्य होते.

रामायण व महाभारताचा कालखंड इतिहासात ‘महाकाव्य काळ’ म्हणून ओळखला जातो. हडप्पा संस्कृती, वैदिक युग आणि त्यानंतरचा कालखंड म्हणजे महाकाव्य काळ होय. रामायण काळात माता कैकयीने आपल्या मुलाला राजगादी मिळावी यासाठी केलेला अट्टाहास आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रास मिळालेला वनवास सर्वश्रुत आहे. कुरू वंशातील कौरव- पांडवांमधील सत्ता संघर्षातून महाभारत घडले. प्रभू श्रीरामचंद्रास मिळालेला वनवास आणि महाभारताचे युद्ध यामुळे झालेला भीषण संहार केवळ राजसत्तेच्या लोभातूनच घडून आलेत.

प्राचीन भारतातील इतिहास प्रसिद्ध प्रदेश म्हणून मगध प्रदेशाची ओळख आहे. गौतम बुद्धाच्या काळात बिंबिसार हा मगधचा सम्राट होता. त्याचा मुलगा अजातशत्रू याने बिंबिसारला पदच्युत करून कैदेत टाकले आणि आपण स्वतः सिंहासनावर आरूढ झाला. भारतीय इतिहासात नव्या युगाचा प्रारंभ करणारे मौर्य घराणे सुद्धा भाऊबंदकीच्या सत्ता संघर्षाला अपवाद ठरले नाही. या घराण्यातील सम्राट अशोकाला राजसत्ता मिळाविण्यासाठी आपल्या भावांशी संघर्ष करावा लागल. मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ समजला जातो. कारण चंद्रगुप्त मौर्याने(इ.स.पूर्व ३२२-इ.स.पूर्व २९८) मगधवर मौर्य घराण्याची सत्ता स्थापन करीत सर्वप्रथम भारतात विशाल एकछत्री सार्वभौम सत्तेची स्थापना केली आणि अनेक वर्ष उत्तम पद्धतीने राज्य केले. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार गादीवर बसला. बिंदुसारला अनेक राण्या व त्यांच्यापासून झालेली अनेक मुले होती. सुशीम हा बिंदुसारचा सर्वात मोठा मुलगा होता. दुसऱ्या एका राणीची अशोक व तीष्य ही दोन मुले होती. सम्राट अशोक सुशीमपेक्षा पराक्रमी असल्याने बिंदुसारने आपल्या हयातीतच अशोकाला गादीचा वारस जाहीर केले होते. परंतु बिंदुसारच्या मृत्यूनंतर सुशीमने अशोकाच्या गैरहजेरीत सिंहासनाचा ताबा मिळविला तेव्हा अशोकाने सुशीम व इतर सर्व भावांना युद्धात पराभूत करून ठार केले. सिंहली इतिहासकारांच्या मते आपल्या ९९ भावांना ठार करून अशोकाने रक्तरंजित मार्गाने मगधची सत्ता प्राप्त केली.  (या दंतकथेला नीट पुरावा उपलब्ध नाही.) जवळपास चार वर्षे अशोकाला आपल्या भावांशी सत्तेसाठी संघर्ष करावा लागला.

वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास लेण्यांची निर्मिती करणाऱ्या राष्ट्रकूट राजघराण्यातही सत्तेसाठी यादवी घडून आली. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांच्या मृत्यूनंतर गादीवर बसलेल्या गोविंद दुसरा याला पदच्युत करून  त्याचा धाकटा भाऊ ध्रुव याने गादी बळकावली.(इ.स.७८०) पुढे ध्रुवने आपला धाकटा मुलगा गोविंद तिसरा यास वारस म्हणून नियुक्त केले. तेव्हां त्याचा मोठा मुलगा स्तंभ याने त्याच्याविरुद्ध बंड पुकारले.

मध्ययुगीन मुस्लिम सत्ताधीशांच्या काळातील कौटुंबिक सत्ता संघर्ष

  भारतात इ.स.आठव्या शतकाच्या सुरुवातीपासून मुस्लिमांच्या आक्रमणांना सुरुवात झाली. सुरुवातीला अरबस्थानातील मंहमद बीन कासीम याने वायव्य भारतावर स्वारी केली. त्यानंतर मंहमद  गझनी याने इ.स.१००१ ते १०२६ या दरम्यान भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या. त्यानंतर मंहमद घोरी याने बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात भारतावर स्वारी केली. मंहमद घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा सरदार कुतुबुद्धीन ऐबक याने १२०६ मध्ये दिल्ली येथे मुस्लिम सत्तेची स्थापना केली. तेव्हापासून ते १८५७ पर्यंत(केवळ हिंदू शासक हेमूचा अल्प शासनकाळ वगळता) दिल्लीच्या गादीवर मुस्लिम सत्ताधीशांची सत्ता कायम होती. भारतातील मुस्लिम सत्ताधीशांचा पहिला कालखंड हा  सुलतानशाहीचा कालखंड होता (इ. स.१२०६ ते १५२६).आणि दुसरा कालखंड हा मुघल सत्तेचा होता (इ. स. १५२६ ते १८५७).

मुस्लिम शासकांमध्ये वारसा नियमांचा अभाव असल्याने सुलतान किंवा सम्राटाच्या मृत्यूनंतर राजपुत्रांमध्ये सत्तेसाठी कायम संघर्ष होत आले. सुलतानशाहीच्या कालखंडातील प्रसिद्ध सुलतान अल्लाउद्दीन खिलजी(देवगिरीच्या यादव राज्यावर आक्रमण करून ते जिंकणारा) याने आपला संरक्षक असलेल्या काकाला अत्यंत निर्दयीपणे ठार करून सुलतान पद मिळविले.आपला मोठा भाऊ शहाबुद्धींनच्या मृत्यूनंतर जलालुद्दीन खिलजी याने आपला पुतण्या अल्लाउद्दीन व त्यांच्या सर्व भावांचे पालनपोषण मोठ्या प्रेमाने केले. अल्लाउद्दीनचे शौर्य व हुशारी लक्षात घेऊन जलालुद्दीने आपल्या एका मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले आणि सुभेदारपदी त्याची नियुक्ती केली. जलालुद्दीन खिलजी हा अल्लाउद्दीन खिलजीचा काका, सासरा आणि संरक्षक होता. परंतु सत्तेसाठी हपापलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने १९ जुलै  १२९६ रोजी आपल्या काकांवर मारेकरी पाठवून क्रूरपणे त्याला ठार केले. उपकारकर्त्या काकास केवळ सत्तेसाठी अत्यंत अमानुष व क्रूरपणे ठार मारणारा अल्लाउद्दीन खिलजी अत्यंत निर्दयी व नीच वृत्तीचा होता.

मुघल कालखंडात राज सत्तेसाठी राजपुत्रांनी बापाविरुद्ध केलेले बंड आणि भावां -भावांनी आपसात केलेला

 

 

 

 

 

 

 

 

रक्तरंजित संघर्ष इतिहासात प्रसिद्ध आहे. इ. स.१५२६ मध्ये बाबरने पानिपतच्या पहिल्या लढाईत सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान इब्राहीम लोधी याचा पराभव करून दिल्ली येथे मुघल सत्तेची स्थापना केली. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायुन गादीवर बसला. त्याच्यानंतर इ.स.१५५६ मध्ये त्याचा मुलगा अकबर गादीवर बसला. मुघलांच्या इतिहासात सम्राट अकबराची कारकीर्द अनेक दृष्टीने महत्त्वाची ठरली. अकबराने साम्राज्य विस्तार करीत मुघल सत्तेला स्थैर्य व बळकटी प्राप्त करून दिली. परंतु त्याच्या हयातीतच त्याचा मोठा मुलगा सलीम उर्फ जहांगीर याने सत्तेसाठी त्याच्याविरुद्ध बंड केले. त्याने अकबराला मारण्याचा प्रयत्नही  केला.अकबराने त्याला कसेबसे समजावून शांत केले. अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर बादशहा झाला( ३ नोव्हेंबर १६०५). जहांगीरच्या काळात राजपुत्रांमधील सत्ता संघर्षाला विकृत रूप आले. जहांगीरला खुसरो, परवेज, खुर्रम उर्फ  शहाजहान आणि शहरियार अशी चार मुले होती. जहांगीरच्या कारकिर्दीच्या प्रारंभीच त्याचा मोठा मुलगा खुसरो यांने सत्तेसाठी बापाविरुद्ध बंड केले. परंतु जहांगीरने खुसरोचे बंड मोडून काढले आणि अत्यंत निर्दयपणे त्याचे डोळे काढून त्याला आंधळे केले.(खुसरोच्या बंडाच्या वेळी खुसरोला मदत केली म्हणून जहांगीरने शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदेवास मृत्युदंडाची शिक्षा दिली. तेव्हांपासून मुघल -शीख संघर्ष सुरू झाला) जहांगीरच्या हयातीत त्याचा कर्तबगार पुत्र खुर्रम उर्फ शहाजान याने सत्तेसाठी बंड केले. जवळपास चार वर्ष त्याने जहांगीरला त्रस्त केले. पुढे जहांगीरच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी शहाजहानने आपले तीन सख्खे भाऊ, काही चुलत भाऊ व इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांना रक्तरंजित मार्गाने बाजूला सारले.

पित्याविरुद्ध पुत्राने बंड करण्याचा जहांगीरने पाडलेला प्रघात आणि शहाजहाननेही  त्याचे केलेले अनुकरण या गोष्टी मुघल राजघराण्याच्या दृष्टीने हानीकारक ठरल्या. कारण तीस वर्षानंतर शहाजहानला आपणच लावलेल्या विषवृक्षाची फळे चाखावी लागली. शहाजहानच्या शेवटच्या काळात त्याच्या मुलांमध्ये दोन वर्ष चाललेला संघर्ष इतिहासात ‘वारसा युद्ध’ म्हणून ओळखले जाते. शहाजहानला दारा शुकोह, शहाशुजा,औरंगजेब,  मुरादबक्क्ष ही चार मुले होती.ही चारही मुले  सत्तेसाठी  एकमेकांचा घोट घेण्यास उत्सुक झाले. ‘तख्त  किंवा तख्ता ‘(शवपेटी) हे त्यांचे घोषवाक्य बनले. या संघर्षात औरंगजेबाने मोठ्या धुर्ततेने,कपटकारस्थान आखून आपल्या तीनही भावांना ठार केले.एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष आपल्या पित्यालाही कैदेत टाकून तो सिंहासनारूढ झाला. एकेकाळी साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ वीर आणि सेनानी असलेल्या शहाजहानला आपल्या आयुष्याची अखेरची आठ वर्ष मुलाचा कैदी म्हणून छोट्याशा कोठडीत कितपत पडावे लागले. औरंगजेबाच्या काळात आणि त्याच्या मृत्यूनंतरही मुगल वंशातील रक्तरंजित सत्ता संघर्ष कायम राहिला.मुगल वंशात सत्तेसाठी चाललेल्या रक्तरंजित संघर्षाने वैभवशाली मुघल साम्राज्य खिळखिळे होऊन मुघल साम्राज्याचा डोलारा कोलमडून पडला.

राजपुत राजांमधील कौटुंबिक सत्ता संघर्ष

सुमारे आठशे वर्ष सातत्याने परकीय आक्रमकांशी टक्कर देत आपली प्रखर अस्मिता जागृत ठेवणाऱ्या राजपुतांनी भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. आपली प्रखर अस्मिता जागृत ठेवण्यासाठी परकीय शक्तींशी लढा देणारे शूर व पराक्रमी राजपूत राजेही सत्तेसाठीच्या अंतर्गत यादवीला अपवाद ठरू शकले नाही.

राजस्थानातील मेवाड हे प्राचीनतम  राज्य होय. भारत वर्षात परकीयांची आक्रमणे सुरू झाल्यापासून ज्या ज्या राज्यांनी आपले स्वातंत्र्य संरक्षण करण्याचे अथवा गत स्वातंत्र्य मिळवण्याचे भगीरथ प्रयत्न केले त्या सर्वात मेवाडचा प्रथम क्रमांक लावावा लागेल. बाप्पा रावळ , महाराणा हमीर, महाराणा कुंभ, राणा संघ आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांसारख्या पराक्रमी राजांची परंपरा या घराण्याला लाभली.

पंधराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात महाराणा कुंभ मेवाडच्या गादीवर बसला.(इ.स. १४३३ )महाराणा कुंभ हा मेवाडच्या इतिहासातील अत्यंत पराक्रमी व कर्तृत्वान राजा होता. त्याच्या काळात मेवाड हे उत्तर भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य बनले. आर्यवर्तातल्या समस्त हिंदू राजांना त्याने मेवाडचा आदित्य ध्वजासमोर वंदन करावयास लावले. माळवा व गुजरातच्या इस्लामी सुलतानांवर त्याने विजय मिळविला. त्याच्या काळात मेवाड राज्याची सर्व क्षेत्रात भरभराट झाली. आपल्या पराक्रमाने शत्रूंना धडकी भरविणाऱ्या मेवाड राज्याला अंतर्गत यादवीने ग्रासले. महाराणा कुंभाचा ज्येष्ठ पुत्र उदयसिंह उर्फ उदा याने सत्तेच्या लोभाने अत्यंत निर्दयपणे पराक्रमी राणा कुंभास भोसकून ठार केले.राज्य लोभाने पितृघाताचे पातक करणारा  उदयसिंग याने आपल्या नीच कृत्याने मेवाडच्या प्रतिष्ठेला धक्का लावला.

महाराणा कुंभाला मारल्यानंतर उदयसिंग स्वतः गादीवर बसला. परंतु मेवाडच्या  सरदार व प्रजेने त्याला पदच्युत करून राणा कुंभाचा धाकटा मुलगा रायमल्ल यास गादीवर बसविण्यासाठी प्रयत्न चालविले. त्यातूनच उदयसिंग व रायमल्ल यांच्यात चार-पाच लढाया झाल्यात. यात रायमल्ल यशस्वी झाला. महाराणा रायमल्ल इ. स. १४७३ ते १५०९ पर्यंत गादीवर होता. रायमल्ल यास राणा संग्रामसिंह उर्फ राणा संग, पृथ्वीराज आणि जयमल अशी तीन मुले होती. ही तीनही मुले पराक्रमी साहसी व वीर होती. परंतु महाराणा कुंभास  मारणाऱ्या उदयसिंग याच्या  शेषमल व सुरजमल या दोन मुलांनी राजा रायमल्लच्या  पराक्रमी मुलांत जाणीवपूर्वक कलह निर्माण केला. आपसातील कलहाने रायमल्लच्या पराक्रमी तीन मुलात त्याच्या हयातीतच अनेकदा द्वंदयुद्ध झाले. यातूनच जयमल व पृथ्वीराज या दोन मुलांचा अंत झाला. पुढे रायमल्लच्या मृत्यूनंतर राणा संग्रामसिंह ऊर्फ राणा संग मेवाडचा शासक बनला.(मे १५०९) राणा रायमल्ल यास तीन तीन पराक्रमी पुत्र असूनही त्यांचा राष्ट्रीय गौरव वृद्धीच्या कामी उपयोग होऊ शकला नाही. त्यांच्या मुलांनी आपसात भांडून अंत:कलहाचे बीज मेवाडात निर्माण केले.राणा संगाच्याच काळात मुघल सम्राट बाबरचा भारतात प्रवेश झाला.  राणा संग आणि बाबर यांच्यात १७ मार्च १५२७ रोजी खानुआ लढाई झाली. यात राणा संगचा पराभव झाला.

राणा सांगा नंतर मेवाडच्या गादीसाठी अंतर्गत संघर्ष सुरू राहिल्याने मेवाडचे सामर्थ्य क्षीण  झाले. पुढे वीर महाराणा प्रताप यांनी अकबराच्या काळात पराक्रमाने मेवाडचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. राणा प्रतापानंतर अमरसिंह, कर्णसिंह, जगतसिंह, राजसिंह व जयसिंह हे पाच पराक्रमी राजे मेवाडच्या गादीवर आले. इ. स. १७०० साली जयसिंहाचा मुलगा दुसरा अमरसिंग यांने बापाविरुद्ध बंड केले. पुढील काळात १७६२ मध्ये मेवाडच्या गादीवर बसलेल्या अरिसिंह राजाच्या काळात तर अंतर्गत संघर्षाने कळस गाठला. अरिसिंहाच्या  कारकिर्दीत झालेल्या यादवीने मेवाडला अत्यंत क्षीण करून सोडले. याचा फायदा परकीय शक्तींना मिळाला. एक सहस्त्रकाहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगलेल्या मेवाडने  अंतर्गत कलहाने गुलामीच्या शृंखला पायात अडकवून घेतल्या.

जयपूर राजघराण्यातील सत्ता संघर्ष

जयपूर किंवा अंबर हे राजपुतानातील दुसरे महत्त्वाचे राज्य होते.राजा भगवानदास, राजा मानसिंह, मिर्झा राजा जयसिंह हे याच राज्याचे राजपुरुष होते. या राज्यातील राजा जयसिंह (इ.स.१७०० ते १७४३)यांनी जयपूर शहराची स्थापना केली व अंबरहून आपली राजधानी जयपूरला आणली.सवाई जयसिंहाच्या मृत्यूनंतर त्याच्या ईश्वरसिंह आणि माधवसिंह या दोन मुलांमध्ये गादीसाठी संघर्ष सुरू झाला. अनेक दिवस चाललेला हा संघर्ष शेवटी विकोपाला गेला. जयपूरच्या या वारसा संघर्षात जयाप्पा शिंदेनी ईश्वरसिंहाला तर मल्हारराव होळकरांनी माधवसिंहाला पाठिंबा दिला.( केवळ खंडणीसाठी) यावेळी जयपुरात शिंदे-होळकर यांच्यात यादवी युद्ध होण्याचा संभव निर्माण झाला. जयपूरच्या गादीसाठीच्या या संघर्षात जयपूर राज्याचे मोठे नुकसान झाले.कारण मराठा सरदारांनी यावेळी जयपूरच्या राजपुत्रांकडून भरपूर खंडणी वसूल करून घेतली. शेवटी आपसातील संघर्षाला आणि मराठ्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळून शेवटी ईश्वरसिंहांने विष घेऊन स्वतःचे जीवन संपविले.(इ.स.१७५१) मराठ्यांच्या जयपूर राज्यातील हस्तक्षेप मराठ्यांसाठीही अत्यंत हानीकारक ठरला. या प्रकरणानंतर मराठा राजपूत संबंधात मोठा दुरावा निर्माण झाला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या प्रसंगी मराठ्यांना राजपुतांचे सहकार्य मिळाले नाही.

मराठा राजांमधील कौटुंबिक सत्ता संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात स्वराज्याची स्थापना करून मराठा सत्तेचा पाया घातला. बलाढ्य मुघल, दक्षिण भारतातील आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याशी लढा देत शिवाजीराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याचा विस्तार केला. शिवाजी राजानंतर छत्रपती संभाजी, छत्रपती  राजाराम आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी शौर्य व पराक्रम गाजवित प्राणप्रणाने स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य जिंकून घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावीत, तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबापुढे मराठे नमले नाही. उलट मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब मात्र याच मातीत संपला.( इ. स.१७०७) अठराव्या शतकात हिंदुस्थानवर मराठा सत्तेचा विस्तार झाला.

स्वराज्यातील गृहकलह

शिवराज्याभिषेकानंतर काही दिवसांनी राजमाता जिजाबाईंचा मृत्यू झाला. (१७ जून १६७४ ) त्यानंतर लगेच रायगडावर गृहकल सुरू झाला. शिवराज्याभिषेकाप्रसंगी पट्टराणी पदाचा मान सोयराबाईस मिळाला असला तरी युवराज पदाचा मान संभाजी राजांना मिळाला त्यामुळे राज्याचा वारस आपल्या मुलाला म्हणजे राजारामाला मिळणार नाही याचे दुःख सोयराबाईस झाले. सोयराबाईच्या मनातील राजसत्तेची महत्त्वकांक्षा, संभाजी विरोधी प्रधानांनी अधिकच  फुलविली. त्यामुळे प्रारंभी सुप्ताअवस्थेत असणारा आपल्या पुत्राच्या राज्याविषयीचा सोयराबाईचा लोभ पुढे उघडरित्या प्रकट झाला. त्यातूनच स्वराज्यात गृहकल सुरू झाला. रायगडावर संभाजीविरुद्ध सोयराबाई व प्रधान यांचा एक प्रभावी गट निर्माण होऊन राजकारणातील कुटील डावपेच सुरू झाले. कुटील राजकारणी प्रधानांनी संभाजींचे चरित्र्यहनन  करण्यासाठी अनेक दंतकथा रचल्या. एकूणच रायगडावर संभाजी राजे आणि राणी सोयराबाई- प्रधान यांच्यामधील वितुष्ट पराकोटीला पोहोचले. त्याची दुर्दैवी परिणती मराठी राज्याचा वारसदार शत्रूच्या गोटास जाऊन मिळण्यात झाली. मात्र शिवाजी महाराजांनी शत्रूच्या गोटातून युवराजास परत आणले.

३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोयराबाईच्या गटातील प्रधान यांनी लगेच राजाराम महाराजांचे मंचकारोहण घडवून आणले आणि सोयराबाईशी मसलत करून पन्हाळ्यावर असलेल्या संभाजी राजास कैद करण्याची योजना आखली. परंतु संभाजी राजांनी ही योजना यशस्वी होऊ दिली नाही. स्वतः ससैन्य रायगडावर येऊन स्वराज्याची सत्ता सूत्रे ताब्यात घेत स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.( १६ जानेवारी १६८१) अपराधी प्रधान व सावत्र माता सोयराबाई यांना संभाजीने कठोर शासन न करता सौम्य व सौजन्यशील वागणूक दिली. विरोधातील सर्व प्रधान व अधिकाऱ्यांना मुक्त करीत त्यांना सन्मानाने पूर्ववत अधिकाऱ्यांच्या जागेवर नेमले. तरीही स्वराज्यात उठलेले दुही व यादवीचे वादळ शांत झाले नाही. राज्याभिषेकानंतर अवघ्या सहा सात महिन्यातच संभाजी राजांना विष देऊन ठार मारण्याचा आणि शहजादा अकबराचे (औरंगजेब पुत्र )सहकार्य घेऊन राजास पदच्युत करण्याचा कट झाला. सुदैवाने संभाजी राजे यातून सुखरूप बाहेर पडले. यानंतर मात्र या कटातील सहभागी सर्वांना संभाजी महाराजांनी देहांताची शिक्षा दिली. सोयराबाईने आपली बेअदबी टाळण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी असा उल्लेख ऐतिहासिक संदर्भात सापडतो. सोयराबाईच्या मृत्यूनंतर स्वराज्यातील गृहकलाच्या नाट्यावर अखेरचा पडदा पडला.

महाराणी ताराबाई -शाहू संघर्ष

सतत पंचवीस वर्ष मराठ्यांची लढा देऊनही औरंगजेब स्वराज्य ताब्यात घेऊ शकला नाही. शेवटी २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे त्याचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बादशहा झालेल्या आझमशहाने उत्तरेत परत जाताना आपल्या ताब्यात असलेल्या संभाजी पुत्र शाहूला मराठा राज्यात दुही निर्माण व्हावी यासाठी मुक्त केले.( छत्रपती संभाजीच्या मृत्यूनंतर नोव्हेंबर १६८९ पासून महाराणी येसूबाई व शाहू औरंगजेबाच्या छावणीत होते) यावेळी महाराणी ताराबाई साताऱ्याहून राज्यकारभार पाहत होती. मुघल छावणीतून सुटून महाराष्ट्रात आलेल्या शाहूने काही मराठा सरदारांना सोबत घेऊन मराठा राजवंशाचे आपण वारस असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ताराबाई मनोमन दुखावल्या गेल्या,ताराबाईला शाहूच्या हाती सत्ता द्यायची नव्हती. छत्रपती संभाजी नंतर राजाराम आणि त्यानंतर आपण स्वतः मुघलांपासून स्वराज्याचे रक्षण केले असल्याने राजारामाचा मुलगा शिवाजी दुसरा याचा छत्रपतीच्या गादीवर जास्त हक्क आहे असा दावा ताराबाईने मांडला. त्यामुळे शाहू आणि ताराबाई यांच्यात गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शेवटी पुण्याजवळील खेड या गावी उभयपक्षात लढाई झाली. या लढाईत शाहूचा विजय झाला. पुढे ताराबाईकडून सातारा ताब्यात घेऊन शाहूने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला.

सत्ता मिळाल्यानंतर शाहूने महाराणी ताराबाईंना शांत करण्याचा आणि आपल्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ताराबाईने माघार न घेता शाहूशी संघर्ष सुरूच ठेवला आणि कोल्हापूर क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे सातारा आणि कोल्हापूर अशी दोन सत्ता केंद्र महाराष्ट्रात निर्माण झालीत. मराठ्यांच्या या दोन्ही सत्ता केंद्रांनी मुघल बादशाकडे दक्षिण सुभ्यातील चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदांची मागणी केली.(इ.स.१७०९) अशा परिस्थितीत शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षात जो कोणी विजयी होईल यालाच आपण चौथाई आणि सरदेशमुखीचा अधिकार देऊ असा निर्णय मुघल बादशहाने दिला. या निर्णयाने मराठ्यांच्या दोन्ही पक्षात भावनांचा भडका उडाला. दोन्ही पक्षांनी एकमेकांना कायमचे नष्ट करून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले. यातून छत्रपतींच्या महाराष्ट्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उभय पक्ष आता आपापले समर्थक शोधू लागले. महत्त्वाच्या सरदारांनी आपल्या बाजूला यावे म्हणून दोघेही जहागिरीची मोठी प्रलोभने त्यांना दाखवू लागले. स्वार्थी सरदारांनी या परिस्थितीचा मोठा फायदा करून घेतला. थोडक्या कारणावरून आपला पक्ष सोडायचा आणि दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळायचे, हा एक प्रकारे व्यवसायाच याकाळात निर्माण झाला. याचा फायदा घेऊन अनेक सरदार स्वतंत्र झाले. काही सरदारांनी शाहूचे वर्चस्व अमान्य करीत त्याच्याविरुद्ध बंडाळ्या पुकारल्या. यामुळे महाराष्ट्राची स्थिती अत्यंत वाईट बनली.

ताराबाई -राजसबाई संघर्ष

छत्रपती शाहू आणि ताराबाई यांच्या सत्ता संघर्ष सुरू असतानाच कोल्हापुरात राजारामाची दुसरी पत्नी राजसबाई हिने कट करून ताराबाई आणि तिचा मुलगा शिवाजी दुसरा यांना तुरुंगात टाकले.(इ.स. १७१४) यानंतर राजसबाईने आपला मुलगा संभाजी दुसरा यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले. (दुर्दैवाने ताराबाई सारख्या कर्तबगार स्त्रीला आपल्या जीवनातील अनेक  वर्षे तुरुंगातच काढावी लागली ). राजसबाई आणि तिचा मुलगा संभाजी दुसरा यांनी शाहूला विरोध करण्याचे धोरण पुढे चालूच ठेवले. मात्र ताराबाईंची कर्तबगारी राजसबाईंमध्ये नसल्याने अनेक सरदार शाहूच्या पक्षाला जाऊन मिळाले.त्यामुळे शाहूचा पक्ष बलिष्ठ बनला. शाहू आणि राजसबाई यांच्यात दीर्घकाळ चाललेला सत्ता संघर्ष इ.स. १७३१ मध्ये वारणेच्या तहाने संपुष्टात आला असला तरी छत्रपतींच्या घराण्यात राज गादीसाठी दुही निर्माण होऊन यादवी घडून आल्याने त्याचे मराठा राजकारणावर अतिशय वाईट परिणाम घडून आले. ही गोष्ट नाकारून चालणार नाही.

पेशवा माधवराव व रघुनाथराव यांच्यातील सत्ता संघर्ष

 थोरले बाजीराव पेशवे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा राज्याचा चौफेर विस्तार करीत त्याचे रूपांतर एका विशाल साम्राज्यात केले. थोरले बाजीराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा बनला (इ. स.१७४०).बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव अशी तीन मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा विश्वासराव याचा पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मृत्यू झाला. त्यामुळे माधवरावास बाळाजीच्या मृत्यूनंतर पेशवे पद देण्यात आले.(इ. स. १७६१). बाळाजी बाजीरावच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ म्हणून पेशवाईची सूत्रे आपल्याकडे येतील असा रघुनाथरावाचा (थोरले बाजीराव पेशवे व काशीबाई यांचा दुसरा मुलगा) कयास होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे रघुनाथराव दुःखी झाला.त्याला मराठा राज्याची सर्व सत्ता स्वतःच्या हाती पाहिजे होती. त्यातूनच माधवराव- रघुनाथराव यांच्यात निकराची लढाई सुरू झाली. राज्यात एकाएकी रघुनाथराव आणि माधवराव एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे मराठा राज्याचे खरेखुरे हित चिंतना-या सरदारांची फारच पंचाईत झाली. कोणत्या पक्षाला जाऊन मिळावे हे त्यांना कळेना! पेशवेपद बळकाविण्यासाठी रघुनाथरावने वारंवार प्रयत्न केले. पण त्यात त्याला यश आले नाही.पेशवे पदासाठी रघुनाथरावने माधवरावास  हयातभर त्रास दिला. परिणामतः त्याने रघुनाथरावला नजर कैदेत ठेवले.

पेशवा नारायणराव व रघुनाथराव यांच्यातील सत्तासंघर

पराक्रमी माधवराव पेशव्यास अल्फ आयुष्य लाभले. वयाच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने त्याचे निधन झाले.( १८ नोव्हेंबर १७७२) माधवरावाला मुलगा नसल्याने त्याचा १७ वर्षीय लहान भाऊ नारायणराव याला पेशव्याच्या गादीवर बसविण्यात आले. नारायणरावच्या कारकिर्दीत रघुनाथरावच्या पेशवे पद मिळविण्याच्या आकांक्षाने मोठीच उचल खाल्ली. सत्तेसाठी रघुनाथरावने मराठेशाहीला कलंकित करणारे कृत्य केले.त्याने आपल्या पुतण्याविरुद्ध कट रचून तुळाजी पवार व सुमेरसिंग यांच्या कडून शनिवारवाड्यात नारायणरावाचा खून करविला. (३० ऑगस्ट १७७३) या घटनेने संपूर्ण मराठेशाही हादरली.कारण मराठ्यांच्या इतिहासात कधीही न घडलेला अभूतपूर्व प्रकार घडला होता. पेशवे पदाच्या लालसेपोटी आपल्याच पुतण्याची निर्घुण हत्या घडवून आणणारा रघुनाथराव मराठा इतिहासातील कलीपुरुष ठरला.नारायणरावाची हत्या करून रघुनाथरावाने पेशवे पद प्राप्त केले असले तरी दरबारी मुसद्द्यांच्या विरोधामुळे अल्पकाळात त्याला पेशवे पद सोडावे लागले.

नागपूरकर जानोजी व मुधोजी भोसले यांच्यातील सत्ता संघर्ष

मराठ्यांच्या इतिहासात नागपूरकर भोसले यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. नागपूरकर भोसल्यांनी आपल्या पराक्रमाने मराठा संघात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले. थोरले रघुजी भोसले हा नागपूरच्या भोसले घराण्यातील सर्वात पराक्रमी पुरुष होय. रघुजीने नागपूर राज्य उभारून या राज्याचा चहुबाजूने विस्तार केला. १४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजीचा मृत्यू झाला. रघुजीने आपल्या हयातीतच राज्याची वाटणी आपल्या चार मुलांमध्ये करून दिली असताना सुद्धा त्यांच्या मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी सुरू झाली. रघुजीच्या चार मुलांपैकी जानोजी व साबाजी हे धाकट्या पत्नीपासून म्हणजे सकवारबाईपासून जन्माला आलेली होते; तर मुधोजी व बिंबाजी हे दोघे थोरल्या पत्नीपासून म्हणजे सुलक्षणाबाईपासून जन्माला आलेले होते. मुलांमध्ये सर्वात वडील जानोजी हा होता. परंतु मुधोजी हा थोरल्या पत्नीचा मुलगा असल्यामुळे मुधोजीला सत्ता हवी होती. त्यातूनच जानोजी आणि मुधोजी यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. सत्तेसाठी दोन्ही भावांनी एकमेकांविरुद्ध शस्त्रे हाती घेतली. त्यातूनच व-हाडात त्यांच्यात दोन-तीन ठिकाणी लढाया झाल्यात. शेवटी पेशव्यांच्या मध्यस्थीने भोसल्यांचा वारसा प्रश्न तीन वर्षानंतर निकालात निघाला. मात्र दीर्घकाळ चाललेल्या या वारसा संघर्षामुळे नागपूरचे राज्य दुर्बल झाले. या गृहयुद्धात गुंतल्यामुळे भोसल्यांचे बंगालच्या राजकारणाकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा फायदा इंग्रजांना मिळाला.

भारतीय इतिहासातील विविध राजघराण्यातील सत्तेसाठीच्या गृहयुद्धाने पराक्रमी राजघराण्याची शक्ती व प्रतिष्ठा कमी झाली. सोबतच या घराण्यातील रक्तरंजित संघर्षाने वैभवशाली भारतीय इतिहासातील काही पाने डागाळल्या गेलीत.

(मीडिया वॉच दिवाळी अंक २०२४)

 लेखक स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगावपेठ (अमरावती) येथे इतिहासाचे अधिव्याख्याते आहेत.  9405406138

[email protected]

Previous articleचार पुरुषांच्या चार शोकांतिका!
Next articleडॉ. अभिजित आणि डॉ. मनिषा: भिक्षेकऱ्यांचे मसिहा
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here