आज गाडगेबाबाचा स्मृतिदिन. त्यांच्या अनेक गुणांचे आज स्मरण होते पण मला ते भावतात ते पुस्तकांच्या जगापासून दूर असलेल्या अशिक्षित जनतेशी ते संवादी असण्याबाबत. बाबांनी अशा पुस्तक वर्तमानपत्र या जगापलीकडे असलेल्या जगाचे प्रबोधन केले. मला माझ्यासाठी ती खूप महत्वाची गोष्ट वाटते. याचे कारण आज आपण आपले विचारविश्व आणि अभिव्यक्ती केवळ आपण मध्यमवर्ग आणि वर्तमानपत्र पुस्तके वाचणारा वर्ग आणि फारतर सोशल मीडियापर्यंत संपर्क करतो आहोत. कोणत्याही विषयावर आपण फक्त या समूहापर्यंत आपले विचार पोहोचवतो आहोत. यात चूक काही नाही. मध्यमवर्ग हा निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकत असतो त्यामुळे त्यांचे मन बनविणे नक्कीच महत्वाचे आहे पण ज्या मोठ्या परीघावर इथली लोकशाही उभी आहे त्या पुस्तके आणि सोशल मीडियापलीकडच्या जगाशी माझे काय नाते आहे ? काहीच नाही.
आज महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर १२ कोटीच्या महाराष्ट्रात सर्व प्रमुख वर्तमानपत्रांचे खप ५० लाखाच्या आसपास असतील. त्यातही अग्रलेख उपलेख पुरवणी वाचणारा वर्ग धरला तर गंभीर वाचक १ कोटीच्या आसपास असेल. सोशल मीडिया वापरणारी संख्या ४ कोटी इतकी आहे. या परिघापलीकडे किमान ८ कोटी इतकी संख्या ही पुस्तके न वाचणारी अग्रलेख उपलेख न वाचणारी व सोशल मीडिया न वापरणारी आहे. या लोकसंख्येशी आपण कसा संवाद करणार आहोत हा प्रश्न मला गाडगेबाबा विचारतात. त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. मी केवळ या चार कोटीच्या जगात फिरत राहतो. माझी पुस्तके, माझे वर्तमानपत्र, माझे टीव्हीवरील भाष्य,माझी व्याख्याने परिसंवाद परिषदा पोस्ट, लाईक, comment, फेसबुक, whatsapp,twitter हे सारे सारे फक्त आणि फक्त या एक ते चार कोटीच्या जगात फिरणारे आहे.
आपल्याला जो पुरोगामी महाराष्ट्र अपेक्षित आहे. जे समाजपरिवर्तन अपेक्षित आहे. जो शोषणमुक्त समाज अपेक्षित आहे तो निर्माण होण्यासाठी बोलक्या मध्यमवर्गाशी बोलावे लागेलच पण जो समूह आपल्याला बदलायचा आहे तो बदलण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद कसा करणार आहोत. अंधश्रद्ध आणि धार्मिक राजकारणाला बळी पडणारा हाच समूह आहे. तो बदलायचा असेल तर त्यांच्याशीच बोलावे लागेल ना ?
पण त्याची माध्यमे ही पुस्तके वर्तमानपत्र सोशल मीडियाला यांना ओलांडून जाणारी असतील. गाडगेबाबांनी जे कीर्तनमाध्यम वापरले तशी माध्यमे आपल्याला निर्माण करता येतील का ? संत साहित्याने जे वेगवेगळे माध्यम वापरले त्याचे आज कालसुसंगत रूप आपल्याला शोधावे लागेल. या जनसमुहाला सोबत घेवून आंदोलन करणे हा खूप दुरचा मुद्दा आहे पण किमान त्यांच्याशी आपण संवादी नाहीत. आपण त्यांचे प्रश्न मांडतो आहे पण त्यांच्याशी बोलू शकत नाही.
या गरीब समूहाशी बोलणे ही खूप अवघड असते. गाडगेबाबाकडून ते ही शिकावे लागेल. मी शहरी वेशभूषा करून आदिवासी पाड्यावर गेलो तेव्हा लक्षात आले की आपली शारीर भाषा हीच समस्या आहे. आपण या लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद करू शकत नाही. त्यांना आपले नाही वाटत.तिथे गाडगेबाबा मोठे वाटतात. ज्या समुहाशी बोलायचे त्यांच्यासारखे राहायचे. त्यांच्या भाषेत बोलायचे हे मला जमेल का ? जी माणसे बदलावीत असे मला वाटते त्या समुहाचा मी भाग व्हायला तयार आहे का ? त्यांची भाषा आणि शरीरभाषा मला आत्मसात करता येईल का ? शेवटी या देशात महात्मा गांधीनी कोट काढून टाकला आणि पंचा नेसला तेव्हाच या गरीब माणसांना बापू आपला वाटला. मला या माणसांच्या जगाचा भाग होऊन यांच्याशी बोलावे लागेल ना ?
गाडगेबाबांचा फोटो जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा मला हे सारे आठवते. मला माझीच लाज वाटते. मी एक कोटीच्या परिघात विचारवंत व्हायला निघालोय. मला फक्त बोलक्या वर्गाला प्रभावित करायचे आहे पण ज्या वर्गासाठी मी लिहितो बोलतो त्या वर्गाशी मात्र मला संवाद करता येत नाही किंवा ती मला गरज ही वाट्त नाही. गाडगेबाबा मला हादरवून टाकतात. मला माझ्या बनचुक्या संकुचित जगातून ओढून बाहेर यायला सांगतात. पण मी पुन्हा त्याचीही पोस्ट तयार करतो आणि त्यांना स्मृतिदिनानिमित्त वंदन करून माझी सुटका करून घेतो आणि जुनेच उद्योग सुरु ठेवतो ..किमान नव्या वर्षात थोडे बदलावे हे ठरवतो आहे
हेरंब कुलकर्णी सर यांचा लेख खरी वस्तुस्थिती मांडणारा आहे.या लेखातील त्यांचे विश्लेषण अप्रतिम आहे