-ॲड. किशोर देशपांडे
आजच्या दैनिक ‘हिंदुस्थान’ मध्ये एक बातमी वाचली. हिंदू जनजागृती समितीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन येत्या १४ तारखेला पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे. १४ तारखेला व्हॅलेन्टाईन डे असून त्यादिवशी महाविद्यालये, उद्याने याठिकाणी तरुणींची छेडखानी होण्याची शक्यता असल्याने व अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांची गस्त वाढवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची आवश्यकता असल्यामुळे दामिनी पथक व अन्य पथकांना देखील सतर्क करावे अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण होऊन शंभर वर्षे झाली आहेत. आणीबाणीमध्ये तुरुंगवासाच्या काळात माझी अनेक संघ स्वयंसेवकांशी चर्चा होत असे. संघाचे त्यावेळचे मुख्य प्रवक्ते व दैनिक तरुण भारतचे संपादक स्व. मा. गो. वैद्य यांच्यासोबत विशेष चर्चा व्हायची. संघ स्थापनेचा मूळ उद्देश जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. त्यामुळे तुरुंगवासाच्या आधी व नंतरही मी अनेक संघ कार्यकर्त्यांसोबत विचार-विनिमय करत असे. त्या सर्वांच्या बोलण्यातून व त्यापैकी काहींचे लेख वाचून मला असे समजले की राष्ट्र निर्माणासाठी चारित्र्यवान व्यक्ती तयार करणे हे संघाचे मूळ उद्दिष्ट्य आहे. म्हणूनच संघ स्वयंसेवकांनी दररोज शाखेत जाणे संघाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते.
परंतु शंभर वर्षांच्या अथक प्रयत्नानंतरही जर हिंदू जनजागृती समितीला पोलिसांकडे गाऱ्हाणे मांडण्याची वेळ आली असेल तर चारित्र्यनिर्मितीच्या प्रयत्नामध्ये संघ कमी पडला असे मानायला हरकत नसावी. संघाचे चारित्र्यवान कार्यकर्ते पोलिसांची मदत न घेता संभाव्य गैरप्रकार १४ तारखेला रोखू शकत नाहीत असे दिसते. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये संघ पोहोचला आहे असे सांगण्यात येते. संघ हिंदूंचे संघटन करतो. देशात व अमरावतीत हिंदू बहुसंख्य आहेत. परंतु वारंवार त्यांना गाईंच्या व स्त्रियांच्या रक्षणासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते. संघाचे जे स्वयंसेवक राजकारणात आले, त्यांच्या चारित्र्याची काही सन्मान्य अपवाद वगळता समाजावर विशेष छाप पडलेली नाही. राजकारणात न जाता समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांची देखील यादी फार मोठी नसणार. जे स्वयंसेवक कौटुंबिक जीवन जगत आले, ते सर्वच धुतल्या तांदुळासारखे चारित्र्यवान आयुष्य जगले असतील असेही सांगता येत नाही.
कॉंग्रेस ची स्थापना १८८५ साली झाली. त्यांचे उद्दिष्ट्य राज्यकारभारात भारतीयांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे आणि ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करणे, असे होते. ते उद्दिष्ट्य १९४७ साली पूर्ण झाले. तेव्हा म. गांधींनी कॉंग्रेस विसर्जित करावी असा सल्ला दिला होता. परंतु तो सल्ला कॉंग्रेसने मानला नाही. असे असले तरी स्थापनेच्या वेळी असलेले उद्दिष्ट्य कॉंग्रेसने ६२ वर्षात पूर्ण केले. त्या कामात एक संघटना म्हणून संघाचे सहकार्य काहीच नव्हते.
संघाचा जो विस्तार झाला तो चारित्र्यनिर्मितीच्या कार्यामुळे नव्हे तर मुस्लीम समुदायाची भीती हिंदूंच्या मनात सतत वाढवत नेण्यामुळे झाला. संघ विचारांचे सरकार मागील ११ वर्षांपासून निरंकुश सत्तेवर असूनही “ हिंदू संकटात आहेत ” अशी आरोळी संघ स्वयंसेवक देत असतात, तेव्हा संघ विचारांचे सरकार दुर्बल आहे की काय अशी शंका येते. बरे, सरकार सक्षम आणि सशक्त आहे म्हटले तर हिंदू संकटात कसे राहतील ? आणि चारित्र्यवान लक्षावधी स्वयंसेवक हिंदूंचे संरक्षण आरोळी न ठोकता करू शकत नाहीत काय ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दीनिमित्त या मुद्द्यांवर देखील आत्मचिंतन करावे, ही नम्र विनंती.
(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)
9881574954








