-ॲड. किशोर देशपांडे
नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत दोघेही भारतीय संस्कृतीच्या संस्कारांमध्येच वाढले आणि जगले आहेत.
भारतीय संस्कृतीने प्राचीन काळापासून सरासरी मानवी आयुष्य शंभर वर्षांचे मानून त्याचे चार टप्पे प्रमाण मानले आहेत. पहिला ब्रह्मचर्य- ० ते २५ वर्षे; दुसरा गृहस्थाश्रम- २५ ते ५० वर्षे; तिसरा वानप्रस्थाश्रम- ५० ते ७५ वर्षे आणि चौथा संन्यासाश्रम- ७५ ते १०० वर्षे.
मोदी आणि भागवत दोघांनीही वयाच्या २५ वर्षानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश न करता सरळ वानप्रस्थाश्रम स्वीकारला. म्हणजे स्वतःचा संसार उभा न करता त्यांनी देशासाठी, धर्मासाठी व समाजासाठी फिरस्तीवर राहून कार्य केले. परंतु धर्माने अत्यंत महत्वाचा मानलेला चौथा आश्रम आहे. संपूर्ण विश्व ही एक केवळ माया असून मानवाचे खरे ध्येय मोक्षप्राप्ती हेच असावे, अशी धर्माची शिकवण आहे. वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली की सर्व प्रापंचिकच नव्हे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक इत्यादी व्यापक कार्यातून देखील मानवाने अंग काढून घ्यावे आणि केवळ मोक्षप्राप्तीसाठी संन्यस्त जीवन जगावे, अशी आपल्या महान संस्कृतीची अपेक्षा आहे.
मोदी आणि भागवत या दोघांनाही तुमच्या-आमच्यापेक्षा संस्कृतीच्या या विलक्षण व महानतम तत्वांची जाण आहे. मोदींनी तर २०१३-१४ सालीच ही जाण बाळगून मोठ्या प्रेमाने पक्षातील वरिष्ठांना निवृत्त होण्याची विनंती केली होती. भागवतांनी अगदी अलीकडे पुन्हा एकदा सर्व समाजाला या तत्वाची आठवण करून दिली.
मोदी विश्वगुरु आहेत. बोलतो तसा वागतो हे गुरुचे मुख्य लक्षण असते. मला अशी खात्री आहे की पुढील एक दोन महिन्यात हे दोन्ही महापुरुष पंच्याहत्तरीचा टप्पा ओलांडताना निश्चितच संन्यासाश्रमात प्रवेश करतील आणि पुढील २५ वर्षे फक्त मोक्षप्राप्तीची साधना करतील. तसे करून ते अमेरिका, चीन, रशिया या महासत्तांच्या प्रमुखांना देखील लज्जित करतील व आपले अनुसरण करण्यास भाग पाडतील. त्यामुळे भारत हा विश्वगुरु असल्याचा आपला दावा सिद्ध होईल.
भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधीही एका व्यक्तीवर अवलंबून नव्हते व आताही नाहीत. नेतृत्वाची दुसरी व तिसरीही पिढी तयार ठेवण्याची त्यांची परंपरा आहे. त्यामुळे मोदी आणि भागवत यांच्या निवृत्तीनंतर भाजपचे व संघाचे कोणतेही नुकसान होणार नसून त्यांनी या दोन्ही नेत्यांना अत्यंत सन्मानपूर्वक प्रेमादराने निरोप देण्यास हरकत नसावी.
(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)
9881574954








