– अॅड.किशोर देशपांडे
अध्याय पहिला
प्राचीन काळी जंबुद्वीपात समुद्र आणि पर्वताने वेढलेला भरतखंड धनधान्याने समृद्ध होता. त्यात माणसांपेक्षा देवांची संख्या बरीच जास्त होती. पर्वतावरून उतरून समुद्राकडे धाव घेणाऱ्या नद्यांमुळे जमीन सुपीक होती. सूर्यदेव, अग्निदेव, वायूदेव इ. देवता आपापला धर्म पाळून माणसांचे जीवन सुखी करण्यासाठी सहाय्य करायचे. भरतखंडात शेकडो राज्ये आणि नगरे होती. पण बहुसंख्य प्रजाजन हे सर्वत्र पसरलेल्या हजारो ग्रामांमध्ये राहून मुख्यतः शेती व पूरक कामं करायचे. प्रत्येक राज्याचा राजा हा ‘भूपती’ म्हणजे राज्यातील सर्व जमिनीचा, वनांचा, नद्यांचा मालक असायचा. तसेच तो ‘नृपती’ म्हणजे राज्यातील सर्व प्रजेचाही एक प्रकारे मालकच असायचा. राजा, त्याचे मंत्री, सल्लागार, उपदेशक, सरदार, सेनानायक, धनिक, वणिक, कुशल कारागीर व कलाकार नगरांमध्ये राहायचे. या सर्वांच्या सेवेसाठी अनेकानेक सेवक देखील नगरांमध्येच राहायचे. शेतीच्या, वनांच्या, गोधनांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा राज्याच्या तिजोरीत लोकांना जमा करावा लागत असे. राजा त्याच्या मर्जीनुसार गावेच्या गावे खास विश्वासातील लोकांना महसुलाचे उत्पन्न घेण्यासाठी बहाल करत असे.
राजाचे सल्लागार व उपदेशक असलेल्या विप्रांनी सखोल विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी धर्माचे नियम आखून दिले होते. कोणी काय खावे, कुठे राहावे, कोणती वस्त्रे नेसावी, समाजातील कोणत्या पायरीवर वावरावे, पित्याने पुत्राशी, पुत्राने पित्याशी, पत्नीने पतीशी कसे वागावे हे सर्व काही धर्माने ठरवून दिले. त्यामुळे ग्रामांमधील गावगाड्याचे सर्व सामाजिक व्यवहार शतकानुशतके सुरळीतपणे चालू राहिले. सर्व प्रजाजनांनी हे धार्मिक नियम आत्मसात केले व त्यामुळे बाहेरून कोणाला शासन करण्याची गरज कमी पडायची. सर्व देवी देवतांची जशी कृपा होती तसाच धाकही होताच. सरस्वती, लक्ष्मी आणि काली या देवींची चेतना समाजजीवनात प्रवाहित असायची. म्हसोबा हा देव ग्रामाच्या वेशीबाहेर राहून ग्रामाचे, शेतीचे, गावगाड्याच्या संस्कृतीचे रक्षण करायचा. सटवाई देवी प्रत्येक तान्ह्या बाळाच्या कपाळावर जन्माच्या सातव्या दिवशी त्याचे भाग्य लिहायची.
कालांतराने सरस्वतीच्या उपासनेत जडपणा आला. नवीन ज्ञान, नवी विद्या शिकण्याची ओढ संपत गेली. लोक जुन्याच ज्ञानाला न तपासता व नवनवीन विद्यांचा शोध न लावता पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा पाळण्यात, देवतांच्या उपासनेचे फक्त उपचार पाळण्यात दंग झाले. परिणामी सरस्वती देवी नाराज होऊन भरतखंडातून नदीसह लुप्त झाली. लक्ष्मी मूठभर समूहांवर प्रसन्न राहिली. कालीने मात्र संहार कार्य वाढवले. अधूनमधून दुर्गेच्या रूपात वीरांचे पराक्रम झळकत होते. सत्ता, संपत्ती, स्त्रियांसाठी कलह, आपसात लढायांचे प्रमाण वाढू लागले आणि परकीय आक्रमकांचे फावले.
****************************************************
म्हसोबा पुराण – अध्याय दुसरा
म्हसोबा आणि सटवाई दोघेही शतकानुशतके आपापले काम चोख करत होते. वरचे राजे बदलत राहिले, कधी देशी कधी विदेशी, पण गावगाडा तसाच राहिला या दोघांच्या कृपेने.
म्हसोबा ज्याची रखवाली करत असे आणि सटवाई ज्यातील बालकांचे भाग्य त्यांचे कपाळी लिहून ठेवीत असे, त्या भरतखंडातील गावगाड्याचे काही कठोर नियम होते. ते त्यांच्या धर्माचेच नियम होते, म्हणून नियमांना देखील धर्मच म्हणायचे.
पहिला नियम :- पर्वतांवरून खाली वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे सर्व ज्ञान हे पूर्वजांकडून वंशजांकडे प्रवाहित होत असते. पूर्वजांनी मिळविलेल्या ज्ञानाचे अनुसरण करत राहणे हा पुढील पिढ्यांचा धर्म होय.
दुसरा नियम :- बापाचाच व्यवसाय मुलाने पुढे चालवावा.
या नियमामुळे अनेक ज्ञाती निर्माण झाल्या. पाठांतराची आवड व क्षमता ज्या समूहांमध्ये होती त्यांना ‘विप्र’ म्हणायचे. शौर्य गाजवणारे, हत्यारांनी राज्याचे व प्रजेचे संरक्षण करू शकणारे आणि वेळप्रसंगी दुसर्याचा मुलुख सुद्धा आपल्या राज्यात युद्धातून सामील करून घेणारे जे समूह होते त्यांची ‘राजन्य’ नावाची ज्ञाती निर्माण झाली. जे व्यवहार चतुर होते, गणिताची आकडेवारी करू शकायचे, इकडच्या वस्तूंची तिकडे व तिकडच्या वस्तूंची इकडे विक्री करायचे, त्याची ‘वणिक’ ज्ञाती तयार झाली. विप्र, राजन्य व वणिक यांची संख्या भरतखंडातील एकंदर लोकसंख्येमध्ये तशी फार कमीच होती. परंतु त्या तिन्ही ज्ञाती शक्तिशाली असल्यामुळे अन्य सर्व साधारण प्रजाजन त्यांच्या नियंत्रणात असायचे. अशा सर्व प्रजाजनांना विप्रांनी “इतरेजन” असे नाव दिले. कालमानाने व्यवसायानुरूप इतरेजनांच्या देखील अनेक ज्ञाती निर्माण झाल्या.
विप्र, राजन्य आणि वणिक ज्ञातींचे लोक मुख्यतः नगरांमध्ये राहायचे. धर्म म्हणजे काय ? मृत्युनंतर जीवाचे काय होते ? इ. गहन विषयांवर विचार विमर्श करण्यात, धर्म निर्णय देण्यात आणि राजन्य व वणिकांना सल्ला देण्यात विप्रांचा सर्व वेळ व्यतीत होत असे. राजन्य हे व्यायाम, शिकार, नृत्य गायनादि मनोरंजन, जुगार खेळणे व शत्रूंशी आणि आपल्याच राज्यातील प्रतिस्पर्ध्यांशी युद्ध करण्यात गुंतले असायचे. इतरेजनांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या विनिमयात वणिकांचा वेळ जायचा. त्यामुळे उत्पादनाचे मुख्य काम हे इतरेजनांनाच करावे लागे.
शिवाय जे प्रजाजन भद्र लोकांच्या दृष्टीने गलिच्छ असलेली कामे करायचे, त्यांच्या वंशजांना सुद्धा तीच कामे पिढ्यान्पिढ्या करीत राहणे भाग पडले आणि ह्या जाती घाणेरड्या असतात असे मानून त्यांना गावकुसाच्या बाहेर, पण गावगाड्याचा भाग म्हणूनच, गावाच्या मेहरेबानीवर जगावे लागायचे.
तिसरा नियम :- स्त्रियांनी कोणताही व्यवसाय न करता मुलांची देखभाल करत घर सांभाळावे.
पतीची व सासरच्या मंडळींची सेवा करावी. गरिबीमुळे, आर्थिक चणचणीमुळे काही स्त्रियांना वेळ प्रसंगी मोल मजुरीसाठी बाहेर पडणे भाग असले तरी त्यांची मुख्य जबाबदारी ही अपत्यांना जन्म देणे , त्यांचे संगोपन करणे, स्वयंपाक करणे , पाणी भरणे व अन्य सर्व घरकाम करणे ही असायची.
चौथा नियम:- कुटुंबातील लहानांनी मोठ्यांचे नेहमी ऐकावे. बापाची व अन्य वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी. प्रश्न विचारू नये.
कुटुंबासाठी काय भले, काय वाईट याचा अंतिम निर्णय फक्त कुटुंब प्रमुख घेईल, तो सर्वांनी मान्य करावा.
विप्रांनी या सर्व नियमांना धर्माचे रूप दिले व हे चार धर्म ‘चतुःधर्म’ म्हणून प्रसिद्ध पावले. अडाणी लोक त्याचा उच्चार ‘चतुरधर्म’ असा करायचे.
***********************************************
म्हसोबा पुराण – अध्याय तिसरा
म्हसोबा आणि सटवाई यांच्यासारख्या देव-देवता सुद्धा धर्माच्या नियमांनी बांधलेल्याच होत्या. ह्या नियमांचे पालन शतकानुशतके होत गेल्यामुळे भरतखंडातला गावगाडा स्थिर राहिला. त्यामध्ये आक्रमक यवनांनी, म्लेन्च्छांनी फारशी ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे गावखेड्यातली व शहरातली वजनदार मंडळी समाधानी होती.
बहु काळाने एक गोरा राजा साता समुद्रापार देशातून आला. तो लक्ष्मी आणि सरस्वतीचा उपासक होता. त्याला फक्त भरतखंडातून लक्ष्मीला आपल्या मुलखात न्यायचे होते. पण डोक्यावर बसून आलेल्या सरस्वतीचा अवमान तो करू धजेना. सरस्वती म्हणजे ज्ञान-विज्ञान, शास्त्रार्थ, तर्क, संवाद, वादविमर्श, साहित्य- गद्य आणि पद्य, कला- नृत्य, संगीत, नाटक,चित्रपट, चित्रकारी हे सगळं! सरस्वती नेते अंधारातून उजेडाकडे, गुलामीतून स्वातंत्र्याकडे.
गोऱ्या राजाने अवघा भरतखंड पादाक्रांत केला आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन त्याचे देशात जाऊ लागली. पण परतलेल्या सरस्वतीने भरतखंडावर पुन्हा कृपा वर्षाव सुरु केला. हळुहळू ज्ञानविज्ञानाची जिज्ञासा वाढू लागली. असे घडले की गुलामगिरीचा अंतकाळ जवळ येतो. तसेच झाले. भरतखंड स्वतंत्र झाला. गोरा राजा निघून गेला.
भरतखंडाचा पहिला राजा होता जवाहिर, लक्ष्मीचा पुत्र पण सरस्वतीचा उपासक! त्याला साथ मिळाली दुसर्या निःसीम उपासकाची, भीमरायाची. त्यांनी मिळून नवीन नियम तयार केले. प्रजेच्या शिक्षणासाठी तिजोरी खुली केली. खेडोपाडी मोफत शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा सुरू केल्या. गावातले गरीब, श्रीमंत, वरचे, खालचे सगळे मुलं-मुली त्यात एकत्र शिकू लागले. सर्वांना आपापल्या आवडीनुसार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले. जवाहिर राजाने उच्च विद्येसाठी मोठमोठी संस्थाने सरकारी तिजोरीतून उभी केली. गावोगाव आरोग्यकेंद्र काढले, वीज पोचवली, लोकांना तर्कसंगत विचार करायला प्रोत्साहन दिले, विज्ञानाची आवड वाढवली. जो प्रत्यक्ष शेती करतो, त्यालाच जमिनीची मालकी सुद्धा देऊन टाकली. बापाच्या संपत्तीत मुलींनाही वारसा हक्क दिला. अस्पृश्यतेसारख्या वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या.
जवाहिराची मुलगी प्रियदर्शिनी राणी ही सरस्वतीपेक्षा कालीची अधिक भक्ती करायची. तिच्या काळात निर्मितीपेक्षा तोडफोड जास्त झाली. तिने पराक्रम गाजवून स्वतःच्या पित्याचे दल फोडले आणि शेजारी देशाचेही दोन तुकडे केले. मात्र भरतखंडाला अधिक तुकडे होण्यापासून वाचवलं. भांडणाऱ्या दोन महाबोक्यांपासून जगाला वाचवण्यासाठी तिने शंभरावर देशांना एक करून त्यांचे पुढारपण केले. परंतु माझ्याशिवाय अन्य कोणी राज्य करण्यास लायक नाही असा अहंकारही प्रियदर्शिनी राणी मध्ये वाढत गेला. गावगाड्याची जुनी व्यवस्था डगमगू लागल्यामुळे प्रजाजनांमध्ये असंतोष वाढत गेला. लक्ष्मीचा प्रवाह देखील आटत गेला.
नंतर आली राव-सिंह ही जोडी. ते सरस्वतीप्रमाणेच लक्ष्मीचेही भक्त होते. त्यांनी लक्ष्मीला पुन्हा प्रसन्न करून घेतले. भरतखंड समृद्धीच्या वाटेने चालू लागला.
पण दुसरीकडे शहरे वाढत होती. शहरांमध्ये नवेनवे उद्योगधंदे सुरु झाले, कारखाने आले. गावगाड्यात ज्यांच्या जवळ जमिनी नव्हत्या, ज्यांचे व्यवसाय बसत चालले होते असे सगळे प्रजानन शहरांकडे धाव घेऊ लागले. ज्यांची नाळ गावाशी जुळली होती, ते नवीन ज्ञानाचा प्रकाश गावातही वाटू लागले आणि गावगाड्याला हादरे बसू लागले. जवाहिर राजाच्या धोरणामुळे आणि भीमरायाच्या उपदेशामुळे ते हादरे वाढत गेले. स्त्रियांची घराबाहेरचे जग पाहण्याची व कर्तृत्व सिद्ध करण्याची इच्छा वाढत गेली. मुले बापाच्या आज्ञेला तपासू लागले आणि प्रसंगी बंड करू लागले. शहरांमध्ये नवनवीन उद्योग निर्माण होऊन सर्व जाती-पातीच्या लोकांना एकत्र काम करणे भाग पडले.
ज्यांना हे बदल आवडले नाहीत, ज्यांचे या बदलांमुळे समाजातील महत्व कमी होत गेले, गावांवरची, शेतीवरची मालकी गेली, जुन्या पूर्वजांचे ज्ञान हेच खरे ज्ञान होय अशी ज्यांची श्रद्धा होती, ते सर्व लोक अतिशय अस्वस्थ झाले. मग काही विप्रांनी म्हसोबाला साकडे घातले. म्हसोबा प्रसन्न व्हावा म्हणून त्यांनी वर्षानुवर्षे मैदानात लाठ्याकाठ्या हवेत फिरवत रोज एक तास तप केले होते. तो आता प्रसन्न झाला आणि मागाल तो वर देतो म्हणाला. तपस्वीजन म्हणाले, “म्हसोबा आम्ही अस्वस्थ आहोत. आमची समाजातली प्रतिष्ठा घसरली आहे. आमचीच मुले बाळे, बायका आमच्या आज्ञा पाळत नाहीत. आम्ही ज्यांना नीच मानत आलो अश्या लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसणे भाग पडते. हे सगळं जवाहिर राजा, भीमराया, पश्चिमेचे वारे आणि परधर्मीयांमुळे घडत आहे. तू गावगाड्याचे नियम पुन्हा लागू करून दे.”
म्हसोबाने बरेच चिंतन केले. तो म्हणाला, “वत्सांनो, मला अवतार घेता येत नाही. पण ज्याने आईच्या गर्भातून जन्म घेतला नसेल असा एखादा माणूस मी शोधतो. त्या माणसाला मी काही जादूची विद्या शिकवीन. त्याच्यासोबत एक जंबूरा देईन, कवायतीची फौज तुम्ही द्या. त्या पुंगीवाल्या जादूगाराला कसंही करून तुम्ही आपला राजा बनवा. मग तो पुंगी वाजवून जंबुऱ्याच्या मदतीने गावगाडा पुन्हा रुळावर आणेल. फक्त तुम्ही तुमचे तप चालूच ठेवा. मी एक मंत्र सांगतो, त्याचा अखंड जप करत रहा. ‘परधर्मीय भयावहः’ या मंत्राचा संपूर्ण भरतखंडात प्रसार प्रचार करा. त्या मंत्रात मी जादुई शक्ती भरतो.”
सटवाई म्हणाली, “म्हसोबा, मी पण तुझ्या पाठीवर येते. माझे भाग्य लेख आजकाल फळत नाहीत, पण मला सोंगं चांगली घेता येतात. जादुगाराने पुंगी वाजवली की मी कधी लक्ष्मीचे, कधी कालीचे तर कधी सरस्वतीचे सोंग सुद्धा घेऊ शकते.”
तपस्वी विप्रांचे समाधान झाले, ते कामी लागले. ते गेल्यावर सटवाई बोलली, “म्हसोबा, मला थोडं थोडं भविष्य समजते. काळ पुढे चालला आहे. हे चक्र उलटे फिरविणे प्रत्यक्ष महाकालाला तरी शक्य आहे का ?” म्हसोबा खिन्न होता. बोलला, “खरं आहे. आपण एक आभासी दुनिया निर्माण करत आहोत. पण आभासाची एक मर्यादा असते. मी सुद्धा धर्माला बांधलेला आहे. ज्याने तप केले त्याला वर देणे हा माझा धर्म आहे. साक्षात ब्रम्हदेवाने आणि महादेवाने सुद्धा तपस्वी असुरांनाही वर दिले होते.”
*********************************************
म्हसोबा पुराण – अध्याय
चौथा
म्हसोबा सुद्धा कामी लागला. खूप शोध घेतल्यावर त्याला भरतखंडाच्या पश्चिम भागात अमृततुल्य पेय वाटणारा एक मुलगा आढळला, जो आईच्या गर्भातून जन्मला नव्हता. म्हसोबाने त्या मुलाला वश केले, त्याला अनेक जादूच्या विद्या शिकवल्या, आणि तपस्वी विप्रांकडे त्याला सोपविले. तपस्वी विप्रांनी त्या मुलाचे कोड कौतुक केले. ‘परधर्मीय भयावहः’ या मंत्राचा जागर करत त्यांनी भरतखंडात सर्वत्र रथयात्रा काढल्या. तो जणू अश्वमेध यज्ञच होता. मंत्र हळू हळू प्रभावी होत गेला आणि जादुगार भरत खंडाचा राजा झाला.
सटवाईने सोंग घेतले सरस्वतीचे. जादुगार राजाने प्रजेला सांगितले, आपल्या पूर्वजांना आजचे सर्व विज्ञान प्राचीन काळीच ठाऊक होते. आपले पूर्वज प्लास्टिक सर्जरी करून माणसाच्या धडावर हत्तीचे शीर बसवायचे. कोणतेही इंधन नसताना केवळ मंत्रबळाने विमान उडवायचे. जगात अशी कोणतीही विद्या नाही जी आपल्या पूर्वजांना ठाऊक नसेल. तपस्वी विप्र सुद्धा प्रजाजनांना सांगू लागले की आमच्या पूर्वजांचे सर्व ज्ञान म्लेंच्छांनी पळवून नेले आणि मग त्यांच्या देशातून ते ज्ञान गोऱ्यांच्या देशात गेले. आता ते जुनेच ज्ञान गोरे त्यांच्या भाषेत प्रगट करत आहेत. या सर्व माहितीमुळे प्रजाजन काहीसे भारावून गेले.
नंतर सटवाईने लक्ष्मीचे सोंग घेतले की जादुगार जमलेल्या प्रजेला सांगायचा, “सर्व प्रजाजनांनो बँकेत खाते काढा. तुमच्या खात्यात लाखो रुपये जमा होतील”. भरतखंडातले सर्व गोरगरीब, इतरेजन, ज्यांनी पूर्वी कधी बँकेचे तोंड पाहिले नव्हते असे सुद्धा, भराभर बँकेकडे धाऊ लागले. बँक म्हणायची खाते उघडायला थोडे पैसे जमा करा. खूप पैसे येतील म्हणून गोरगरीब प्रजाजन जवळ असलेले पैसे बँकेत भरून खाते उघडू लागले. बँकांजवळ कोटी कोटी रुपये जमा झाले. ते त्यांनी मोठ-मोठ्या वणिकांना कर्जाऊ दिले. काही वणिक बँकांचे कर्ज बुडवून परदेशी पळून गेले. काहींनी त्या कर्जातून मोठमोठे रस्ते बांधले, खाणी खोदल्या, विमानतळ बांधले, विकासच विकास केला. भरतखंडातले रस्ते, नगरं चकाकू लागले. त्याने प्रजाजन दिपून गेले, जादुगाराने प्रजेच्या खात्यात पैसे जमा करण्याचे दिलेले आश्वासन विसरून गेले.
जादुगाराची एक जादू अशी होती की तो एक मोठे दोरखंड आकाशात फेकत असे, एक टोक आपल्या हातात ठेवून. म्हणून त्याला काही प्रजाजन ‘फेकू राजा’ असेही म्हणायचे. त्याचा डमरू ऐकून ही जादू पाहायला खूप बघ्यांची गर्दी जमायची. दोर सरळ, ताठ आकाशात चढल्यावर त्याचे दुसरे टोक दिसेनासे होत असे. जादुगार पुंगी वाजवायचा आणि जम्बुरा दोरावरून सर सर आकाशात जायचा व दिसेनासा व्हायचा. पुंगीने संमोहित झालेले प्रजाजन आ वासून आकाशाकडे पाहत राहायचे आणि दरम्यान जादुगाराचे माणसं बघ्यांचे खिसे रिकामे करायचे.
सटवाईने मध्येच कालीचे सोंग घेतले की जादुगार अदृश्य शत्रूसोबत लढाई सुरु करायचा. तपस्वी विप्र सुद्धा लाठ्या काठ्यांची पूजा करायचे. जादुगाराचा जयघोष व्हायचा. अदृश्य शत्रू मरत राहिला आणि पुन्हा जिवंत होत राहिला, पुन्हा मरत राहिला. जादुगाराचा हा पराक्रम बघून प्रजाजन भारावून गेले.
कधी लक्ष्मीचा खणखणाट, कधी कालीचा खडखडाट, तर कधी सरस्वतीचा सुस्वर प्रजेला ऐकू येऊ लागला. पण सगळीच आभासी जादू! ती कधी तरी उतरणारच. तपस्वी विप्र चाणाक्ष होते. दशकभरानंतर त्यांच्या ध्यानी आले की अशा जादुई प्रयोगांनी कालचक्र मागे फिरणे शक्य नाही. ते पुन्हा म्हसोबाकडे गेले आणि म्हणाले, “म्हसोबा, तू हा जो कोणी जादुगार आम्हाला दिलास, त्याचा प्रभाव फार काळ टिकेल असे दिसत नाही. गावगाडा पुन्हा सुरळीत होण्यासाठी तू आणखी काही कर. ” म्हसोबा विषण्ण झाला. तो म्हणाला, “विप्रांनो, तुम्ही बुद्धिमान आहात. कालचक्र हे नेहमी पुढेच जात असते. ते मागे फिरल्याचा केवळ आभास काही काळ निर्माण करता येतो. पण अल्पकाळच. तुमच्या बुद्धीला शहाणपणाची जोड द्या आणि नवे विचार, नवीन विज्ञान मनापासून समजून घ्या. परधर्मीय इथे नवीन नाहीत. त्यामुळे तेही प्रजाजनच आहेत हे स्वीकारा. तुमच्या मुलाबाळांना भरतखंडाच्या बाहेर असलेले जगदेखील परके वाटत नाही. आणि त्यांच्या आकांक्षा कालोचित आहेत. तेव्हा लेकरांची बाजूही समजून घ्या. स्त्रियांना स्वातंत्र्य द्या. उच्च नीचता मनातही बाळगू नका. जुन्या नियमांचा त्याग करा. जवाहिराने आणि भीमरायाने निर्माण केलेल्या नवीन युगातील नियमांचा मनापासून स्वीकार करा. तसे आचरण करा. मग तुम्हाला असल्या जादुगाराची अथवा जम्बुऱ्याची गरज पडणार नाही. अर्थात मी सांगतो तसे तुम्ही न वागले, तुम्हास न पटले, तरी तुमची लेकरे-बाळे, तुमच्या स्त्रिया-मुली, इतरेजन हे सगळे नाविन्याचा स्वीकार करणार आहेतच. तेव्हा कुढत बसण्यापेक्षा आनंदाने त्यांच्या उत्साहात सामील व्हा.”
इतके बोलून म्हसोबा कायमचा अंतर्धान पावला.
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ व छात्र संघर्ष युवा वाहिनीचे माजी राज्य संयोजक आहेत )
9881574954







