-ॲड. किशोर देशपांडे
बटन दाबले की दिवा प्रकाशित होतो. ते बटन आणि बल्ब एकमेकांना वायरने जोडले असतात. ती वायर आपण पाहू शकतो. पण बसल्या जागी रिमोटचे बटन दाबले की १०-१५ फुट अंतरावर असलेला टीव्ही चा स्क्रीन उजळतो; त्यात काही दृश्ये दिसू लागतात व त्यातून अनेक आवाजही ऐकू येतात. रिमोट आणि टीव्ही यांना जोडणारी कोणतीही वायर नसते. पूर्वी सर्व टेलिफोन केबलने जोडलेले असायचे. आता मात्र युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान,अरब देश इत्यादी हजारो मैल दूर असलेल्या मुला-मुलींना भारतातले आई-बाप स्मार्टफोनचा वापर करून वाटेल तेव्हा व्हिडीओ कॉल करून बघू शकतात व संवादही करू शकतात. आपल्या हातातील मोबाईल व त्यांच्या हातातील मोबाईल एकमेकांशी वायरने अथवा केबलने जोडलेले नसतात. हे सगळे कसे घडते ते आपल्याला समजत नसते. परंतु या चमत्कारिक गोष्टींचे आश्चर्य मात्र आपल्याला वाटत नाही. कारण त्यामागे काही विज्ञान आहे हे आपल्याला माहित असते.
ज्यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या बल्ब, मोटर पंप, वाहने, टीव्ही, स्मार्टफोन इत्यादी अनेकानेक वस्तूंचा आपण दररोज उपयोग करतो, त्या वैज्ञानिकांमध्ये काही अद्भुत दैवी शक्ती आहे असे आपण मानत नाही. एकतर हे वैज्ञानिक संशोधन आहे याची आपल्याला अंधुक जाणीव असते. दुसरे, ते वैज्ञानिक कुठे असतात याची आपल्याला कल्पना असते. तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे स्वतः जवळ काही चमत्कारिक दैवी शक्ती असल्याचा दावा ते वैज्ञानिक करत नसतात.
परंतु आपल्याजवळ काही चमत्कारिक दैवी शक्ती आहे, शरण येणाऱ्यांना आपण त्या शक्तीचा लाभ मिळवून देऊ शकतो, विरोध करणाऱ्यांना ताप देऊ शकतो, असा दावा करणाऱ्या बाबा, महाराज, संत अथवा योगी व्यक्तींच्या दरबारात ( शक्य असले तर) आपण सामान्यजन लोभाने अथवा भयाने जाऊ शकतो. कारण त्यांच्याजवळ असलेली शक्ती विज्ञानापलीकडची आहे व जे विज्ञानाला जमले नाही असे दैवी चमत्कार ते करू शकतात, अशी आपली श्रद्धा असते.
‘साधना’ आणि ‘सिद्धी’ हे शब्द सहसा आध्यात्मिक साधनेच्या संदर्भात वापरले जातात. परंतु कोणतेही काम शिकण्यासाठी सुरुवातीला जाणीवपूर्वक व एकाग्रतेने प्रयत्न करावे लागतात. ते सगळे प्रयत्न म्हणजे साधनाच असते. एकदा एखाद्या कामात आपण कुशल झालो की त्याची सवय होते आणि मग ते काम आपल्या हातून पुष्कळसे यांत्रिक पद्धतीने होत राहते. म्हणजे आपण त्या कामापुरते सिद्ध होतो. त्यामुळे सगळेच मानव आपापल्या परीने साधनाही करतात आणि सिद्धही होतात.
लोभ, क्रोध, मोह, भय, आक्रमक वृत्ती, इर्षा इत्यादी गुण मानवांच्या प्रकृतीत जन्मतः असतातच. त्याचप्रमाणे सहानुभूती, वात्सल्य, दया, परोपकार, त्याग इत्यादी गुणही सर्वांमध्ये असतात. फक्त या सर्व गुणांचे मिश्रण मात्र व्यक्तीगणिक वेगवेगळे असते. जे गुण स्वतःचे व इतरांचे नुकसान करतात, त्यांना आपण अवगुण म्हणतो आणि ज्या गुणांमुळे आपला व इतरांचा विकास होतो त्यांना आपण सद्गुण म्हणतो. एखाद्या बाबतीत आपण काही कौशल्य किंवा सिद्धी मिळवली म्हणजे आपल्यातील अवगुण आपोआप दूर होत नसतात किंवा सद्गुण आपोआप वाढत नसतात.
वैज्ञानिक हे बाह्य सृष्टीचे तटस्थतेने व एकाग्रतेने निरीक्षण करून सृष्टी-रचनेतील मुलभूत तत्वांचे संशोधन करतात. अशाच प्रकारचे निरीक्षण व संशोधन आपल्या जाणीवेला एकाग्र करून आपल्या आतील सृष्टीचे व बाह्य सृष्टीमधील आजवर अज्ञात अथवा गुह्य असलेल्या अ-भौतिक जगतांचे व रचनांचे करता येऊ शकते, अशी भारतीय संस्कृतीची पूर्वापार धारणा आहे. केवळ हिंदूच नव्हे तर (चार्वाक/लोकायत वगळल्यास) अन्य सर्व धर्मांची व पंथांची देखील हीच समजूत असल्याचे आढळते. सजीव देहाबाहेर चेतनेचे/जाणिवेचे अस्तित्व नसते आणि जाणीव हा केवळ देहातील व विशेषतः मेंदूतील रासायनिक खेळांचा आविष्कार आहे, असे मानणारे लोक वरील समजुतीवर व धारणेवर आक्रमकपणे तुटून पडतात. मनःशांती साठी काही ध्यानविधी करण्यास मात्र त्यांची हरकत नसते. मेडिकल सायन्सला देखील अश्या ध्यान प्रकारांची मदतच होते. आपले पूर्वग्रह आणि आग्रह यांच्यापासून आपली जाणीव मोकळी करत जाणे व मनात उगवणाऱ्या भाव-भावना, वासना, विचार तटस्थपणे न्याहाळणे इथपर्यंत ध्यानाचे महत्व टीकाकार मानतात. परंतु आपल्या देहाबाहेर काही गुह्य शक्ती अथवा चेतना असू शकतात, असे ते स्वीकारू शकत नाही. त्या टीकाकारांनी तटस्थपणे व मोकळ्या मनाने म्हणजेच संशोधक वृत्तीने आणि एकाग्रतेने खरोखर काही शोधून पहिले की नाही, याची प्रस्तुत लेखकास माहिती नाही. परंतु देहाबाहेरील चेतनांचे अस्तित्व मात्र मला वेळोवेळी जाणवत आले आहे व अजूनही जाणवते. ज्यांना असे अस्तित्व जाणवते अशा अनेक लोकांनाही मी जवळून ओळखतो.
बाह्य सृष्टीतील अथवा आपल्या आतील काही गुह्य सामर्थ्यांकडून विशिष्ट शक्ती प्राप्त करावी व त्या शक्तीचा इतरांना लाभ करून द्यावा अथवा धाक बसवावा, अशा प्रकारची साधना भारतात हजारो वर्षांपासून काही लोक करत असतात. श्रद्धावान सामान्यजन अश्या साधकांना अथवा सिद्ध व्यक्तींना गुरु, महाराज, तपस्वी अथवा योगी मानून मनोमन प्रणाम करतात व काही व्यावहारिक लाभ मिळावा म्हणून याचनाही करतात. ज्या साधकांना काही सिद्धी प्राप्त झाल्या, त्यांच्यातील अहंकार, लोभ, मद, मोह, क्रोध, इत्यादी अवगुण आपोआप नष्ट होत नसतात. त्यामुळे त्यांच्या बाह्य स्वभावात व वागणुकीत ते अवगुण आढळून येतातच. शिवाय स्वतःला अशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाली आहे, असा खोटा डांगोरा पिटणारे बाबा/बुवा एक देखावा निर्माण करून भक्तांना आकर्षित करतात. परंतु खोटी डिग्री दाखवून जनतेची फसवणूक करणारे अथवा खोटी प्रलोभने दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडणारे महाभागही सर्वच क्षेत्रांत असतात. धार्मिक/आध्यात्मिक साधना करणारे लोक स्वतःला सामान्य लोकांपेक्षा उच दर्जाचे मानून वेगळी वेशभूषा व वागणूक करत असतील, तर श्रद्धाळू जनांना त्यांच्या विषयी भययुक्त आदर वाटत राहतो.
सामान्य जनांनी सावध होणे व सर्वच धार्मिक/आध्यात्मिक गुरूंची, महाराजांची व बाबांची चिकित्सक वृत्तीने तपासणी करणे अत्यावश्यक आहे. ज्यांना खरोखर आध्यात्मिक साधना करावयाची आहे, अश्या व्यक्ती स्वतःमधील अवगुण/विकार शोधून ते विकार कमी अथवा नष्ट व्हावे यासाठी देखील प्रयत्नरत असतात. परंतु ज्यांना केवळ काही गुह्य जगतांमधून सिद्धी मिळवायची असते व त्या सिद्धीचा सदुपयोग अथवा दुरुपयोग करावयाचा असतो, अश्या साधकांचे/सिद्धांचे स्वतःमधील विकार दूर करण्याकडे फारसे लक्ष नसते. त्यामुळे एखाद्या बाबा, बुवा अथवा महाराजाजवळ काही विशिष्ट प्रकारची सिद्धी असली व तिच्या आधारे ते आपल्याला काही मार्गदर्शन करीत असले तरी त्या मार्गदर्शनात गुरूचा स्वतःचा लोभ अथवा अन्य अवगुण मिसळले आहेत की काय, याकडे श्रद्धाळूचे लक्ष असायला हवे. त्या बाबामधील लोभ, आक्रमकता, मोह अथवा भयाचे स्वतःला साधन होऊ न देणे भक्ताच्या हाती असते. पण त्यासाठी भक्तांमध्ये देखील विवेक व तर्कशक्ती वाढून लोभ, मोह, सुड भावना, इर्षा इत्यादी विकारांचे प्रमाण कमी होणे अत्यावश्यक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला त्यामुळेच महत्वही आहे.
(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)
9881574954








