Home featured मुंबईची खाद्यसंस्कृती!

मुंबईची खाद्यसंस्कृती!

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
-संजीव साबडे 
खूप प्रश्न पडतात.
पोर्तुगीज मुंबईत आले तेव्हा इथे काय खायचे? मग लक्षात येतं की त्यांनी पाव, बटाटा, टोमॅटो हे प्रकार आणले. शिवाय मुंबईतले मूळ निवासी जे होते, त्यांचेही काही पदार्थ आत्मसात केले असणार. ब्रिटिशांना भारतात पाव व बटाटा आयताच मिळाला. मुघलांचा सामोसा आवडू लागला, तंदूर पदार्थही त्यांना आवडू लागले. हे दोघे यायच्या आधी चिनीही येऊन गेले. त्यांनी इथून मसाल्याचे पदार्थ नेले आणि आपल्याला चहा, भात वगैरे दिले. मन्चुरिअनही त्यांचंच की. म्हणजे आता आपण खातो ते बटाटे, पाव टोमॅटो, चहा, सामोसा, अनेक तंदुरी पदार्थ, जिलबी, साबुदाणा आणि आपण खातो ती अनेक फळं कुठल्या ना कुठल्या देशातील लोकांकडून आली आहेत. ही फळं, भाज्या, पदार्थ मुंबई, कोलकाता, चेन्नई वा कर्नाटक व केरळच्या किनाऱ्यांवरून आपल्यापर्यंत पोहोचलं. इतरांचा किती मोठा प्रभाव आहे आपल्या खाण्यावर.

 

हा शोध घेताना खूप वेगवेगळी माहिती मिळते. आज आपण सर्रास चायनीज पदार्थ खातो. पण मुंबईत पहिलं चायनीज सु्रू झालं १९ व्या शतकात. ते सु्रू केलं एका जपानी दाम्पत्याने. ते सु्रू केलं मुंबईतला सर्वात मोठा शरीरविक्रय चालत असे अशा कामाठीपुऱ्यात. तिथं एक सफेद गल्ली होती. इथं परदेशी गोऱ्या बायका शरीरविक्री करत, म्हणून ती सफेद गल्ली. त्यांची गिऱ्हाईकं होती, परदेशी बो्टींवरचे खलाशी आणि इतर कर्मचारी व अधिकारी. ते भारतीय बायकांकडे जात नसत. तर अशा त्या परदेशी पुरुषांसाठी जपानी दाम्पत्याने ‘सेलर्स क्लब’ नावाने १८८० साली सु्रू केलेल्या रेस्टॉरंटमुळे गोऱ्या बायांचीही सोय झाली. पुढे त्याचं नाव ‘लोकजुन’ रेस्टॉरंट झालं. आता ते बंद झालंय. ती इमारतच मोडकळीस आली.

अठराव्या व एकोणीसाव्या शतकात मुंबईच्या उपनगरातून मुंबई शहरात जाणं अवघड होतं. त्यामुळे बोटींचा वापर अधिक होई. अशा वेळी आग्रा शहरापासून काही अंतरावर असलेल्या टुंडला गावातून पंचम शर्मा नावाचा माणूस भविष्याच्या शोधत निघाला. बरंच अंतर चालत तुडवलं. तो पोहोचला मुंबईच्या फोर्ट भागात. तेव्हा फोर्टच्या भिंती होत्या. त्याला फक्त पुरीभाजी चांगली करता येई. त्याने १८४० साली फोर्टच्या रस्त्यावर पुरीभाजीचा धंदा सु्रू केला. त्याचं पुढे छोटं रेस्टॉरंट सु्रू झालं. स्वस्तात पुरीभाजी. असतात त्याचा धंदा खूप फोफावला. नाव आहे पंचम पुरीवाला. ते मुंबईतील पहिलं रेस्टॉरंट असावं. आजही तिथं शाकाहारी जेवण व उत्तरं भारतीय जेवण उत्तम मिळतं.

अठराव्या व एकोणीसाव्या शतकात अनेक इराणी लोक भारतात आले. पारशी तर खूप आधी आले होते. त्यातील काही इराणी व पारशी मंडळींनी मुंबईत बन मस्का आणि चहा, ऑम्लेट, खिमा, सलीबोटी वगैरे देणारी रेस्टॉरंट आणि जोडीला बेकरी सु्रू केली. कुलाब्याचं लिओपोल्ड खूप प्रसिद्ध व महाग. परदेशी पर्यटकच तिथं अधिक दिसतात. ते सु्रू झालं १८७१ साली. त्यानंतर इतर इराण्यांनी दक्षिण मुंबईपासून दादरपर्यंत आणि अगदी थोडी उपनगरात सामान्यांना परवडणारी कयानी, मेरवान, कूलर, एक्सेलसीअर, याझदानी, मिलिटरी, आर्मी, कॉलनी, रेल्वे, बस्तानी, जिमीबॉय, सनशाईन, मॉडर्न टाइम्स, तुफान मेल वगैरे रेस्टॉरंट सु्रू केली. पारशी लोकांची पाटुक, ब्रिटानिया, ससानियन अशी रेस्टॉरंट त्याच काळात सु्रू झाली. काही इराणी रेस्टॉरंट आताही चालू आहेत आणि काही बंद पडली. जिमीबॉय अलीकडेच बंद पडलं. चर्चगेट स्टेशनपाशी गुरां नावाचं फ्रेंच रेस्टॉरंट विश्व युद्धातील इमील गुरां या युरोपियन लष्करी अधिकाऱ्याने 1930 साली सु्रू केलं. तेही बंद झालं. पण कामलिंग हे खूप जुनं चायनीज रेस्टॉरंटअद्याप चर्चगेट स्टेशन जवळ आहे. ते एका चिनी माणसाचं आहे आणि कुलाब्याचं लिंग्ज पॅविलिअन हेही चिनी व्यक्तीने सु्रू केलं.

इथं मुंबईच्या रेस्टॉरंटचा इतिहास सांगण्याचा उद्देश अजिबात नाही. मुंबईची खाद्यसंस्कृती किंवा खादाडी इतकी बहुरंगी व बहुढंगी का आहे आणि ती कशी झाली, हे समजून घेताना इथली रेस्टॉरंट संस्कृतीही समजून घ्यायला हवं. मुळात पूर्वापार मुंबईत देशाच्या विविध भागातून व परदेशातून लोक येत राहिले. कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसायासाठी, कोणी पर्यटनासाठी, तर काही लोक केवळ जीवाची मुंबई करायला इथं आली. काही परदेशी व्यापारी आले आणि इथेच स्थायिक झाले. काही जण देश सोडून पळून आले. तेव्हापासून आजतागायत देशा-परदेशातील लोकांचं येणं सुरूच आहे. परदेशी लोकांमुळे मुंबईत चायनीज, थाई, जापनीज, मेक्सिकन रेस्टॉरंट सुरूच झाली नसती, तर ती चव, तो स्वाद आपल्या तोंडापर्यंत पोहोचलाच नसता. ती चव व स्वाद चांगला नसता तर आपल्याला त्या पदार्थांची सवय लागली नसती. पण चव आवडली आणि ती सवय लागली म्हणूनच मुंबईच्या कानाकोपऱ्यावर चायनीजचे स्टॉल दिसू लागले आणि गावागावात नूडल्स, फ्राईड राईस, मन्चुरिअन, चिली चिकन हे चायनीज पदार्थ माहीत झाले आणि मिळूही लागले. आता तर छोट्या छोट्या गावांतही मोमोजचे स्टॉल्स आले आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, दिल्ली या मोठ्या शहरात खेळलं जाणारं क्रिकेट खेड्यात गेलं तसंच खाद्यसंस्कृतीच झालं. मुंबईची खाद्यसंस्कृती म्हणजेच खादाडी सर्वत्र पसरली आहे. मिसळ, वडा, भजी व शेव मिळणाऱ्या लहान गावातल्या छोट्या छोट्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चायनीज, मोगलाई, पंजाबी व दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ खाणारे लोक सर्रास दिसू लागले आहेत.

इराण्यांनी दक्षिण मुंबईतील कानाकोपऱ्यावर आपली रेस्टॉरंट सु्रू केली. हे इराणी परदेशातून आलेले आणि पाव, खिमा, ऑम्लेट खायला घालून आपल्या लोकांना बिघडवतील, असं काही मराठी मंडळींना गेल्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या शतकात वाटू लागलं. तेव्हा हॉटेलात खाणं हे पाप मानलं जायचं. धर्म बुडेल अशी भीती धर्ममार्तंडांना वाटायची. पण लोकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्यापासून थांबवणं शक्य नव्हतं. तरीही गिरगावातल्या काही ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन मोठी मराठी वस्ती असलेल्या आपल्याच भागात जागा विकत घेऊन आधी दूध विक्रीचा व्यवसाय सु्रू केला आणि त्यातून प्रल्हाद भवन, टेंबे, मॉडर्न, तांबे उपहार गृह, पणशीकर, कुलकर्णी, वीरकर, कोना, चाफेकर अशी असंख्य मराठी उपहारगृहं सु्रू झाली. हे सारे होते कऱ्हाडे ब्राह्मण. कऱ्हाडे ब्राह्मण खाद्यपदार्थ तयार करण्यात तज्ज्ञ असल्याने त्यांना ‘हातात झारा आणि उलथनं’ घेऊन फिरणारे म्हणजे कऱ्हाडे असं म्हटलं जात असे.

त्यामुळे आजही मराठी शाकाहारी रेस्टॉरंट बहुतांशी कऱ्हाडे ब्राह्मणांची आहेत. दादरच्या आस्वादचे सरजोशी व गोरेगावचे सप्रे हेही कऱ्हाडे ब्राह्मण. त्यांच्याकडे पोहे, खिचडी, साबुदाणा वडा, बटाटेवडा, खमंग काकडी, मसाला दूध, फराळी पॅटिस, हिरव्या वाटाण्याची करंजी, कोथिंबीर वडी, आळुवडी, थालीपीठ, पियुष हे मराठमोळे पण ब्राह्मणी शिक्का असलेले पदार्थ मिळू लागले. मात्र ते फक्त मराठीच नव्हे, तर सर्वांनाच आवडू लागले. कोना, वीरकर, कोल्हापुरी चिवडा यांच्याकडे मराठी पद्धतीचं जेवणही उपलब्ध झालं. गिरगावातल्या कुलकर्णीकडे बटाटा भजी व बटाट्याची भाजी खाण्यासाठी सकाळी झुंबड उडायची. मराठी माणसाच्या खाण्याच्या सवयी टिकवण्याचा हा प्रयत्न होता. पण मुंबई व मुंबईकर आणि त्याच्या खाण्यासह सर्व सवयी वेगाने बदलत होत्या. रोज घरी जेवणाऱ्या आणि कामाला जाताना घरचाच जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या आणि प्रसंगी मराठी हॉटेलात जेवणाऱ्या मुंबईकरांना पारंपरिक खाद्यपदार्थांबरोबरच इराणी, पंजाबी, गुजराती, दक्षिणी, मुघलाई चवीही आवडू लागल्या होत्या.

वाघाला मानवी रक्ताची चटक लागली वा चव मिळाली की तो सतत माणसाच्या शिकरीचे प्रयत्न करतो, असं म्हणतात. अशा त्या वाघाला नरभक्षक म्हणतात. पण माणूस वाघाच्या पूर्णपणे विरुद्ध. त्याची जीभ सतत वेगळ्या चवीच्या शोधात असते. वेगवेगळ्या वासांनी त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. ती जीभ माणसाला भटकायला, वेगवेगळे पदार्थ खायला व शोधायला लावते. त्या जिभेला एकाच चवीची काही काळाने कंटाळा येतो आणि तो नव्या चवीचे पदार्थ शोधू लागतो. मुंबईत अठरापगड जातींचे आणि शंभर गावात जेवलेले लोक इथं अट्टल मुंबईकर झाल्याने खाण्यात पटाईत झाले, शाकाहारी मुंबईकर लवकर मांसाहार करू लागले. याचं कारण मुंबईभर असंख्य खाद्यपदार्थ सर्वत्र आज मिळतात आणि ४०-५० वर्षांपूर्वीही मिळत होते. ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृती तशी बहरली नाही, करणं तेव्हा सरसकट बाहेर खाण्याची पद्धत छोट्या गावांत नव्हती आणि खाद्यपदार्थातील वैविध्यही तिथं नव्हतं. पण मुंबईकर विविध खाद्यपदार्थांना जणू सोकावलेलाच. त्याच्या जिभेचे हजार चोचले इथं आपोआप तयार झाले. आज बाहेर खाल्लेलं चायनीज कितीही मस्त असलं तरी दुसऱ्या दिवशी मुंबईकर पंजाबी वा मुघलाई पदार्थ खाण्यासाठी जातो. एक दिवस पोहे व एक दिवस उपमा खाल्ला की तिसऱ्या दिवशी त्याला ऑम्लेट पाव किंवा खिमा पाव हवा असतो. मांसाहारी असेल तर सुटीच्या दिवशी त्याला मटण, चिकन वा मासे हवेच असतात. घरी केले नाहीत तर हा बाहेर जातो. कधी त्याला पोटाला अजिबात त्रास न देणारे दक्षिण भारतीय पदार्थ खावेसे वाटतात आणि मुख्य म्हणजे असे पदार्थ मुंबईत सहज मिळतात. सकाळी सायकलवर विक्रीला असलेली इडली, मेदूवडा, डोसा वा उत्तप्पा असलं काही तरी तो खातो. रस्त्यावर उभं राहून वडापाव वा पाणीपुरी किंवा शॉरमा, सँडविच वा फ्रँकीही खातो. मुंबईकर पाणीपुरीवाल्याचा हात व पानी किती स्वच्छ आहे याचा फार विचार करत नाही किंवा शॉरमाच्या यंत्रावर वा त्या चिकनवर माशा असू शकतात, याची पर्वा नाही करत. बटाटेवड्याच्या तेलाचा रंगही तो पाहत नाही.

एखाद्या शहरात जितक्या प्रांतांचे लोक असतात, तितकी त्या शहराची खाद्यसंस्कृती समृद्ध होतं जाते. दक्षिण भारतीय म्हणजे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश व तेलंगणा. त्या प्रत्येक प्रांतातील काही पदार्थ वेगळे आहेत आणि प्रत्येक राज्याचे मसाले व करायची पद्धत वेगळी असल्याने त्यांची चवही वेगवेगळी. अशा सर्व चवी मुंबईत रूळल्या आणि मुंबईकरांनॅ त्या आवडल्या. पहिले आले उडिपी. मुंबईतील पहिलं उडिपी रेस्टॉरंट म्हणजे माटुंग्याचं रामा नायक यांचं श्रीकृष्ण. मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या रामा नायक यांनी १९४२ साली सानेगुरुजी यांच्या हस्ते रेस्टॉरंटचं उदघाटन झालं. तिथलं केळीच्या पानावरच्या जेवणावर शेकडो मुंबईकर फिदा झाले. त्याच काळात दादरला गोखले यांनी श्रीकृष्ण लॉजिंग व बोर्डिंग सु्रू केलं. त्यावर ठसा होता हेडगेवार यांचा आणि जेवण पूर्ण ब्राह्मणी मराठी पद्धतीचं. त्याच काळात आंध्र प्रदेशातून आलेल्या लक्ष्मण वर्मा यांनी सु्रू केलेल्या पोलीस कॅन्टीनवर पोलिसच नव्हे, तर सर्व मुंबईकरांच्या उड्या पडल्या. आंध्र पद्धतीचं जेवण मुंबईत लोकप्रिय केलं लक्ष्मण वर्मा यांनी. आता मोठ्या जागेत व न्यू ग्रॅण्ट हाऊस नावाने तो ओळखलं जातं. त्याच क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरातलं १९०५ साली बी. ए. बादशाह नावाच्या व्यक्तीने बादशाह कोल्ड्रिंक हाऊस सु्रू केलं. उन्हाळ्यात घामाने बेजार होणाऱ्या मुंबईतील लोकांना फ्रुट ज्यूस आणि फालुदाची सवय लागली या बादशाहमुळे. आता हाजी आली ज्यूस सेंटर, अमर ज्यूस सेंटर अशी अनेक ठिकाणं असली तरी मुंबईत फालुदाचा जनक बादशाहच.

उडिपी पद्धतीचे खाद्यपदार्थ तर इतके लोकप्रिय झाले की मुंबईत नंतरच्या काळात हजारभर तरी उडिपी रेस्टॉरंट आली. मुंबईच्या घराघरात इडली, डोसा, उत्तप्पा आणि सांबार, रसम, मेदूवडा हे प्रकार बनू लागले उडिपी रेस्टॉरंटमुळेच. एरवी गोवा व कोकणातील प्रसिद्ध घावन व काळ्या वाटाण्याची उसळच मुंबईकर खात होते. तेही फक्त कोकणातले. उडिपीनंतर आले केरळी खाद्यपदार्थ. मुंबईत दक्षिणेच्या  राज्यांतील लोक खूप होते. मल्याळी तर नोकरदार. बऱ्याच जणांची ऑफिसेस फोर्ट भागात. त्यामुळे केरळी खाद्यपदार्थ देणारी रेस्टॉरंट सु्रू झाली तिथंच. ओणम, विशू या सणाला त्यांचं पारंपरिक जेवण आणि एरवी फिश, चिकन वा मटण, अविअल आणि गरम जिऱ्याचं पानी यांचा आस्वाद घ्यायला सारेच जातात. आंध्र व तेलंगणा वगळता तिन्ही राज्यांचं जेवण फार मसालेदार वा पोटात जळजळ करणारं नसतं. पहिली आंध्र पद्धतीची रेस्टॉरंट सु्रू झाली कामाठीपुऱ्यात. त्याची कारणं दोन. एक म्हणजे बांधकाम व्यवसायातील अनेक कामाठी तिथं राहत. त्यांची कुटुंबं असत गावी. त्यामुळे त्यांना घरची चव इथं हवी होती. त्या काळात शरीरविक्री करणाऱ्या बायकांही प्रामुख्याने त्या भागातील. त्यांच्या जेवणाची सोयही त्या रेस्टॉरंटमुळे झाली. गंमत म्हणजे ती मुंबईभर पसरली नाहीत. आताशी काही ठिकाणी आंध्र पद्धतीची रेस्टॉरंट सु्रू झाली आहेत. पण खूपच कमी.

मुंबईत पोर्तुगीज होते आणि ब्रिटिशही नंतर आले. त्यामुळे ब्रेड, बीफ, मटण, पोर्क देणारी रेस्टॉरंट फोर्टच्या बाहेर, पण जवळच सु्रू झाली. बऱ्याच रेस्टॉरंटचे मालक होते गोवन ख्रिश्चन. मरीनलाइन्स परिसरात आजही काही शिल्लक आहेत. सी डिसोझा, कॅसल, स्नो फ्लेक ही गेल्या शतकातील जुनी रेस्टॉरंट. विंदालू, सोर्पोतेल, रचाडो, कॅफ्रेल असे पारंपरिक पदार्थ तिथं आजही तिथं मिळतात. एक तर फोर्टच्या परिसरात ख्रिश्चन वस्ती पूर्वापार आहे. त्यापैकी काही गोवन वा मंगलोरी आहेत. मराठी वस्तीचं गिरगाव तिथून जवळ आणि गुजराती वस्तीचा काळबादेवी, मुंबादेवी हा भागही अगदी लागून. शिवाय पारशी व इराणी वस्तीही बऱ्यापैकी आणि जेमतेम एक किलोमीटर चाललं की मुस्लिम वस्तीचा भाग सु्रू होतो. त्यामुळे मांसाहारी लोकांची चंगळच झाली. मुघलाई, गोवन व पोर्तुगीज, मराठी, पारशी, इराणी आणि गुजराती खाद्यपदार्थ चर्चगेट, फोर्ट, मरीन लाइन्स, क्रॉफर्ड मार्केट या परिसरात मिळू लागल्याने मुंबईकरांना या वेगवेगळ्या चवी आणि खाद्यसंस्कृती यांची ओळख झाली. मुंबईतलं पहिलं पंजाबी रेस्टॉरंट १९३० मध्ये फोर्टमध्येच सु्रू झालं. त्याचं नाव शेरे पंजाब. त्यामुळे वेगवेगळे पराठे, छोले, राजमा आणि पंजाबी ढंगाचं शाकाहारी व मांसाहारी जेवण व खाद्यपदार्थ मुंबईकरांना मिळू लागले. पण कोकणातून आलेल्या नोकरदारांसाठी फोर्टमध्ये संदीप व प्रदीप गोमांतकही आले.

कुलाब्याच्या छोट्या गल्लीत आलेल्या बडे मियाँनी मांसाहारी तंदूर प्रकार आणि बैदा रोटी,खिमा रोटी यांची ओळख मुंबईकरांना करून दिली. त्याआधीच मुंबईतलं पहिलं इराकी रेस्टॉरंट सु्रू झालं. त्या बगदादी रेस्टॉरंटमुळे मुंबईकरांना मध्य आशियाई खाद्यपदार्थांची ओळख करून दिली. त्याच दरम्यान मोहमद आली रोड, भेंडी बाजार या भागात सु्रू झालेल्या नूर मोहमदी, शालिमार, पर्शियन दरबार, कॅफे निझारी ही इराणी व उत्तरेकडील मांसाहारी पदार्थ देणारी रेस्टॉरंट सु्रू झाली. त्यामुळे मुंबईकरांना रान खाण्याची सवय झाली.,आता ही ७०-८० वर्षाची होऊन गेली. त्याच भागात सुलेमान उस्मान बेकरी व स्वीट्स, तवक्कल स्वीट्स आणि झमझम बेकरी यांच्या मिठाई व बिस्कीटं व अन्य उत्पादनांनी मुंबईकरांना खूपच वेडं करून टाकलं. आजही त्या भागातून येताना मुंबईकर तिथली बकलावा, अफलातून, ड्राय फ्रुट रोट, मालपुवा, बटर केक आणि बर्फी, काजू कतली, अत्यंत तुपाळ मोतीचूर लाडू, जिलबी, वेगळीच बिस्कीटं असे प्रकार घेऊन येतो. तिथे आणि माहीम या भागात रमझानच्या काळात रात्री प्रचंड गर्दी होते. कित्येक हजार लोक तिथं तिखट, गोड, फळं खात असतात आणि फालुद्याचा आस्वाद घेताना दिसतात. केवळ मुस्लिम नव्हे, तर हिंदू, ख्रिश्चन, शीख असे सर्व धर्माचे लोक तिथं आवडीनं मांसाहार करत असतात. ते खाताना कोणाचा धर्म आडवा येत नाही. असंच चित्र वांद्र्याच्या माऊंट मेरीच्या जत्रेच्या काळात पाहायला मिळतं आणि माहीमच्या मखदुम बाबाच्या उरुसाच्या काळातही मांसाहारी, शाकाहारी, तिखट, गोड पदार्थांची लयलूट असते. मुंबईकरांची सर्वधर्म समभावाची खाद्यसंस्कृती अशा धार्मिक समारंभातही दिसते. मराठी व गुजराती उत्सव सणामध्ये गोडधोड खूप असतं, पण त्यात खाण्याची सामूहिक चंगळ दिसत नाही

पूर्वी, लहानपणी वर्षातून एखाद वेळी तरी रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा विचार घरी काढला, तरी आई-वडील रागावत. पाणीपुरी, भेळपुरी हे उघड्यावरील पदार्थ खायचे नाहीत, असं बजावत. पण आता इटिंग आऊट म्हणजे बाहेर खाणं सर्रास, सहज व आवश्यक झालं आहे. पूर्वी मुंबई खूप आटोपशीर होती आणि वस्तीही कमी. खरं तर आजची दक्षिण मुंबई हीच पूर्वी मुंबई होती. तेव्हा कामाच्या वेळाही ठरलेल्या. नोकरदार वेळेत घरी पोहोचत. पण पुढे पुढे मुंबईची वस्ती वाढली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि विरार, पालघर, डहाणू किंवा पनवेलपर्यंत लोक राहायला गेले. त्यामुळे वेगवेगळी खाद्यसंस्कृती बदलली, ती फोफावली आणि आता तर नोकरदार स्त्री-पुरुषांना जवळपास रोजच बाहेर खाणं गरजेचं होऊन बसलं आहे. बाहेर न खाता मुंबईकर बहुदा जगूच शकणार नाही. आता बाहेरचं खाणं वाढलं असलं तरी त्यावरचा खर्च वाढू नये, यासाठी मुंबईतल्या कुटुंबातील आई, वडील, मुलं असे सर्वजण प्रयत्न करत असतात. मुंबईत मध्यमवर्ग अधिक आणि त्याला हे करावंच लागतं. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये आयुष्यभर न जाताही खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांवर मुंबईकर जगतो.

तो सकाळी घाईघाईत रेल्वे स्टेशनात शिरताना हातगाडीवर उपमा, पोहे वा शिरा, खिचडी खातो. घरातला सर्व स्वैपाक करून निघताना महिलांना स्वतःला खायला वेळही मिळत नाही. त्या तर सकाळचा हा १५ रुपयांतला नाश्ता पार्सलमध्ये घेतात आणि गाडीत बसल्यावर खातात. स्टेशनवर उतरल्यावर तिथंच चहा व कॉफी घेतात किंवा ५ रुपयांचा कटिंग चहा पितात. डबा नेला नसेल तर दुपारी जेवणात जास्त पैसे घालवण्यापेक्षा सँडविच वा वडापाव किंवा डोसा खातात. संध्याकाळी घरी पोहोचेपर्यंत पोटात खड्डा पडलेला असतो. त्यामुळे सुकी भेळ व पाणी पिऊन भूक लांबवतो. उपासाच्या दिवशी दुपारी दोन केळीही पुरतात. अर्थात मुंबईत दोन केळ्यांनाही २० रुपये लागतात. तरुण मुलं कॉलेजला जाताना सायकलवरच्या अण्णाकडील २० रुपयांत ३-४ इडल्या व सोबतची चटणी, सांबार खाऊन दिवस ढकलतात. हल्ली मध्यमवर्गीय तरुण एकत्र रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं टाळतात ते वाढत्या महागाईमुळे.

हे असूनही मुंबईकरांची खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. अनेकदा रेस्टॉरंटमध्ये न मिळणारे वा न परवडणारे मस्त, स्वस्त व चमचमीत खाद्यपदार्थ खाऊगल्लीत संध्याकाळी सहज मिळतात. भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, ४०-५० पद्धतीचे डोसे, ऑम्लेट पाव, चायनीज, पंजाबी, दक्षिण भारतीय, मुघलाई आणि मराठी असे सारे पदार्थ तिथं रेस्टॉरंटच्या निम्म्या किमतीत मिळतात. शिवाय कबाब, वेगवेगळी ज्यूस, फालुदा, मिसळपाव, चहा व बन मस्का, सँडविच, शॉरमा, पिझ्झा, स्पॅगेटी, बिर्याणी, केळ्याची, कांद्याची व बटाट्याची भजी, पोळीभाजी, छोले भटुरे, राजमा भात, फ्रँकी, रोल, मोमो हे आणि असे अनेक पदार्थ त्या गल्लीत मुंबईकराला खेचून नेतात. शिवाय मिठाईचं दुकानही असतं जवळ. काही गल्ल्यात तर खरवस, पुरणपोळी, उकडीचे मोदक, कॅरमल कस्टर्ड असे गोडधोड असते. जिलबी, समोसे तळताना पाहिलं की मुंबईकर त्यावर तुटूनच पडतो. आता या खाऊ गल्ल्यावर गुजराती मंडळींचा प्रभाव वाढल्यानं तिथं ढोकळा, पापडा, पात्रा व काही वेळा उंधीयूही असतं. गुजराती आणि राजस्थानी भोजनालयं तर कायमच तुडुंब भरून वाहतात. काळबादेवी, कांदिवली, बोरिवली या गुजराती वस्तीच्या भागात आणि मॉलमध्येही आता गुजराती थाळी नक्की मिळते. ज्यांना खूप वेळ गप्पा मारत खायचं असतं, त्यांच्यासाठी मॉलच्या आत फूड मॉल आलेत.

तुम्ही मुंबईत कुठेही गेलात तरी खाण्याची असंख्य ठिकाणं तुमच्यापुढे येतं राहतात, ती खुणावत असतात. गिरगाव वा जुहू चौपाटीवरून तर काही न खाता बाहेर पडताच येत नाही. मुंबईकर भरपूर वडापाव खाणारे असले तरी आता गवगवा आहे मिसळपाव आणि भाजीपावाचा, इराण्याकडील खिमा आणि सली बोटीचा, नाक्यावरच्या ऑम्लेटपाव व पाया सुपचा, स्टॉलवर मिळणाऱ्या तवा पुलावचा. कारण हे पोटभरीचे पदार्थ. अन्य कोणत्याही शहरात वा महानगरांत खाद्यपदार्थांची इतकी चंगळ नसते. दिल्लीत सकाळी तुम्हाला ठिकठिकाणी दिसतात समोसे व छोले भटुरे. पण चहा वा इडली, पोहे, मिसळपाव हे प्रकार नसतात. म्हणजे जे आहेत त्यातलंच काही खायचं. मुंबईइतके खाण्याचे पदार्थ अन्यत्र नाहीतच. इथं मेक्सिकन, थाई, जापनीज, इटालियन आणि मध्य आशियाई असे कॉन्टीनेटल पदार्थ सहज मिळतात आणि भारतातील प्रत्येक प्रांताचेही मिळतात. लिट्टी चोखा, दाल ढोकली, वरणफळं, मेतकूट भात, काश्मिरी काहवा, गट्टे की सब्जी, कमल ककडी की सब्जी, धनसाग, सरसो का साग व मक्के की रोटी, गोवन फिश करी, केरळची पायसम म्हणजे खीर, अवियल नावाची मिक्स भाजी आणि चिकन वा मटण स्टू, सर्व प्रकारचे कबाब आणि टिक्का, कोलकाता, हैदराबादी, अवधी अन काश्मिरी बिर्याणी, बांबू पुलाव, मलबार परोटा, चिकन चेट्टीनाड अशी किती नावं घेतली तरी ती कमीच ठरतील. गोवा भवन गजालीमध्ये मासे खाण्यासाठी लांबून लोक येतात. नागा पद्धतीच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये येऊन नागालँडच्या खाद्यपदार्थांचा मुंबईकर आस्वाद घेतात, तंजोर, बनाना लीफ, अर्बन तडका अशा काहीशा महाग रेस्टॉरंटपासून चंपारण मटणपर्यंत आणि नागोरी चहापर्यंत मुंबईकर भटकत राहतो.

यामुळे मुंबईकरांची खाद्यसंस्कृती सर्वव्यापी झाली आहे आणि त्याच्या घरीही रेस्टॉरंटमधील पदार्थ बनू लागले आहेत. बटर चिकन, राजमा, छोले, चिल्ला, अप्पम, रसमलाई, बिर्याणी, फ्राईड राईस आणि चिकन चिली, नागपुरी तर्री पोहे, इंदूरचे शेव पोहे, पिझ्झा, सँडविच, भेळपुरी, दक्षिणी कडल करी म्हणजे चण्याची उसळ असे अनेक पदार्थ. मुंबईची बदलती व वाढलेली खाद्यसंस्कृती लक्षात घेऊन असे वेगळे पदार्थ बनवणंही खूप सोपं करून टाकलं आहे. रेडी मिक्सची संस्कृती सर्वत्र भिनली आहे. त्यातून गोड बनवा, चायनीज बनवा, सूप तयार करा किंवा बिर्याणी वा मराठमोळा मसालेभात तयार करा. कोल्हापूर, नाशिक अन पुण्याचे मिसळ मसाले, तांबडा व पांढरा रस्सा मसाला, नागपूरच्या झणझणीत सावजी मसाला, सोलापुरी शेंगा चटणी व कडक भाकरी आणि चितळेपासून कोंडाजीपर्यंत आणि कुंथल व सातारी कंदी पेढ्यापासून नागपूरची आनंद भांडारची संत्रा बर्फी, हल्दीरामचे नेमकेन प्रकार आणि अगदी अकोल्याच्या शर्माची शेगाव कचोरी हे इथं मिळतं. ऑर्डर देऊन मांडे, पुडाची वडी, पुणे-नाशिकची मासवडी व बोल्हाईचं मटण असे सारं काही सहज मिळत असेल तर मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा जगभर गवगवा झाला तर त्यात काय नवल!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
8888843371
Previous articleबोडोलँण्ड
Next articleप्रेम : आदिम विचारांकडून डिजिटल युगापर्यंत
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. मुंबईच्या खाद्य संस्कृतीवर मस्त लेख.वाचून जिभेला पाणी सुटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!