मुखवट्यामागचा संघ

 

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)

-दत्तप्रसाद दाभोळकर

संघाच्या ‘सकल हिंदू हिंदू बंधु बंधु’ या कार्यक्रमात अगदी धर्मकृत्य मानून अस्पृष्यता न पाळता, म्हणजे शिवशीव न मानता संघस्थानावर एकत्र येणे, रोटी व्यवहार करणे, एवढेच बसते. त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’, सानेगुरुजींचे ‘पंढरपूरमधील मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा, म्हणून केलेले आमरण उपोषण’, ‘एक गांव, एक पाणवठा’ या कार्यक्रमापासून संघ शतप्रतिशत दूर राहीला. हिंदू एकतेसाठी ‘आंतरजातीय विवाह’ हातात घ्यावा, असे त्यांना वाटले नाही. वाटण्याची शक्यताही नाही. गुरुजींनी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉटस्’ या पुस्तकात सांगितले आहे, ‘जाती व्यवस्था ही एक फार चांगली व्यवस्था आहे. केवळ या जातीव्यवस्थेमुळेच अनेक शतके अनेक आक्रमणे पचवून हा देश आणि हा धर्म अजिंक्य ठरले.’ संघाच्या मनात आहे ते ‘वर्णाश्रम धर्मावर आधारलेले सनातन हिंदू राष्ट्र’.  देश स्वतंत्र झाला तेव्हा ‘ऑर्गनायझर’ लिहित होता, ‘मनु हा सबंध जगाने मान्य केलेला फारमोठा विचारवंत आहे. भारताची घटना मनुस्मृतीवर आधारलेली हवी.’

……………………………………

संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संघाबाहेर राहून संघावर टीका करणारे, चार गोष्टी पुन:पुन्हा सांगतात.

१. संघाचा खरा चेहरा आपण समजावून घेऊ शकत नाही. कारण ‘खोटं बोला पण रेटून बोला’ हा मंत्र बरोबर घेऊन मुखवटे घालून संघ हिंडत असतो.

२. ‘सकल हिंदू बंधु बंधु’ हे संघाचे सांगणे अगदी वरवरचे आहे. त्यांचा ‘डी.एन.ए.’ ‘कडवा मुसलमान’ द्वेष हा आहे. त्यासाठी किंवा केवळ त्यासाठीच संघ हिंदू संघटन करतो.

३. गांधी हत्येत संघाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे. ‘गांधी द्वेष’ त्यांच्या रक्तात भिनलेला आहे.

४. ‘घुसमट करणारी एकाधिकारशाही’ ही संघाची रचना आहे.

यावर संघ कार्यकर्ते हसत हसत आणि अगदी शांतपणे खालील उत्तरे देतात.

१. ‘संघ माणसांना घडवतो, बिघडवत नाही! संघाचा प्रत्येक स्वयंसेवक, स्वच्छ, प्रामाणिक आणि पारदर्शक आहे. तो कधीच खोटे बोलत नाही.’

२. संघाने कुठेही मुसलमान द्वेष सांगितला नाही, ‘सकल हिंदू बंधु बंधु’ म्हणून संघ कार्यरत आहे. संघाला एकसंध स्वयंशासित हिंदू समाज तयार करायचा आहे.

३. संघ गांधींजींच्याकडे अतीव आदराने बघतो. त्यांचा परम आदर करतो. संघाच्या प्रात:स्मरणात गांधीजींचे नाव आहे. सावरकर, डॉ. हेडगेवार किंवा गुरु गोळवलकर यांची नावे त्यात नाहीत.

४. संघात एकाधिकारशाही नाही. संघ तत्त्वज्ञानावर आधारित आहे, त्यामुळे संघ मुक्तसंवाद करतो. त्यावर संघाचा विश्वास आहे.

संघ स्वयंसेवक या गोष्टी सांगतात. कारण संघात अगदी प्रारंभापासून म्हणजे १९२५ पासून वेगवेगळ्याप्रकारे स्वयंसेवकांना हे समजावून देण्याचे काम शिशु गटापासूनच सुरू होते. १९२५-४८ या कालखंडात शिशु वर्गात हे सांगणारी अनेक गाणी मनावर बिंबवली जात. त्यातील दोन-

१. संघात हाय काय.. संघात हाय काय.. संघात गेल्याबीगर कळायचं नाय नाय…

२. खालील गाणे शिशु मनाला कोड्यात टाकून प्रथम घाबरवते, नंतर त्याचे छान उत्तर देते.

आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना

सद्‌गुरुच्या संगे, शिष्य बिघडला

शिष्यबी-घडला.. सद्‌गुरुच झाला!

संघाचिया नादे आम्ही बिघडलो

आम्हीबी-घडलो.. संघरुप झालो…

म्हणजे आता संघात काहीकाळ राहून, त्यांचे साहित्य वाचून संघातील विचारवंतांशी आणि संघ परिवारातील संपादकांशी बोलून या चार प्रश्नांच्याबाबत काय वाटते ते सांगितले पाहिजे.

१. संघ, दलितांचे आरक्षण आणि मंडल आयोग 

 

 

 

 

 

 

 

‘खोटं बोला पण रेटून बोला आणि मुखवटे घालून हिंडा’ हे संघ मानतो आणि व्यवहारात आणतो. हे सगळे आपल्याला कळले, संघ, भाजपमधील एखादा उच्चपदस्थ, अगदी खाजगीत, असे काही बोलून जातो. त्यावेळी त्याला संपवायचेच आहे, म्हणून संघातील एखादा गट ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करून हे सारे बाहेर काढतो. आणि त्याला संघ- भाजपमधून हद्दपार करण्यात यशस्वी होतो. यावेळी आपणाला हे ज्यांच्यामुळे समजले, त्यांचे नाव गोविंदाचार्य. कन्नड तुलुभाषिक ब्राह्मण. हिंदीवर विलक्षण प्रभुत्व असलेला. ‘सोशल इंजिनिअरींग’ हा शब्द त्यांनीच प्रथम सांगितला आणि व्यवहारात आणला. कल्याणसिंग, उमा भारती त्यांनी घडविले असेही काहीजण मानतात. वाजपेयी, अडवाणी आणि प्रमोद महाजन या त्रिमूर्तींना आव्हान देत पुढे येणारे जनसंघातील ते नेतृत्व होते. गोविंदाचार्य जनसंघाचे जनरल सेक्रेटरी होते. आपणाला कल्पना नसते, पण अशा मंडळींचा वावर प्रामुख्याने दिल्लीत परकीय वकीलातीत असतो. गोविंदाचार्य हे इस्रायल लॉबी आणि अमेरिकन वकीलातीचे आवडते होते. त्यांनी अमेरिकन वकीलातीमध्ये एका उच्च पदस्थ अमेरिकन अधिकाऱ्याला अगदी खाजगीत बोलताना सांगितले, ‘वाजपेयी काय म्हणतो याच्याकडे लक्ष देऊ नका. तो आमचा मुखवटा आहे!’ संघ परिवार फार सहजपणे ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करतो हे त्यांना माहित असणार. आपल्यालाही माहित आहे! ‘स्ट्रिंग ऑपरेशन’चा जन्मदाता असलेल्या तरुण तेजपाल याला गोव्यात स्ट्रिंग ऑपरेशन घडवून त्यांनी त्याला तुरुंगात अडकवला. मोदींना शह देऊ शकणाऱ्या संजय जोशी यांना ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करुन वासनाकांडात अडकवले. तरीही अमेरिकन वकीलातीमध्ये त्यांनी ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ कसे केले, त्यांची पोच कुठवर आहे, याचा अंदाज गोविंदाचार्य यांना आला नाही. अमेरिकन वकीलातीमधील लोकांनाही, किमान काहीकाळ तरी याचे कोडे होते. संघाकडे बघताना आपण गोविंदचार्य काय म्हणाले हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याच्या खुणा त्यांनी लपवलेल्या असल्यातरी आपल्याला दिसतात. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दिल्लीत तीन दिवस लांबलचक भाषणे दिली. पत्रकार परिषदपण घेतली.

सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यानंतर असे सुहास्य मुद्रेने जनसामान्यांना दर्शन देणारे हे दुसरे सरसंघचालक! त्यांनी अनेकांना दिलासा देणारे एक विधान केले, ‘आपल्या हिंदू समाजात अनेक काळ यातना भोगलेला एक वर्ग आहे. त्यांना हवे असेल, तोवर त्यांना आरक्षण दिले पाहिजे असे संघ मानतो.’ त्यानंतर पत्रकार परिषदेत टाळ्यांचा कडकडाट होणे बाकी होते.- खरंतर त्यांनी नवे काही सांगितले नव्हते. ५०-५५ वर्षांपूर्वी सरसंघचालक झाल्यावर बाळासाहेब देवरसांनी हेच सांगितले होते. त्यावेळी त्यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण दिले. बाबाराव भिडे त्यावेळी अध्यक्ष होते. बाबाराव भिडे तसे संघातील कडवे, खरे हिंदू महासभेचेच!. आरक्षण चुकीचे आहे, हे त्यांचे ठाम मत. त्यामुळे देवरसांनी सुरवातीलाच सांगितले, ‘मी आता एक महत्त्वाचे विधान करणार आहे. ते करण्यापूर्वी सभेचे अध्यक्ष बाबाराव भिडे यांच्याशी बोललो आहे. त्यांचाही याला पाठींबा आहे. हे विधान मी देवरस म्हणून नव्हे, तर सरसंघचालक म्हणून करतोय. ‘जोपर्यंत दलितांना आरक्षण पाहिजे असे वाटते, तोवर त्यांना ते दिले पाहिजे.’- त्यानंतर फक्त दोन महिन्यांनी झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील ठराव आहे, ‘नवी समिती नेमून आरक्षणाचा पुर्नविचार करण्याची वेळ आलेली आहे.’– अगदी जागरुकपणे संघाचा मागोवा घेणाऱ्या मंडळींना पण हे दोन वर्षानंतर समजले. ज्यावेळी प्रतिनिधी सभेचा अहवाल त्यांच्या हातात आला!- भागवतांनी यावेळी अनेकांना गोंधळात टाकणारे आणखी एक विधान केले. त्याचे कारण इतरांना समजले नाही. भागवत म्हणाले, ‘पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती, या गोष्टीवर संघाचा विश्र्वास नाही. माणूस कार्यक्षम आहे, तोवर त्याने सेवा निवृत्त न होता काम केले पाहिजे. सरसंघचालक त्याला योग्य वाटेल त्यावेळी सेवानिवृत्त होतो.’- थोडक्यात मोदी आणि मी सेवानिवृत्त होणार म्हणून कोणी डोळे लावून बसले असतील, तर त्यांनी डोळे बंद करायला हरकत नाही! यावेळी ऐकणारे काहीजण गोंधळात पडले. त्याचे कारण असे की, त्यापूर्वी काहीकाळ आधी मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहनराव भागवत म्हणाले, ‘मोरोपंत एकदा म्हणाले होते की, पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबा, तुमचे वय झाले, आता तुम्ही बाजूला व्हा. नव्या लोकांना काम करू दे.’ या विधानानंतर भागवतांच्या नव्हे तर मोदींच्या निवृत्तीची चर्चा केली जाऊ लागली होती! त्यानंतर आणखी तीन आठवड्यांनी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होत असताना भागवत ही नवी घोषणा करून मोकळे झालेत. सरसंघचालकासारखी जबाबदार व्यक्ती सार्वजनिक व्यासपीठावरून स्वत:च्या निवृत्तीची भाषा करतील हे संभवत नाही. त्यांनी मोदी यांना हवा असलेला पण संघातील अनेकांना नको असलेला हिरवा कंदील दाखविला आहे!

२. संघाचा कडवा मुसलमान द्वेष आणि वरवरचे ‘सकल हिंदू बंधू बंधू’ 

कडवा मुसलमान द्वेष हा संघाचा डी.एन.ए. आहे. ‘लांड्यांना धडा शिकवावा एवढ्यासाठीच संघाचे हिंदू संघटन आहे’ असे अनेकांना का वाटते, हे समजावून घ्यावयास हवे. संघाने आपले नाव ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ठेवले. संघात फक्त हिंदूंनाच प्रवेश होता. मग, संघाने ‘हिंदू राष्ट्रीय संघ’ असे नाव का ठेवले नाही? हिंदू सोडून सारे अराष्ट्रीय आहेत, हे संघाला सांगावयाचे होते. डॉ. हेडगेवार आणि गुरुजी यांच्या लिखाणात कडव्या मुसलमान देशाचे प्रचंड संदर्भ आहेत. डॉ. हेडगेवारांनी २२ नोव्हेंबर, १९३५ रोजी नाहाटे यांना पत्रात सांगितलंय, ‘मुसलमान मनोवृत्ती नेहमीच सत्कार्यात विघ्न आणणारी असते, हे आपण जाणताच.’ एखाद्याने बामणं अशीच वागतात किंवा महारडे असेच वागणार, असे म्हणणे जेवढे भयंकर आणि समाजविघातक आहे, तेवढीच ही झापडबंद विचारधारा भयंकर आहे. गुरु गोळवलकर याच्याही पुढे गेलेत. त्यांच्या ‘बंच ऑफ थॉटस्’मध्ये ते सांगतात, ‘१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध फसले याचे एकमेव कारण दिल्लीला आल्यावर सैनिकांनी बहादूरशाह जफर याला बादशाहा म्हणून घोषित केले. त्याचक्षणी हिंदू सैनिक आणि हिंदू जनमानस या स्वातंत्र्ययुद्धातून बाहेर पडले. मुसलमान बादशाहपेक्षा इंग्रज चांगले, हे त्यांना माहित होते.’ त्याच पुस्तकात त्यांनी पुढे सांगितले आहे, ‘फाळणीनंतर या देशात राहीलेले मुसलमान पंचमस्तंभी आहेत.’ गुरुजींनी लालबहादूर शास्त्रींना भेटून ‘मुसलमानांचा मतदानाचा हक्क काढून घ्या.’ असेही सांगितले आहे.

कडवा मुसलमान द्वेष बरोबर घेऊन, हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी कटिबद्ध झालेल्या संघाने स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही केलेल्या, त्यांच्यादृष्टीने गौरवशाली गोष्टी म्हणजे मुसलमान विरोधी दंगली! संघाचा दंगलींचा इतिहास समजावून घ्यावयाचा असेल तर संघाने घडवलेली किंवा त्यात भाग घेऊन यशस्वीपणे जिंकलेली पहिली दंगल नीटपणे समजावून घ्यावयास हवी. संघ स्थापन झाल्यानंतर ती दंगल केवळ दोन वर्षात झाली. हे संघाचे पहिले यश आहे. शिवाजीने तोरणा जिंकावा किंवा बाळकृष्णाने केशी राक्षसाचा वध करावा, तसे काहीसे हे संघ परिवाराबद्दल आहे. संघ परिवारातील लोकांनी संघावर जे लेखन केले आहे, त्यात अनेक ठिकाणी या दंगलीच्या अभिमानाने उल्लेख येतो. त्यातील सर्वात संयमाने लिहिलेला वृत्तांत आहे प्रा. डॉ. वि. रा. करंदीकर यांच्या ‘तीन सरसंघचालक’ या ग्रंथात आलेला. तो वाचतानाही आपण चक्रावतो. प्रा. करंदीकरांसारखा संघ परिवारातील समतोल विचारवंत, मुसलमानांच्यावर जे भाष्य करतो, ते यातनादायक आहे. तो उतारा असा आहे.-

‘३ सप्टेंबर, १९२७ या दिवशी सय्यद मीर साहेब यांची स्मृती जागविण्यासाठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सामील झाल्यास मिरवणुकीची शान व जोम वाढेल व सर्वांना पुण्य प्राप्त होईल. असे पत्रक निघाले.’ त्या पत्रकावर करंदीकरांचे भाष्य असे ‘हे पत्रक डॉक्टरांच्या हातात आले. त्याचबरोबर मुसलमान वस्तीमधून हत्यारे जमा केली जात आहेत आणि मशिदीतून लाठीचे वर्ग चालू आहेत, अशा बातम्याही आल्या. ते दिवस व-हाडात महालक्ष्मीच्या सणाचे दिवस होते. स्त्रिया अलंकार घालून नटूनथटून मोठ्या थाटात देवीची पूजा करीत. सोन्यामोत्याचे अलंकार आणि नटलेल्या स्त्रिया या गोष्टी मुसलमानांच्या दृष्टीने लूट करण्याच्या होत्या. ही लूट त्यांच्या दृष्टीने नेहमीच एक पुण्यकृत्य असते. पत्रकात पुण्य लागण्याचा उल्लेख होता. याचा ठीक मुकाबला केला पाहिजे, असा निर्णय डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांनी घेतला.’  – याला आपण पराचा कावळा करणे किंवा सुतानं नरकात जाणे, असे काही म्हणू शकतो का, याचा विचार प्रत्येकानं आपापल्या मनात करावयास हवा.

त्यानंतर मिरवणुकीचं वर्णन येते. ‘दुपारी दोन वाजता ठरल्याप्रमाणे मुसलमानांची मिरवणूक निघाली. लाठ्या, भाले, एवढेच नव्हे तर काही जणांच्या हातात तलवारी होत्या. महाल भागाजवळ येताच मुसलमानांच्या घोषणांचे आवाज चढू लागले. ‘अल्ला हो अकबर’ आणि ‘दीन दीन’ हे आवाज दुरून ऐकू येताच घराघरात गंभीर वातावरण पसरले.’ या साऱ्या वर्णनात डॉ. करंदीकरसुद्धा ‘मुसलमानांनी पहिला दगड फेकला.’ असे म्हणत नाहीत, पण पुढे काय होते ते सांगतात; ‘गल्ल्यागल्ल्यांतून आलेले स्वयंसेवक जणू मिरवणूक जवळ येण्याची वाटच पाहत होते. थोड्याच वेळात सरळ रस्त्याने चाललेल्या मिरवणुकीतील काही लोक आरडाओरडा करीत वाईकरांच्या गल्लीत शिरले. त्या अरुंद गल्लीत शिरलेल्या लोकांवर तात्काळ तेथे तोंडाशी असलेल्या स्वयंसेवकांनी लाठीचे सणसणीत प्रहार केले. चार-सहा मुसलमान रक्तबंबाळ होताच ते मागे फिरले. त्यानंतर मुसलमानांनी इतर दहा-पाच गल्ल्यांतून शिरण्याचा प्रयत्न केला, पण तेथेही त्यांना सपाटून मार खावा लागला. मुसलमान जमाव मिळेल त्या रस्त्याने पसार झाला. सारी योजना करणारे डॉक्टर त्यावेळी नागपुरात नव्हते. डॉक्टरांची कार्यपद्धती प्रथमपासूनच अशी सावधगिरीची असे. पुढील तीन दिवस झुंबड चालू होती. ठिकठिकाणी हल्ले- प्रतिहल्ले झाले; सर्वत्र हिंदूंनी कणखर प्रतिकार केला. एक स्वयंसेवक, एका मुसलमानाने घरातून गोळीबार केला त्यात ठार झाला. त्यामुळे प्रक्षुब्ध आलेल्या हिंदूंच्या जमावाने मुसलमानांची काही घरे व एक मशीद आग लावून भस्मसात केली. शंभरांच्या संख्येने जखमी झालेले मुसलमान रुग्णालयात पोहोचले, दहा-पंधरा ठार झाले. चार-पाच हिंदूही मृत्यू पावले. दंग्याच्या संदर्भात डॉक्टरांनी जी आखणी केली होती, ती पूर्ण यशस्वी झाली.’

या दंगलीची नोंद घटाटे यांनी पण घेतली आहे. घटाटे म्हणजे ज्यांच्या बंगल्यात डॉक्टरांचे निधन झाले आणि ज्यांच्या बंगल्यात गुरुजी, शामाप्रसाद मुखर्जी आणि बलराज मधोक यांनी जनसंघ स्थापन केला! त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे, ‘इ.स. १९२५ मध्ये संघ सुरू झाला. १९२७ पर्यंत नागपुरात हिंदू मुसलमानांच्या हातचा मार खात होते. पण जेव्हा १९२७ मध्ये महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुसलमानांनी दंगा सुरू केला, तेव्हा चार दिवस दंगल झाली. मात्र या चार दिवसांत मुसलमानांनी खूप मार खाल्ला. आपल्या स्वयंसेवकांनी हिंदूंना संघटीत करून मुसलमानांना चांगले ठोकून काढले आणि हिंदूंचा धाक बसवला.’- स्वातंत्र्यानंतरही संघाचे हे वीरकृत्य सुरू राहीले आहे. सत्तरच्या दशकात अहमदाबाद येथील दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, ‘यापुढे हिंदू मार खाणार नाहीत.’ २००२ मध्ये गुजरातमधील अमानुष पाशवी दंगलीनंतर त्या राज्याचे संघाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ‘रस्त्यावर पुढे जाणाऱ्या गाडीच्या आड येणारी कुत्री चिरडली जाणारच!’ नानाजी देशमुखांच्या मृत्यूनंतर त्यांचा उजवा हात समजले जाणारे यादवराव देशमुख, ऑर्गनायझर आणि पांचजन्य यांचे संस्थापक सदस्य. १९५७-६७ ते पांचजन्यचे संपादक आहेत. नानाजींच्या मृत्युनंतर माझा आणि त्यांचा पत्रव्यवहार झाला. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे, ‘हिंदूत्व म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान द्वेष हे स्वयंसेकांच्या मनावर बिंबले आहे. हे तुमचे म्हणणे खरे आहे. याचा अर्थ संघातील आम्ही काही लोक हिंदुत्वाचा खरा अर्थ स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी झालो.’

कडवा मुसलमान द्वेष हा संघाचा ‘डी.एन.ए.’ आहे. मुसलमानांना धडा शिकविण्यासाठी त्यांना हिंदू संघटन आवश्यक वाटत होते. संघाच्या ‘सकल हिंदू हिंदू बंधु बंधु’ या कार्यक्रमात अगदी धर्मकृत्य मानून अस्पृष्यता न पाळता, म्हणजे शिवशीव न मानता संघस्थानावर एकत्र येणे, रोटी व्यवहार करणे, एवढेच बसते. त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’, सानेगुरुजींचे ‘पंढरपूरमधील मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा, म्हणून केलेले आमरण उपोषण’, ‘एक गांव, एक पाणवठा’ या कार्यक्रमापासून संघ शतप्रतिशत दूर राहीला. हिंदू एकतेसाठी ‘आंतरजातीय विवाह’ हातात घ्यावा, असे त्यांना वाटले नाही. वाटण्याची शक्यताही नाही. गुरुजींनी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉटस्’ या पुस्तकात सांगितले आहे, ‘जाती व्यवस्था ही एक फार चांगली व्यवस्था आहे. केवळ या जातीव्यवस्थेमुळेच अनेक शतके अनेक आक्रमणे पचवून हा देश आणि हा धर्म अजिंक्य ठरले.’ संघाच्या मनात आहे ते ‘वर्णाश्रम धर्मावर आधारलेले सनातन हिंदू राष्ट्र’.  देश स्वतंत्र झाला तेव्हा ‘ऑर्गनायझर’ लिहित होता, ‘मनु हा सबंध जगाने मान्य केलेला फारमोठा विचारवंत आहे. भारताची घटना मनुस्मृतीवर आधारलेली हवी.’

आणखी एक अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. १९२५ मध्ये म्हणजे संघ सुरू झाल्यावर फक्त दोन वर्षांनी संघाने घडवलेली किंवा घडताना त्यात भाग घेऊन जिंकलेली, विजयादशमीला नागपूर येथे झालेली दंगल संघ अभिमानाने मिरवतो. मात्र, त्याचवेळी १९२७ मध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याचा सत्याग्रह करत होते. संघ त्याची साधी नोंदही घेत नाही. याचे कारण असे आहे, की ‘सकल हिंदू बंधु बंधु’ म्हणून संघस्थानावर एकत्र येणे, एवढेच बसते. संघ सावरकरांना आपला मार्गदर्शक मानतो. संघाचा दलित विरोधी डिएनए समजावून घ्यावयाचा असेल, तर सावरकरांना समजावून घेतले पाहिजे. सावरकर आणि ‘सावरकरांचे हिंदूत्व’ हे पुस्तक संघाचे मार्गदर्शक आहेत. १९४० मध्ये झालेली डॉ. हेडगेवारांच्या आयुष्यातील शेवटची ‘ओटीसी’ म्हणजे ‘अधिकारी प्रशिक्षण शिबीर’. त्यात अध्यक्षीय भाषण सावरकरांचे आहे. सावरकरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त १५ मे, १९६३ रोजी मुंबईत दिलेल्या भाषणात सरसंघचालक गोळवलकर यांनी सांगितले आहे, ‘सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या महान ग्रंथात विशुद्ध राष्ट्रवादाची तत्त्वे शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेली आहेत. हा एक पाठ्यग्रंथ आणि शास्त्रग्रंथ आहे.’- आपण आता सावरकरांचे मत काय होते हे सावरकरांचे भक्त असलेल्या द. न. गोखले यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य’ हे मौज प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात लिहिलेले आहे. त्यांनी त्या पुस्तकात सांगितले आहे.

अ) सावरकर समाज सुधारक होते, पण समाज सुधारणा त्यांच्या डोक्यात चढली नव्हती. जातीभेद उन्मूलन त्यांना हिंदू समाज संघटीत आणि बलशाली करण्यासाठी हवे होते. आपले हे विचारसूत्र ते केव्हाही विसरले नव्हते. त्यांच्या जातीभेद उन्मूलन करण्यात न्याय, समता, माणुसकी इ. तत्त्वांची बूज राखली जात होती. पण केवळ त्या तत्त्वांच्या सिद्धतेसाठीच त्यांना ते नको होते (पृ.२९).

ब) धर्मांतर करु पाहणाऱ्या अस्पृष्य बंधूंना (म्हणजे आंबेडकरांना) सावरकरांनी सांगितले, ‘आम्हाला शिवा, नाहीतर आम्ही दुसरे घर पाहतो.’ अशी अत्यंत भिकारडी आणि नेभळ्या कुलकलंकासारखी वाक्ये उच्चारून, आपल्या पुर्वजांच्या घराला सोडून, त्यांच्या शत्रूंनाच आपले पूर्वज समजण्याचा भ्याडपणा तुम्ही करू नका. दुसऱ्या धर्मात जाणे म्हणजे हिंदूत्व धिक्कारून आणि या तुमच्याच, महार- मांग प्रभुती सोमवंशीय कुलातील शतसहस्र पूर्वजांस मुर्खात काढून बापाचे नाव बदलणे होय (पृ.२२९).’

आपणाला माहित आहे, सावरकरांनी रत्नागिरीत ‘पतीतपावन मंदिर काढले’. पतीतांना आमच्या मंदिरात प्रवेश द्या असे म्हटले नाही. तुम्ही पतीत आहात, आम्ही तुमच्यासाठी एक वेगळे मंदिर काढतो आणि तुम्हाला पावन करुन घेतो. संघ शंभर वर्षे हेच करत आला आहे. सर्वसाधारणपणे संघाचे सहा सरसंघचालक माहित आहेत. माहित नसलेले एक नाव म्हणजे लक्ष्मण वासुदेव परांजपे. १९३०-३१ या काळात ते सरसंघचालक होते. शंभर वर्षांच्या या एकूण सात सरसंघचालकांत पाच महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत! बाकीचे दोन द्विजवर्णीय आहेत. संत ज्ञानेश्वरांनीच याचा अर्थ नक्की काय आहे हे सांगितले आहे. त्यांनी ज्ञानेश्र्वरीत लिहिले आहे, ‘ब्राह्मण क्षत्रीय वैश्य हे द्विजवर्ण, त्यांचे चरण पूजन हे शुद्र कर्म’.

३. गांधीजींचा खून आणि संघ

 

 

 

 

 

 

 

 

संघ आणि गांधी हत्या याचा संघाशी काहीही संबंध नाही आणि संघाला गांधीजी प्रात:स्मरणीय आहेत. संघाला बदनाम करण्यासाठी ‘संघ आणि गांधी हत्या’ यांचा संबंध जोडला जातो. जनसामान्य असे का मानतात हे सांगितले पाहिजे. कारण हा संबंध संघ ज्यांना लोहपुरुष मानतो त्या सरदार पटेलांनी सांगितला आहे. गांधी हत्त्येनंतर त्यांनी शामाप्रसाद मुखर्जी आणि गुरु गोळवलकर यांना पाठवलेल्या पत्रात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे, ‘गांधीजींचा खून संघाने कट करून केला की केला नाही, हे सांगता येणार नाही. मात्र संघाने या देशात जे विषारी वातावरण निर्माण केले, यातून हा खून झाला आहे. आमच्याकडे आलेल्या अहवालाप्रमाणे संघ स्वयंसेवकांनी भारतभर मिठाई वाटून तो साजरा केला आहे. संघ ही हिंदू महासभेपेक्षा अधिक भयावह आहे. कारण संघ गुप्तता पाळतो आणि ती निमलष्करी संघटना आहे.’ संघाची आणखी एक अडचण आहे. ‘आमचा आणि नथुराम गोडसे यांचा अजिबात काहीही संबंध नाही.’ हे अगदी अडवाणी यांनी सुद्धा पुन:पुन्हा सांगितले आहे. संघाच्या या सांगण्यात पुन्हा एक अडचण आहे. गोपाळ गोडसे यांनी ‘गांधी हत्या आणि मी’ हे गांधी हत्येवर जे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अनेकदा स्पष्टपणे म्हटले आहे, ‘मी आणि नथुराम घरापेक्षा संघातच जास्त वाढलो. आमच्यावरचे तप्त संस्कार हे संघाचेच आहेत.’

)   संघ गांधीजींचा द्वेष करतो हे शतप्रतिशत खोटे आहे, हे सांगताना संघ एक गोष्ट सांगतो, ‘संघाच्या प्रातःस्मरणात भारतभक्ती स्तोत्रात, श्रद्धेय गांधीजींचा उल्लेख आहे.’ त्यामागची खरी गोष्ट काय आहे हे दामुअण्णा दाते जे संघाचे महाराष्ट्र विभाग प्रमुख वगैरे काही होते, त्यांनी त्यांच्या ‘स्मरणशिल्पे’ या पुस्तकात लिहिले आहे. ते लिहितात, ‘तरीसुद्धा महात्मा गांधींचे नाव भारतभक्ती स्तोत्रात आले, यावर भरपूर नाराजी होती. पुणे जिल्ह्याचे एक ज्येष्ठ प्रचारक श्री. गोपाळराव देशपांडे त्यावर नाराजीने बोलले… काकासाहेब मुळे यांनी माझ्या विभागात ते प्रातःस्मरण नको असे म्हटले… श्री. काशिनाथपंत लिमये यांनीही आपला विरोध प्रकट केला होता. श्रीगुरुर्जीनी त्यांना नंतर एक पत्र पाठवले. त्यात गुरुजींनी लिहिले आहे, ‘नागपूरच्या आपल्या बैठकीत आपण सर्वांनी मिळून चर्चा केली होती. निर्णय माझ्यावर बंधनकारक नाही, असा पायंडा आपणासारख्या ज्येष्ठ कार्यकत्यांनी पाडण्याचे ठरविले असेल, तर मी काय बोलणार?’ भारतभक्ती स्तोत्र १९६५-६६ मध्ये सुरू झाले व १९८५ च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने नव्याने निर्माण केलेल्या ‘एकात्मता स्तोत्र’ याला अनुमती दिली, ज्यामध्ये कबीर, रसखान, दादाभाई नौरोजी, ठक्करबाप्पा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी नावांची भर पडली…’- आपण नोंद करावी ती गोष्ट अशी की, भारतभक्ती स्तोत्रात गांधीजींचे नाव घ्यावे की नाही हा संघाला चर्चेचा विषय वाटत होता आणि काशिनाथपंत लिमये, बाबाराव भिडे अशा ज्येष्ठ मंडळींनी त्याला ठराव झाल्यावरही विरोध केला होता.

आणखी एक गोष्ट आहे. संघाचा गांधीहत्येशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला नाही, म्हणजे तो नसणारच हे सर्वांनी मान्य करावयास हवे; पण संघ गांधीजींचा द्वेष करीत होता, त्यांना संपवणे गरजेचे आहे व हे धर्मकृत्य करून, आपणच त्यांना संपवणार आहोत, अशी स्वयंसेवकांची आणि जनसामान्यांची कल्पना करून देत होता. दामुअण्णा दाते यांच्या ‘स्मरणशिल्पे’ या पुस्तकातील पान ५८-५९ वरील हा उतारा पहा.

‘‘… कर्जत तालुक्यातील एका प्रमुख गावी मी गेलो. म. गांर्धीच्या खुनानंतर आलेल्या बंदीमुळे तेथील शाखा बंद झाली होती, ती अजून सुरू झाली नव्हती…. मी गावातील एका स्वयंसेवकाकडे जायचे ठरविले. त्यांचा लोहाराचा व्यवसाय होता. रस्त्यावरून मला येताना त्यांनी पाहिले. मी त्यांच्या दुकानाजवळ गेलो, त्यावेळी ते एकदम मला म्हणाले, ‘‘संघाचे प्रचारक दिसताय!’’ धोतर, मुंडासे असलेले, गलेलठ्ठ मिशा व ठणठणीत प्रकृती असलेले असे ते गृहस्थ होते. मी त्यांना ‘हो’ असे म्हणालो व ‘तुम्ही कसे ओळखले ?’ असे विचारले. ते म्हणाले, ‘त्यात अवघड काय आहे? भर बाजारपेठेत असे दुटांगी धोतर नेसून प्रचारकाशिवाय कोण येणार?’ …मी त्यांना म्हटले, ‘नगरला आपले चार मजली कार्यालय पूर्ण जळून खाक झाले आणि नगरपासून तीस मैलांवर असलेल्या तुमच्या गावात काहीच कसे झाले नाही?’ ते म्हणाले, ‘कदाचित झाले असते. मला पहिल्यांदाच कुणकुण लागली होती, काही मंडळी दंगा करणार आहेत. कदाचित आमच्यावर हल्ला करतील. संभाव्य असे जे होते, त्यांना गाठून मी स्वच्छ सांगितले की, ‘आमच्या वाटेला कोणी यायचे नाही. याद राखा! गांधीबाबा आमच्या वाटेला आला, त्याला आम्ही संपवला, तर तुमची काय कथा?’ त्यानंतर गावात कोणीही आमच्याकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत ठेवली नाही.’- त्यांचा तो जोश पाहून मी त्यांना म्हटले, ‘सुभानराव, म. गांधींचा खून आपण नाही केला. तुम्ही असे कसे बोलता?’ तर ते म्हणाले, ‘तुम्ही मुंबईवाले, तुम्हाला काय माहिती? हे असेच आहे.’ त्यांना समजावून देताना माझ्या नाकी नऊ आले… परंतु माझे म्हणणे मी त्यांना पटवून देऊ शकलो नाही, हेही तितकेच खरे!’

ही गोष्ट पश्चिम महाराष्ट्रातील एका खेड्यातील आहे. उत्तरेत त्यांनी काय मानसिकता निर्माण केली असेल? एक गोष्ट कोणीही अजिबात बोलत नाही. महात्मा गांधींच्या खुनानंतर नानाजी देशमुख यांना दफा ३०२ खाली पकडले होते. त्यांना सहा एक महिने तुरुंगात काढावे लागले. महंत दिग्विजय व गोडसे यांची भेट त्यांनी घडवली व त्याला पिस्तूल मिळवून दिले, असा त्यांच्यावर आरोप होता. नानाजी यातून पूर्णपणे निर्दोष सुटले. पण त्यानंतर बलराज मधोक म्हणाले त्याप्रमाणे, ‘आमचा हा नाना एवढा हुशार आहे की, आपल्याला भेटला तो नाना हे महंत दिग्विजय यांना कळलेच नसणार !’

आपण आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. या खंडप्राय, जात धर्म पंथ भाषा यामुळे शतखंडीत झालेल्या देशात खेड्यापाड्यातील अशिक्षित माणसांचे व्यवहार ज्ञान विलक्षण आहे आणि भारतभर ते सारखेच आहे. त्यामुळे नानाजींनी एका ध्वनीमुद्रीत मुलाखतीत जे सांगितले आहे, ते लक्षात घ्यावयास हवे. नानाजी म्हणाले, ‘जनसंघ वाढत नव्हता, याचे कारण १९६७ मध्ये माझ्या लक्षात आले. या देशातील सर्वसामान्य माणूस संघाला आणि जनसंघाला गांधीजींचा हत्यारा समजतो आणि तो गांधींचे हत्यारे असलेल्या संघ आणि जनसंघाला स्वीकारणार नाही. त्यामुळे अनेक फंडे वापरून आम्ही लोहिया आणि जयप्रकाश यांच्याजवळ गेलो. त्यांनी आम्हाला स्वीकारले. मग या देशाने आम्हाला स्वीकारले.’

)   संघाचे भारतातील विचारवंत म्हणजे संपादक एक गोष्ट पुन:पुन्हा सांगतात. ‘विवेक’चे एकवेळ संपादक असलेले आणि मी ज्यांना ‘समरसता मंच’ या अभिनव कल्पनेचे प्रमुख शिल्पकार मानतो, त्या रमेश पतंगे यांनी हाच विचार मांडला आहे. ‘संघ व्यक्तिकेंद्रीत नाही, तत्वसिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे एखाद्या सरसंघचालकांनी काही वेगळा विचार मांडला तरी संघ फुटणार नाही.’- मात्र हे असे काही नाही, हे सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि प्रजापरिषदेचे अध्यक्ष, जनसंघाचे फाऊंडर मेंबर, खासदार, जनसंघाचे अध्यक्ष बलराज मधोक या दोघांनीही सांगितले आहे.

अ) देवरसांनी ज्यावेळी संघाचा झपाट्याने अनेक क्षेत्रात विस्तार करावयास सुरवात केली, त्यावेळी जुन्या, जाणत्या ज्येष्ठ प्रचारकांनी त्यांना विचारले, ‘संघाने आपला मुळ उद्देश बाजूला ठेवला का?’ देवरस म्हणाले, ‘अजिबात नाही. संघाचा फक्त एककलमी कार्यक्रम आहे, ‘हिंदूचाच हिंदुस्थान’ म्हणजे हे हिंदूराष्ट्र आहे. ज्यावेळी आपण ‘हिंदूराष्ट्र’ म्हणतो त्यावेळी ‘भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज’ आणि ‘एकचालकानुवर्तीत्व’ हे आपोआपच येते.’- एकचालकानुवर्तीत्व म्हणजे एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही.’

 

 

 

 

 

 

 

 

बलराज मधोक याच्याही पुढे गेलेत. ते म्हणालेत, ‘सरसंघचालकांच्याबरोबर एका शब्दानेही असहमत होणाऱ्याला ‘या किंवा त्या मार्गाने’ संपविण्यात येते! मौलीचंद्र शर्मा आणि मी दोघेही जनसंघाचे एकवेळ अध्यक्ष होतो. मात्र गुरुजींना न पटणारे काही बोललो, म्हणून आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. तरीही आम्ही तसे भाग्यवान! माझे मित्र, जनसंघाचे पहिले अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी, ‘एक देश में दो निशान, दो प्रधान, दो विधान, नही चलेंगे.. नही चलेंगे..’ म्हणून काश्मीरला गेले आणि त्यांचा अकत्मात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कसा झाला हे मला अजुनही कोडे आहे. मात्र, माझे जवळचे मित्र दिनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू हा अपघात नव्हे. नानाजी देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कट करून केलेला खून आहे. मी त्यावर पुस्तक लिहिले आहे. ते हिंदीत आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. माझे सांगणे होते, ‘पुन्हा चौकशी करा. मी खोटे सांगत असेन तर मला शिक्षा करा.’ मला माहित होते. या संघटनेची पोच केवढी आहे. यातील काहीही होणार नाही, पुस्तक उपेक्षेने मारले जाईल.’- आज नानाजी आणि अटलजी भारतरत्न आहेत. केवळ मधोकच नव्हे तर त्यांचे जवळचे मित्र दिनदयाळ हे दोघेही तसे स्मृतीआड गेलेत.

आ)  संघात फार वर असलेल्या देवरस, मधोक यांच्या खालती जे वर्तुळ असते, त्यात ते अधिक भयावह प्रकारे होते. वसंतराव ओक हे दिल्लीमधील संघाचे सर्वेसर्वा. देश स्वतंत्र झाला त्यावेळी केवळ दिल्लीमधील संघच नव्हे, तर संबंध दिल्ली त्यांच्या शब्दावर नव्हे, तर केवळ त्यांच्या इशाऱ्यावर हलत होती.- गुरुजींनी त्यांना एका क्षणात संघातून हद्दपार केले. त्यांना बाहेरचा रस्ता का दाखवला, याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. त्यातील एक आहे, ‘पंडीत नेहरु उदारमतवादी होते. १९४२ चे आंदोलन चिरडून टाका म्हणून व्हाईसरॉयला पत्र पाठवणाऱ्या हिंदू महासभेच्या शामाप्रसाद मुखर्जी यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतले होते. त्यांनी वसंतराव ओक यांना मंत्रीमंडळात या म्हणून बोलावले होते. ओक म्हणाले, ‘गुरुजींना विचारून सांगतो.’ ही ओक यांच्याकडून झालेली महाभयानक चूक होती. त्यांनी सांगावयास हवे होते, ‘गुरुजींना विचारा!’- माणसाला वाळीत टाकणे म्हणजे काय हे आपल्याला वसंतराव ओक यांच्याकडे पाहिल्यावर समजते. मी दिल्लीत पंचवीस वर्षे होतो. माझे घर त्यांच्या विभागात होते. मी त्यांना कधी भेटलो नाही. माझा मित्रपरिवार दांडगा. ‘शहरी नक्षलवादी’ त्यांच्यापासून ‘शहरी हिंदुत्ववादी’ यांच्यापर्यंत सगळे माझे जवळचे मित्र! दिल्लीतील स्वयंसेवकच नव्हे, तर पुण्यातील स्वयंसेवक मला भेटायला आले, तर हसत हसत सांगायचे, ‘तुमच्याकडे येण्यात एक अडचण आहे. वाटेत वसंतराव ओक भेटले तर उद्या आमची परेड होईल!’

इ)   कोणत्याही संघटनेत कोणत्याही पक्षात अशी ‘थोर मंडळी’ असतात! आणि त्यांचे प्राक्तन हेच असते हे खरे. मात्र, गुरुजींच्या काळात, भारतातील प्रत्येक विभागात, संघातील पूर्णपणे समर्पित, प्रामाणिक, पारदर्शक, अपार उर्जा असलेले जे स्वयंसेवक होते, त्यांनी गुरुजींना एकही प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवले, तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात असे. आपण फक्त महाराष्ट्रात काय झाले ते लक्षात घेवूया. ज्ञानप्रबोधनीचे पेंडसे आणि दलितांच्या सिंचनाचा म्हैसाळ प्रकल्प उभे करणारे देवल यांचे कर्तृत्व आणि मोठेपण आपण सर्वजण मानतो. त्या दोघांना गुरुजींना बाहेरचा रस्ता का दाखवला याचे सविस्तर वृत्तांत संघ परिवारातील प्रमुख विचारवंताने लिहिलेल्या आणि परिवारानेच प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आहेत, तेवढेच आपण विचारात घेऊया.

१)   संघात अनेक प्रकारचे गट होते, हे खरे. अगदी शस्त्रास्त्र मिळविण्यापासून अनेक कामांत गुंतलेले. मात्र, पुण्यातील एक गट अधिक बुद्धीमान, अधिक खोल विचार करणारा, नाना देशाचे इतिहास वाचलेला, जगातील विविध चळवळींचे भान असलेला आणि वर्तमान काळातील प्रश्नांचा मागोवा घेऊ पाहणारा होता. त्यांचीही एक बाजू होती. देशाचे भविष्य घडविण्यामध्ये आता पुढील कालखंडात संघाचा डोळ्यात भरण्यासारखा वाटा असला पाहिजे, ही त्यांच्या मनातील तडफड होती. संघातील तीन-चार प्रौढ पदाधिकारी अशीच मते व्यक्त करणारे होते, त्यांची दखल घेतली जात नव्हती. संघाचेच नित्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. हे त्यांना समजत होते. ते त्यांना अधिक अस्वस्थ करीत असे. ते बैठकीत प्रश्न उपस्थित करीत, पण त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नव्हता.

२)   या तरुणांचा सूर आक्रमक असे. त्यांच्या व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्यात अंतर्गत ताण सुरू होता. त्यातून मतभेदाला नकळत व्यक्तिगत अहंकाराच्या संघर्षाचे रूप प्राप्त झाले. त्याचा स्पर्श या बंडखोर तरुणांच्या वाणीत उमटला. आपण या प्रश्नांची तड लावावयाची, एक संघटीत फळी निर्माण करावयाची, आणि संघापुढे आव्हान उभे करावयाचे, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यातील काहीजणांनी संघाच्या त्यावेळच्या धोरणावर व एकूण कार्यशैलीवर आक्षेप घेणारे लेख लिहिले.- संघासारख्या शिस्तबद्ध संघटनेत काही बदल घडवून आणावयाचे असतील, तर हा मार्ग नव्हे, हे त्यांच्या लक्षात आले नाही.

३)   महाराष्ट्राच्या या भागात १९४० पासून गुरुजींना आलेले काही अनुभव त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान देणारे किंबहुना जाब विचारणारे असत. आपल्यापरिने शांतपणे ते मार्ग काढत होते. पळसुले यांच्या घरी झालेल्या बैठकीत गुरुजीं उत्तर दिले, ‘अशीच सारी कामे झाली पाहिजेत हे खरे, पण संघ प्रत्यक्षपणे कोणत्याही कामात उतरणार नाही.’ गुरुजींनी आपले उत्तर ठाम स्वरात व अगदी थोड्या शब्दात दिले. ते अधिक काही बोलले नाहीत. ज्ञानप्रबोधिनी उभी करणारे डॉ. आप्पा पेंडसे आणि म्हैसाळ प्रकल्पामुळे गाजलेले मधुकरराव देवल या बैठकीत उपस्थित होते. गुरुजींच्या उत्तरामुळे त्यांचे समाधान झाले नाही.

४)   पुढे तीन-चार तरुण गुरुजींना भेटण्यासाठी थेट नागपूरला गेले. त्यामध्ये देवल आणि पेंडसे होते. एका बैठकीत गुरुजी उठत असताना, ‘आमच्या प्रश्नांची उत्तरे न देता कुठे चाललात?’ असा प्रश्न देवलांनी केला. ही स्वयंसेवकांनी गुरुजींच्याबरोबर बोलण्याची भाषा नव्हे, ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी होती. या जगात सर्वांचे समाधान आजवर कोणीच करु शकलेले नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी हा विषय संपवावयास हवा होता. आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांशी आपले मतभेद होतात, संस्था आपण निर्माण केली असल्यामुळे आपलेच मत मानले जाईल, असे आपले धोरण राहते. त्यामुळे काही सहकारी दुखावतात तर काही सोडून जातात. हा अनुभव पुढील काळात डॉ. पेंडसे यांनाही घ्यावा लागला आहे. देवलांनी काढलेल्या नव्या रचनेमुळे जे दलित दुरावस्थेतून सुस्थितीत आले,- त्यांची मानसिकता त्यांच्या पुढच्या पिढीने आत्मसात करण्याची शक्यता कमी असते, हे नाकारता येत नाही. ध्येयवादी दृष्टीने काढलेल्या सहकारी संस्थेलाही हळूहळू राजकारणाची बाधा होत असते. अशा या मर्यादा हरएक मानवी प्रयत्नाला पडतात.- त्यामुळे गरज माणसे घडविण्याची आहे, हे संघाने ओळखले होते आणि संघ स्वयंसेवक घडवून त्यातून सारा समाज घडविणार होता.

रशियातील कम्युनिष्ट पक्षात नव्हे, तर भारतातील कम्युनिष्ट पक्षातसुद्धा यापेक्षा अधिक मोकळा श्वास होता! संघाची तुलना फक्त इजिप्तमधील ‘मुस्लीम ब्रदरहूड’ बरोबर होऊ शकते. ‘सर्व मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणून मुस्लीम ब्रदरहूड कार्यरत झाला. आपला विश्वास बसत नाही, अशा झपाट्याने त्याने अनेक क्षेत्रात सेवाभावी संघटनांचे जाळे उभे केले. लोकशाही वापरून तो सत्तेवर आला. त्यांनी शासनाची आणि प्रशासनाची रचनाच मोडून काढली.- लष्कराने सत्ता हातात घेऊन तूर्तास तरी मुस्लीम ब्रदरहूडला पूर्णपणे संपवले आहे!- हुकूमशाही रचनांचे प्राक्तन रशियात आणि इजिप्तमध्ये, खरेतर जगभर कुठेही सारखेच असते!

(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत . ‘प्रकाशवाटा’, ‘माते नर्मदे’, ‘काही डावे काही उजवे’ , ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ , ‘संघ समजून घेताना ..’. आदी अनेक गाजलेल्या पुस्तकांचे ते लेखक आहेत.)

9822503656

Previous articleइंडिगोचा डोलारा कोसळला: स्वस्त तिकिटांमागे दडलेली विस्कळीत सेवा!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here