-प्रा . हरी नरके
‘जोतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’
– नारायण महादेव उर्फ मामा परमानंद (३१ जुलै, १८९०)
स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात, आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, यावर एक वाद झालेला होता. इंग्रजांच्या रूपात शत्रू समोर दिसत असल्याने आपण स्वाभाविकच राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आता आपले सामाजिक प्रश्न आपसूक सुटतील असा लोकांचा समज होता. परंतु जसजसे दिवस उलटू लागले, तसतसा लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातून सामाजिक चळवळी हळूहळू जोर पकडू लागल्या.
जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
विविध क्षेत्रातल्या सामाजिक न्यायाच्या चळवळी संघटित करणाऱ्यांच्या हे लक्षात येऊ लागलं की या विषयाची जोतीराव सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.
जोतीराव सावित्रीबाईंवर मराठीत आजवर दोनशेहून अधिक ग्रंथ लिहिले गेलेत. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलगू, बंगाली, कन्नड, पंजाबी, ऊर्दू, सिंधी, गुजराती या भाषांमधेही काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. यातल्या सावित्रीबाईंवर लिहिल्या गेलेल्या छोट्यामोठ्या पुस्तकांची संख्या ४० आहे. त्यातील ललितेतर वैचारिक ग्रंथ लक्षात घेतले तर त्यात मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे.
सावित्रीबाईंचं चिकित्सक चरित्रच नाही
त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्र ग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. प. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित असून त्यात फारसं नवीन काहीही नाही. मात्र सावित्रीबाईंचं आजवर एकही चिकित्सक चरित्र लिहिलं जाऊ नये, हे खेदजनक होय.
सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.
लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं.
शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.
शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत दोन साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्तीस केली.
त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणाऱ्यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणाऱ्याच आहेत.
ब्राह्मण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.
जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’
बरोबर काय न्यायचं आहे?
दुसऱ्या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्न दान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’
सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.
जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.
पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.
सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.
जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.
प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचं अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्यागच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.
सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.
मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.
(लेखक ज्येष्ठ संशोधक आणि विचारवंत आहेत.)
खालील Video नक्की पाहा ,ऐका – क्लिक करा -सावित्रीमाईचे चरित्र त्यांच्या जन्मभूमीतून