मेळघाटात दोनशेहून आधिक गावानध्ये तीव्र पाणीटंचाई

-राम वाडीभस्मे

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, हा भाग आहे. सोबतच विदर्भातील नंदनवन म्हणून प्रख्यात असलेले चिखलदरा हे पर्यटन स्थळही इथेच आहे. या सुंदर मेळघाटात एक वास्तव लपलेलं आहे. ते म्हणजे भीषण पाणीटंचाईचे.विविधतेने नटलेल्या मेळघाटात तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत. येथील नागरिकांना कोसोदूर डोंगर दऱ्यात पायपीट करत  दूरवरच्या गावातून मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागते. शासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र तोही तोंडाला पाने पुसल्यासारखाच. गावातील नागरिकांना दिवसरात्र एकच चिंता असते ती म्हणजे मुबलक व शुद्ध पिण्याजोगे पाणी कुठे मिळणार? टँकरद्वारे मिळणारे पाणी लोकांचे आपसात भांडण होऊ नये म्हणून विहिरीत सोडले जाते. मात्र तेही गढूळ असल्याने रोगराईला आमंत्रणच असते . कावीळ, हगवण, ताप, अंगदुखी, पोटदुखी इत्यादी रोगांचा सामना येथील नागरिक सतत करत असतात.

डोंगराळ व उंचसखल टणक काळ्या दगडाचा भूभाग

मेळघाट हा भाग डोंगराळ व उंचसखल टणक काळ्या दगडाचा असा भूभाग आहे. या भागात घनदाट जंगल असल्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात होतो . परंतु  डोंगरमाथ्याचा भाग असल्याने याठिकाणी जेवढा पाऊस होतो ते पावसाचे पाणी या भागातून वाहून जाते. या पाण्याचा फायदा पायथ्याशी असलेल्या अचलपुर, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव या भागाला होतो. पावसाच्या पाण्याने जेवढा पाणी विहिरीत जमा होत असतो तो पाणी कसा तरी जानेवारी महिन्या पर्यंत पुरत असतो.

यातच खडीमाल हे गाव अमरावती धारणी मार्गावरून सेमाडोह येथून साधारणतः ४० किमी आत डोंगर दऱ्यांच्या कुसीत बसलेले. या गावाची लोकसंख्या जवळपास १५०० असून एकूण घरे ३११ आहेत. या गावाला जाण्याकरिता डोंगर घाटांचा रस्ता असून, थोड्या दूर पर्यंत डांबरीकरण, सिमेंटचा तर मोठ्या प्रमाणात गिट्टीचा कच्चा रस्ता आहे. या गावाला कोणतेही वाहतुकीचे साधन नसून नागरिकांना खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही.

या गावातील मुख्य समस्या पाणीटंचाई आहे. देश स्वतंत्र्य झाल्या पासून या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. दिवाळी नंतर म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून तिथे पाणीटंचाई निर्माण होत असते. तर फेब्रुवारी महिन्यापासून, येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावात चार विहिरी दोन गावात तर दोन शेतारानात, मात्र या चारही विहिरीला पाणी नाही. सोबतच गावात येते वेळेस लागत असलेल्या विहिरी जवळ एक कूपनलिका (हापसी/हँडपम्प) आहे. ती सुद्धा कित्येक वर्षांपासून बंद असल्याचे दिसून येते. तिला दांडा नसून समोरील चेन सुद्धा नाही. व जंग चढलेली कोरडी पडून आहे. त्याचसमोर असलेली विहीर व गावच्या पुढील भागात असलेली विहिरी साधारणतः ३० ते ३५ फूट खोल परंतु दोन्ही विहिरीना पाणी नाही.

विहिरीचे आतील काही भाग दगडांने बांधलेला व खालचा भाग हा काळा टणक दगडाचा असल्याने त्यांना झरे नाहीत. त्यामुळे त्या विहिरीत टँकरद्वारे पाणी ८ किमी दुरून आणून सोडले जाते. दिवस भरात दोनदा टँकर येतो एक सकाळी ८ च्या सुमारास व सांयकाळी ४ च्या सुमारास. टँकर कधी येणार? याची चातकासारखी येथील महिला, पुरुष लहान मुलेमुली वाट बघत असतात. नजरेला दूरवरून टँकर दिसला की, गावातील भीड एकदम तुटून पडते. जसे पटातील बैल शर्यतीत धावू लागतात जिंकण्यासाठी, तसेच या गावातील नागरिकांची जीव घेणी स्पर्धा सुरू होते, पाण्यासाठी.

टँकर पोहचण्या आधीच भांडे बकेट घेऊन येथील लोक जणू युद्धातील जवानां सारखे तयारीत असतात. व फायर असा आवाज म्हणजेच टँकरमधील पाणी विहीर पडायला सुरुवात झाली, तर घरातील बळकट मुलगा मुलगी किंवा महिला पुरुष कोणताही सहारा नसताना विहिरीच्या तोंडीवरती साधारणतः शंभरेक लोक हे जवानासारखे गोळ्या चालवायला म्हणजेच पाणी ओढायला सुरुवात करतात. पाणी ओढताना विहिरीत बघितल्यास असे वाटते की, जणू मकर संक्रांतीच्या पतंगी ह्या आभाळात उडत असून, एक दुसऱ्यांच्या पतंग कापण्यात जसा पेच लागतो. तसाच प्रकार विहीरितील पाणी ओढतानाच्या दोरांचा दिसून येतो.

हा एवढा भयानक प्रसंग असतो की, कधी कुणाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू होईल याचा काही नेम नाही. समजा विहिरीत कुणी पडला की सरळ देहावसान, कारण विहरित पाणी कमी आणि खाली पूर्णतः टणक दगडांचा भाग यामुळे यांना जीव सांभाळून पाणी काढावे लागते. परंतु इथे यांना इतके सुख नाही. जितका आपल्या भागातील विहिरीवर एक तर मोटार बसवून पाईपलाईनने, पाणी घराच्यावरती बसवलेल्या टाकीत नेले जाते. किंवा हळुवार निवांत एकेकाने येऊन आपल्या परीने पाणी काढता येईल.

मात्र ही एक जीवघेणी जादू समजावी काय? 

कोणत्याही प्रकारे एक दुसऱ्यांच्या दोरांचा गुंतवडा होत नसून, सगळे जण पाणी ओढत असतात. सर्वचजण विहिरीच्या तोंडीवरती उभे असल्याने एक दुसऱ्यांना धक्का बुकी लागताना सुद्धा मोठ्या हिंमतीने पाणी ओढताना दिसून येतात. मात्र यात कोणताही हिंसक प्रकार घडत नाही. सर्वांचे येथे एकच मिशन ते म्हणजे मला जास्त पाणी कसे मिळवता येईल. दुसरीकडे पाणी ओढण्याची बकेट वरती आली की, लहान मुलां पासून  त्यांचे इतर सोबती हातात बकेट छेलून, आणलेल्या भांड्यात पाणी घालतात. भांडे भरले की तिसरी व्यक्ती डोक्यावर दोन ते तीन गुंड ठेऊन व हातात एक घेऊन पायदळ अनवाणी पाणी घरी साठवणूक करण्याचे काम करतात. कित्येक लहान मूल मुली हातात वही पेन किंवा पाठीवर दप्तराचा ओझा शोभणाऱ्या वयातील त्यांच्या डोक्यावर गुंड आणि पायात चप्पल नसल्याने, भर उन्हात पायाला गरम चटके सहन करत पाणी नेताना दिसून येतात. इतकेच नव्हे तर वृद्ध महिलांपासून गर्भवती महिलां सुद्धा असतात. एक तर पाणी काढताना किंवा डोक्यावर गुंड घेऊन जाताना दिसतात.

टँकरचे पाणी संपले? तर…

एक टँकरमध्ये ५ हजार लिटर पाणी येते. आणि विहिरीत ते पाणी घातले की, अर्ध्या तासाच्या आत पाणी संपून जाते. कित्येकांना तर पाणी मिळतच नाही. मग अशावेळी ज्यांच्याकडे साधने आहेत ती मोठे ड्रम वैगेरे घेऊन आपल्या वाहनाने ६-७ किमी दूर अंतरावरील गावातून पाणी आणतात. परंतु ज्यांच्याकडे वाहने नाहीत ते, पायदळ ३ किमी दुरून डोंगर दऱ्या चढून उतरून नदी नाल्यात असलेल्या झऱ्यातून पाणी आणतात. ही तिथे लहान मुलांपासून तर मोठ्या पर्यंत दोन तीन गुंड डोक्यावर घेऊन डोंगर चढत पाणी आणावे लागते.

कधीकधी पाणी मिळत नसतो, आज मला एकही पाणी मिळाला नाही. महताऱ्यांना एकही पाणी मिळत नाही. – रेखा संजय जमुनकर

सामान्य माणसाला साधे एक किमी सपाट भागात, या कडक उन्हातच नाही तर सामान्य दिवसात सुद्धा चालायला जिव्हारी येते, तिथे डोक्यावर दोन तीन गुंड व हातात एक पाणी काढण्याची बकेट घेऊन पाणी आणावे लागते. यातही पायात चप्पल नाही. समजा चुकून काटा रुतला, दगडाची ठेच लागली, पाय घसरले तर काय दुःख या माऊलीनां सहन करावे लागते असेल? सोबतच डोंगळ दऱ्यात जायचं म्हटलं तर रानटी जनावरांचा धोका नेहमीच सोबतीला. यातच गावातील काही गर्भवती महिला सुद्धा या डोंगर दऱ्या चढून पाणी आणताना दिसतात. ही तर सर्वात भयानक स्थिती म्हणावी लागते.

डोक्यावर दोन तीन गुंड शरीराचे बेहाल..

महिलांचे म्हणणे आहे की, घरची कामे आटपून दिवसभर सतत पाणी आणत असल्याने, डोक्याचा भाग हा चेपलेला वाटत असून सतत डोके दुखत असते. संपूर्ण शरीराला दुखणं भरत असते. ताप येत असतो. कंबरेचा तसाच मणक्याचा त्रास सतत सहन करावा लागत असतो. रात्रीला वीज नाही, त्यामुळे सुखाची झोप ही नाही. व पुन्हा पहाटे पासून तर रात्री झोप पर्यंत हीच स्थिती, असल्याने पूर्ण वेळ हा पाणी साठवणूक करण्यात जात असतो.

यातच एक गर्भवती महिला नमाये रामा दहिकार म्हणाली की, आठ महिन्यांपासून गर्भवती असून घरची कामे करून, कधी विहरीतून तर कधी दूरवर असलेल्या डोंगर दऱ्या पार करत, नदी नाल्यातील झऱ्यातून पाणी आणत असते. विहरिवरील धक्काबुक्कीच्या ठिकाणी पाणी आणायला जायची भीती वाटते. पाणी आणल्या नंतर पूर्णतः शरीराला दुखणं भरत असून मांडया व पाय दुःखत असतात, कंबर दुखत असल्याची वेदना त्यांनी सांगितली.

पाण्याचे रोगराईला आमंत्रण…

दूषित पाणी मिळत असल्याने रोगराईला आमंत्रण मिळत असून, पाणी वाचवण्यासाठी येथील लोक उघड्यावर संडासला जातात. यामुळे दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भीती निर्माण होते आहे. सोबतच टँकर द्वारे मिळणारे पाणी गढूळ असल्याने येथील लोकांना पोटदुखी, अंगदुखी, हगवण, ताप, सर्दी, खोकला तसेच कावीळ इत्यादी रोगांचा सामना करावा लागतो.

रामकली लाभो जमुनकर आशा सेवक – संडास उलटीमुळे न मुलांना अमरावती अचलपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन दिवसात, इतका पाणी खराब आहे.

गाव सोडावं की तुमच्या राजकारणासाठी थांबावं?

गावात एक बोअर केली पण तिलाही पाणी लागले नाही. गाव सोडून जावं आणि पावसाळ्यात वापस यावं असे येथील लोकांची मानसिकता आहे. निवडणूका आल्या की, नेते प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरतात. आम्ही तुमच्यासाठी अमुक तमुक करू असे मोठया बाता फेकून येथील भोळ्या भाबड्या, अशिक्षित आदिवासी जनतेची फसवणूक करतात. एकदा निवडणूक संपली की, कुणीही साध ढूकुनही बघत नाही, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. आम्हाला वाहतुकी करिता पक्का रस्ता आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी पाहिजे अशी या लोकांची मागणी आहे. परंतु येथील लोकांची मागणी ऐकायला निवडणूक प्रचारातील मोठी आश्वासन दिलेले नेतेगण निवडून गेले की, ऐकायला ही येत नाहीत. नुसते नेतेच नाही तर अधिकारी सुद्धा येऊन बघत नाहीत. ग्रामसेवक, तलाठी सुद्धा गावात राहत नाहीत. एसी वाले अधिकारी तर दूरच राहिले आहेत.

गावातील नागरिक बोलताना म्हणाले, गावाजवळ धरण बांधण्यात यावे. व वाहतुकी करिता पक्का रस्ता तयार करून मिळावा. जेणेकरून त्यांना सुखाचे दिवस बघता येतील.

पाण्याअभावी उघड्यावर संडास, जनावरे दुबळी

पिण्यासाठी पाणी नाही तर अंघोळीला व वापरायला पाणी कुठून आणावे? सोबतच येथील सर्व लोक हे पाणी वाचवण्यासाठी उघड्यावर संडासला जातात. यामुळे दुर्गंधी व रोगराई पसरण्याची भीती निर्माण होते आहे. जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरे कमी पाणी पितात. कारण, हिरव्या चाऱ्यामार्फत त्यांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागविली जाते. हिरव्या चाऱ्यामध्ये ६५ ते ८५ टक्के पाणी असते. १५ ते ३५ टक्के शुष्क भाग असतो. मात्र, उन्हाळ्यात खायला हिरवा चारा नसल्याने जनावरे सुका चारा खातात आणि त्यामुळे त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढत असल्याने, पाण्याच्या कमतरतेमुळे येथील जनावरे दुबळी होत चालली आहेत.

मानवाला दिवसाला तीन लिटर पाण्याची आवश्यकता असते तर लहान जनावरांना ४ ते ६ लिटर तर मोठ्या जनावरांना साधारणतः ४० ते ५० लिटर पर्यंत पाण्याची गरज भासत असते. त्यातही दुभत्या व गाभण जनावरांना ५ लिटर पेक्ष्या जास्त अधिकचे पाणी लागते. गायी-म्हशींना पाणी कमी पाजल्यास त्यांची दुग्धोत्पादन क्षमता असतानाही घट येते. यामुळे येथील नागरीकांपेक्षाही जनावरांची स्थिती बेहाल आहे. पशुसंवर्धन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांची तर चांगलीच फजिती होताना दिसते.

शासन प्रशासन कधी लक्ष घालणार?

विदर्भाचे नंदनवन व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मेळघाट मागे तसेच आदिवासींच्या मागे लपलेल्या भयाण वास्तवाकडे नेते आणि अधिकारी कधी लक्ष देणार?  नावापुरते प्रयत्नशील न राहता, त्यांना शहरी, निमशहरी व इतर सामान्या जीवाप्रमाणे नैतिक जबाबदारी स्वीकरून मूलभूत गरजा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तरच या देशातात अमृत महोत्सव साजरा करण्याचे फलित होईल.

(लेखक ‘उद्धार’ फौंडेशनचे अध्यक्ष आहेत )

8796455216

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here