रामा इकडून जाताना शेतकऱ्याचा माल भरायचा आणि कामठवाड्याच्या थोडं पुढे गेलं की बिनधास्त गाडीत अंगावर घोंगड घेऊन ताणून द्यायचा. पहाटे यवतमाळातील यादवचे हळे आले की बैलांचे पाय आपोआप थांबायचे. रामाच्या लक्षात यायचे की बैलांना तहान लागली. रामा बैलांच्या खांद्यावरून जू काढायचा. बैलांना भरपेट पाणी पाजायचा. पुन्हा जुवाला बैल जुतले की यवतमाळच्या मार्केटात घेऊन जायचा. परतीच्या वेळी कामठवाडा आणि चाणी येथील दुकानदाराचा किराणा त्याच्या गाडीत भरायचा. जवळपास तो पंधरा-वीस क्विंटल माल असायचा. बैलांना तो पोटभर खाऊ घालायचा आणि सायंकाळ झाली की हळूहळू तो कामठवाड्याच्या दिशेने निघायचा. पुन्हा त्याच हळ्यावर बैलांना पोटभर पाणी पाजायचा आणि घाट संपला की गाडीवान गाडीतच झोपून जायचे. तोच नाही तर सोबतीने असलेल्या सर्व बैलगाडीवान झोपायचे अन् बैलाच्या भरोश्यावर पुढचा प्रवास सुरु व्हायचा. बैल सवयीने मार्गक्रमण करत राहायचे. समोरुन प्रखर प्रकाशाचे वाहन आले की, बरोबर बाजूलाही व्हायचे. सलग तीस ते पस्तीस वर्ष ही अव्याहत वाहतूक सुरु होती पण कधी अपघात झाला नाही की कधी चोरी.