-वसुंधरा काशीकर
अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष रुझवेल्ट यांची एक फारच प्रगल्भ सवय होती. ती सवय कम्युनिकेशनच्या विदयार्थ्यांनी आणि नातेसंबंधासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या समुपदेशकांनी अभ्यासण्यासारखी आहे. अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे प्रचंड तणाव आणि जबाबदारीचं पद. प्रेसिडेंट रुझवेल्ट खूप तणावात असले वा मूड खराब असला तर बायकोला घरात प्रवेश केल्या केल्या सांगत, ‘’माझा मूड खराब आहे, माझ्याशी बोलू नकोस कारण मी अकारण चिडचिड करु शकतो आणि तू न बोलताही मी चिडचिड केली तर दुर्लक्ष कर’’…
याने काय झालं असेल तर त्यांच्यात उद्भवू शकणारे अनेक तणाव उद्भवलेच नाहीत आणि नातं करपण्यापासून वाचलं.
थोडक्यात काय तर आपल्या आनंदाच्या जागा आपल्याला जितक्या माहिती असायला हव्यात तितक्याच आपल्या ताणाच्या, ट्रिगर्सच्या जागाही आपल्याला माहिती असायला पाहिजे.
आजचा काळ तर सर्वच अर्थानं प्रचंड गुंतागुंतीचा काळ आहे. वेगानं बदलत जाणारं तंत्रज्ञान, जीवनाची प्रचंड वाढलेली गती, कुटुंब संस्थेतील बदल, जीवनशैलीतील बदल, त्यातून आलेला एकटेपणा, भकासपणा…मोठ्या शहरांमधे होणारं ऊर्जेचं शोषण, जाहिरातींमधून होणारा स्टेट्सचा मारा, ते टिकवण्यासाठीची केविलवाणी धडपड…ज्यात प्लास्टिक होत चाललेलं जगणं…
अशा सगळ्या अवस्थेत माणसांचे ट्रिगर्स वाढताहेत. माणसांची व्यक्तिगत अस्वस्थता, असमाधानाची कोणावर कधी भडास म्हणून निघेल सांगता येत नाही. त्यासाठी कोणतंही छोटं निमित्त आणि कारण पुरेसं ठरतं. सोशल मीडिया हे त्यासाठी उत्तम साधन झालंय. परवा माझ्या १२ वर्षांच्या मुलीनं कुठलंही प्रशिक्षण न घेता एडिट केलेला एक छान व्हिडिओ मी तीचं कौतुक करावं म्हणून फेसबुकवर टाकला. त्यावर एका व्यक्तीनं पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांवर तुमचं काय मत आहे मला विचारलं..या ठिकाणी मी रिअँक्ट करावं यासाठी रचलेला तो सापळा होता. पण तो वेळीच मी ओळखल्यानं त्यात मी अडकले नाही. त्या व्यक्तीलाही मी काही दोष देणार नाही. उलट अशावेळी तीच्या जखमा लवकर भरु दे अशी प्रार्थनाच मनात आली.
स्वत: सोबतच दुसऱ्यांचे ट्रिगर्स ओळखणं हे आज खूप गरजेचं झालंय. ते ओळखले नाही तर आपली प्रचंड ऊर्जा निरर्थक वादविवादात जाते. सिग्नलवर अगदी क्षुल्लक कारणासाठी होणारे भांडणं, अगदी क्षुल्लक गोष्टींवरून हमरीतुमरीवर येणं, शिवीगाळ करणं, अत्यंत व्यक्तिगत पातळीवर टीका करणं हे सर्व हेच दर्शवतं.
स्वत:वर काम करताना आपली नेमकी कोणत्या पॉईंटवर कुठे सटकते, चिडचिड होते हे सजगतेनं, जागरुकतेनं शोधणं खूप गरजेचं आहे. यात काही वैदयकीय आजारही असू शकतात. काहींना आवाजाची सेन्सेटिविटी असू शकते. काही विशिष्ट आवाज ऐकल्यावर अचानक संताप होऊ शकतो. बायपोलर डिसऑर्डर हा एक गंभीर मानसिक रोग आहे. यातही लोक अचानक विक्षिप्त आणि विचित्र वर्तन करतात. कधी खूप आनंदी तर कधी अगदी दु:खी राहतात. त्यांचे प्रचंड मूड स्वींग्ज होत असतात. अशा प्रकारचे मानसिक आजारांचं निदान होणं आणि त्यावर उपचार होणं गरजेचं आहे. मासिक पाळीच्या आधी किंवा पाळीमध्ये अनेक स्त्रियांची प्रचंड चिडचिड होते. त्यासंदर्भात घरच्यांना किंवा ऑफीसमधील सहकाऱ्यांना कल्पना देणं, त्यांच्याशी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे. झिम्मा २ च्या टीमची मी मुलाखत घेत होते. त्यात अभिनेत्री क्षिती जोगनं हा मुद्दा मांडला. ती म्हणाली, ‘’पाळीच्या काळात तीची प्रचंड चिडचिड होते आणि पाळीमध्ये स्त्रियांची होणारी मानसिक आंदोलनं या बाबतची प्रचंड संवेदनशीलता आणि जाणीव अभिनेता सिद्धार्थ चांदेकरमध्ये आहे हे ही क्षितीनं आवर्जून नमूद केलं’’. स्त्रियांचे हार्मोनल आक्रंदन पुरुषांना समजावेत म्हणून लहानपणापासून त्यांचं पॅरेंटिंग कसं होतं हे महत्वाचं आहे.
लहानपणी मनावर झालेले आघात (चाईल्डहूड ट्रॉमाज्) हे अनेकदा ट्रिगर्सचं कारण असतात. त्या जखमा बसलेल्याच नाहीयेत हे लक्षात येत नाही आणि त्यातून वाहणारं रक्त इतरांच्या कपडयांवर डाग पाडतं. आई-वडिलांमधला बेबनाव असेल, कधी आलेला एखादा विचित्र लैंगिक अनुभव असेल, अभाव आणि दारिद्र्याचं विदारक दर्शन असेल, कोणा प्रिय व्यक्तीचा बघितलेला मृत्यू असेल, प्रेम मिळालं नसेल, किंवा लैंगिक-सहजीवनातील असमाधान असेल..कितीतरी कारणं… या जखमा नंतर ब्लिड करत राहतात. सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू एकार्त टोल याला ‘पेन बॉडी(pain body)’ असं म्हणतात. एकाच शरिरात दोन व्यक्ती राहाव्यात तसा हा एक वेगळाच दु:खी, जखमी माणूस आपल्या शरीरात वसत असतो. त्याच्या जखमांवर मलमपट्टी आणि दु:खाचं हिलींग केलं नाही तर त्याची दुर्गंधी इतरांना झेलावी लागते. यातून माणसाचे वैयक्तिक नातेसंबंध तुटणे ते व्यावसायिक किंमत चुकवावी लागणे हे नुकसान होते तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे. म्हणून लोकांबद्दल एकदम जजमेंटल न होता, न्यायाधीशाच्या भूमिकेत न जाता थोडा वेळ दयायला हवा. एखादया पुस्तकाचं ५४७ वं पान काढून त्याबद्दल निष्कर्श काढण्यासारखं आहे ते…तुम्ही आधीची ५४६ पानं वाचली आहेत का? निदा फाज़लींचा फार इनसाईटफूल शेर आहे..
हर आदमी में होते हैं दस-बीस आदमी
जिसको भी मिलना कई बार मिलना…
एक प्रसंग सांगते, एका रिसर्च प्रोजेक्ट निमित्त काही मुलाखती घेत होते. कोल्हापूर-सांगली असा दौरा होता. गाडीमध्ये मला मदत करायला एक गृहस्थ बसले होते. ते सतत बोलत होते. स्वत:बद्दल सांगत होते. स्वत: काढलेले फोटो सतत मोबाईलवर मला दाखवत होते. हळूहळू माझा संयम सुटू लागला. पण कसंतरी मी स्वत:ला थांबवलं.
दुसऱ्या दिवशी ते गेस्टहाऊसवर मला घ्यायला आले. बोलता बोलता त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला. बाबा मी ऑफीसला पोहोचलो असं तो त्यांना सांगत होता. त्याचा फोन ठेवल्यावर ते मनाशी म्हणाले, ‘’श्रीपादराजं शरणं प्रपदये’’..मला ते वेगळंच वाटलं. मग ते सांगायला लागले, मॅडम मुलगा नं रोज ऑफीसला जायला निघाला आणि पोहोचला की मला आणि त्याच्या आईला फोन करतो. मी आपल्या भारतीयत्वानुसार त्यांना सहज विचारलं, ‘काय करतो तुमचा मुलगा’’…तर ते गृहस्थ म्हणाले, ‘’मॅडम मला दोन मुलं आहेत..हा एका मोठ्या व्हॅक्सीन कंपनीत शास्त्रज्ञ आहे’’. मग मी स्वाभाविकपणे विचारलं दुसरा मुलगा काय करतो..त्यावर ते सांगायला लागले..की तो नववीत आहे. मी म्हटलं बरं…मग ते जे बोलले त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली…अक्षरश: मी थिजून गेले…ते म्हणाले, मॅडम माझा मुलगा नववीत गाडीची धडक लागून गेला. खूप हुशार होता तो. क्रिकेटमध्ये त्याला खूप रस होता. पण तो गेला हे मी मानतच नाही. म्हणून मी सांगतो मला दोन मुलं आहेत…
अक्षरश: काय बोलावं हे मला कळेना…डोळे वाहायचे थांबेनात…मला सगळं अचानक लख्ख प्रकाश पडावा तसं दिसलं…त्या गृहस्थांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला होता. म्हणून हे अति बोलणं…व्यक्त होणं सुरू होतं…काल मी त्यांना रागावून प्रतिक्रिया दिली असती तर…
परत एकदा ५४७ वं पान आठवलं…
स्वत:चे आणि इतरांचे ट्रिगर्स ओळखता आले तर कुठे वादाला उत्तर दयायचं कुठे दुर्लक्ष करायचं, कोणता मुद्दा किती ताणायचा आणि कुठे सोडायचा याचं तारतम्य येईल. “मी दु:खी आहे, मला समस्या आहे. लोकांनी मला समजून घ्यावं’’ असं सतत इतरांना सांगणारी आमची एक मैत्रिण..तीला एकदा मी शांतपणे “तू कधी इतरांच्या समस्या आणि दु:ख समजून घेणार आहेस. लोकांनी तुला सतत समजून घेण्याचा ठेका घेतला आहे का?’’ हा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न तीला विचारुन भानावर आणणं गरजेचं होतं.
थोडक्यात माईंडफुलनेस हा ट्रिगर्स आणि ट्रॉमाज् ओळखण्याचा मंत्र आहे. ते ओळखता यायला लागले, त्याकडे साक्षी भावानं बघता यायला लागलं की आपोआप जगण्याची, प्रतिक्रियांची आणि प्रतिसादाची गुणवत्ता वाढेल. मग प्रतिक्रिया-रिअँक्शन येणार नाही तर प्रतिसाद-रिस्पॉन्स येईल…
कहते हो की ग़म से परेशान हुए जाते हैं
ये नही कहते की इन्सान हुए जाते हैं…
आणि स्वानुभवावरुन सांगते तारतम्याच्या साधनेचा हा प्रवास फार उन्नत करणारा आहे..श्रीमंत करणारा आहे…
(लेखिका कन्टेन्ट रायटर व नामवंत सूत्रसंचालिका आहेत)








