उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारायला नको होतं . सुरुवातीला जनतेच्या भावनेला हात घालत ते बोलले चांगले ; इतके छान बोलले की , ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री वाटले . समाज मध्यमांत तर उद्धव ठाकरे ‘सुपर डुपर हिरो’ ठरले . त्यांनी टोमणेबाजीही झकास केली . भाजपशी युती तोडून महाविकास आघाडीत आलेले उद्धव ठाकरे एका रात्रीत डावे , पुरोगामी आणि समाजवादी वर्तुळात ‘पवित्र ’ ठरण्याचा विरोधाभास घडला ; हेही खरं तर मिथकच होतं . कोण जाणे कोणाच्या आहारी जाऊन त्यांनी नरेंद्र मोदी , भाजप आणि केंद्र सरकारशी मर्यादा ओलांडून पंगे घेतले . मात्र मुख्यमंत्रीपद हा २४x७ जॉब असतो हे उद्धव यांना उमगलंच नाही . मात्र , त्यांचं प्रशासन आणि महाविकास आघाडीवर कोणतंही नियंत्रण नव्हतं ( प्रशासनाचा अनुभव नसल्याची कबुली त्यांनी जास्तच प्रामाणिकपणे दिली . ) शिवसैनिकांशी असणारा त्यांचा थेट संपर्क या काळात हळूहळू खंडीत होत गेला . शिवसेनेची अवस्था या काळात धनुष्याला बाणा ऐवजी काँग्रेसचा हात आणि त्या हाताला (महा)राष्ट्रवादीचं घडयाळ अशी झालेली होती ! त्यातच भाजपनं त्यांना हिंदुत्वाच्या सापळ्यात अलगद अडकवलं . या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याच पक्षात बंडाळीची बीजं पेरली जात आहेत आणि नंतर ती नुसतीच अंकुरलेली नाही तर चांगलीच फोफावली आहेत याचा कोणताही अंदाज उद्धव ठाकरे आणि ते ज्यांच्यावर विसंबून होते त्या चाणक्यांना आला नाही , ही तर अक्षम्य चूक होती . त्यात प्रकृतीच्या कारणाची भर पडली . परिणामी सर्वाधिक नुकसान शिवसेनेचं झालेलं आहे . शिवसेना संपावी अशी शरद पवार यांची खेळी होती असंही म्हटलं गेलं ; त्यात तथ्य असेल तर तोही राजकारणाचा एक भाग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे . मात्र बंडाळीची ज्योत पेटल्यावर ‘ती शिवसेनेची अंतर्गत बाब आहे’ हे शरद पवार म्हणाले तेव्हाच उद्धव ठाकरे लढाई हरले होते . हे राजकारणी शरद पवार यांना शोभेसं होतं पण , त्यामुळे ‘पवारालंबी’ ( या शब्दाचे जनक ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आहेत . २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाऊ आणि मी एबीपी माझा या प्रकाश वृत्त वाहिनीवर होतो तेव्हा त्यांनी हा शब्द प्रथम प्रयोगात आणला होता . ) उद्धव ठाकरे या सत्ता संघर्षात एकाकी पडले .
अप्रतिम सर अतिशय उत्तम पद्धतीने शिवसेनेच्या बंडाची मांडणी केली व आजच्या राजकीय घडामोडीचे विश्लेषणही अतिशय उत्तम पद्धतीने मांडले ग्रेट सर