राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आतापर्यंत फाटाफूट का झाली नाही?

 

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
  -रमेश पतंगे   
       हिंदूंचे संघटन करत असणारा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे झाली तरी  अजूनपर्यंत  फुटला कसा नाही?   याचे आश्चर्य अनेकांना वाटते. बाहेरच्या लोकांना फारशी माहिती नसते; पण संघात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले नाहीत, असे नाही. दिल्ली, महाराष्ट्र, गोवा इत्यादी ठिकाणी संघात फूट पाडून वेगळा संघ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. परंतु त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे जे काम करतात ते देशहिताचेच असते, नि:स्वार्थी भावनेेचे असते. समाजहिताची त्यात कळकळदेखील असते. असे जरी खरे असले तरी, संघातील फार मोठा स्वयंसेवक वर्ग त्यांच्या मागे जात नाही, हे देखील तेवढेच खरे. 

           राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय हिंदू समाजसंघटनेचे आहे. हिंदू समाजाचा स्वभाव संघटित होऊन न राहाण्याचा आहे. हिंदू व्यक्ती जेवढ्या संघटना उभ्या करतात तेवढ्या संघटना दहा-पंधरा वर्षांतच फाटाफूट होऊन अनेक संघटना होतात. हिंदूंच्या राजकीय पक्षांपासून सुरुवात केली तर, महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक तुकडे झाले. हिंदूंच्या राजकीय आकांक्षांचा विषय घेऊन सुरू झालेली शिवसेनादेखील फुटत चालली. राष्ट्रवादी पक्षांचे दोन तुकडे झाले, कम्युनिस्ट पक्षही फुटले. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जरी स्वत:ला हिंदू म्हणून घेत नसले तरी डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बीलात हिंदूंची जी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येत ते बसतात. त्यांच्या एका रिपब्लिकन पक्षाचे मोजता येणार नाही तेवढे तुकडे झाले आहेत.

         हिंदू अनेक धार्मिक संघटना उभ्या करतात. या संघटना एखाद्या सिद्ध धर्म पुरुषाच्या नावाने चालतात. त्यातही फाटाफूट  होते. समर्थ रामदास स्वामींच्या नावाने चालणार्‍या दोन-तीन संघटना आहेत. त्यांचे आपापसात पटत नाही. स्वामी समर्थ यांच्या नावाने चालणार्‍या अनेक संघटना आहेत. प्रत्येक संघटना स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. साईबाबांच्या नावाने चालणार्‍यादेखील अनेक संघटना आहेत. इतिहास काळातील धार्मिक संघटनांविषयी न लिहिलेले बरे! अन्य हिंदू संघटनांत फुट पडते. संघात ती पडत नाही, याचे कारण काय? संघाविषयी अभ्यास करणारी अनेक मंडळी आहेत. त्यातील बहुतांश कधी संघात गेलेली नसतात. ते संघासंबंधी लिहिलेली पुस्तके वाचतात, संघ अधिकार्‍यांची भाषणे ऐकतात, चार-दोन संघ स्वयंसेवकांशी चर्चा करतात आणि त्यावरून आपले पुस्तक तयार करतात. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना संघ एक का आहे? याचे उत्तर सापडत नाही.

             संघ संघटनेची रचना व्यक्ती आधारित नाही. सरसंघचालक हे संघ अधिकार्‍याचे सर्वोच्च पद आहे. जी गोष्ट कधी होणार नाही, त्याची आपण कल्पना करुया. ती म्हणजे, सरसंघचालकानेच संघाच्या मूळ ध्येयापासून बाजूला होऊन काही वेगळा विचार मांडला आणि त्या आधारे संघात फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर, त्यात सरसंघचालकांनादेखील अपयश येईल. बहुसंख्य स्वयंसेवक त्यांच्या मागे जाणार नाहीत. असे कोणत्याही अन्य संघटनेत घडणे अशक्य आहे. राष्ट्रीय संघटनेच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती पक्ष फोडीत असेल तर तिच्या मागे ९० टक्के पक्ष जातो. संघात ते अशक्य आहे. त्याचे कारण काय?

संघकामाची रचना तत्त्वावर आधारित आहे. व्यक्तीवर आधारित नाही. व्यक्ती येते आणि जाते. तत्त्वे कायम राहातात. ती अपरिवर्तनीय असतात. ती शाश्वत आणि सनातन असतात. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी हे बीज संघात इतके खोलवर रुजविले आहे की, त्यात बिघाड करणे कोणालाही शक्य नाही. संघकार्य हे तत्त्वनिष्ठ कार्य आहे. सिद्धांतनिष्ठ कार्य आहे. व्यक्तिसापेक्ष कार्य नाही. व्यक्ती कितीही मोठी असली तरी, त्या व्यक्तीचे संघातील मोठेपण ती व्यक्ती जोपर्यंत संघ विचार, तत्त्व, सिद्धांत यांच्याशी एकनिष्ठ आहे, तोपर्यंत असते. ज्या क्षणी ही निष्ठा पातळ होते, क्षीण होते, त्या क्षणापासून त्या व्यक्तीचे संघातील स्थान क्रमाक्रमाने ढळत जाते.

संघपद्धतीत शिस्तभंगाची कारवाई असा विषय नसतो. पदअवनती असा विषयदेखील नसतो. डॉ. हेडगेवारांनी एक अशी अद्भूत रचना उभी केली आहे की, जो स्वयंसेवक आपल्या तत्त्वापासून दूर जाईल तो आपोआप संघ स्वयंसेवकांच्या मनातून दूर जाईल. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज रहात नाही. अशा व्यक्तीविषयी संघस्वयंसेवक म्हणू लागतात की, हा स्वयंसेवक चांगला आहे. संघकामासाठी त्याने खूप कष्ट केले, पण त्याच्याकडे आता ती तत्त्वनिष्ठा राहिलेली नाही. तो आपल्या मार्गापासून दूर जात चाललेला आहे. त्याचा दूर जाण्याचा प्रवास हा स्वयंसेवकांपासून दूर जाण्याचा असतो.

          संघाचा तत्त्वविचार कोणता आहे? संघाचे पहिले तत्त्व आहे, हे हिंदू राष्ट्र आहे. हे हिंदू राष्ट्र शाश्वत सनातन सत्य आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करायचे नाही, हिंदू राष्ट्राची ओळख हिंदू विसरले आहेत. या ओळखीचे जागरण करायचे आहे. हिंदूपणाची ओळख याचे दुसरे नाव संघकार्य. संघाचे दुसरे तत्त्व आहे, भगवा ध्वज हा आमचा गुरू आहे. या गुरूपेक्षा संघात कोणी मोठा नाही. पहिला प्रणाम गुरूला आणि दुसरा प्रणाम अधिकार्‍याला. पहिला प्रणाम सरसंघचालकांना आणि नंतर भगव्या ध्वजाला, असे संघात चालत नाही. भगवा ध्वज हा आपला सनातन धर्म, सनातन संस्कृती, जीवनमूल्ये, जीवनपद्धती यांचे प्रतिक आहे. भगव्या ध्वजाची पूजा ही भगव्या वस्त्राची पूजा नसून ती या प्रतिकांची पूजा आहे. या प्रतिकांचे स्मरण स्वयंसेवकाने चोवीस तास करायचे असते.

              म्हणून संघाचे कार्य नेमके काय? हे सांगताना डॉ. हेडगेवार सांगून गेले, ‘आपला हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांचे रक्षण संघटित समाज शक्तीद्वारे करणे हे संघकार्य आहे.’ आपला सनातन धर्म कोणता? आपल्या देशात धर्माला रिलिजन म्हणतात. परंतु धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. रिलिजन ही विशिष्ट देवतेची, विशिष्ट ग्रंथाद्वारे, विशिष्ट कर्मकांडाद्वारे केलेली पूजा असते. धर्म याचा अर्थ समाजाची धारणा करणार्‍या शाश्वत आणि सनातन नियमांनुसार जीवन जगणे. म्हणून धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. ही गोष्ट भल्याभल्या पंडितांनादेखील समजत नाही किंवा ती समजून घेत नाहीत. संघाचा ज्यांना विचार करायचा आहे त्यांनी धर्माचा संघाचा हा अर्थ समजून घेऊन विचार करायला शिकले पाहिजे.

          धर्माचे रक्षण करायचे म्हणजे काय करायचे? आपल्या परंपरेचे एक महावाक्य आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो. धर्म रक्षण म्हणजे धर्माचे पालन. धर्माचे पालन म्हणजे धर्माच्या शाश्वत नियमांचे पालन. धर्माचे शाश्वत नियम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, दया, क्षमा, दम (दमन), इंद्रीयनिग्रह, धी(विद्या), अक्रोध हे सांगितले गेले आहे. प्रत्येक व्यक्तीने त्या प्रमाणे जगावे लागते. उदा. कुठल्याही प्राण्याची हिंसा करता कामा नये. सर्वांविषयी दया आणि क्षमाभाव मनात ठेवला पाहिजे. ज्ञानाची उपासना केली पाहिजे. क्रोधाच्या आहारी जाता कामा नये. हे सर्व जगावं लागतं.

              संघ जेव्हा म्हणतो की, संघाला धर्मरक्षण करायचे आहे, म्हणजे, भारतातील मंदिरांचे रक्षण करायचे आहे, व्रतवैकल्याचे रक्षण करायचे आहे, यात्रांचे रक्षण करायचे आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. संघाच्या धर्म रक्षणाचा अर्थ होतो, धर्म नियमांप्रमाणे प्रत्येक हिंदूंनी जगले पाहिजे. धार्मिक आचार हे वेगवेगळे असतील. काहींना कुंभस्नान करण्याने लाभ होतो, असे वाटते. काहींना वाटणार नाही. हा ज्याच्या त्याच्या मन:स्थितीचा प्रश्न आहे; परंतु शाश्वत नियमांसंदर्भात तसे नसते. त्याचे पालन केलेच पाहिजे. ते केले नाही तर, धर्म क्षीण होतो, समाजात अनिती निर्माण होतो, अनाचार निर्माण होतात आणि संस्थेत फाटाफुट निर्माण होते. एवढे त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
धर्माचा अविष्कार कालानुरूप बदलत जातो. ‘अहिंसा परमो धर्मा:’ हा शाश्वत नियम असला तरी, या नियमाचा असा अर्थ करून चालत नाही की, आपल्याला मारायला आलेल्या शत्रूलादेखील अहिंसा धर्माचे पालन करून क्षमा केली पाहिजे. आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसूनच ठार मारावे लागते. भगवान गौतम बुद्धांच्या काळी असले आतंकवादी नव्हते. फक्त प्राण्यांची हिंसा केली जात असे आणि तेही असे प्राणी जे मानवी जीवनाला फार उपकारक आहेत. भगवान बुद्धांच्या हिंसा त्यांच्या संदर्भात आहेत. हीच गोष्ट महावीरांची आहे. गुरूनानक देव आणि गुरूगोविंद सिंग यांच्या काळात देखील अहिंसा धर्म होता. पण गुरू गोविंद सिंगांनी म्हटले, ‘सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज़ तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं’ त्यांना असे म्हणावे लागले कारण, मुस्लिम आक्रमकांनी हिंदूंच्या रक्ताच्या नद्या वाहविल्या होत्या. बेसूमार कत्तली सुरू केल्या होत्या. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे होते. गुरू गोविंद सिंगांनी खालसा पंथ निर्माण करून हेच कार्य केले.

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जेव्हा म्हणतो की, धर्मरक्षण हे संघाचे मुख्य काम आहे. हिंदू संघटन कशाला करायचे? याचे उत्तर असे की धर्म रक्षणासाठी करायचे. धर्म रक्षणासाठी का करायचे? याचे उत्तर असे की, आपला धर्म हा मानवधर्म आहे. मानवाला सर्व प्रकारे सुखी आणि समृद्ध करण्याचे सामर्थ्य या धर्मात आहे. माणसाने नीतीमान असले पाहिजे. विश्वातील सर्व जीवसृष्टीचा त्याने विचार केला पाहिजे. आपण सर्व एका अविनाशी चिरंतन अशा तत्त्वाची रूपे आहोत. चैतन्य रूपाने आपण सर्वव्यापी असतो. मनुष्य हा एकाकी प्राणी नसून तो आपल्या अस्तित्वाने सर्व मानवाशी जोडला गेलेला आहे. चराचर सृष्टीशी जोडला गेलेला आहे. असा आपला धर्म आहे. त्याचे रक्षण मानवी सुखासाठी आणि कल्याणासाठी करायचे. हा संघाचा उत्तुंग ध्येयवाद आहे.

            डॉ. हेडगेवारांनी म्हटले म्हणजे संघाने म्हटले की, आम्हाला आमच्या संस्कृतीचे रक्षण करायचे आहे. देशाची संस्कृती शंभर-दोनशे वर्षांत निर्माण होत नाही. त्यासाठी हजारो  वर्षे द्यावी लागतात. आपली संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे ती लाखो वर्षे अखंड वाहत आहे. या संस्कृतीने काही शाश्वत मूल्ये आम्हाला दिली आहेत, त्यातील काही मूल्ये अशी -सर्व समावेशकता : आपली संस्कृती कोणालाही वगळायला शिकवित नाही. सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. विशिष्ट प्रकृतीचे आणि प्रवृत्तीचे समूह तयार होतात. कोणी त्याला वर्ग म्हणतात, कोणी जाती म्हणतात. त्यांची त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य असतात. त्याचे जतन करायचे आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचे.

           आपल्या संस्कृतीचे दुसरे वैशिष्ट्य आहे, सृष्टीत जी विविधता आहे आणि मानवी जीवनात जी विविधता आहे. त्यातील आंतरिक एकतेचे सूत्र शोधायचे. आपल्या पूर्वजांनी हे सूत्र शोधून काढले. ते म्हणाले की, हे सर्व विश्व जे आहे, ते ईश्वरनिर्मित आहे. सर्व प्रकारची स्थावर जंगम मालमत्ता ईश्वरनिर्मित आहे. तिच्यावर कोणाचाही एकाधिकार निर्माण करता येत नाही. सर्व मानवांनी या संपत्तीचा त्यागपूर्ण भोग केला पाहिजे. म्हणजे काय तर, आपले जीवन यातन करण्यासाठी जेवढे आवश्यक आहे, तेवढेच स्वीकारले पाहिजे. त्याहून अधिक घेता कामा नये. हा ईशावास्योपनिषदाचा पहिला मंत्र आहे. एक चैतन्याची आपण सर्व विविध रूपे हे एकतेचे महान सूत्र आहे. ते सर्वंखलू इदं ब्रह्म या शब्दांनी सांगितले जाते.  आपल्या संस्कृतीची तिसरी महान देणगी आहे, ती म्हणजे सत्य एकच आहे, त्याची अनुभूती वेगवेगळ्या प्रकारे घेता येते. प्रत्येकाच्या अनुभूतीमध्ये विविधता राहते. त्यातून संप्रदाय निर्माण होतात. काही अर्धवट लोकं त्यातून सांप्रदायिक भेद निर्माण करतात. ती आपली मूळ प्रवृत्ती नव्हे. सर्व दर्शने सत्य आहेत. सर्वांचा समान आदर केला पाहिजे. कोणी जैन मार्गी असेल, कोणी बौद्ध मार्गी असेल, कोणी वेदांती असेल, कोणी दत्तसंप्रदायांचा असेल, तर कोणी वारकरी असेल. सगळे मार्ग सत्य आहेत. एकाच शाश्वत सत्याची वेगवेगळी रूपे आहेत. हा आपल्या संस्कृतीचा महान मंत्र आहे.

       आपल्या संस्कृतीचे पुढील वैशिष्ट्य आहे, जीवसृष्टी आणि वनस्पती सृष्टीशी संतुलन राखत जगण्याचे. आपण वृक्ष पूजक आहोत, तसे पशू पूजकही आहोत. ज्यांना यातील महान आशय समजत नाही, असे अर्धवट पंडित त्यावर शेरेबाजी करतात. वृक्षांमुळे आपले जीवन आहे आणि प्राण्यांमुळेदेखील आपले जीवन आहे. जीवसृष्टीची एक जीवशृंखला आहे आणि वनस्पतींचीदेखील एक जीवशृंखला आहे. आता त्याला पर्यावरणशास्त्र म्हटले जाते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला पर्यावरण शास्त्रासारखे अवजड शब्द दिले नाहीत. त्यांनी सांगितले वृक्षांचे संवर्धन करा, प्राण्यांवर दया करा, तुळशीचे रोप अंगणात लावा, लिंबाच्या वृक्षाचे समर्थन करा, पक्षांना पाणी द्या इत्यादी.

            राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्म संस्कृतीच्या रक्षणाचे ध्येय ठेवले आहे. धर्म आणि संस्कृती या दोन शब्दांचे रक्षण नसून या दोन शब्दांत येणार्‍या महान आशयाचे रक्षण हे संघकार्य आहे. या संघकार्यात राजकीय आशय शोधणे हे अज्ञानाचेे लक्षण आहे. राजकीय सत्ताप्राप्तीसाठी संघाची स्थापना झालेली नाही. संघस्वयंसेवक राजकारणात आहेत ते आपल्या कर्तृत्वाने मोठे होतात. सत्तास्थानी जातात. त्यांना सत्तास्थानी नेण्यासाठी संघकाम चालत नाही. संघकामाचे ते बायप्रोडक्ट आहे.

           संघ स्वयंसेवक ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात संघविचार, संघध्येय आणि संघमूल्य यांची जोपासना केली पाहिजे, अशी संघाची अपेक्षा असते. सर्वांना ते जमते असे नाही. संघ स्वयंसेवक झाल्यामुळे कोणी परिपूर्ण गुणसंपन्न होऊ शकत नाही. तो प्रथम माणूस असतो आणि प्रत्येक माणूस हा विकारवश प्राणी आहे. काही जणांना स्व विकारांवर नियंत्रण ठेवण्यास जमतं, काहींना जमत नाही. संघ स्वयंसेवक हा देखील माणूसच आहे. आणि माणसाचे गुणदोष त्याच्या ठिकाणीही असतात.

             राजकारणातील संघ स्वयंसेवक शतप्रतिशत संघमूल्यांना धरून व्यवहार करतात, असे कोणी म्हणू शकत नाहीत. त्या त्या क्षेत्राच्या काही मर्यादा असतात आणि मागण्या असतात, त्यानुसार त्यांचा व्यवहार राहातो. त्यात हा पास झाला, तो नापास झाला असे म्हणता येत नाही. प्रत्यक्ष जे संघकामात गुंतलेले आहेत, अशा कार्यकर्त्यांपुढे मोहाचे क्षण फार कमी येतात. अन्य क्षेत्रांत काम करणार्‍या कार्यकर्त्यांपुढे असे क्षण येण्याचे प्रमाण थोडे जास्त असतात. राजकीय क्षेत्रात ते सर्वाधिक असते. आणि मनुष्य हा सर्वगुणसंपन्न नसल्यामुळे मोहाला बळी पडणे हे स्वाभाविक असते. हे गृहीत धरावे लागते. याचा अर्थ त्याचे समर्थन करणे असा नव्हे.

            मा. दत्तोपंत ठेंगडी एक सुंदर उदाहरण देत असत. संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी कचदेव शुक्राचार्यांचे शिष्य होतात. शुक्राचार्य राजगुरू असतात. त्यांच्या कन्येचे नाव असते, देवयानी. ती कचाच्या प्रेमात पडते. कचाला मृत्यू संकटातून वाचविते. शेवटी कच संजीवनी विद्या प्राप्त करतो. देवयानी त्याला विवाहाची मागणी घालते. कच म्हणतो की, ‘मी या क्षेत्रात विशिष्ट काम करण्यासाठी आलो होतो. तू गुरू कन्या असल्यामुळे माझी बहीण आहेस, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही.’ आपले क्षेत्रातील काम झाले की पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन जायचे असते. सर्व कार्यकर्त्यांना दत्तोपंतांचा हा संदेश होता. हजारो कार्यकर्ते तो शब्दश: जगतात. काही जणांना ते जमत नाही, पण संघ हा मातृॠदयी आहे. ज्यांना जमत नाही तेही आपलेच आहेत आणि जे आपले आहेत तेही आपलेच आहेत.

               अशा संघाची शतकाची वाटचाल ही हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाच्या दृष्टीने ईश्वरीय कार्याचीच आहे. ईश्वराच्या कार्याचा हेतू धर्म संस्थापना करून लोकसंग्रह करण्याचे असते. संघ तेच काम गेली शंभर वर्षे करीत आहे. कार्यपूर्ती झाल्यानंतर संघ समाजात विलिन होऊन जाईल.

(लेखक साप्ताहिक ‘विवेक’ चे माजी संपादक आहेत.)

9869206101

Previous articleनोबेल पुरस्काराची १२५ वर्षे!
Next articleतोकडा राहिलेला ‘शेकडा’
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here