आमचा कांबळे

नितीन चंदनशिवे

आमचा कांबळे लईईई हुशार
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला
हुं करून…

कांबळे शाळेत गेला
मास्तरने फळ्यावर सरस्वती काढली,
पण,
कांबळेनं पाटीवर सावित्री काढली…
मग
मास्तरने असा तुडवला असा तुडवला….
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच नाही रडला
नुसताच कण्हला हूं करून….

कांबळे वयात आला
आणि प्रेमात पडला
तिनं विचारली जात
तो म्हणाला
अगं वेडे मी फक्त माणूस…
माणूस माझी जात
मग
तिनं बी असा तुडवला असा तुडवला
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून…

लग्नाला सत्यनारायण
कांबळे म्हणला “चालणार न्हाय…”
मुहूर्त बघून करूया
कांबळे म्हणला “पटणार न्हाय…”
जागरण घाला
बोकड कापा
कांबळे म्हणला “जमणार न्हाय…”
मग घरच्याच
लोकांनी असा तुडवला
असा तुडवला अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून….

कांबळे मित्रांच्या नादाने
चुकून मुकमोर्चात गेला
त्यालाबी वाटलं माझ्याही मित्रांना
आरक्षण मिळावं..
‘एक मराठा लाख मराठा’ म्हणत म्हणत
चुकून ‘जय भिम’ बोलला
मग काय
त्याच्याच मित्रांनी
असा तुडवला असा तुडवला
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून…..

कांबळे चळवळीत आला
इस्कुट बघितला चळवळीचा
कांबळेला वाईट वाटलं
आणि चौकात उभा राहून
सर्वाना म्हणला
सगळ्यांनी एकत्रित या
एकत्रित या
मग
आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला
असा तुडवला असा तुडवला
अस्सा तुडवला
पण आमचा कांबळे
कधीच न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून….

परवा कांबळेच्या मुलाने
कांबळेला एक प्रश्न विचारला
पप्पा,बाबासाहेब कोण होते?
भारत म्हणजे काय?
संविधान ही काय भानगड आहे?
आत्ता मात्र कांबळे लईई पेटला….।
मग त्यानेच त्याच्याच मुलाला
असा तुडवला
असा तुडवला अस्सा तुडवला…
पण चिरंजीव कांबळे बी
लईईई हुशार
त्यो पण न्हाय रडला
नुसताच कण्हला हूं करून..

आत्ता कांबळे वेडा झालाय
वेड्यांच्या दवाखान्यात असतो
पण,
हातात तिरंगा असतो
आणि
मांडीवर असतं संविधान
आणि कांबळेसारखा मानवतेच्या
बाता बडबडत असतो
अंधश्रद्धेवर बोंबलत असतो
दाभोळकरांचे खुनी शोधा म्हणतो
देश वाचवा,लोकशाही वाचवा
म्हणून पाय आपटून आपटून
ओरडत असतो
मग
डॉक्टर पण असा तुडवत असतो
असा तुडवत असतो
अस्सा तुडवत असतो

पण कांबळे आमचा लय हुशार…।
तो कधीच न्हाय रडत
नुसताच कण्हतोय
कसा
हूं…..करून.

————–
दंगलकार- नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली.
7020909521

Leave a Comment