आमची उन्हाळ्याची सुट्टी…

– स्नेहलता दातार, चेन्नई 

दरवर्षी परीक्षा झाली आणि निकाल लागलेला असला, नसला, तरी आम्ही नियमाने कोकणात आंजरल्याला बोटीने जात होतो. मुंबईला भाऊच्या धक्क्यावरून बोट निघायची, आणि समुद्राचा आणि बंदराच्या वासाचा एक वेगळाच माहोल मनावर गारुड करायचा. थर्ड क्लासचे पॅसेंजर खालच्या डेकवर, दाटीवाटीने लाकडी जमिनीवर बसलेले असत. काही जण आधीच पथारी पसरत. कारण बोट सुरू झाली की  पुष्कळ मंडळींना बोट लागत असे. ओकारी व्हायची, नाहीतर पोटात डचमळायचे. डेकचे, सेकंड क्लास पॅसेंजर,आम्ही वरच्या मजल्यावर….. तिथे तिन्ही बाजूनी उंच  कठडा असे आणि त्यावरचा भाग उघडा; एखाद्या मोठ्या सुरक्षित व्हरांड्यासारखा; त्याच्या वरच्या डेकवर काही मोजके केबिन पॅसेंजरसाठी, आणि, बोटीवरच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या केबिन असत. पायाखाली लाकडी जमीन आणि डोक्यावर लाकडीच छत. काही काळ उगीचच आपण सिंदबादसारखे वाटायला लागायचे . कठड्याजवळ सलग लांबलचक बाके असत. समुद्राकडे पाठ फिरवून बसता येत असे, आणि लहानपणी आम्ही गुडघे टेकून,  कठड्यावर हनुवटी टेकवून समुद्राकडे बघत ,खारा वारा आणि लाटांचा खेळ न्याहाळत पाय दुखेपर्यंत बसत होतो.

डेकवरच्या उरलेल्या मधल्या जागेत , लाकडी जमिनीवर ओळीने पथाऱ्या पसरलेल्या असत. ओली बाळंतीण असली तर बरोबर दोन-तीन ज्येष्ठ बायका, अगोदरच कोपरा रिझर्व करीत. मुंबईत ऑपरेशन करून घेऊन  विश्रांतीला घरी परत चाललेले , दीड दोन वर्षाच्या लहान मुलांपासून ते अतिवृद्धांपर्यंत सगळीजण सोयीस्कर रित्या जागा पकडून ठेवायचे. आपापली दहा बारा तासांची सफर, कमी कटकटीची व्हावी म्हणून प्रयत्नशील असत. मुंबईला हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करून  पहिलटकरीण सासरी परत जात असो, किंवा  दोन-तीन महिने साग्रसंगीत माहेरी विश्रांती  घ्यायला गर्भवती जात असली, तरी तिच्या सोबतीला दोघी तिघी घरातल्या ज्येष्ठ  स्त्रिया असत. शाळकरी मुलेमुली बाकावर बसून, कठड्यावर  हनुवटी टेकवून, धक्क्याकडे किंवा समुद्राकडे पाहण्यात तासचेतास शांत बसलेले असत. समुद्राच्या लाटांची वेगवेगळी रूपे पाहण्यात रमून जात.  प्रत्येकाकडे दुपारची शिदोरी, थोडेफार कोरडे, कुडूमुडू खाणे, हे बांधून घेतलेले असे.

सकाळच्या वेळी बोट सुटायच्या आधी तर अर्धा पाऊण तास मस्त करमणूक असे. प्रत्येकाकडे सामान भरपूर असेच. बहुतेक सगळे चाकरमानी, त्यामुळे गावातल्या नातेवाईकांसाठी नवीन कपडे, कोकणात न मिळणारे  वाणसामान, लवंगा, दालचिनी, वेलदोडे, बदाम, केशर, साबुदाणा,अत्तर, चंदनी उदबत्ती, दुरुस्तीला दिलेले किडूक मिडूक दागिने, आणि दोन महिन्याच्या सुट्टीसाठी लागणारे, विद्यार्थ्यांसाठी नेता येईल तेवढे अभ्यासासाठी सामान. रोजचे कपडे कमी असत, आणि बहुधा नवे फारसे कधीच नसत , कारण लाल मातीत महिनाभर वापरायचे, आणि खाऱ्या पाण्यात धुवायचे . त्यामुळे कपड्यांची रया जात असे. गावी न्यायचे कपडे दोन-तीन जोडच असायचे . तान्ह्या  लहान मुलांसाठी मात्र मेणकापडे, दुधाच्या बाटल्या, हे सामान जपून न्यावे लागत असे. बोट सुटायच्या आधी दहा मिनिटे भोंगा होई. आणि कॅप्टनने शिटी वाजवली की बोटीचे दोर धक्क्यावरून हळूहळू सोडले जात, आणि नाविक व खलाशी मंडळी ते वर उचलून घेत. गोगलगायीच्या वेगाने बोट धक्का सोडीत असे, आणि किंचित हेलकावे घ्यायला सुरुवात झाली की सगळ्यांचे चेहरे खुललेले असत . “चला सुट्टी झाली, आता खूप खूप खेळायचे,” हा  निर्मळ आनंद चेहऱ्यावर अगदी खुललेला असे.

बावरलेली सासुरवाशीण ,आणि मुंबईच्या चाकोरीतून काही काळ विश्रांती मिळण्याच्या कल्पनेने मोहरलेली माहेरवाशीण, आल्याचा तुकडा, आवळकाठी, तोंडात धरायला देणारे आजी आजोबा, हे सगळेजण अगदी खुशाललेले असत. भाऊचा धक्का लांब लांब जायला लागला की गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल हॉटेल, राजाबाई टॉवर, आणि परदेशी जाणाऱ्या मोठ्या कार्गो बोटी, त्यांची  विटलेली धुडे, पाण्यालगत हिरवट झालेला बोटीचा भाग, हे सारे अनोखे पण विलक्षण आकर्षक विश्वरूप , असे मोहवणारे दृश्य असे. त्या मोठ्या बोटीच्या पुढे आमची सात-आठशे टनाची प्रभावती, चंद्रावती, बालवाडीतली बोट वाटायची. पण तीच आम्हाला सुरक्षितपणे गावाकडे नेणार होती.

मुंबई दूर राहिली की खांदेरी उंदेरी, तिथे बोट जास्ती हालायची, त्यामुळे आता समुद्राकडे बघण्याऐवजी खाली मान घालून पुस्तक वाचणे, किंवा तोंडावर रुमाल धरून डोळे मिटून रामरक्षा म्हणणे, हा त्यावर उपाय असे. त्यातूनही जास्तीच बोट लागणार असेल,  पोटात डचमळायला लागले, किंवा मळमळायला लागले, तर त्यांना एखादे जुने फडके, टॉवेल, शेजारी ठेवून सरळ मोकळ्या जागेत चादर, चिरगुट पसरून आडवे  निजायला लागे. कारण एकदा उलटी सुरू झाली की मग इतरांनाही त्रास आणि स्वतःला जास्तच अवघड वाटत असे.

पहिले बंदर मुरुड जंजिरा. तिथे काही प्रवासी उतरत. पण बोटीतून पडावात उतरणाऱ्या प्रवाशांकडे बघण्याऐवजी आम्ही तो भव्य, प्रशस्त, अभेद्य, जंजिरा किल्ला डोळे भरून पाहत बसत होतो. आफ्रिकन सिद्दीचे  वर्चस्व असलेला हा किल्ला कधीही, कोणालाही, मोगलांना, इंग्रजांना किंवा  मराठ्यांना  जिंकता आला नाही. पाऊणशे वर्षांपूर्वी किल्ल्याबद्दल इतकी माहितीदेखील आम्हाला नव्हती. पण या सगळ्या समुद्री किल्ल्यात  गोड्या पाण्याचा भरपूर साठा होता. हा दैवी चमत्कार पाहून आम्ही थक्क होऊन त्या किल्ल्याकडेच एकटक बघत राहत होतो. मराठेशाहीचा शाळकरी इतिहास डोळ्यापुढे येई. आणि बोट थांबली असल्यामुळे त्या वेळात आपले दुपारचे जेवण उरकायची सगळ्यांना घाई असे. प्रत्येकाची शिदोरी वेगळी. कुणी भाजी, पुरी, शिरा, आणायचे ,तर कुणी सकाळीच आमटी भात कालवलेला घेऊन यायचे. कोणी पोळीचा लाडू, किंवा लोणचे, पोळी, केळी, असे खात. शक्यतोवर खायला न्यायला सोपी, अशा प्रकारची दुपारसाठी बेगमी असे. आजारी, वृद्ध, किंवा बाळ बाळंतीण यांचे पथ्याचे प्रकार. सोबत असलेल्या नातेवाईक स्त्रिया,  हे सर्व  अगदी निगुतीने व्यवस्थित करीत, व त्या दोघांना प्रवासात नीट सांभाळून घेत असत.

जंजिऱ्याचे प्रवासी उतरले आणि हरणई, दाभोळकडे जाणारे चढले, त्यांचे सामान सुमान एकदा चढवले की बोटीचा भोंगा होई. मालगाडीला असतात, तशी सरकती लोखंडी दारे  खालच्या डेकवर उघडलेली असत. ती नीट बंद व्हायची. कॅप्टनची शिट्टी वाजली, की  पडाव बोटीपासून अलग होऊन बंदराच्या धक्क्याकडे जाऊ लागायचे, आणि नांगर वर घेऊन , बाजूला वळत, बंदरातली बोट पुन्हा दक्षिण दिशा पकडायची.

सकाळी पूर्वेचे ऊन असे , म्हणून डाव्या बाजूचे बसलेले पॅसेंजर, त्यांच्या अंगावर उन्हाची तिरीप येई. आता सूर्य पश्चिमेकडे  कलायला लागला की पश्चिमेच्या बाजूचे उन्हाचे , गरम वाऱ्याचे झोत सुरू होत .त्यामुळे बहुतेक सारीजण ऊन न लागेल, असे पाहायचे व थोडा वेळ वामकुक्षी. हालत्या डुलत्या बोटीने  जरा वेळ डुलकी लागायची , पण कुणाचे तरी रडणारे बाळ, किंवा खोकणारे आजोबा, आजूबाजूला असायचेच. कुरकुरायचे नाही किंवा तोंड वाकडे करायचे नाही, ही आईची तंबी होतीच. ती म्हणायची, “ मुद्दाम होऊन कुणी खोकत नाही किंवा रडत नाही. आठ दहा तासाचा तर प्रवास, सगळ्या अडचणी सोसायची सवय ठेवा. आयुष्यात पुष्कळ संकटे पुढे  झेलायची आहेत.” त्या आगामी काळजीने आम्ही डोळे मिटून गुपचूप पडायचो, आणि रामरक्षा किंवा भीमरूपी मनातल्या मनात म्हणत केव्हा झोपेच्या आधीन होत होतो ते कळायचं नाही. श्रीवर्धनच्या पुढे बोट गेली की “ चला, आता थोड्यावेळाने उतरायचं हो आपल्याला.” आईच्या आवाजात आता प्रेमळपणा निथळायचा.

आळीपाळीने तोंड धुवून जराशी फेस पावडर लावून, किंवा टाल्कम पावडरचा हात फिरवून, आम्ही सामान आवरायला सुरुवात करत होतो. छोटी छोटी खेडेगावे किनार्‍यावर दिसत होती, आणि आमच्या डोळ्यासमोर   आंजरल्यातले आपले घर दिसायला लागायचे, व हापूस आंब्याचा वास कुठून तरी यायला लागायचा. प्रत्येक गावावरून जाताना बोटीचा भोंगा होत असे. ती सर्वांची परिचित खूण होती. सगळ्यांची हालचाल सुरू व्हायची. आणि उन्हाचा तडाखा कमी झालेला असला नसला, तरी तो आता जाणवायचा नाही.

हरणे चा किल्ला लांब वर दिसायला लागला की मुंबईचा विसर पडायचा आणि कड्यावरचा गणपती डोळ्यासमोर दिसायला लागायचा. त्या उंच डोंगरावरून समोर दिसणारा  हिरवट निळसर , अथांग शांतसागर, आणि आमच्या आगबोटीतून काही तास पाहिलेला फेसाळ दर्या.. वारा फोफावला, दरिया उफाळला, हे गजाननराव वाटवे यांचे सुप्रसिद्ध गीत गुणगुणतच आम्ही सामान आवरायला लागायचो.

समिंदर आणि पासिंजर दोघेही खुशीत आलेले……

(स्नेहलता दातार या मुक्त लेखिका व अनुवादक आहेत.)

[email protected] 

 

Previous articleपवार, ठाकरे, फडणवीस, शिंदे यांची झाकली मूठ !
Next articleलोकशाहीचा लिलाव…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.