सुरेश भटांना आठवताना..

.

.महान कवी सुरेश भटांच्या निधनास 15 वर्षे झाली.. त्यानिमित्ताने त्यांच्या काही आठवणी….

प्रमोद चुंचूवार

बहुदा 1998 वर्ष असावे म्हणजे आजपासून जवळपास 20 वर्षांपूर्वी ..लोकमत नागपूर च्या संपादकीय विभागात मी तेव्हा क्रीड म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इंग्रजी बातम्याचा अनुवाद करणाऱ्या विभागात कार्यरत होतो.. आमच्या बाजूलाच शहर वार्तांकन करणारा विभाग होता.. बहुदा संध्याकाळी 4/5ची वेळ असावी..मला कुणी तरी आवाज देऊन शहर विभागात बोलावून घेतलं..मैफल रंगली होती.. सारे पत्रकार सहकारी एका व्यक्तीच्या भोवती जमा झाली होती..आणि ती व्यक्ती खड्या आवाजात गझल ऐकवत होती..अगडबंब वाटावं अशी देहयष्टी आणि आवाज ही तसाच..मी त्याना पहिल्यांदा पाहत होतो.. त्यांचे छायाचित्र यापूर्वी पाहिली होती.. माझी ओळख करून देण्यात आली त्यांच्याशी आणि पुन्हा मैफल सुरू झाली..आणि खास वऱ्हाडी भाषेत गप्पा ही रंगल्या!
कविवर्य सुरेश भट यांचे हे पहले दर्शन..मला तेव्हा झालेला आनन्द मी शब्दांत सांगू शकत नाही..कारण मी भटांच्या कवितांची गझलांची किती पारायणं केली ते सांगणं अशक्य.. मलमली तारुण्य माझे , मालवून टाक दीप अश्या फुल पाखरांच्या पंखाहून ही तरल काव्य रचना करणारा हा माणूस एकदा तरी पहायला मिळावा हे माझे स्वप्न होतं.. ते असे अनपेक्षितपणे पूर्ण झालं.. त्या काळात आठवड्यातून 4/5 दिवस ते लोकमत कार्यालयात येत.. त्यांचे घर लोकमत  कार्यालयासमोर धंतोलीत होते..शहर विभागात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबततूनवार, भुपेंद्र गणवीर हे भट साहेबांचे खास चाहते..त्यांच्यावर भट साहेबांचेही विशेष प्रेम..
संपादकीय विभागाच्या वर छतावर त्या काळात एक अल्पोपहार गृह सुरू झालं होतं..तिथे आम्ही भट साहेबांसोबत जाऊन अनेकदा नाश्ता करायचो..तेव्हा हा माणूस 24 तास कवितेच्या विश्वात असतो हे लक्षात आलं..
एक दिवस तर मला आश्चर्ययाचा मोठा धक्का बसला. तत्कालिन संपादक  कमलाकर धारप सरांच्या दालनासमोर एका खुर्चीवर ते बसले होते.त्यांना फर्माईश केली जात होती आणि ते न थकता उत्साहानं कविता-गझल ऐकवत होते. मी बारकाईने पाहिल्यावर चकितच झालो..कारण ते ज्यांना कविता गझल ऐकवत होते ते सारे लोकमत मधील चपराशी होते.. आपल्या चाहत्यांमध्ये साहेब किंवा चपराशी असा भेद न करणाऱ्या  या थोर कविसमोर  आणि गझल प्रेमी चपराशी मित्रांसमोर मी मनातल्या मनात नतमस्तक झालो!
त्यांच्याशी गप्पा मारण आणि राजकारण साहित्य या क्षेत्रातील मोठं मोठ्या माणसंबद्दल ऐकणे ही एक पर्वणी होती..मात्र इतका परिचय होऊन ही त्यांना माझ्या कवितांची वही दाखविण्याचे माझे धाडस कधी झालं नाही..तशी त्यांना मी लिहिलेल्या कविता दाखवून  त्यांचे मार्गदर्शन मिळवावे, असे मला खूप वाटायचं..मात्र प्रत्यक्ष ते जमलं नाही..
त्या काळात त्यांचे लेख लोकमत च्या संपादकीय पानावर प्रकाशित व्हायचे. या पानांची जबाबदारी असलेल्या उप संपादकास
भट साहेब उद्या आपली खरडपट्टी कोणत्या शब्दात काढतील  ही भीती सतावत असायची. कारण भट होते शब्दप्रभू! त्यांनी लिहिलेल्या वाक्य रचनेत, उकार,इकार, काना मात्रा यात काहीही बदल करण्याचा संपादक वा मालक यांना कुणालाही अधिकार नव्हता..व्याकरणाची एक जरी चूक लेखात दिसली तर मग संपादक धारप सरांना दूरध्वनीवरून त्यांच्या खास शैलीत सुनावलं जायचं..सुरेश भटाला तुम्ही व्याकरण शिकविणार का रे? अश्या शब्दात आम्हा लोकांची  अगदी योग्य हजेरी घेतली जायची..भट साहेब ही मूळचे पत्रकार…त्यामुळं त्यांना ज्येष्ठ या नात्याने ही आमची खरडपट्टी काढण्याचा त्यांचा अधिकार होता..त्यांनी स्व हस्ताक्षरात पाठविलेल्या लेखांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात वापरलेली विविध रंगांची पेन. निळ्या सोबतच हिरवी, लाल रंगांची पेन वापरून काही वाक्य ते लिहीत..हे वाक्य तिरपी( इटालिक) किंवा ठळक (बोल्ड)अशी प्रसिद्ध करायची, असा प्रेमळ दम असायचा.लेख पेजवर लागत असतांना फोन यायचा तो वेगळाच..
तेव्हा क्रीडच काम साभाळून श्याम पेठकर यांच्या मूळ लोकमत मध्ये सुरू झालेल्या लोकमत युवामंच च ही काम श्याम भाऊ च्या नेतृत्वात पाहत होतो. मी, श्याम भाऊ, निरंजन मार्कन्डेयवार, गजानन जानभोर
अशी आमची ‘चांडाळ चौकडी’ तेव्हा काही तरी उपद्व्याप करीत रहायचो..आणि आम्हा सर्वांसाठीच भट साहेब म्हणजे जीव की प्राण .. दीपक रंगारी हा त्यांचा शिष्यही तोवर आमचा लोकमतमधील सहकारी झाला होता. त्यांच्या हाताखाली मराठी कविता आणि व्याकरणाचे धडे गिरविलेल्या दीपककडून आम्हाला भट साहेबांच्या वैयक्तिक जगण्याबद्दल खूप वेगळी आणि त्यांच्याबद्दल आदर वाढविणार माहिती मिळायची.. (दीपक आज त्यांच्यामुळेच मराठी व्याकरण या विषयातील बाप माणूस झाला आहे..)
लोकमत युवा मंच तर्फे बहुदा 1999 की 2000 मध्ये( वर्ष नेमकं आठवत नाही) मॉरिस महाविद्यालयात आम्ही युवा मंच सदस्य असलेल्या तरुण तरुणींचे कवी संमेलन व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आयोजित केलं होतं.तश्या बातम्या प्रसिद्ध केल्या..श्याम पेठकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यक्रमाची तयारी करीत होतो.. 13 फेब्रुवारीस श्याम भाऊंना एक दूरध्वनी आला आणि ते उडालेच..होय..कारणही तसेच होतं..
या कवी संमेलनास मला का बोलावले नाही, अशी हक्काची नाराजी व्यक्त करून मी उद्या कवी संमेलनास येतोय, असे साक्षात सुरेश भटांनी कळविले होत..आम्ही पोरा टोरांचं नवोदित कवींच संमेलन ठेवलं होतं..त्याचे सूत्र संचालन मी करणार होतो..त्यामुळं या महाकवीला निमंत्रित करण्याचा प्रश्नच नव्हता!
मात्र भट साहेब येणार असं सांगताच धारप सरांना ही आश्चर्याचा धक्का बसला. भट साहेब येत असल्याने संपादक म्हणून ते ही कार्यक्रमात येतो असे म्हणाले ..आम्हा पोरा टोरांचा कार्यक्रम थेट एका वेगळ्या उंचीवर पोहोचणार हे तर तोवर स्पष्ट झालं होत..
कार्यक्रम सुरू झाला..ठरल्याप्रमाणे सुरेश भट आणि धारप सर आले.. मी सूत्र संचालन करू लागलो..प्रेम दिनानिमित्त प्रेमाचं महत्व सांगू लागलो..नेमकं त्याच क्षणी भटांमधील खोडकरपणा मिश्किलपणा जागा झाला.. त्यांनी मला थांबवलं..आणि विचारलं—
” प्रमोद, तू प्रेमावर इतकं बोलतोय, तूच सांग बर प्रेम म्हणजे नेमकं काय? काही व्याख्या त्याची आहे का?”
समोर बसलेले विद्यार्थी आणि धारप सरांसह सारे सहकारी गालातल्या गालात हसू लागले..मला काय बोलावं ते सुचेना! बोलती बंद. फटफजिती.
मात्र काही क्षणात संस्कृत भाषा मदतीला धावून आली.. शाळेत संस्कृत शिकल्याचा लाभ झाला.
” ॥ दर्शने स्पर्शणे वापि श्रवणे भाषणेऽपि वा। यत्र द्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते॥  ”
हे सुभाषित ऐकवून,  जर कुण्या व्यक्तीच्या दर्शनाने स्पर्शाने त्याचे बोलणं ऐकल्याने वा त्याच्याशी बोलण्यानं  अंतःकरण पाझरते असेल तर ते प्रेम आहे असे समजावे, अश्या आशयाची व्याख्या संस्कृतात असल्याचे सांगितल्यावर भटांनी अरे वाह म्हणत शाबासकी दिली आणि सभागृहात पुन्हा एकदा हास्याच्या लहरी उमटल्या..माझी फजिती टळल्याने अनेकांसोबत मला ही हसू आले..
कवी संमेलन सुरू झालं..एकेकजण कविता सांगू लागला..माझी वेळ आली..
” अनुभवी माणसं म्हणतात
हे वयच असं असतं
कळत नाही कधी
कुणाच्या हास्यात
कधी कुणाच्या रूपात
मन कसं फसत,
हे वयच असं असतं//
ही मी 1994 ला लिहिलेली कविता सांगणं सुरू केली.. साक्षात भट साहेब ही कविता ऐकत असल्याचे दडपण होतच..
सन्नीवरची मिस
न मिस व्हावी सत्वर
म्हणून पिच्छा करताना
आमची सायकल होई पंक्चर
या मिसपैकी कुणी
न आम्हा ढुंकून बघतं
हे वयचं असं असतं//
( सन्नी ही त्या काळची स्कूटी वा एक्टिवा होती)

या ओळी सांगताच भट साहेब दिलखुलास हसले.. ही दीर्घ कविता मी वाचल्यावर त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केलं..अनपेक्षितपणे भटांना कविता ऐकविण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि स्वप्नातही विचार केला नसतांना त्यांची दाद रुपी बक्षीस मिळालं..
समारोपाला त्यांनी स्वतःच्या काही अजरामर कविता ऐकवल्या..त्यांच्या आवाजात तू माझ्या आयुष्याची पहाट ही कविता ऐकण तर अद्भूत अनुभव होता.
दोन चार कविता छापून आल्यावर पाय जमिनीवर नसणाऱ्या कवींचा आजचा काळ.. भटांच्या काळातही अश्यांची संख्या मोठी होतीच..ग्रेस सारखे महाकवी तर स्वतः भोवती एक तारांचे अदृश्य कुंपण घालून बसले होते..मूठभर अभिजनांनाच ग्रेस शी संवाद साधता यायचा..मात्र भटांना एक साधा माणूस ही साहेब तुमची कविता ऐकवा न, अशी गळ घालू शकत होता.. भट हे जसे अभिजनांना आपले वाटायचे.. त्यापेक्षाही अधिक ते रस्त्यावरील सामान्यांना,दलित बहुजनांना आपल्या हक्काचे व आपल्यातीलच एक वाटायचे.. म्हणूनच ते जनकवी होते. कारण ते जगले फकिरासारखे..भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, ही त्यांची केवळ शब्दरचना नव्हती तर ती त्यांच्या अंतरात्म्याची साद होती.  साध्या माणसांना एल्गार करायला शिकविणा-या,  अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अशी साद घालणा-या या क्रांतीच्या उद्गात्यास आणि सच्च्या, जिंदादिल व कलदंर व्यक्तिमत्वास कोटी कोटी अभिवादन!

प्रमोद चुंचूवार

One Comment

  1. प्रमोद मुळे says:

    खरं आहे.. भट साहेबांचे चाहते समाजातील सर्व वर्गात होते. अमरावतीला असताना, अनेकदा रात्री सिनेमा बघून येताना राजकमल चौकात बघावे तर ८-१० सायकल रिक्षा चालक घोळक्याने उभे, आणि भट साहेब त्यांना आपल्या कविता/गजल ऐकवीत आहेत असे द्रुष्य दिसे. अश्या मैफली रात्री उशिरापर्यंत, कधी पहाटे पर्यंत चालत.

Leave a Comment