मोबाईलशिवाय पाच दिवस

-अविनाश दुधे

मोबाईल फोन ही सोय की गैरसोय ?

हा प्रश्न प्रत्येक मोबाईलधारकाच्या डोक्यात कधी ना कधी येतोच. एखाद्यावेळी वैतागून आपण मोबाईलला कितीही नावं ठेवली, तरी त्याची साथसंगत सोडणं आपल्याला जिवावरच येतं. इनमिन आठ-दहा वर्षापूर्वी आपल्या आयुष्यात आलेलं हे प्रकरण आता बहुतेकांचं ‘सर्वस्व’ झालं आहे. मोबाईल काही वेळ जरी बंद असला, तर ‘तेरे बिना जिया लागे ना’ अशी आपली स्थिती होते. सद्या माणूस बाहेर पडताना एखाद्यावेळी आपल्या बाईलला विसरेल, पण मोबाईल नाही. तीच स्थिती बायांची. घरातून बाहेर पडताना मंगळसूत्र गळ्यात अडकविण्याचं भान त्यांना राहणार नाही. प्रसंगी पर्सही विसरतील. पण मोबाईल अजिबात नाही. …नो चॉईस.

मोबाईलबद्दल ही काहीशी अतिशयोक्तीपूर्ण प्रस्तावना यासाठी की, आता दिवाळीला गावाला जाताना अमरावती बसस्थानकावर मोबाईल हरविला. बस शहराबाहेर पडल्यानंतर एक एसएमएस करण्यासाठी खिशात हात घातला, तर मोबाईल गायब, शर्ट-पॅन्टीचे सर्व खिसे तपासले, बॅग चेक केली. मोबाईलचा पत्ता नाही. डोक्यात ट्यूब पेटली…. बस पकडण्याच्या घाईत मोबाईल बसस्थानकावरील बाकड्यांवर राहिला. लगेच बायकोच्या फोनवरून रिंग देऊन पाहिली. रिंग गेली. कोणाला लगेच पाठविलं तर फोन मिळू शकतो, मनात आशेची पालवी फुलली.

डोळ्यासमोर दोन-चार नाव तरळली. पण… पण… मोबाईल नसल्याचा पहिला तोटा तत्काळ लक्षात आला. ज्यांना बसस्थानकावर पाठवायचं, त्यांच्यापैकी एकाचाही नंबर आपल्याला पाठ नाही. सारे नंबर मोबाईलच्या फोनबुकमध्ये. हवा गेलेल्या फुग्यासारखा फुस्स झालो. मात्र ज्या एका मित्राचा नंबर तोंडपाठ होता त्याला फोन लावला. ऑफिसच्या रवी खांडेला लगेच बायकोच्या फोनवर  कॉल करायचा निरोप त्याला दिला. रवीने दुसऱ्याच मिनिटाला कॉल केला. बसस्थानकावर माणसंही पाठविले. दरम्यानच्या काळात माझं मोबाईलवर रिंग देऊन तो सुरक्षित आहे की नाही, हे तपासणं सुरूच होत. जवळपास पंधरा मिनिटं रिंग जात होती. आयसीयू वॉर्डातील पेशंटबाबत मनात जी धाकधूक असते तशी काळजी माझ्या मनात मोबाईलबद्दल होती. लोकांच्या चांगुलपणाबद्दल उगाच विश्वासही वाटत होता.

एखादा समजदार व प्रामाणिक माणसाला फोन सापडेल. तो विचारेल, ‘साहेब, फोन तुमचा आहे का? कुठे आणून देऊ?’ वगैरे वगैरे बरंच विशफुल थिकींग डोक्यात येत होतं. मात्र लवकरच भ्रमनिरास झाला. काही वेळातच ‘द नंबर व्हिच हॅव कॉलड् इज आउट ऑफ कव्हरेज एरिया’ हा सुश्राव्य आवाजातील संदेश ऐकायला मिळाला. अर्थ स्पष्ट होता. मोबाईल गायब झाला होता. लगेच रवीचाही फोन आला. तुमचा फोन एकदा उचलला, पण समोरचा माणूस बोलला नाही. आता उठापटक करण्यात अर्थ नव्हता. मोबाईल गेला हे फायनल झाले. बायकोच्या काय ते लक्षात आलं होतंच. तरीही तिला सांगितलं. तिनं थंड कटाक्ष टाकला. जणू तिला म्हणायचं होतं, ‘हे आमच्याकडून घडलं असतं, तर आमचा कसा उद्धार झाला असता..आता तुम्हांला काय म्हणायचं?’ पण ती काही बोलली नाही. पोरगा मात्र चक्क खूष झाला. ‘बाबा, नाहीतरी तुमचा फोन जुनाच झाला होता. आता छान मोटोरोलाचा फोन घ्या. त्यात भरपूर गेम्स असतात.’, त्याने सल्ला देण्यात कसूर ठेवली नाही.

फोन गेला हे निश्चित झाल्यानंतर पुढचे क्रियाकर्म पार पाडणे आवश्यक होते. मित्राला फोन करून सिम लॉक करायला सांगितले. कस्टमर केअर सेंटरकडून माहिती मिळाली की, कोणत्याही सेंटरवरून कोरं सिम घ्या. लगेचच नंबर Activate होईल. पण काय कोण जाणे, मोबाईल गेला हे लक्षात आल्यानंतर मन एकदम तटस्थ झालं होतं. डोक्यात विचार आला, एवढं अर्जंट कार्ड अॅक्टिव्ह करण्याची काय गरज? दोन-चार दिवस मोबाईलशिवाय राहिलो, तर काय बिघडते? आपल्यात मोबाईल किती ‘भिनला’ आहे, हे तपासण्याची हुक्कीही आली होती. बायकोने तो विचार लगेच उचलून धरला. निर्धार पक्का झाला. शांतपणे डोळे मिटून घेतले. प्रवास सुरूच होता. डोक्यात मात्र विचार सुरू होते. निर्धार वगैरे जरी केला असला तरी ऑफिसला आणि काही जवळच्या मित्रांना पर्यायी नंबर देणे आवश्यक होते. एकाकडून दुसऱ्याच, दुसऱ्याकडून तिसऱ्याचा असे नंबर घेऊन तिघाचौघांना फोन केले. पुन्हा लक्षात आलं, मोबाईल फोनने आपल्या न्यूमरिक मेमरीची पार ऐसीतैसी झाली आहे. आपण या जगात आहोत, हे किमान तीन-चार मित्रांना कळविल्यानंतर मी काहीसा रिलॅक्स झालो. मात्र आठ वर्षापासून लागलेली ‘लत’ अशी एकाएकीच थोडीच सुटणार? प्रत्येक काही मिनिटानंतर अस्वस्थता दाटून यायची. ‘अरे, खूप वेळ झाला आपला फोन वाजला नाही.’ तेव्हा आणखी एक गोष्ट लक्षात आली, थोड्या-थोड्या वेळानंतर मोबाईल वाजला नाही, तर आपण अस्वस्थ होतो.. कोणाचा फोन आला नाही, तर आपण स्वतःच फोन वा एसएमएस करतो. हे शॉकींग होतं. दारुड्याला दारू मिळाली नाही तर तो जसा तडफडतो. काहीशी त्यासारखी ही अवस्था होती.

मात्र गावात पोहोचेपर्यंत मी माझ्या मेंदूला बऱ्यापैकी प्रोगाम केलं होतं. आपला मोबाईल हरविला आहे. पुढील पाच दिवसापर्यंत आपल्याला अगदीच अर्जन्ट असल्याशिवाय कोणालाही फोन करायचा नाही. थोडक्यात फोन या प्रकारापासूनच आपल्याला दूर राहायचे आहे, असा व्यवस्थित मेसेज मेंदूपर्यंत पोचविण्यात मी यशस्वी ठरलो. याचा फायदा झाला. मेंदू डायव्हर्ट झाला. मन रमविण्याची, रिझवण्याची इतर साधनं तो शोधू लागला. एरवी गावात पोहोचलो की, घरातील मंडळींसोबत ख्यालीखुशालीची बात करताना मध्येच फोन वाजायचा. त्यानंतर धड गावात आणि डोकं अमरावतीत, असा प्रकार असायचा. यावेळी मोबाईल नसल्याने आपल्या आजूबाजूला जिवंत हाडामासाची माणसं आहेत. फोनवर बोलण्यापेक्षा त्यांचेशी संवाद साधण्यात अधिक आनंद आहे, हे प्रकर्षाने लक्षात आलं. घरच्यांशी, शेजाऱ्यांशी मनसोक्त गप्पा सुरू झाल्या. दुपारी पोरगा जवळ आला. बाबा, क्रिकेट खेळायचं का? घराच्या आवारात खेळ सुरू झाला. झटकन शाळा-कॉलेजचे दिवस आठवले. एक काळ आपण क्रिकेटने किती झपाटलो होतो, याचेही स्मरण झाले. पोरगा व त्याचे मित्र जिद्दीने खेळत होते. त्यांच्या वयाचं असताना आपल्याला एवढं चांगलं खेळता येत नव्हत हे लक्षात आलं. आपले वडील सलग दीड-दोन तास एकदाही फोन कानाला न लावता खेळत आहे, हे पाहून पोरालाही नवल वाटलं.

खेळ आटोपल्यावर लक्षात आलं. आपल्या बॅगेत चार-पाच अतिशय सुंदर पुस्तक आहेत… गेल्या कित्येक महिन्यांपासून ते वाचायचे प्लॅनिंग आपण करतो आहे. पुस्तक हा आधीच विकपॉईंट. त्यात आता निवांत पाच दिवस आहे म्हटल्यावर पुस्तक उघडण्यापूर्वीच मन प्रचंड उल्हसित झालं. अरुण साधूच ‘शोधयात्रा’ हाती घेतलं. काही पानातच झपाटलेपण यायला लागलं. मी कोण? मी कोठून आलो? कुठे जाणार? माझ्या जीवनाचे प्रयोजन काय ? या प्रत्येक माणसाला पडणाऱ्या सनातन प्रश्नांचा शोध घेण्याचा अफलातून प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तक संपल्यानंतरही भरपूर काळ हे पुस्तक मनात ठाण मांडून राहतं. सुहास शिरवळकर, मंगला आठलेकर आदी लेखकांचीही दोन-तीन पुस्तके वाचली. मोबाईल नसल्याने पाच दिवसात चार पुस्तके वाचता आली. एरवी महिन्यात मुश्किलीने एखाददुसरं पुस्तक वाचता येतं.

पुस्तके वाचताना नाही म्हटले, तरी अधूनमधून मोबाईलची आठवण यायची. आपल्याला कोणाचे फोन आले असतील? दिवाळीचे एसएमएस कोणाकोणाचे असतील? हे प्रश्न डोक्यात रेंगाळायला लागले. आपण ट्रेस होत नाही म्हटल्यानंतर जवळची मंडळी अस्वस्थ झाली असतील. त्यांना फोन हरविला होता, हे कळवायला पाहिजे होतं का?. कंबलवाले बाबा सोमवारी अमरावतीत येणार होता. त्याचं काय झालं असेल? आपण तेथे पाहिजे होतो, असंही वाटलं. मात्र बाबा आलाच नाही, अशी माहिती कार्यालयातून मिळाल्यावर मन रिलॅक्स झालं. एरवी बाहेरगावी असताना सायंकाळी कार्यालयात फोन करून आज काय विशेष बातमी? ले- आउट कसं करणार? कोणती बातमी लीड करणार? अशी विचारणा करत असतो. यावेळी मात्र मी स्वत:ला प्रयत्नपूर्वक आवरलं. सहकारी राजेश लेहकपुरेला सांगूनच ठेवलं होतं. अमरावती डुबणार असेल किंवा भूकंप आला असेल, तरच मला कळव. त्यानेही त्रास दिला नाही.ऑफिस चार दिवस बाजूला ठेवायचं ठरविल्यानंतर पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. पुस्तकांसोबतच खूप दिवसांनी निवांत मनःस्थितीत आवडीची गाणी ऐकता आली. टीव्ही-व्हिसीआरवर चित्रपट पाहता आले. ‘लगान’ ‘चक दे इंडिया या चित्रपटांचा पुन्हा आनंद घेता आला. घरी येणाऱ्या लोकांशी निवांत गप्पा मारता आल्या. मोबाईलचा डिस्टर्बन्स नसल्याने जुन्या आठवणीत रमता आलं. जुनी पत्र वाचता आली. खूप महिन्यांनी आभाळातील तारे पाहता आले. आपलंच गाव नव्या नजरेने पाहता आलं.

आनंदाचे हे क्षण शरीर व मनाला खूप रिलॅक्स करत होते. शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं, मोबाईल आल्यापासून आपण आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदाला मुकायला लागलो आहे. मोबाईल सलगपणे कुंठलीच गोष्ट आपल्याला करू देत नाही. वाचन, लिखाण, गप्पा, जेवण, झोप या प्रत्येक ठिकाणी मोबाईल कडमडतो. त्यामुळेच माणूस कशावरच एकाग्र होत नाही. मोबाईलवर बोलणारा पलीकडचा माणूस कुठला ना कुठला विषय डोक्यात पेरतो, आणि त्याभोवतीच आपण घोटाळत राहतो. आजूबाजूला असलेली माणसं, हातात असलेलं काम यावर अन्याय करतो. आणखी काही गोष्टी लक्षात आल्या. दिवसभर फोन घेणे व करणे या प्रकारात किमान शंभर-सव्वाशेवेळा आपण ते डबडं कानाला लावतो. त्यामुळे कानाचं काय भजं होतं असेल या विचाराने क्षणभर थरारून गेलो. मोबाइल नसला तर काय बिघडते? विचार केल्यावर जाणविलं, काहीच बिघडत नाही. ज्यांना आपल्यासोबत खूप महत्त्वाचं काम असते, ते कोठूनही आपल्याला शोधून काढतात. मोबाइलवर येणाऱ्या कॉलपैकी ७५ टक्के कॉल कॅज्युअल असतात. उगाच हवापाण्याच्या गोष्टी करणारे ते कॉल असतात. मोबाईल नसल्यामुळे हे व आणखी बरेच विचार व आले. तुमच्या आमच्या सर्वांचेच हे अनुभव असतील.

या एवढ्या लांबलचक मोबाईलपुराणाचे तात्पर्य- सुखाने जगायचं असेल तर अधूनमधून मोबाईल बंद ठेवला पाहिजे. त्यामुळे काही बिघडत नाही. उलट ताजेतवाने होऊन तुम्हांला नवीन ऊर्जा मिळते.

(२००८ मध्ये प्रकाशित झालेला लेख)

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleबहिरमचं झगमग स्वप्न
Next articleजोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही एक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here