-ज्ञानेश्वर मुंदे
उन्हाळा आला की हमखास कामठवाड्याचे बसस्टँड आणि तेथील मैघणेंच्या हॉटेलातील रांजण डोळ्यासमोर येतो. गत महिन्यात कामठवाड्याच्या स्टँडवर उतरलो. सवयीप्रमाणे मैघणेंच्या हाॅटेलात शिरलो. पाणी पिण्यासाठी रांजणावर गेलो. तर मागून आवाज आला, आताही रांजणातीलच पाणी पिशील काय? चमकून मागे बघितले… एक जण हातात बिसलेरी (कोणत्याही मिनरल वाटरला गावात बिसलेरीच म्हणतात.) घेऊन उभा. थंडगार पाणी पोटात रिचवले. दोन सेकंद डोळे बंद केले अन् चाळीस वर्षापूर्वीचे दृश्य डोळ्यासमोर तरळले.
आमचे कामठवाडा तसे पाण्यासाठी समृद्ध. गावात पाण्याने चबडब भरलेल्या अनेक विहिरी. गावाला खेटूनच उन्हाळ्यातही खळखळून वाहणारी दातपाडी नदी. (आमच्या गावच्या नदीला दातपाडी का म्हणतात ते पुढे कधी तरी सांगेन) जवळच गोखी नदी. पाथ्रडला बांधलेल्या धरणाचे बॅक वाटर. असे समृद्ध चित्र. त्या काळात गावात अन् शिवारातील विहिरी कधी आटल्याचे कानावर आले नाही. दातपाडीची एक धार तर वर्षभर सुरु राहायची. बंटीच्या डोहात अन् वडाखाली तुडुंब पाणी. उन्हाळाच काय, कधीही मनात येईल तेव्हा नदीवर जायचे आणि मनसोक्त पोहायचे.
तिसरी- चवथीत असू. शाळेला दीड वाजता मधली सुटी झाली की, थेट नदीवर. पाच सहा सोबती असायचे सोबत. काढले कपडे की टाक नदीत उडी. छातीभर पाण्यात मनसोक्त डुंबायचे. वेळेचेही भान नसायचे. कुणी तरी सांगायचे घंटी वाजली. मग लगबगीनं कपडे घालयाये, शाळेकडे धूम ठोकायची. पण अनेकदा पोहण्याचा मोह अंगलट यायचा. घरी माहिती होऊ नये म्हणून संपूर्ण कपडे काढून तसेच नदीत उतरायचो. एकदा कुणी तरी गुरूजींना सांगितले पोट्टे नदीत पोहत आहे. मग काय गुरुजी दहा-बारा जणांची फौज घेऊन नदीवर. इकडे आम्हाला पत्ताच नाही. गुरुजींनी चूपचाप नदीच्या थडीवरचे आमची खाकी पँट व पांढरा शर्ट ताब्यात घेतले. कुणाला तरी गुर्जी दिसले. निसर्गावस्थेत आम्ही नदीबाहेर. गुर्जीच्या हातात नेहमीचा रुळ होता. सवयीप्रमाणे आम्ही हात पुढे केला पण…गुर्जींनी यावेळी हातवर नाही तर उघड्या ढुंगणावर दणका दिला. ढुंगण चोळत आम्ही कपडे घतले व घरी धूम ठोकली. तर घरीही वार्ता गेलीच होती. घरच्यांनीही चांगलेच कुथाडले.
अशा अनेक आठवणी दातपाडीसोबतच्या. जामवाडीला धरण झाल्यापासून दातपाडी डिसेंबरमध्ये कोरडी पडते. उन्हाळ्यात तर नदीत केवळ खडक दिसते. कधीकाळी लेकरांच्या मनसोक्त डुंबण्याच्या आनंदात सहभागी होणाऱ्या दातपडीच्या डोळ्यातील अश्रू आटले. गावातील विहिरी म्हणजे गावाची जलसमृद्धी. पाण्याने भरलेल्या विहिरीतून पाणी काढणे म्हणजे दिव्य. सकाळपासून खिराड्यांचा खळखळाट सुरु राहायचा. मोठ्या खटल्याच्या घरातील गडीमाणसं कावडीने पाणी भरायचे. कुणी फक्त देवपूजेसाठी एक कळशी पाणी न्यायचे. मायमाऊल्या भल्या पहाटेपासून पाणी भरायच्या. सुखादुखाच्या गोष्टी व्हायच्या. सासू-सुनांच्या चुगल्याही व्हायच्या. कधी कडाक्याचे भांडण होऊन उनीदुनी निघायची. पण त्यात वेगळाच आनंद होता.
