आसारामच्या सुरस कथा

संताचा बुरखा पांघरलेले आसारामबापू तुरुंगात जाऊन आता अकरा दिवस लोटले आहेत. या कालावधीत दररोज त्याची नवनवीन कुकर्म बाहेर येत आहेत. कधीकाळी दारुची तस्करी आणि अजमेरच्या रस्त्यावर टांगा चालविणार्‍याने जमविलेली ८000 कोटीची संपत्ती, उपचार वा दीक्षा देण्याच्या नावाखाली असंख्य महिला भक्तांचे केलेले लैंगिक शोषण, तुरुंगात महिला वैद्याला बोलाविण्याची मागणी, रक्ताची चाचणी देण्यास नकार असा असंख्य सुरस आणि तेवढय़ाच संतापदायक कथा गेल्या आठ-दहा दिवसात बाहेर आल्या. मात्र सर्वात रंजक कथा आहे ती आसारामच्या अटक नाट्याची. 

 
१ सप्टेंबरला जोधपूरचे पोलीस आसारामला अटक करण्यासाठी इंदोरच्या आश्रमात गेले तेव्हा तिथे काय-काय नाटकं घडलीत याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे. जोधपूर पोलीसांचा ताफा डीआयजी राकेश गुप्ता आणि एसीपी चंचल मिश्रा या अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली इंदोरला पोहोचला तेव्हा भक्तांनी आश्रमाची नाकेबंदी करुन टाकली होती. आश्रमाकडे जाणार्‍या दोन्ही रत्यांवर हिरव्या मॅटीन टाकून भक्त रस्ता अडवून बसले होते. अशा परिस्थितीत वाहन घेऊन आश्रमात जाणे आणि तेथून आसारामला घेऊन बाहेर पडणे अशक्य होते. कोणत्याही परिस्थितीत भक्तांवर लाठीमार वा इतर अप्रिय प्रकार होऊ नये, याचे निर्देश पोलीसांना देण्यात आले होते. अशा परिस्थितीत पोलीसांचे काम अतिशय कठीण होते. आश्रमाच्या पदाधिकार्‍यांकडून भक्तांना फोन व एसएमएस करुन गर्दी करण्यास सांगण्यात येत होते. रात्री अकरापर्यंत पोलीसांनी भरपूर बंदोबस्त ठेवूनही पाच हजारांपेक्षा अधिक भक्त परिसरात जमा झाले होते. यावेळी पोलीसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला. गूगल मॅप्सच्या (नकाशा) माध्यमातून त्यांनी आश्रमात जाण्याचे इतर काही मार्ग आहेत का हे शोधणं सुरु केले. त्यात यश आलं. गुगल मॅप्सने एक रस्ता असा दाखविला ज्याचा उपयोग केवळ आश्रमाचे सेवक करत होते. पोलीसांनी त्या रस्त्यावर तातडीने साध्या वेषातील पोलीस तैनात केले आणि अधिकारी आश्रमात पोहोचले. पोलीस अधिकारी आश्रमात पोहोचले म्हटल्यानंतर आसाराम हादरला. त्याने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतले. अधिकार्‍यांनी दार ठोठावले तेव्हा ‘आत येण्याचा प्रय▪केला, तर मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल’, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर रात्रीच्या जेवणाच्या निमित्ताने तो मागच्या दाराने काहीवेळासाठी गायब झाला. इकडे बाहेर तणाव वाढत होता. इंदोर पोलीस जोधपूर पोलीसांना लवकर कारवाई आटपा, भक्तांची संख्या वाढली, तर कठीण जाईल हे सांगत होते. दरम्यानच्या काळात आसाराम व त्याचे वजनदार भक्त राजकीय नेत्यांना फोनाफोनी करत होते. मात्र मीडियाच्या दबाबामुळे कोणीही मदत करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आपल्याला आपला कोणताही राजकीय भक्त मदत करत नाही, हे पचविणं आसारामला अतिशय जड जात होतं. तरीही तो दार उघडायला तयार नव्हता. मी सकाळी तुमच्याशी बोलेल, एवढंच सांगत होता. शेवटी रात्री तीनच्या सुमारास एसीपी चंचल मिश्रांनी त्याला निर्वाणीचा इशारा दिला. आता जर दार उघडलं नाही, तर दार तोडून आम्ही आत येऊ. त्यानंतर मात्र स्वत:ला सर्वशक्तीमान भासविणारा आसाराम निमूटपणे पोलीसांच्या स्वाधीन झाला. पोलीसांनी कुठलाही वेळ न दवडता त्याला तातडीने गाडीत टाकले आणि विमानतळावर घेऊन गेले. मात्र भक्तांपर्यंत ती माहिती पोहोचलीच. त्याच्या खास भक्तांनी लगेच सकाळच्या इंदोर-दिल्ली विमानाची तिकीट बुक करुन बापू प्रवासात एकटे पडणार नाही याची काळजी घेतली. मीडियाचे काही प्रतिनिधीही विमानात होते. शेवटी दुसर्‍या दिवशी दुपारी आसारामची वरात व्हाया दिल्ली जोधपूरपर्यंत पोहोचली.

आसाराम जोधपूर तुरुंगाचा पाहुणचार घेत असतांना गेल्या दहा दिवसात आसारामचे असंख्य पराक्रम बाहेर आलेत. त्याचे अनुयायी मात्र आमचे बापू निर्दोषच आहे, असे सांगत आहे. त्याच्या ठिकठिकाणच्या आश्रमांमध्ये सद्या यज्ञ सुरु आहेत. हवनकुंडाच्या चारही बाजूंना असलेले भक्त पवन तनय बल पवन समाना. बुद्धी विवेक विज्ञान निधाना. स्वाहा… असे उच्चारत यज्ञकुंड तूप, काळे तीळ, साखर व आणखी बर्‍याच गोष्टींची आहुती देत आहेत. यामुळे बापू निर्दोष सुटलीत. त्यांच्यावरच्या सार्‍या आरोपातून मुक्त होतील, असा त्यांना विश्‍वास आहे. भक्तांचा हा भाबडा विश्‍वासच एवढे दिवस आसारामची ढाल होती. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूर येथील ज्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरुन आसाराम तुरुंगात गेला त्या तरुणीचे वडिल रमेशसिंहही आसारामचे असेच कट्टर भक्त होते. ते म्हणतात,ज्यांना देव मानले तेच भक्तांशी असे कृत्य करु शकतात यावर आजही विश्‍वास बसत नाही. १५ ऑगस्टला त्या रात्री मी स्वत: हजर नसतो, तर मुलगी व पत्नीच्या सांगण्यावर कधीही विश्‍वास ठेवला नसता. ११ वर्षापासून त्याची तन-मन-धनाने सेवा केली. माझी श्रद्धा ही अंधश्रद्धा होती, याची जाणीव आज होते आहे. रमेश सिंहांना आपल्या मुलीचं आयुष्य बरबाद झाल्यानंतर जाग आली. मात्र लाखो भक्त असे आहेत ज्यांना आसारामची अटक हे कारस्थानच वाटते आहे. आसारामच्या अटकेच्या अनुषंगाने गेल्या गुरुवारच्या मीडिया वॉचमध्ये ‘बापू, महाराज, स्वामी आणि श्रद्धेची झापडं लावलेली भक्त’ या मथळ्याखाली बुवा-महाराजांच्या महिलांचं शोषणं कसं करतात, त्यांची कार्यपद्धती काय आहे, हे लिहिलं होते. आसारामच्या अनेक भक्तांनी विशेषत: महिला भक्तांनी माझ्या या लिखाणाला विरोध दर्शविला. काहींनी धमक्याही दिल्या. काही प्रतिक्रिया मात्र मोठय़ा नमुनेदार होत्या. धुळे जिल्ह्यातील एका आमदाराची बहिण असलेल्या महिला भक्ताचा फोन आला. तिने सुरुवातीलाच माझा निषेध करुन बापूचे गोडवे गाणे सुरु केले. ती म्हणाली, ‘हे सोनिया गांधींचं कारस्थान आहे. बापू पवित्र आहे. मी अनेकदा आश्रमात जाते. पण त्यांनी कधी मला साधा हातही लावला नाही. बापू ब्रह्मचारी आहेत. अतिशय कठोरपणे ते ब्रह्मचर्य पाळतात. त्यांनी आयुष्यात केवळ दोनदा आपल्या पत्नीसोबत शरीरसंबंध केला, तो सुद्धा दोन मुलं होण्यासाठी. बाकी त्यांना महिलेचा डाग नाही.’ अशी इतरही बहुमोल माहिती पुरवितांना त्यांनी आसारामनी लिहिलेली ‘महान नारी’, ‘श्री गुरुगीता’ आदी पुस्तकं वाचण्याचा व बापूंच्या आश्रमांना भेट देण्याचा सल्लाही प्रस्तुत लेखकाला दिला. अशा भक्तांच्या भाबड्या विश्‍वासामुळेच असंख्य स्त्रियांचं शोषण होऊनही आसाराम एवढे दिवस गजाआड गेला नव्हता. सार्‍या बुवा, महाराज, बापूंचे भक्त ही अशीच पराकोटीची श्रद्धा बाळगून असतात. आमदारांच्या भगिनींनी जी पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला त्या ‘महान नारी’ या आसारामच्या पुस्तकात ‘मासिक पाळी आलेली महिला अपवित्र असते. तिच्या सावलीने झाडांची पानं, फुलं जळून जातात, गळून पडतात’, असा उल्लेख होता. ‘महिलांनी आत्मशुद्धीसाठी पाण्यात शेण घालून ते प्राशन करावे’, असा सल्लाही त्यात देण्यात आला होता. त्यावर गदारोळ झाल्यानंतर ते पुस्तकचं मार्केटमधून गायब करण्यात आलं., श्री गुरुगीता या आसारामच्या अन्य पुस्तकात ‘भक्त को अपना शरीर, प्राण और यहा तक अपनी पत्नी भी गुरु को अर्पण कर देनी चाहिए,’ असा उल्लेख आहे. आसारामच्या साबरमती येथील योगवेदांत सेवा समितीने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. महिलांचे अवमान करणारे एवढे स्पष्ट उल्लेख असतांनाही सुशिक्षित, संपन्न घरातील महिला भक्त त्याचं सर्मथन करतात याचा अर्थ भक्तांची डोकी किती मोठय़ा प्रमाणात बापूंनी काबिज केली आहेत, हे लक्षात येईल. काय बोलायचं. हरी ओम! हरी ओम!!

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleबापू, महाराज, स्वामी आणि श्रद्धेची झापडं लावलेले भक्त
Next articleडिजिटल विषमतेचा भूलभुलैय्या
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.