उचललेस तू मीठ मूठभर

 

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १३

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

 

या काळात नेहरू मात्र गांधीजींशी मतभेद राखूनही त्यांच्या अधिकाधिक जवळ जात राहिले. त्यांच्या लोकप्रियतेने शिखर गाठले होते. कोणी त्यांंना भारताचा कोहिनूर म्हणत तर कोणी भारताचे भूषण. त्यांना मिळणार्‍या या नामाभिधानांवरून घरातली माणसे त्यांची चेष्टा करायची. ब्रेकफास्टच्या टेबलवर त्यांना उद्देशून  विजयालक्ष्मी एकदा म्हणाल्या ‘हे भारताच्या कोहिनूरा, ते लोण्याचे भांडे इकडे घे’ तर खुद्द इंदिराच त्यांना एकदा म्हणाल्या, ‘ए त्याग शिरोमणी, जरा किती वाजले ते सांगाल का’. नेहरू त्यावर चिडत नसत आणि मोतीलालजी त्याचा आनंद घेत.

लाहोर काँग्रेसनंतर लगेचच नेहरूंच्या सांगण्यावरून आणि गांधीजींच्या सल्ल्याने मोतीलालजींनी त्यांचे आनंदभवन हे राहते घर  काँग्रेसला अर्पण केले. त्यावेळी त्याचे नाव स्वराज्यभवन असे ठेवण्यात आले. लवकरच ते एका साध्या व लहान घरात राहायला गेले आणि अल्पावधीतच स्वराज्य भवनाचे रूपांतर काँग्रेसच्या कार्यालयात व नेत्यांच्या रुग्णालयात झाले.

लाहोर अधिवेशनातच २६ जानेवारी हा दिवस देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याची घोषणाही करण्यात आली. त्या दिवशी देशभरातील सार्‍यांनी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा करावी असे ठरविले गेले. त्याला प्रतिसादही प्रचंड मिळाला. त्यानंतर लगेच इंदिराला लिहिलेल्या पत्रात नेहरूंनी म्हटले, ‘सारे वातावरण येणार्‍या वादळी वातावरणाने कुंद केले आहे’… सविनय कायदेभंगाच्या चळवळीची ती चाहूल होती.

याचवेळी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना गांधीजींनी ३१ जानेवारीला त्यांची अकरा कलमी योजना जाहीर केली. ती करताना त्यांनी ब्रिटीश सरकारला आवाहन केले की त्यांचा हा कार्यक्रम सरकार मान्य करीत असेल तर ते त्यांचे आगामी सविनय कायदेभंगाचे आंदोलन मागे घेतील. ती कलमे होती 1) देशात संपूर्ण दारूबंदी, 2) रुपया व डॉलर यांच्या ज्ाुन्या मूल्यांचे स्थायीकरण, 3) शेतसार्‍यात 50 टक्क्यांची सूट, 4) सरकारी नोकरांच्या वेतनात 50 टक्क्यांची कपात, 5) मिठावरील कराची समाप्ती, 6) लष्करावरील खर्च निम्म्याएवढा कमी करणे, 7) विदेशी कापडावर जास्तीचा आयात कर लावणे, 8) भारतीय नौकानयनाला संरक्षण व प्रोत्साहन, 9) सर्व राजबंद्यांची तात्काळ सुटका, 10) तथाकथित राजकीय गुन्हेगारीचा तपास करणार्‍या यंत्रणांचा शेवट आणि 11) आत्मसंरक्षणार्थ शस्त्र वापराचे नागरिकांना परवाने (नागरिकांच्या संमतीसह).

गांधीजींच्या या पवित्र्याने नेहरूंसह सारेच गोंधळले. गांधीजींच्या मागण्या देशातील सर्वच क्षेत्रांशी व वर्गांशी संबंधित होत्या आणि त्या सार्‍यांना सोबत घेऊ शकणार्‍या होत्या. मात्र सविनय कायदेभंगाच्या चळवळीला ऐन टोक येण्याच्या काळात गांधीजींनी हा पवित्रा जाहीर करून त्या चळवळीतील सारा जोमच काढून घेतला असे त्यांच्यासह अनेकांना वाटले. प्रत्यक्ष नेहरूंना ‘मिठाचा आणि स्वातंत्र्याचा संबंध काय’ असा प्रश्न पडला व तो त्यांनी जाहीरपणे विचारला. गांधी म्हणाले, ‘पाण्याबाहेर मिठाला अस्तित्वच नाही तरीही त्यावर कर लावून सरकार जनतेची आणि गरिबांची पिळवणूक करीत आहे. हा अतिशय अमानवीच नव्हे तर अनैसर्गित म्हणावा असा कर आहे.’

आणि पाहता पाहता ते मीठ देशभक्तीचे प्रतीक बनले. काही काळातच सारा देश त्याचा आत्मीयतेने विचार करू लागला. कायदा झुगारा आणि मीठ तयार करा हा गांधींचा नारा देशाने उचललेला दिसला आणि अल्पावधीतच मीठ हे क्रांतीचे प्रतीक बनले.

२ मार्चला व्हाईसरॉय इर्विन यांना ‘डियर फ्रेंड’ असे संबोधून लिहिलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात, ‘साध्या मीठावर गरीबांना एवढा कर द्यावा लागावा हा अमानूष अन्याय आहे. हा अन्याय तात्काळ दूर व्हावा अन्यथा दि. ११ ला मी माझ्या आश्रमातील सहकार्‍यांसह कायदा मोडून मीठ बनविण्याच्या सत्याग्रहासाठी साबरमतीहून निघेन. या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळेल व सारा देशच त्यात सहभागी होईल. त्यातून कोणतीही हिंसा उद्भवणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. मात्र तुम्ही मीठावरील कर तात्काळ मागे घेण्याची कारवाई केली पाहिजे.’ त्याला उत्तर देताना इर्विन यांनी लिहिले ‘तुमच्या आंदोलनातून हिंसाचार व अशांततेला बळ मिळेल याची मला भीती वाटते.’

हे आंदोलन थांबवा, फार तर त्यासाठी गांधींना अटक करा हा आपल्या सहकार्‍यांचा सल्ला इर्विन यांनी मनावर घेतला नाही. गांधींच्या आंदोलनात फार लोक सहभागी होतील असे त्यांना अखेरपर्यंत वाटलेच नाही…. प्रत्यक्षात १२ मार्चला सकाळी 6.30 वाजता गांधीजी आपल्या ७८ सहकार्‍यांना सोबत घेऊन दांडीच्या दिशेने पायी निघाले तेव्हा सारा देशच त्यांच्यासोबत चालू लागलेला जगाला दिसला. साबरमतीहून २०१ मैल अंतरावर असलेल्या दांडीला ते पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत केवळ ७८ माणसेच नव्हती, तर सारा देश होता. यात्रा निघाली तसतसे लोक तिला मिळत गेले. लोकांनी गावोगावी खार्‍या पाण्याचा उपसा करून त्याचे मीठ करण्याचा उद्योग सुरू केला. जेथे मीठ उपलब्ध नव्हते तेथे जंगल सत्याग्रह व काही जागी झेंडा सत्याग्रह सुरू झाला.

साबरमती आणि दांडीच्या मधोमध असलेल्या जम्बूसर या गावी मोतीलालजी आणि नेहरू गांधीजींना भेटायला आले. अहमदाबाद येथे भरलेली काँग्रेसची बैठक अर्ध्यावर सोडून ते तेथे आले होते. गांधीजींसोबत काही काळ चर्चा करून व त्यांचा निरोप घेऊन ते अहमदाबादकडे परतले. यावेळी नेहरू लिहितात, ‘गांधीजींचे तेव्हाचे दर्शन, हाती उंच काठी घेऊन भर वेगाने निघालेल्या साधकाचे होते, त्यांची पावले मजबूत आणि दृष्टी एकाग्र होती. त्यांच्यामागून जाणारा मोठा जमाव श्रद्धेने भारला होता.’ त्यावेळी देशातील तरुणांना उद्देशून नेहरू म्हणाले, ‘यात्रा निघाली आहे, युद्धाचे मैदान समोर आहे. देशाची लढाई तुम्हाला निमंत्रण देत आहे आणि स्वातंत्र्य तुमची वाट पाहात आहे. यावेळी तुम्ही पुढे याल की स्वस्थ बसाल? साम्राज्याचे बळ आपल्या सामान्यजनांना चिरडून टाकत आहे. ही थांबण्याची वेळ नाही. भारत मेला तर कोण जगेल आणि भारत जगला तर कोण मरेल?’

२३ मार्चला अहमदाबादमध्ये काँग्रेस कमिटीची बैठक होऊन तीत सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाची आखणी केली गेली. पक्षाच्या अध्यक्षांना अटक झाली की त्यांनी स्वत:च आपला उत्तराधिकारी नेमायचा व त्याने आपली नवी कार्यकारिणी नेमायची. हे प्रांत व जिल्हा पातळीवरही करायचे ठरले. गांधीजींनीही यावेळी पक्षाला लिहिले, ‘चौरीचुरा येथील हिंसाचारानंतर आठ वर्षापूर्वी मी आपले आंदोलन जसे मागे घेतले तसे यावेळी घेणार नाही. मात्र या आंदोलनाच्या अहिंसक स्वरूपावर सार्‍यांनी भर दिला पाहिजे.’ आपल्या दांडीयात्रेतही गांधीजी सार्‍यांना अहिंसेचा उपदेश करीत राहिले होेते.

दि. ५ एप्रिलला गांधीजींनी दांडीच्या समुद्रात उतरून तेथील मीठ उचलले आणि सत्याग्रहाला सुरुवात झाली. त्यांच्या अटकेनंतर आंदोलनाचे नेतृत्व अब्बास तैयबजी या मुस्लिम नेत्याकडे जायचे होते. त्यांच्या पश्चात सरोजिनी नायडुंची नियुक्ती व्हायची होती. नेहरू म्हणतात, ‘गांधींनी मिठाची पूड उचलली आणि सार्‍या देशातच क्रांतीचे वारे संचारले.’ ब्रिटीशांना दुर्लक्ष करावेसे वाटलेले हे आंदोलन काही काळातच देशव्यापी झाले. सरकारने ठिकठिकाणी अटकसत्र सुरू केले आणि जागोजागी गोळीबार केला. गांधीजी म्हणाले, ‘आपण देवदूत नाही. साधी व दुबळी माणसे आहोत. आपण लवकर उत्तेजित होतो तसे करणे टाळले पाहिजे. अंतिम युद्ध जिंकायचे असेल तर सरकारच्या आताच्या हिंसाचाराला आपण शांततेनेच उत्तर दिले पाहिजे.’ 14 एप्रिलला नेहरूंना अटक झाली. त्यांना सहा महिन्यांसाठी नैनीच्या तुरुंगावासात पाठविले गेले. हा त्यांचा चौथा तुरुंगवास होता आणि यावेळी ते सात वर्षांनी तुरुंगात आले होते.

बाहेर आंदोलनाने देशभर पेट घेतला होता. सरकारचे अत्याचार वाढले होते. आपल्या अटकेनंतर गांधीजींनी आंदोलनाचे व पक्षाचे नेतृत्व करावे ही नेहरूंची विनंती गांधीजींनी नाकारली. तेव्हा त्यांनी मोतीलालजींवरच ती जबाबदारी टाकली. यावेळी मोतीलालजी थकलेले व आजारीही होते. तरीही ते सार्‍या शक्तिनिशी आंदोलनात उतरले. यावेळी खालावत गेलेल्या त्यांच्या तब्येतीने दहा महिन्यात त्यांची जीवनयात्रा संपविली.

५ मे च्या पहाटे गांधीजींना दांडी येथील त्यांच्या झोपडीत, ते झोपेत असतानाच अटक करण्यात आली. त्यावेळी मीराबेनने लिहिले, ‘मध्यरात्रीच्या अंधारात एखादी मौल्यवान वस्तू चोरण्याच्या बेताने चोरांचे टोळके यावे तसे पोलीस आले आणि त्यांनी गांधीजींना आमच्यातून उचलून नेले. मात्र गांधीजींच्या देहाला हात लावताना तेही नम्र व अस्वस्थ झालेले दिसत होते. बहुदा त्यांनाही तेव्हा गांधीजींमध्ये एक प्रेषित दिसत असावा.’ नेहरूंच्या अटकेनंतर आंदोलन अधिक तीव्र झाले. लाठीमार, गोळीबार व अटकसत्र या सार्वत्रिक बाबी झाल्या. मिठाच्या आंदोलनाने अनेक रूपेही घेतली. ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार, विदेशी कापडांच्या होळ्या, दारूबंदीसाठी निदर्शने, जंगल सत्याग्रह वा झेंडा सत्याग्रह. या आंदोलनाचे वैशिष्ट्य हे की त्यात प्रथमच हजारोंच्या संख्येने महिला उतरल्या. त्यांनी तुरुंगवास पत्करला आणि सरकारच्या अत्याचारांनाही तोंड दिले. या आंदोलनात नेहरूंचे कुटुंबही अर्थात मागे राहिले नाही. त्यांची वृद्ध आई, बहीण व प्रत्यक्ष आजारी असलेल्या कमलादेवीही भर उन्हात विदेशी वस्तूंच्या दुकानांसमोर तासन्तास उभे राहून स्वदेशीच्या घोषणा देत होत्या. या आंदोलनाने स्त्रियांना प्रथमच घराबाहेर व राजकीय आंदोलनात आणले. त्यांच्या मनातील पोलिसांची व तुरुंगाची भीती घालविली. भारतीय स्त्रियांच्या सबलीकरणाचा तो आरंभ होता. आपली पत्नी, मुली वा सून अशी आंदोलनात सहभागी झालेली पाहणे मोतीलालजींना प्रथम अवघड गेले. मात्र पुढे ते स्वत:च तुरुंगात गेले तेव्हा त्यांना सार्‍यांचा अभिमानही वाटू लागला. तसे ते इतरांना बोलूनही दाखवताना नंतरच्या काळात दिसले.

कमला नेहरूंचा सत्याग्रहात सहभागी होण्याचा उत्साह नेहरूंना १९३० मध्ये प्रथमच जाणवला. आजारी अवस्थेत असलेल्या कमला नेहरू सत्याग्रहींना सोबत घेत होत्या, त्यांना घराबाहेर काढत होत्या आणि त्यांच्या संघटना उभारून त्यांना पोलिसांसमोर उभे करीत होत्या ही गोष्ट नेहरूंना तुरुंगात असतानाही अभिमान वाटायला लावणारी होती. कमला ही पत्नी कमी आणि सहकारीच अधिक असल्याची पहिली जाणीवही तेव्हा त्यांना झाली. त्या स्वत:ला ‘माझी पत्नी असल्याचे’ सिद्ध करीत आहे अशी भावनाही त्यांच्या मनात आली.

‘शिक्षण आणि सार्वजनिक अनुभव या दोहोंचाही अभाव असताना त्यावर तिच्यातील ऊर्जा आणि सामर्थ्य मात करताना मला दिसले. अतिशय थोड्या काळात त्या सार्‍या अलाहाबादच्या अभिमानाचा विषय बनल्या.’ हे मग नेहरूंनीच त्यांच्याविषयी लिहिले. एवढ्या दिवसांचा तुरुंगवास आणि दुरावा यातून नेहरूंच्याही लक्षात एक बाब आली नव्हती. कमला नेहरूंना त्यांची नुसती गृहिणी व्हायचे नव्हते. त्यांची राजकीय सहकारी व  त्यांच्या बरोबरीने सार्‍या लढ्यात साथ देणारी साथीदार व्हायचे होते. ही जाण नेहरूंचे कमलाविषयींचे प्रेम व आदर वाढविणारी आणि त्या दोघांना मनाने जवळ आणणारी होती.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमालाजुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://mediawatch.info/category/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82/

***

Previous articleसुगंधाचा प्रवास सोपा नाहीये!
Next articleक्या अक्षय कुमार का प्रधानमंत्री मोदी का इंटरव्यू पेड न्यूज़ नहीं है ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here