उन्हात तळपणारी माणसं …..

साभार -दैनिक सकाळ

-हेरंब कुलकर्णी 

ऐन मे महिना, तापमान ४२ च्या आसपास. हवामानखात्याचे अधिकारी टीव्हीवर अगदी सकाळीच सांगताहेत’ गरज असेल तरच बाहेर पडा’..या सूचनेच्या मध्यमवर्गीय चौकटीचे हसू येत होते . ज्यांना बाहेर पडण्याची गरज नाही ते आर्थिक सुरक्षितता लाभलेले घरात थांबतील पण ज्यांना उन्हात जाण्याशिवाय पर्यायच नाही त्यांचे काय ? असे उन्हात तळपणारे जीव बघावेत म्हणून सकाळी ९ वाजताच बाहेर पडलो..उन तापू लागलेले. थंडगार कुल्फी विकणारी मुले आठवली. त्यांच्यातही आता तीन वर्ग निर्माण झालेत. पायी गाडी ढकलत विकणारे, सायकलवर पेटी लावून गावोगावी जाणारे आणि मोटारसायकलवर विकणारे.मला उन्हात सायकलवर कुल्फी विकणारे बघायचे होते. रोज भर उन्हात जड पेटी लाऊन रोज किमान ३० किलोमीटर ही मुले फिरतात. यात अनेक मुले परप्रांतीय आहेत
.मी शोधत असताना उत्तरप्रदेश मधून आलेला अजितसिंग भेटला.सायकलवर पेटी लाऊन निघालाच होता. त्याला सोबत येऊ का विचारले ? मी माझ्या गाडीवर पाठीमागून जाणार होतो. त्यामुळे तो ‘हो’ म्हणाला. तो पुढे व मी मागे. साडेनऊला सुरुवात झाली.कुल्फीची पेटी किमान २० किलो वजनाची.सायकल अतिशय जुनाट. तिला घंटी बसवलेली. गावाबाहेर पडलो. पहिल्या ६ किलोमीटरमध्ये त्याला एकही गिऱ्हाईक मिळालं नाही. पुढे अवघी २ ते ४ गिऱ्हाईक. लांबून लहान मुले दिसली की तो आशेने घंटी वाजवायचा.खूप विरळ घरे असल्याने तो घरे दिसली की थांबून घंटी वाजवायचा. एक तासात १० किलोमीटर आंम्ही दूर आलो होतो. अंगात बनियन नसल्याने पाठीवर त्याचा शर्ट घामाने ओला झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याला थोडावेळ माझी गाडी घे, मी सायकल घेतो म्हणालो तर विनम्रपणे ‘ नही बाबूजी ‘ इतकेच ठाम उत्तर. मला गाडीवरून जाताना लाज वाटायला लागली. माझ्या शारीरिक कमजोरीची शरम वाटली. उन्हाची वेळ झाल्याने लोक घरात बसले होते त्यामुळे बाहेरही कोणी दिसत नव्हते. त्यामुळे निरर्थक सायकल चालवत राहणे इतकेच तो करीत होता.एका ठिकाणी त्याच्या गावाकडचा माणूस राहत होता.त्याच्याकडे थोडावेळ थांबला. नंतर माझ्याशी बोलू लागला. उत्तरप्रदेशमधील हरडोई जिल्ह्यातला. ३ वर्षाचा असताना आई cancer ने गेली.वडील दारुडे.ते ही वारले.वयाच्या ६ वर्षीच अनाथ झाला.दोन मोठे भाऊ इतर प्रांतात काम शोधायला निघून गेले आणि गावात हा एकटाच राहिला.थोडीफार शेती होती ती नातेवाईकानी वाट्याने दिली. हा एकटाच घरात राहतो, हाताने स्वयंपाक करतो. शाळेत जातो.सुटीच्या दिवशी कामे करतो. शाळेला सुटी लागल्यावर तो इकडे महाराष्ट्रात आला. सायकलवर कुल्फी विकायला लागला. बिनआईबापाचे ते अनाथ लेकरू उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्राच्या एका खेड्यात जगण्यासाठी करीत असलेली धडपड बघून मन भरून आले. रोज किती रुपये मिळतात विचारले. तो म्हणाला “ कंपनीकडून आलेला चोकोबार ५ ला मिळतो तो हा १० ला विकतो व स्थानिक कारखाना अडीच रुपयात कुल्फी देतात त्या ५ रुपयाला विकतो. थोडक्यात निम्म्याला निम्मे पैसे मिळतात. रोज ५०० ते ६०० रुपयांची इतके फिरून विक्री होते आणि २५० ते ३०० रुपये उरतात .त्यात नाश्ता,चहा, सायकल दुरुस्ती असे ५० रुपये रोज खर्च होतात म्हणजे ३० किलोमीटर कडाक्याच्या उन्हात सायकल चालवून घामाघूम होत २०० ते २५० रुपये मिळतात. त्यात जवळच्या गावात हातगाडीवर कुल्फी विकणारे जातात त्यामुळे तिथे संधी नसते आणि मोटारसायकलवाले लांबची गावे करतात त्यामुळे सायकलवर फार धंदा होत नाही. अधली मधली घरे, वस्त्या इथेच विक्री होते. सकाळ संध्याकाळ कुणी घेत नाही त्यामुळे कडाक्याच्या उन्हातच विक्री होते त्यामुळे उन वाढले की शरीर नाराज पण मन आनंदी अशी यांची विचित्र स्थिती असते. इतकी जड पेटी घेवून दिवसभर सायकलिंग केल्याने पायाला गोळे येतात,डोळ्यांची जळजळ होते पण तरीही दुसऱ्या दिवशी अडीचशे रुपयांसाठी ते करावेच लागते.मोटारसायकलवाल्याचे १०० ते १५० रुपये पेट्रोलवर जातात त्यामुळे फार मिळकत होत नाही. हातगाडी उन्हात ८ ते १० किलोमीटर लोटत विक्री करणे दमविणारे असते.
कुल्फिवाल्यासोबत १५ किलोमीटर फिरल्यावर तो एका कुल्फी कारखान्यात थांबला. मालकाने मला बघितले. मी बालमजुरीविरुद्ध तक्रारी पूर्वी केलेल्या असल्याने त्याने याच्या कानात काहीतरी सांगितले. ‘ माझे वय १७ आहे ‘असे तो म्हणताना मी ऐकले आणि नंतर तो घाबरला. त्याने पेटी तिथे लावली आणि दुसरी सायकल घेवून ‘ मै आया बाबूजी ‘ म्हणत पसार झाला. मी अर्धा तास वाट बघितली व नाद सोडून दिला. त्या मालकाने घाबरवल्यामुळे बिचाऱ्याचा दिवसभराचा धंदा बुडाला होता. मला विलक्षण अपराधी वाटले.संध्याकाळी मी त्याचे घर शोधत गेलो.चिंचा फोडत बसला होता. मला पाहून पुन्हा घाबरला. त्याची भीती काढली व अपराधी भावनेने त्याचे आजचे बुडालेले ३०० रुपये त्याला दिले. कष्ट न करता ते ही तो घेईना. बळेच खिशात कोंबले. इतकी इमानदार ही कष्टकरी माणसे, कुठून कुठे जाणारी आणि क्षणाक्षणाला भीतीच्या वरवंट्याखाली जगणारी..पिचलेली माणसे
तो पळून गेल्यावर मग मी उन्हात एका शेतात २० ते २५ महिला मजूर काम करीत होत्या तिथे गेलो. tomatoच्या शेतात बांबूच्या तारेला tomatoच्या रोपाची दोरी बांधण्याचे काम त्या करत होत्या. दुपारचा एक वाजला होता. उन्हामुळे सर्वत्र सामसूम होती.महिला दोरी बांधत होत्या. त्या उन्हात चप्पलसुद्धा तापून चटके देत होती. एका हंड्यात पाणी ठेवलेले होते ते ही गरम झालेले .तरीही त्या गरम पाणी सारखे पीत होत्या. डोक्यावर काहींनी hat किंवा cap घातलेल्या,त्याखाली ऊन कमी लागावे म्हणून डोक्यावर लिंबाचा पाला घेतात. उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून अंगात पुरुषांच्या जुन्या शर्ट pant घातलेल्या. बायका काम करताना सारख्या बोलताहेत, हसताहेत उन विसरण्यासाठी. मी विचारतो की सकाळी खूप लवकर काम सुरु करून उन्हात विश्रांती का घेत नाहीत ? त्या म्हणाल्या “घरची कामे करावीच लागतात आणि १० किलोमीटरहून इथे यावे लागते. त्यामुळे उन्हातच काम करावे लागते. इतक्या तप्त उन्हात कामाचे त्यांना फक्त २०० रुपये मिळणार होते. याच उन्हात त्या कांदे भरण्याचे काम करतात,निंदणी,खुरपणीचे काम करतात.उन्हाचा काय त्रास होतो ? विचारले. त्या म्हणाल्या “संघ्याकाळी तळपायाची खूप आग होते, खूप थकवा येतो, डोळ्याची जळजळ होते. मळमळ होते ,डोके खूप दुखते..” कितीही थकले तरीही दुसऱ्या दिवशी पहाटे उठावेच लागते आणि जनावरांचे आवरून, घरचा स्वयंपाक आवरून घाईने जीपमधून कामावर यावेच लागते. पहाटे ५ ते रात्री १० असे सलग काम त्यात निम्मा दिवस या तळपत्या उन्हात….पुढचे ऐकण्याचे त्राणच राहिले नाही..सावलीत कधी एकदा जाईल असे मला झाले..

उन्हात आणखी कोण काम करतेय ? हे शोधायला निघालो. दूर तळपत्या उन्हात मला माणसे खड्डे खंदताना दिसली. जवळ गेलो तर इलेक्ट्रिक खांब बसवण्यासाठी ते खड्डे खोदत होते.वीजमंडळ हे काम ठेकेदारांना देते. ठेकेदार मजूर नेमून हे काम करतात.३ ते ४ फुटाचे खड्डे ते खडकाळ जमिनीत खोदतांना घामाने भिजून गेले होते. अरुंद खड्ड्यातून जमिनीवर पालथे झोपून छोट्या खोऱ्याने माती काढताना होणारी कसरत बघवत नव्हती. खडकाळ जमीन त्यांचा घाम वसूल करीत होती. एकमेकांशी बोलताना धाप लागत होती. खड्डा पूर्ण झाल्यावर दूर ठेवलेला तो पोलादी खांब उचलला. उन्हाने गरम झाल्याने चटका बसत होता.१५० किलो वजनाचा खांब असावा. टेकवत टेकवत दुरून त्यांनी आणला. त्याच्या एका टोकाला जड दोरीचा नाडा बांधला आणि पुन्हा ताकद लावून पारंपारिक गाणे म्हणत ओरडत त्या खड्ड्यात तो टेकवला.पटापट मोठे दगड त्यात टाकले. बाकीच्यांनी त्या दोरीची टोके हातात धरून ताण दिला होता. खड्ड्यातील दगडावर पहारीने ठोके मारताना घामाने तो भिजून गेला होता पण त्या कामाच्या तणावात तिकडे लक्षही नव्हते.खांब पक्का बसल्यावर छोटा पाळणा घेवून एकजण वर चढला त्यावर बसला. इतक्या निमुळत्या ठिकाणी बसून काम करणे जोखमीचे होते. त्यावर त्याने वायर ओढली आणि उतरला आणि ते पुन्हा पुढच्या खड्ड्याकडे वळले. घाम पुसताना त्यांच्याशी बोललो.रोज सहा मजूर ६ ते ८ वायरिंगसह खांब उभे करतात. यावरून त्यांच्या कष्टाची कल्पना यावी.खड्डे खंदून,खांब उभे करून वायर ओढून देऊन लाईट सुरु करण्यापर्यंत सगळी कामे हे तरुण करत होते . भर उन्हात हे काम करण्याची मजुरी होती फक्त ३०० रुपये. त्यात ते रोज ५० किलोमीटर अंतरावरून दोघे दोघे मोटारसायकलवर येत होते म्हणजे पेट्रोलचा खर्च वजा जाता २२५ रुपये मजुरी पडत होती. इतक्या कडक उन्हातून ओढलेल्या विजेच्या तारेतून अनेक घरात पंखे कुलर फिरणार होते आणि ते ओढणारी माणसे मात्र उन्हात भाजताहेत. मी त्यांना विचारतो की ही कामे सकाळी किंवा संध्याकाळी उन्हे उतरताना का करत नाही ? ते म्हणाले “५० किलोमीटरवरून येतो त्यामुळे सकाळी शक्य नाही आणि संध्याकाळी हे काम करताना लाईट घालवली की लोक ओरडतात त्यामुळे दुपारीच हे करावे लागते “
कामे वेगवेगळी पण अमानुष कष्टाचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामात समान दुवा.कार्ल मार्क्स म्हणाला होता “माणसांच्या वाट्याला माणसांची दु:खे यावीत, जनावरांची दु:खे येऊ नयेत”भर उन्हात भाजणारी ही माणसे बघितली की यांच्या वाट्याला माणसांची दु:खे येत नाहीत असेच वाटत राहते. आपण भर उन्हात सुटी घेत कुलर,एसीत झोपलेलो. निमुटपणे सुटीचाही आपला पगार जमा होणार आणि दुसरीकडे एक एक रुपयासाठी एक एक घामाचा थेंब देणारी ही माणसे…अखेर यांनी या व्यवस्थेत गुन्हा तरी काय केलाय ???

8208589195

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत )
[email protected]

……………………………………………………………………………………………………………………………………….

साभार -दैनिक सकाळ

 

Previous articleमोदींचा विजय नेमका कशामुळे?-सुहास पळशीकर
Next article१९३७ चा कायदा आणि काँग्रेसमधील मतभेद
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here