उपेक्षित प्रतिभेचे ‘टिकटॉक’ पुराण

(साभार : दिव्य मराठी)

-अविनाश दुधे

टिकटॉकची यशोगाथा हा अभ्यासाचा विषय आहे. भारतात केवळ चार वर्षात  टिकटॉक अफाट वेगात लोकप्रिय झालं.  टिकटॉकमुळे ग्रामीण भागातील तरुण एकदम ग्लोबल झाले . रंग,रूप व शहरी चटपटीतपणाच्या अभावाने ज्या तरुणांना कलेच्या जगात संधी मिळणे अवघड होते , ते टिकटॉकमुळे काही दिवसातच ‘स्टार’ झालेत . त्यांच्यासाठी टिकटॉकवरील बंदी निराशाजनक आहे .

……………………………………………………….

भारताने ‘टिकटॉक’, ‘शेअरइट’सारख्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर चीन सरकारचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ या दैनिकाने भारताला टोमणा मारताना, ‘चिनी जनतेने भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकायचे ठरवले तरी उत्पादनेच सापडणार नाही’ , या शब्दात खिजवले होते. चीनची ही प्रतिक्रिया अ‍ॅप बंदीच्या चिडीतून आली असली तरी त्यांनी सांगितलं ते विदारक वास्तव आहे. आपण आयटी क्षेत्रातील आपल्या प्रगतीच्या, आत्मनिर्भरतेच्या कितीही गप्पा हाणत असलो तरी आजच्या घडीला अब्जावधीची उलाढाल असलेल्या सोशल मीडिया, अ‍ॅपच्या जगात पहिल्या पन्नास अ‍ॅपमध्ये अस्सल भारतीय म्हणावं असं कुठलंही अ‍ॅप वा सोशल मीडिया प्लॅटफार्म नाही. जगभर सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या पहिल्या १० अ‍ॅपमध्ये फेसबुक, फेसबुक मेसेंजर, व्हाट्सअप, टिकटॉक, इन्स्टाग्राम, स्काइप , शेअरइट, लाइकी, नेटफ्लिक्स, स्पाटीफाय आदींचा समावेश आहे.  या अव्वल अ‍ॅपपैकी बहुतांश अ‍ॅप हे चिनी किंवा अमेरिकन कंपनीच्या मालकीचे आहेत .

   ज्या टिकटॉक बंदीवरून सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे, ते अ‍ॅप ‘बाईटडान्स’ या चिनी कंपनीने विकसित केले आहे . या कंपनीचा संस्थापक झांग यिमिंग झांग हा ३७ वर्षाचा तरुण आहे. तो केवळ २९ वर्षाचा असताना त्याने बाईटडान्सची स्थापना केली. टिकटॉकसोबतच या कंपनीने सुरु केलेला Tautiao नावाचा न्यूज प्लॅटफार्मही अतिशय प्रसिद्ध आहे . या कंपनीकडे  Xigua Video, Top Buzz आणि Buzz Video ची मालकीही आहे. या कंपनीचे इतरही अनेक अ‍ॅप असले तरी  टिकटॉकची भरारी चकित करणारी आहे. जगभरात जवळपास १८० कोटी लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये टिकटॉकने पसंतीची जागा मिळविली आहे. भारत सरकारने बंदी घालण्यापूर्वी भारतात ६१.१ कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले होते . गंमत म्हणजे टिकटॉक चीनपेक्षाही भारतात अधिक लोकप्रिय झाले होते . कोरोना काळात ‘आरोग्य सेतू’ पेक्षा टिकटॉक अधिक डाऊनलोड झाले. मार्च ते मे या तीन महिन्यात पाच कोटी भारतीयांनी टिकटॉकला आपल्या फोनमध्ये जागा दिली होती. ‘सेन्सर टॉवर’ या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, टिकटॉक डाऊनलोड करणाऱ्या प्रत्येक तीन माणसांमागे एक भारतीय होता.  भारतापाठोपाठ चीनमध्ये  टिकटॉकचा वापर होतो. तिथे जवळपास २० कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. अमेरिकेत १६ कोटी लोक हे अ‍ॅप वापरतात.

    जगातील १५० देशात आणि मराठीसह तब्बल ७५ भाषांमध्ये  टिकटॉकची सेवा उपलब्ध आहे . टिकटॉकच्या वेबसाईटवर अ‍ॅपच्या निर्मितीमागचा उद्देश  Our mission is to capture and present the world’s creativity, knowledge, and precious life moments असे नमूद करण्यात आले आहे . टिकटॉकशी जे परिचित आहेत त्यांना टिकटॉकवर तयार करण्यात येणारे १५ सेकंदाच्या व्हिडीओची धमाल माहीत आहे.  भारतात टिकटॉक व्हिडीओच्या निमित्ताने तरुणांची  सर्जनशीलता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. ग्रामीण भागातील अनेकांच्या कलागुणांना टिकटॉकने प्लॅटफॉर्म मिळवून दिला.

धुळे जिल्ह्याच्या  साक्री तालूक्यातील दिनेश पवार आणि लखानी पवार या आदिवासी  नवरा-बायकोची जोडी टिकटॉकमुळे चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. टिकटॉकवर जवळपास २४ लाख लोकांनी त्यांचे धमाल व्हिडीओ पाहिले आहेत. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनीही या जोडप्याची दखल घेतली.  अभिनेत्री रविना टंडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू  डेव्हिड वार्नर यांनीही या जोडप्याचे कौतुक केले. बारामतीजवळचा सूरज चव्हाणही टिकटॉकमुळे राज्यात अतिशय लोकप्रिय झाला. ‘गुलीगत’ हे त्याचे टोपण नावही चांगलेच फेमस झाले आहे . त्याचे १५ लाख फॉलोअर्स आहेत.

नक्क्की पाहा- बिनधास्तपणाच्या जोरावर ‘गुलीगत’ राज्यात प्रसिद्ध- क्लिक कराhttps://bit.ly/3gA9Jc2

     टिकटॉकने असे अनेक ‘स्टार’ जन्माला घातलेत. ‘टिकटॉक स्टार’ हीच त्यांची ओळख आहे . आपल्या प्रांतात, परिसरात एखाद्या सिनेस्टारसारखी त्यांची लोकप्रियता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नावासोबत पैसाही कमाविता येतो, हे  टिकटॉकद्वारे अनेकांनी दाखवून दिले . मंजुल खट्टर, अवेज दरबार, रियाझ अली , गिमा आशी, फैसल शेख, अवनीत कौर, जन्नत जुबैर, जितेंद्र पाल सिंह, युवराज सिंह परिहार, लकी डान्सर हे तरुण –तरुणी टिकटॉकचे भारतातील आघाडीचे ‘स्टार’ आहेत . यातील बहुतांश कलावंत हे छोट्या शहरातील आहे. या प्रत्येकाचे फॉलोअर्स काही लाखांत आहे .त्यांच्या  व्हिडीओची लोकप्रियता त्यांना महिन्याला सरासरी ३ ते २० लाख रुपये मिळवून देत असे.  टिकटॉक व्हिडीओमुळे महिन्याला १ लाख रुपयांच्या आसपास कमाई करणाऱ्यांची संख्याही एक हजारच्या आसपास होती . टिकटॉक बंदीमुळे हे सारे आता निराश आहेत . ‘चिंगारी’, ‘मित्रों’सारखे भारतीय अ‍ॅप आता टिकटॉकची जागा घेऊ पाहतेय . त्या माध्यमातूनही प्रतिभावंत कलावंतांना नवीन आकाश गवसेल, ही आशा करूया!

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

टिक टॉकवरचं गावरान कपल जोमात- नक्की पाहा

Previous article‘दास बूट’-पाणबुडीचं जग दाखविणारा भन्नाट युद्ध चित्रपट
Next article‘लग जा गले’ ची दर्दभरी दास्तान…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.