एकाकीपणाचे पिशाच!

साभार: साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

धर्मांनी स्त्रियांनाच स्वातंत्र्य नाकारले असे नाही, त्यांनी ते पुरुषांनाही नाकारले. स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येकच चेटकीण वध्य असते, असे ख्रिस्ती चर्चने म्हटले. तेच इतर धर्मांनी वेगवेगळ्या स्वरूपात सांगितले. इस्लामने स्त्रीला बुरखा घालायला लावून तिला एकटेपणीही बंदिवान केले. हिंदू धर्मात स्त्री ‘पापाची खाण’ ठरवली गेली. त्याच वेळी या सर्व धर्मांनी पुरुषाचाही स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नाकारला. तर्क करा, पण तो वेदानुकूलच करा- असे हिंदू धर्माने सांगितले. इस्लामने कुराणाहून वेगळा विचार ही कुफरत ठरविली, तर बायबलहून वेगळा विचार धर्मविरोधी व निषिद्ध असल्याचे ख्रिश्चन धर्माने सांगितले. जिथे स्वतंत्र विचाराचे व बुद्धीचे स्वातंत्र्य नाकारले जाते, तिथे व्यक्तीचे एकाकीपण कोण लक्षात घेईल आणि त्यावर समाजाने धर्म व संस्कृतीच्या नावाने टाकलेली बंधने कोण नाकारील?
…………………………………………………..

व्यक्ती- मग ती पुरुष असो वा स्त्री- खऱ्या अर्थाने एकटी व एकाकीच असते. जन्माला येताना असते तशी जातानाही ती एकटीच असते. आई-वडील असतात, बहीण-भाऊ, पत्नी-मुले आणि मित्र व नातेवाईक. पण ते सारे तिच्या नेपथ्याचा भाग असतात. त्यात असतानाही त्याचे दूरत्व जाणवते. त्यातून बाहेर पडले की मग तर त्याचे स्मरणही राहत नाही. व्यक्ती ही फक्त तिची असते आणि तिच्यातच असते. नाटक पाहावे, सिनेमा पाहावा, गाणे ऐकावे किंवा एखादे पुस्तक वाचताना त्यात रंगून जावे- हा तिच्या जीवनाचा भाग नसतो. तो सारा तिच्या स्वतःचे एकाकीपण हरवण्याच्या प्रयत्नाचा भाग असतो. त्यात कधी यशस्वी होता येते, तर कधी अपयश येते. पण ते तसे होत असणे हाही एक तात्कालिक भाग असतो. तो आयुष्याचा भाग नसतो.

हे एकाकीपण व्यक्तीला आत्मभानासोबत लाभत असते. हे भान जसे वाढते तसे त्याचे एकाकी असणेही वाढते. आत्मभान हे जसे समाजभान जागे करते, तसे व त्याच वेळी त्यापासूनचे स्वतःचे वेगळेपणही जाणवून देते. हे वेगळेपण व एकाकीपण समाजधारणेला फारसे पोषक नसल्याने ते संपविण्याचा वा त्याला आळा घालण्याचा प्रयत्न समाजाकडूनही होतच असतो. या एकाकीपणावरील मार्ग तत्त्वज्ञांना सांगता आले नाहीत. पाश्चात्त्य आणि पौर्वात्य असे सारेच तत्त्वज्ञ त्यात येतात. धर्म येतात, जग आणि सभोवारचे पर्यावरण येते; पण तो सारा आयुष्याला दिलासा देणारा वा तो दिल्याचे भासविणारा भाग असतो.

आस्तिक्याची कल्पना व्यक्तीला ‘नसलेल्या व अनुभवाला न येणाऱ्या’ ईश्वराशी जोडते, तर नास्तिक्य तिला स्थळ-काळाशी जोडते. पण ते जुळणे मानसिक वा भावनिक पातळीवर राहते आणि त्याचा अनुभवही अल्पकाळ टिकणारा असतो. ईश्वराशी एकरूप होणे वा मोक्ष पावणे या साऱ्या कविता आहेत. त्यांचा सत्याशी वा वास्तवाशी संबंध नाही.

नदीच्या पात्रात किंवा वाळवंटात वाळूचे कण असतात. ते खूप असले वा समुद्रात दिसले तरी त्यांचा परस्परसंबंध नसतो. सिमेंट किंवा मातीत जुळविले गेले की, ते एकत्र येतात; पण एकत्र असले तरी एकेकटे व एकाकीच राहतात. झाडाच्या पानांचे तसे नाही. ती एकमेकांना लगडलेली असतात व त्यांच्यात एकच जीवनरस वाहत असतो. त्यांचे रंग व रूप परस्परभिन्न असते. एकाच डहाळीवरची पाने वेगवेगळ्या रूपात व आकारात दिसतात, पण त्यांचे आतून एक असणे स्पष्ट असते व ते जाणवते. व्यक्तींचे तसे नाही. एकाच कुटुंबात, वंशात, वर्णात, जातीत, धर्मात वा देशात असली, तरी ती सर्वस्वी वेगळी असतात. माणसांमध्येही- मग ती कोणत्याही देशाची, धर्माची वा वर्णाची असोत- एकच जीवनरस वाहतो, असे पौर्वात्य तत्त्वज्ञ सांगतात. तो जीवनरस म्हणजेच आत्मतत्त्व किंवा परमात्मभाव. पण झाडाचे एक पान तोडले की, ते कोमेजायला लागते. व्यक्तीचे वेगळेपण तिला कोमेजून टाकत नाही. झाडाची फांदी तोडली की, ती निर्जीव होते. माणसे तुटतात, समाज तुटतात वा देश तुटतात; तेव्हा त्यांचे वेगवेगळे भाग निर्जीव होत नाहीत. हेच व्यक्तीबाबतही खरे असते. वाळूचा कण जसा केव्हाही सारखा असतो; कालमानापरत्वे तो तुटेल वा झिजेल, पण त्याचे वाळूचा कण असणे कायम राहते. व्यक्तींचेही या कणासारखे आहे. ती वयोमानापरत्वे बदलेल, पण व्यक्ती म्हणून तिचे स्वतंत्र व वेगळे असणे आणि एकाकी असणेही कायम असते.

एक सर्वस्वी वेगळे उदाहरण पाण्याचे आहे. पाणी एकात्म व एकजीव असते. ते एकत्र मिसळले की मिसळते व वेगळे केले तरी त्याचा गुणधर्म ते सोडत नाही. पण पाणी ही बाबच सर्वस्वी वेगळी आहे. ती एकत्र असली, समुद्रात असली, सरोवरात वा विहिरी आणि भांड्यात असली, तरी ती एकच असते. तिच्या साऱ्या गुणधर्मानिशी तीच असते. ती वेगळी करता येत नाही, केली तरी तिची ओल कायम राहते. वाळू आणि पाणी यातला हा फरक आहे. वाळूचे कण वेगळे असतात, पाण्याचे थेंब एकजीव असतात. त्यांना वेगळे करता आले तरी त्यांचे एकरूप असणे कायम असते. हवेचा गुणधर्मही हाच आहे. तीही कप्पाबंद केली, तरी तिच्या मूळ धर्मापासून वेगळी होत नाही.

माणूस- स्त्री वा पुरुष यांचे स्वभावधर्मच त्यांना दूर ठेवतात. एकत्र आले तरी ते एक होत नाहीत आणि एक झाले असे म्हटले तरी ते तसे राहत नाहीत. देह, मन, बुद्धी (मानलाच तर आत्मा) ही त्यांची सारी अंगे स्वतंत्र असतात. गर्दीतही त्यांचे ते वेगळेपण कायम असते. मित्रांत ते काही काळ विसरता येते, कलेत रमले की हरवता येते; पण तो संदर्भ संपला की, माणसे पुन्हा एकटी व एकाकीच होतात. एका लोकप्रिय पंतप्रधानांसोबत खासगीत बोलत असताना त्यांना प्रस्तुत लेखकाने प्रश्न विचारला, ‘‘ज्याचा सर्वाधिक परिणाम मनावर राहिला, असा आयुष्यातला प्रसंग कोणता?’’

‘‘प्रसंग नाही,’’

ते म्हणाले, ‘‘अनुभव.’’

‘‘माझ्या सभांना लाखोंच्या संख्येने लोक येतात. भाषणात रंगतात, टाळ्या वाजवतात. क्षणभर मलाही ते माझे विश्व वाटू लागते. पण एखाद्या क्षणी मनात येते, मी यांचा आहे, पण यांच्यातले माझे कोण आहेत? त्या क्षणी मला माझे एकाकीपण कधी नव्हे तेवढे जाणवते.’’

पंतप्रधान वाळूचा कण नव्हते, ते हिमालय होते. त्यांचा अनुभव हा असेल, तर बाकीच्यांचा अनुभव कसा असेल? माणसे बोलत नाहीत, कारण त्यांना आपली लोकमान्यता आणि लोकप्रियता मिरवायला आवडते. नव्हे, तो त्यांच्या जगण्याचाच भाग असतो. पण स्वतःलाही ती खरवडून पाहत असतील वा तसे त्यांना पाहता येत असेल, तर त्यांनाही त्यांचे ‘एकाकी नागवेपण’ (याला शॉपेन हॉवर नेकेड लोन्लीनेस म्हणायचा) कसे दिसत असेल? पत्नी, मुले, कुटुंब यातले आपले कोण, एकाकीपणात सहभागी होणारे किती आणि त्यांचेच ते वाळूचे कण किती?

हे एकाकीपण आत्मकेंद्रीपणातून येत असेल काय? इतरांविषयीच्या तुच्छतेतून, दुराव्यातून, समाजाविषयीच्या वा एकूणच माणसांविषयीच्या दुष्टाव्यातून? की, ते उपजत असते? जन्मतःच रडणारे मूल आपण एका सुरक्षित कोषातून बाहेर आल्याच्या जाणिवेने टाहो फोडत असेल काय? आई-बाप, कुटुंब आणि अवतीभवतीचा परिसर हे सारे सवयीने जवळचे होतात काय? त्या परिवाराखेरीज ते मूल इतरांत राहिले आणि वाढले, तर तो दुसरा परिवारही त्याला त्याचा वाटतो की नाही? माणसे वाढतात, मोठी होतात; पण दुरावलेले सुरक्षितपण त्यांना पुन:पुन्हा खुणावते व आठवते काय? एरिक फ्रॉम तसे म्हणतोही. खरा प्रश्न या एकाकी अवस्थेत माणसे सुखी व आनंदी असतात काय, हा आहे. आनंद वा दुःख या सापेक्ष बाबी इतर घटकांवर अवलंबून असतात, की फक्त स्वतःवर? यातले काहीही खरे मानले, तरी एकाकीपणाचे अस्तित्व असिद्ध होत नाही आणि ते नाकारण्याचा खोटेपणा टिकतही नाही.

बौद्ध तंत्रामध्ये विपश्यना हा मनोनिग्रहाचा एक प्रकार आहे. बौद्ध तत्त्वज्ञान जगाचे सातत्य वा अभंगत्व सांगत नाही. प्रत्येक क्षण दुसऱ्याहून वेगळा असतो. एखादी ज्योत तेवत असते तेव्हा या क्षणीची तिची वात, तेल व तेज या एकाच क्षणापुरते असते. पुढचे जळणे नव्या क्षणाचे असते. काळाच्या अगम्य व प्रचंड वेगामुळे आपल्याला या क्षणांचे वेगळेपण जाणवत नाही, हे आपले अज्ञान आहे. विपश्यना सांगते, दोन क्षणांमधील अंतरावर चित्त केंद्रित करा. हा क्षण कधी निर्वाताचा वा अभावाचा वाटेल, पण तोच खरा ज्ञानाच्या साक्षात्काराचा क्षण असतो. त्यावरची दृष्टी एकदा प्रबळ झाली की, ते त्या अंतराचा काळ व अवधी वाढवीत जाते. हा अवधी जेवढा मोठा असेल तेवढी हे तंत्र आत्मसात करणारी व्यक्ती ज्ञानी व समर्थ होते. विपश्यनेचे हे स्वरूप एका अतिशय उच्च पातळीवरील एकाकीपणाच्या ज्ञानाचे आहे. ते तत्त्वज्ञांच्या स्तरावरचे आहे. येथे ज्याचा विचार करायचा ते, सामान्यजनांच्या एकाकी वृत्तीचे व अनुभवाचे आहे. ही माणसे विपश्यना करीत नाहीत वा प्राणायामातील अखंडपणाचा आत्मसाक्षात्कार अनुभवणारी वा तशी इच्छा बाळगणारी नसतात. परंपरेने वाट्याला आणलेले आयुष्य जगत असतात. त्यातील संस्थांमध्ये राहत असतात. या संस्थांनी दिलेली नाती जोपासत असतात. समाज त्यातून निर्माण होतो.

पण परंपरा असो वा संस्था, आणि नाती असोत वा समाज- माणसाचे एकटेपण कायमच असते. त्याला आतून जाणवणारे एकाकीपण यातून संपत नाही. मग या एकाकीपणाचे मूळ शोधत फार मागे, इतिहासात, इतिहासपूर्व काळात- अगदी आदिमानवाच्या जगात जावे लागते. त्याचे परस्परांवर अवलंबून राहणे हा त्याच्या गरजेचा भाग होता की एकाकीपण घालवण्याचा? एकाकीपण घालविण्याचा मानला तरी ते तेव्हाही खरोखरीच गेले वा जात होते काय? जगभरची तत्त्वज्ञाने, धर्मविचार, संस्कृती आणि समाजधुरीण आपल्यावर जो संस्कार बिंबवतात; तो समाजात राहण्याचा, समाजधर्म सांभाळण्याचा, समाजाच्या उत्कर्षासाठी झटण्याचा व प्रसंगी त्यासाठी प्राणार्पण करण्याचा. करायचे ते समाजासाठी, जगायचे ते समाजासाठी आणि मरायचे तेही समाजासाठी.

प्लेटो म्हणतो, ‘समाजावाचून व्यक्तीला अस्तित्व नाही, श्रेय नाही आणि जीवनही नाही. समाजाची परिपूर्णता हेच माणसांचे व व्यक्ती-जीवनाचे साध्य व सार्थक आहे. ते साध्य करणे हेच त्याचे प्रयोजन आहे…’ जरा खोलात जाऊन विचार केला की, ही विचारांची सारी परंपराच एकांगी व एकारलेली वाटू लागते. ती व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व विचारात घेणे सोडा, ते ध्यानातही घेत नाही. माणूस स्वतंत्र असतो, तो परस्परांहून वेगळा असतो आणि त्यातल्या प्रत्येकाचे एक स्वतःचे विश्व असते- ही बाब या विचारपरंपरेच्या गावीही नसते. (मागासलेल्या आदिम जमातींमध्ये व्यक्ती ही समाजाचा घटक म्हणूनच जगत असते व तेवढीच तिची मान्यता असते. त्याहून वेगळे जगण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती ताबडतोब समाजबाह्य व बहिष्कृत होते.)

शॉपेन हॉवर म्हणतो, ‘बिट्‌विन वन ॲन्ड नन देअर इज इन्फिनिटी.’ मात्र हा तत्त्वज्ञ या परंपरेला मान्यच होणारा नसतो. त्याचा ज्या काळाने गौरव केला, त्या काळाला व्यक्तीच्या स्वातंत्र्याची थोडीफार जाण आली होती. खरे तर ती जाण पूर्वीही होती. माणसे आपसात लढत होती. त्यांच्यात वाद होते. धर्म अमान्य करणारे चार्वाकासारखे पंथ जगातही सर्वत्र होते. पण राजसत्ता, धर्मसत्ता व अर्थसत्ता हे सारे बलशाली समूह विरोधात असल्याने त्यांची दखल तेव्हा कोणी घेतली नाही किंवा त्यांचा नायनाट करण्याचाच या समूहांनी प्रयत्न केला. मध्ययुगानेही त्यांचा आवाज ऐकला नाही.

ग्रीकांचे तत्त्वज्ञान व्यक्तीची बाजू घेणारे होते, पण ते ॲरिस्टॉटलसोबत संपले. भारतात चार्वाकांचे ग्रंथ शिल्लक राहू दिले गेले नाहीत आणि ख्रिस्ती व इस्लाम धर्माच्या उदयानंतर युरोप व अन्यत्रही धर्म हेच सत्य आणि त्याविषयीचा संशय हे पाप ठरले. शिवाय ते मृत्युदंडाला पात्रही ठरले. ही स्थिती व्यक्तीच्या स्वातंत्र्यापर्यंत व त्यातही तिच्या एकाकीपणापर्यंत व्यक्तीलाच पोहोचू देणारी नव्हती. जगातले धर्म स्त्रियांना स्वातंत्र्य देत नाहीत, असे नेहमीच म्हटले जाते.

धर्मांनी स्त्रियांनाच स्वातंत्र्य नाकारले असे नाही, त्यांनी ते पुरुषांनाही नाकारले. स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येकच चेटकीण वध्य असते, असे ख्रिस्ती चर्चने म्हटले. तेच इतर धर्मांनी वेगवेगळ्या स्वरूपात सांगितले. इस्लामने स्त्रीला बुरखा घालायला लावून तिला एकटेपणीही बंदिवान केले. हिंदू धर्मात स्त्री ‘पापाची खाण’ ठरवली गेली. मात्र त्याच वेळी या सर्व धर्मांनी पुरुषाचाही स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नाकारला. तर्क करा, पण तो वेदानुकूलच करा- असे हिंदू धर्माने सांगितले. इस्लामने कुराणाहून वेगळा विचार ही कुफरत ठरविली, तर बायबलहून वेगळा विचार धर्मविरोधी व निषिद्ध असल्याचे ख्रिश्चन धर्माने सांगितले. जिथे स्वतंत्र विचाराचे व बुद्धीचे स्वातंत्र्य नाकारले जाते, तिथे व्यक्तीचे एकाकीपण कोण लक्षात घेईल आणि त्यावर समाजाने धर्म व संस्कृतीच्या नावाने टाकलेली बंधने कोण नाकारील?

एकीकडे समाज व संस्कृती या गोष्टी व्यक्तीचे जीवन प्रगल्भ व समृद्ध बनवायला निर्माण होतात, असे सांगितले जाते. मात्र त्याच वेळी या व्यवस्था व्यक्ती- जीवनावरचे निर्बंध फारसे विचारात घेत नाहीत आणि चर्चेतही आणत नाहीत. स्पष्टच सांगायचे तर, संस्कृती हीच मुळी निसर्गविरोधी आहे. नैसर्गिक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, त्यांना ‘योग्य’ ते वळण देण्यासाठी- म्हणजेच, त्यांना नियम व निर्बंधांनी जखडून ठेवण्यासाठीच ती अस्तित्वात येते. मानवी जीवनाला स्वस्थता, शांतता व व्यवस्था लाभावी म्हणून संस्कृती येते, हे थोडेफार मान्य करूनही मानवी जीवन व्यवस्थित करण्यासाठी ती माणसांना त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती नाकारायला सांगते; हे खरे की नाही? या सांगण्यालाच संस्कार हे गोंडस नाव आहे. या संस्काराने व्यवस्था राखली हे खरे, पण त्याने व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगू वा वागू दिले नाही. तिचे एकाकीपण तिला अनुभवू दिले नाही आणि त्यातले तिचे स्वातंत्र्यही तिच्या वाट्याला येऊ दिले नाही.

आजच्या जगातला मानवी जीवनातला सर्वांत मोठा संघर्षही हाच आहे. निसर्ग आणि नैसर्गिक प्रवृत्ती विरुद्ध संस्कृती व तिने लादलेली बंधने हे आताचे या संघर्षाचे स्वरूप आहे. हा संघर्ष विधायक पद्धतीने समजून घेणारी माणसेही अत्यल्पसंख्य व थोडी आहेत. संस्कृती व धर्मासारख्या समूहकेंद्री व समूहलक्ष्यी व्यवस्था झुंडी उभ्या करतात. व्यक्तीला झुंड होता येत नाही. त्यामुळे संस्कृतीचे निर्बंध नेहमीच फारशा आनंदाने स्वीकारले जातात असे नाही. पुष्कळदा ते नाइलाज म्हणूनही स्वीकारावे लागतात. जगभरच्या प्रतिभावंतांची नेमकी आजची ओरड हीच आहे.

निसर्गाने माणूस नावाचे जनावर जन्माला घातले. संस्कृती व धर्मादिकांनी त्याचे उच्चतर मानवात रूपांतर केले, असे म्हटले जाते; ते काही अंशी खरे आहे. पण हे मानवीकरण करताना या संस्कृतीने माणसाचे किती निसर्गाधिकार हिरावले?

विचार आणि तर्क ही व्यक्तीला मिळालेली नियतीची देणगी आहे. मात्र समाज व संस्कृतीला तिचेच वावडे आहे. विचार व तर्क या माणसांना खऱ्या अर्थाने समृद्ध व प्रगल्भ बनवणाऱ्या गोष्टी या व्यवस्थांनी हिरावल्या आहेत की नाहीत? धर्म वा संस्कृती यांना तर्क मान्य नसतो. त्यांना श्रद्धा हव्या असतात आणि श्रद्धा स्थितिवादी, तर तर्क माणसाचा अभिक्रम जागविणारा असतो. याचे भान एकविसाव्या शतकात जागवावेच लागणार आहे. श्रद्धा गर्दी जमवतात, तर तर्क माणसाला एकाकी बनवितो. पण प्लेटो म्हणाला तसे, गर्दीला फक्त तिचे मन असते. तिचा बुद्धी वा तर्काशी संबंध नसतो. तर्क व्यक्तीला उंचीवर नेतो. ही उंची जसजशी वाढते तसे व्यक्तीचे एकाकीपणही वाढते. अखेर, शिखरावर फारच थोडी व अपुरी जागा असते. पृथ्वी (भूमी), आप (जल), तेज (प्रकाश), वायू (हवा) आणि आकाश (अंतर) या पंचमहाभूतांनी मिळून या सृष्टीची निर्मिती केली, असे आपली परंपरा मानते. यातले आकाश हे महाभूत प्रत्यक्षात नसल्याने वा अनुभवसिद्ध नसल्याने चार्वाकांनी नाकारले. मात्र त्यांनाही अगोदरची चार भूते मान्य आहेत. ही सारी भूते ईश्वरी संयोगाने एकत्र येतात आणि त्यातून सृष्टी व मानवी जीवन यांचा जन्म होतो, असे परंपरा मानते.

चार्वाकांच्या मते, यातील पहिल्या चार भूतांच्या संघातातून (हे काहीसे बिग बँग थिअरीसारखे आहे) या गोष्टी जन्माला येतात. या चार महाभूतांचे अस्तित्व व कर्तृत्वही आता जगन्मान्य झाले आहे. धर्माने नसले तरी विज्ञानाने ते मान्य केले आहे. या चार अनुभवसिद्ध भूतांमध्ये जोवर संयोग वा संघात घडून येत नाही, तेव्हा ती कशी व कोणत्या अवस्थेत असतील? भूमी हे मुळातच जडतत्त्व आहे आणि ते स्थिर आहे. जल प्रवाही आहे आणि ते सातत्याने वाहते राहणारे आहे. तेज हे बुद्धी व ज्ञान जागविणारे आहे. वायू तर नुसता वाहताच नाही, तर जाणवणारा आणि जीवनदाता व जीवनरक्षक आहे. यातले कोणते तत्त्व श्रद्धेला जन्म देणारे आहे? ही महाभूते तरी सारखी वा समान गुणधर्म असणारी आहेत काय?

अभ्यासकांना व विचारवंतांना ती परस्परपूरक मानता येतील, पण तो सारा मानण्याचा व समजून घेण्याचा प्रकार आहे. भूमी आणि तेज यात साधर्म्य कोणते? आणि प्रकाश व वायूतही एकात्म म्हणावे असे काय असते? निर्मितीचे हे मूळच जर असे परस्परभिन्न असेल आणि समानधर्मी नसेल, तर तिने निर्माण केलेली सृष्टी व मानवही तसा कसा असेल? सृष्टीची अनेक रूपे आपण पाहतो, तशी ती माणसांचीही पाहतो. पण एकच माणूस त्याच्या पुरता तरी एक वा एकात्म असतो काय? की, ती अनेकांची गर्दी असते? व्यक्ती किती रूपांत, स्वभावात आणि वर्तनात प्रगट होते? त्यातले एक प्रगटन दुसऱ्यासारखे असते काय? बहुधा नसते. एखादी व्यक्ती कधी तरी अशी वागते व बोलते की, ती मुळातली हीच काय, असा प्रश्न संबंधितांना पडतो. या स्थितीचे मूळ केवळ संस्कारात आहे की निर्मितीच्या प्रक्रियेतच ते दडले आहे? (पंचमहाभूतांचा सिद्धांत डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे विवेचन आहे, हे अर्थातच वाचकांच्या लक्षात यावे.) माणसांच्या जीवनातला समाजधर्म, व्यक्तिधर्म आणि त्यांच्या वाट्याला अटळपणे येणारे एकाकीपण यांचा संबंध या प्रकाराशी जोडता येईल काय? साधे आजचे मानसशास्त्र वा समाजशास्त्र या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. ही शास्त्रे पुढचे वास्तव पाहतात आणि स्वीकारतात. त्याच्या विश्लेषणात वा मूळ कार्यकारणभावात जात नाहीत. आपणही त्यात शिरण्याचे फारसे कारण नाही. येथे अनुभवाला येणाऱ्या व त्यापायी दुःखी (वा अपवादाने सुखी) होणाऱ्या व्यक्तींच्या मनोभूमिकांचा विचार करायचा आहे. मात्र अंधारच जाचक होतो. तहानेने व्याकूळ व्हावे लागते. वाऱ्यावाचून आपण हवालदिल होतो. आणि पृथ्वी? ती तर दर क्षणी नवी रूपे दाखविते, सुखविते आणि दुखवीतदेखील असते.

या महाभूतांतले प्रत्येकच भूत मानवी जीवनाचा प्रत्यक्ष भाग म्हणून असे अनुभवता येते. त्यांनीच मानवी व सृष्टी-जीवनाचे अवकाश भरून काढलेले असते. ते तसे असल्याचे आपण अनुभवतही असतो. या स्थितीत व्यक्तीच्या वाट्याला येते ते एकाकीपण का व कशामुळे? अवतीभवती आपल्याचसारखी व आपलीच माणसे असतात. ती परिचित असतात. त्यांच्याशी संवाद असतो. त्यातल्या काहींशी तर ‘शब्देविण संवादही’ राखता येतो. मग तरीही माणसे हातचे राखून का वागतात? बोलतात, पण सांगत काहीच नाहीत. किंवा न सांगण्यासाठीच बोलत राहतात. हे वागणे दडविण्यासाठी असते, की आपले सुख-दुःख केवळ आपल्यापुरते राखावे या वृत्तीतून येते? असे करण्यामागे अपराधगंड असतो काय? स्वतःविषयीच्या उच्च व भ्रामक कल्पना असतात काय? की, पुढची माणसे आपल्याशी जोडून घेण्याच्या योग्यतेची नाहीत, ही भावना त्यात असते?

कवितांमध्ये आकाशाचे रंग असतात. फुलांचे गंध असतात. सौंदर्याची मोहक वर्णने असतात. ती कवीच्या अनुभवातून आलेली असतात, की निव्वळ कल्पनेतून? वाट्याला कधीही न आलेले सौंदर्याचे सुख आपण अनुभवलेच आहे, अशी कविता लिहिणारे मोठे कवी एवढ्यात होऊन गेले. हे त्यांच्या लिखाणातले अनुभव त्यांच्या स्वप्नातले वा भावविश्वातले होते. त्यातले काहीही खरे नव्हते. एकाकी असताना वा तसे त्याला सभोवतीच्या लोकांनी ‘ठेवले’ असताना तो हे का लिहीत होता? आपल्या तशा ठेवलेल्या अवस्थेची जाणीव असतानाही त्याच्या कविता एवढ्या भावमधूर व खऱ्या वाटाव्यात अशा का येत होत्या? खोट्याला खरे बनविण्याची ही देण त्याच्या एकाकीपणाची, की त्यावर उगविलेल्या सूडाची?

आणखीही एक कथा पती-पत्नी असलेल्या दोन प्रतिभावंतांची. दोघेही लिहितात. अतिशय सूक्ष्मतर वाटावे असे त्यांचे लिखाण असते. त्याला प्रतिभेची उंचीही मोठी असते. अनेक दिवसांच्या मैत्रीनंतर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तो कवी, तीही कवयित्री. शिवाय गंभीर लेखनातही ते होते. पण त्यांचा परस्परांशी असलेला संवाद एकतर्फी होता. तो बोलायचा आणि ती ऐकायची किंवा चिडायची. आणि ती बोलली की, हा गप्प व चिडलेला. अशा वेळी ते आकाश, रंग, फुले, बागा कुठे गेलेल्या असतात? दोन समांतर आयुष्ये न भेटताच चालत राहावीत, आपापली दिशा धरून आणि तसेच सरळ चालत जाऊन आयुष्याच्या शेवटापर्यंत एकमेकांना कधी भेटलीच नाहीत. ती अजून आहेत आणि तशीच आहेत. सर्व पातळ्यांवर सारखेपण असताना माणसे अशी एकेकटी व एकाकी का असतात?

‘आमचे परस्परांशी सारेच जुळते’ असे म्हणणारी व सहभागाची जाहिरात करणारी माणसे खरी असतात, की त्यातल्या कोणा एकाची संपूर्ण शरणागती त्याला कारण असते? मिळते-जुळते घेणे, चर्चा, समन्वय आणि एकाकीपण घालवून समूहशील, कुटुंबवत्सल वा सहचरस्नेही किती जण असतात? आणि असले तरी एकाकीपणाचे पिशाच त्यांना सोडत असते काय? आपल्या एकांतात ते त्यांना जाणवते की नाही? आणि जाणवत असेल; तर त्याचे कारण वेगळे असणे, स्वतंत्र असणे, आत्मकेंद्री असणे की आपण दुर्लक्षित होत असल्याची जाणीव त्याला वा तिला होत असते, हे आहे?

(लेखक नामवंत विचारवंत व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

साभार: साप्ताहिक साधना

Previous articleआठवणीतील गाव -अकोला बाजार
Next articleस्त्री-जन्माची सनातन वेदना
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here