कळालेल्या पुरुषाचा कोलाज

मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६

– शर्मिष्ठा भोसले

पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना कुठल्याही कॉलेजवयीन तरुण-तरुणींमध्ये असतो तसा आमच्या वर्गातही जोड्या जुळवण्याचा कार्यक्रम सुरू असायचा. एकदा चार-दोनSharmistha Bhosale जण सोबत बसलेले असताना एक मैत्रीण मित्राला म्हणाली, ‘काय रे तुला ‘ती’ आवडते ना?’ यावर त्याचं उत्स्फूर्त उत्तर होतं, ‘ती? तिच्यात काय आवडण्यासारखं आहे? मागून-पुढून सपाट आहे नुसती.’ हा मित्र ग्रामीण भवतालातून शहरात शिकायला आला होता. स्त्री सौंदर्याची त्याच्यावर बिंबवली गेलेली कल्पना काय होती? स्त्रीचे विशिष्ट अवयव विशिष्ट मापात(च) असणं म्हणजे ती सुंदर, ‘आवडेबल’ असणं. पण या कल्पनांच्या प्रभावाखाली केवळ ग्रामीण आणि शहरी पुरुषच आहे का? हरेक माध्यमातून सतत थोपवल्या जाणाऱ्या जाहिराती पाहिल्या की लक्षात येईल, प्रत्येक प्रदेशातला पुरुषच काय स्वत: स्त्रीही या ‘पुरुषी सौंदर्यकल्पनां’ची बळी होत आलीय. ‘स्तनांचा आकार लहान असल्यामुळं माझ्यात न्यूनगंड होता. अमुकतमुक प्रॉडक्ट वापरल्यानं तो वाढला आणि मी आता खूप आत्मविश्वासानं वावरते.’ असं सांगणारी जाहिरातवाली तरुणी तुम्हीही पेपरात, टीव्हीवर पाहिली असेल.
प्रख्यात स्त्रीवादी विचारवंत कमला भसीन मांडतात की, ‘पुरुष असणं ही तशी फक्त लिंगाधारित गोष्ट असते असंही नाही. पुरुष असणं म्हणजे सत्ताधारी असणं, लाभार्थी असणं आणि अनेकार्थानं वरचढ असणं. स्त्री-पुरुष नात्यातल्या ‘पॉवर प्ले’ च्या राजकारणात जो बलवान असेल, तो पुरुष हे आपसूकच ठरतं. एखाद्या कार्यालयीन व्यवस्थेच्या उतरंडीत जर ‘बॉस’ स्त्री असेल तर ती पुरुष आणि हाताखाली काम करणारा स्त्री बनून जातो. सासू-सूनेच्या नात्यातही सासू ‘पुरुष’ आणि सून ‘स्त्री’ अशा भूमिका ठरतात. किंवा उलटही होऊ शकेल.’
यालाच जोडून एक निरीक्षण सांगायचं झालं तर, ‘गे’ जोडप्याविषयीच्या एका बातमीत मी एक शब्दप्रयोग वाचला. ‘हिज हजबंड’! मला तिथं केवढं तरी अडखळायला झालं. आता समलिंगी जोडप्यात ही ‘हजबंड-वाईफ’ भानगड कुठून आली? तर त्यांच्यात जो तुलनेनं जास्त ‘श्रेष्ठ’ तो हजबंड, आणि उरलेला दुसरा ‘वाईफ’ असं होत असतं म्हणे! ते दोघांच्यात समजुतीनं भूमिका वाटून घेतात किंवा त्या तशा वाटल्या जातात. आता त्यासाठीचं हे ‘श्रेष्ठत्व’ कशावरून ठरतं? तर बहुतांश वेळा तेच पारंपरिक कर्तृत्व, दिसणं, पद-प्रतिष्ठा यातून.
भारतीय पुरूष सतत एका ‘परफॉर्मन्स प्रेशर’खाली राहतो. स्वतःचं पुरूष म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या या दडपणानं त्याचा वैयक्तिक, सामाजिक वर्तनव्यवहार प्रभावित होतो. लौकिकार्थानं ‘यशस्वी’ नसलेल्या पुरूषाचं काय करायचं हे आपल्या ‘समाजपुरुषा’ला अजूनही उमगत नाही. म्हणजे नसेल एखाद्या पुरुषाला विशिष्ट करियरिस्टिक क्षेत्रांमध्ये गती. नसेल तो महत्वाकांक्षी. त्याला एखादी ललित कला, बागकाम, नृत्य असं काही आवडत असलं तर तो अगदी ‘बिनकामी’च ठरतो व्यवस्थेच्या नजरेत.
माझ्या नात्यातले एक गृहस्थ आहेत. त्यांना कायमच पाकशास्त्रात खूप रस वाटत आलाय. पण त्यांचे वडील डॉक्टर. त्यांना मुलाचा हा कल ‘बायकी’ वाटला. घरात इतरही कुणी कधी त्यांच्या कौशल्याचं आणि स्वयंपाकातल्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं नाही. त्यांना पारंपरिक शिक्षणात हुशार भावंडांच्या तुलनेत सतत हीन वागणूक मिळत राहिली. पुढं ते व्यसनात बुडाले, काही काळानं सावरले. आज एका लहानशा हाॅटेलात आचारी आहेत.
आपल्या समाजात कर्तृत्व आणि यशाच्या चौकटीतल्या व्याख्या ठरलेल्या आहेत. इव्हन पुरूषानं पुरूष असण्याचे आणि बाईनं बाई असण्याचे प्रोटोकॉलही कमालीचे सनातन आहेत. एखादा प्रतिभावान रितुपर्ण घोष हे ओझं सहन न होऊन स्वतःला संपवितो, ठराविक साच्यातच यशस्वी आणि कर्तबगार असण्याच्या दडपणानं पिचलेले अनेक पुरूष मी जवळून पाहत आलेय. वर मर्दानगीचा बागुलबुवा मन मोकळं करण्याची, त्यांची घुसमट सांगण्याची दारंही त्यांच्यासाठी बंद करतो.
या सगळ्यात मग त्याची लैंगिकता तरी याला अपवाद कशी राहील? लैंगिक संबंधात तो समसमान आनंद घेण्याऐवजी ‘मला बाईला चीत करायचंय’ हे मनात ठेऊन तिच्याशी वागतो. आपोआपच इथंही बाई मग नाजूक, अबला आणि पुरूष कणखर मर्द बनतो. समाजही त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवत नाही. कारण तो मुळात लैंगिक घुसमट झालेल्या व्यक्तींचा समूहच असतो ना. बाजारात विकल्या जाणार्या कॉण्डमचं नावही पुरूषाच्या ‘स्कोअर’ परफॉर्मन्सला डोळ्यासमोर ठेऊन दिलेलं असतं. खैरलांजी असो की कोपर्डी, बहुसंख्य बलात्काराच्या प्रकरणांत शेवटी क्रूर हिंसा झालेली दिसते. त्याची मुळं या लैंगिक घडणीमध्ये सापडू शकतात का? बाईचं दमन करून तिला अमानवी वागणूक दिल्याशिवाय अनेकदा पुरुषाची सूखपूर्ती होतच नाही असं दिसतंय.
पत्रकार मौलश्री कुलकर्णी यांनी एका हिंदी ब्लागसाठी लिहिलेल्या लेखाचं शीर्षक सांगतं, ‘कॉण्डम की वजह से पिटती है दिल्ली की हर चौथी औरत’. त्या लिहितात, ‘नेशनल हेल्थ फेमिली सर्वेच्या माध्यमातून हे वास्तव समोर आलंय. घरगुती हिंसेमागचं एक महत्त्वाचं कारण दिल्लीत ५०० महिलांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणात समोर आलंय. या सर्व स्त्रियांचे पती हे मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्गातले नोकरदार आहेत हे विशेष! ४६ टक्के स्त्रियांना त्यांनी पतीकडे ‘सेफ सेक्स’साठी कॉण्डमचा आग्रह धरला म्हणून जबर मारहाणीला वेळोवेळी सामोरं जावं लागलंय. ३९ टक्के पती पत्नीवर बलात्कार (जबरीनं केलेला समागम) करतात. या सर्वेतल्या ७१ टक्के स्त्रिया पदवी किंवा त्याहुनही वरचं शिक्षण घेतलेल्या आहेत. पण गोळ्या, तांबी अशी गर्भनिरोधक साधनं वापरण्याचंही स्वातंत्र्य नसल्यानं त्या वारंवार गर्भपाताला सामोरं जात असतात.’
कोपर्डीत मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती मुलगी मराठा समाजाची होती म्हणून मराठा संघटना आक्रमक झाल्या. कोपर्डी गावात ठाण मांडून त्या गावातलं वातावरण या संघटनांनी आपल्या उक्ती-कृतीतून दूषित केलं. या प्रकरणातले आरोपी जातीने दलित आहेत. आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला तेव्हा या मराठा संघटनांनी आणि शासनानेही त्यांना प्रतिबंध केला. आता गावोगाव फक्त मराठा समाजाला भावनिक आवाहन करत त्यांचे मोर्चे काढण्याचा प्रयोग सध्या या संघटनांनी सुरु केलाय. या मोर्चानंतर होणाऱ्या सभेतली निवेदनं मी नजरेखालून घातली. त्यांची भाषा अत्यंत ‘पुरुषी’ आहे. ‘आमची निर्भया’, ‘आमच्या समाजातल्या माता-भगिनी’ ‘जिजाऊच्या लेकी’ सुरक्षित नसल्याची खंत त्यात व्यक्त केलीय. बाईचा धर्म आणि जात शोधत तिच्यावर ‘आमची इज्जत’ आणि ‘त्यांची इज्जत’ असे शिक्के मारले की तिच्याबाबत काय स्टेंड घ्यायचा हे ठरवता येतं. या नेत्यांच्या तोंडी खासगीत असलेली भाषाही ‘आमच्या स्त्रीवर हात टाकता काय?’ अशी अहंकार दुखावल्याची आहे. या मोर्चेबांधणीचं समर्थन करणाऱ्या नेत्यांनी आपल्या संघटनांच्या ‘वैचारिक’ साहित्य निर्मितीसाठी लिखाण करताना त्यांनी एकतर उघडपणे ब्राम्हण जातीच्या सरसकट द्वेषाचा अजेंडा समोर ठेवला. त्यातही ब्राम्हण स्त्रियांबाबत तर त्यांनी या द्वेषाचा कडेलोटच केलाय. आपल्या पुस्तकात ‘ब्राम्हण स्त्रियांवर बलात्कार करा.’ अशी आवाहनं ते मराठा पुरुषांना करतात. एका जातीने दुसऱ्या जातीला नामोहरम करण्यासाठी त्या जातीतली बाई बाटवावी असा ‘विचार’ पेरणारे आज स्त्री अत्याचाराविरोधात मोर्चे काढताहेत. ही उच्च दर्जाची ‘ब्लेक कॉमेडी’ नाही तर काय? जातीय-धार्मिक अस्मितेशी युती केलेला पुरुष अजूनच डेंजरस बनून जातो तो असा! सध्या मराठवाड्यात असे ‘मोर्चातूर’ पुरुष आणि त्या पुरुषाचीच भाषा बोलणाऱ्या पोरी-महिला सारख्या भेटत राहतात.
मी आणि माझी पिढी जिथं जन्मली-वाढली तो समाज-भवताल पुरुषप्रधान आहे. त्याचं कळत-नकळत तसं असणं मी पावलोपावली अनुभवतही आलेय.
पितृसत्तेच्या साच्यात घडलेल्या ‘समाजपुरुषा’चा चेहरा बहुतांश वेळा उद्विग्न करणारा, कधी चीड आणणारा तर कधी भीतीदायकही असतो. तुम्ही स्त्री असा की पुरुष, ही पितृसत्ता हरेक क्षण तुमचं जगणं कळत-नकळत प्रभावित करत राहते. तुमची देहबोली, तुमच्या क्रिया-प्रतिक्रिया, स्वीकार-नकार काहीच यातून सुटू शकत नाही असं जाणवत राहतं.
माझ्या गावाकडचे एक काका काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या आमच्या घरी आले. दिवसभरातलं त्यांचं बाहेरचं काम आटोपून रात्री ते आमच्याशी निवांत गप्पा मारत होते. काका मोठेच प्रेमळ आणि कुटुंबवत्सल आणि धार्मिक. आई-पप्पांचे महाविद्यालयीन काळापासूनचे मित्र. त्यांच्या गार हिरव्या मळ्यातल्या घरामध्ये, गाय-गुरांच्या गोठ्यामध्ये लहानपणी खेळलेले खेळ अजून आठवणीत जपलेले. स्वत:ची शिस्तप्रिय जीवनशैली, वक्तशीरपणा आणि पुजाअर्चेबाबत सांगताना ते आणि आम्हीही संवादात रंगून गेलो. तसं त्यांचं कथनही मोठंच गोष्टीवेल्हाळ. मूळचे तेलुगु भाषिक असल्याने मराठी बोलतानाचा त्यांचा स्वत:चा एक खास, सुंदर लहेजा असतो. मला आवडतो तो. गप्पांमध्ये उदाहरणं देताना ते वर्षांपूर्वी केलेल्या अय्यप्पा व्रताची गोष्ट सांगू लागले. हे व्रत भक्तांसाठी अत्यंत कडक असतं. आधी केवढातरी काळ ब्रह्मचर्य पाळणं, विशिष्ट अन्नच खाणं, केवळ निळे किंवा काळेच कपडे घालणं आणि अशा असंख्य गोष्टी बिनचूक व दीर्घकाळ पाळाव्या लागतात. अय्यप्पा स्वामींची महती सांगताना काका नकळत भक्तीरसात डुंबू लागले. खूप काय काय सांगून म्हणाले, ‘बेटा, या मंदिरात समद्या जातीचे लोक जाऊ शकतेत. पण दहा आणि पन्नास वर्षाच्या मधल्या बायकांना तिकडं प्रवेश राहिना.’ हे ‘दहा ते पन्नास’ चं गौडबंगाल मला कळेना. मी म्हणले कसकाय? तर पुढे ते बोलले, ‘कसं राहतंय, दहा ते पन्नास मधेच बाईला कावळा शिवतंय ना. मग देवाला ते चलना. विटाळ होतंय. पण त्याच्या मागे-पुढे असलेल्या बाईचा काही प्रॉब्लेम नसतंय.’ मग काकांनी भक्तीरसाच्या वाटेवरची गाडी अचानक मोड बदलून पुढं धर्मसंसंस्कार आणि धर्मरक्षणाच्या मंगलमार्गावर आणली. ते माझ्या आईला उद्देशून म्हणाले, ‘तू या पोरींना ‘त्या’ काळात ‘बाहेर’ बसवनास. यातून घरात निगेटिव्ह एनर्जी पसरती. वास्तुदेवता नाराज होतीय. मग लक्ष्मी कोपती. कुटुंबप्रमुखाच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतंय. आपल्या धर्मात सगळं सांगितलंय त्याच्यामागं काहीतरी शास्त्र असतंय.’ आता धर्माभिमानाची रेकॉर्ड वाजू लागली. ‘हिंदू धरम काय असाच टिकला नाही आजवर. धर्मप्रचाराचं काम करायला आरएसएसनं गावागावात काम केली. बेटा, आम्हीबी आयोध्येच्या टायमाला विटा गोळा करत समद्या म्हराटवाडयात फिरलाव. तवाच्या टायमाला कोणी नावबी ठेवले. पण हिंदू एक झाल नसता तर सगळ्यांची सुन्नत झाली असती. तुला बुरका घालून रहाव लागलं असतं.’ आवाजातला आवेश आणि दर्प आता ठळक झालेला. हे असं ‘धर्मसंस्कार समुपदेशन’ पुढंही बराच काळ जारी होतं.
मी मात्र माझ्याच धर्माच्या एका सदोदित वत्सल, प्रेमळ आणि घरगुती वाटलेल्या पुरुषाचे हे सनातनी, स्त्रीविरोधी रूप पाहून अवाक झाले. धर्माच्या पवित्र अस्तराखाली किती आणि कसे स्त्रीशोषणाचे, दडपशाहीचे पापुद्रे लपलेले असतात याची ही जणू ‘लाइव्ह’ झलकच होती. माणूस श्रद्धेच्या अंमलाखाली इतका आणि असा बहकतो की मग त्याला ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धेतली तथाकथित नाजूक सीमारेषा’ दिसेनाशी झाली तर त्यात नवल ते काय?
प्रचंड मोठं धार्मिक महात्म्य असलेलं अय्यप्पा स्वामींचं मुख्य स्थान केरळातल्या ‘सबरीमाला’ इथं आहे. आख्यायिका सांगते की प्रभू श्रीरामाच्या कथेतल्या भिल्लीण शबरीनं इथं तपश्चर्या केली होती. आणि श्री अय्यप्पाने अवतार घेउन शबरीला मुक्ती मिळवून दिली. या पुरुषी देवाच्या पुरुषी भक्तांचा साक्षात्कार मला स्तब्ध करून गेला.
प्रसिद्ध स्त्रीवादी विचारवंत सिमॉन द बोव्हा म्हणते, की स्त्री घडवली जाते. मात्र भारतीय समाजचौकटीत पुरुषही ‘पुरुष’ म्हणून कसा घडवला जातो याची असंख्य उदाहरणं जगताना सामोरी येत राहतात. मग पुरुषाचा अनेकदा राग येतो तशी कीव, करुणाही येते. मला आठवतं, मी अकरावी-बारावीत होते. आम्ही भावंडं आई-वडिलांसह शहरात राहायचो. गावाकडं चुलत्यांचं एकत्र कुटुंब, शेती. एकदा असेच आम्ही गावी गेलेलो. घरात जरा वाद सुरू होता. एक चुलत चुलते काही काळापासून व्यवसाय डबघाईला आल्यानं जवळपास घरीच बसून होते. त्यात थोडेफार व्यसनात बुडालेले. त्यांची बायको शिक्षिका. तिच्या पगारावर त्यांचा संसार रेटत होता. त्या दिवशी काका बाहेरून घरी आले. संध्याकाळची वेळ होती. आल्या-आल्या ते अचानक खाली जमिनीवरच बसले आणि बाजेवर बसलेल्या आजोबांशी जोरजोरात बोलू लागले, ‘मी काय आजवर घराला कमी पैसा लावला का? हे केलं, ते केलं… धंदा बसला म्हणून काय… येईल वर, माझ्यात दम आहे. मी सगळं आनंल नीट लायनीवर. अन बोलताबोलताच ते हमसून हमसून रडायला लागले. आजोबांना सांगू लागले, ‘माझे मित्र मला चावडीवर नाही नाही ते बोलतात. बायकोच्या जीवावर खाणारा म्हणतात…’ कर्त्या म्हणवणाऱ्या भरदार-उंच्यापुऱ्या पुरुषाला असं कातरवेळेला हुंदके देताना बघून घर हादरून गेलेलं. आजोबा मग खूप वेळ काकाला समजावत त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते. काका थरथरत होता. माझ्या खूप जवळच्या नात्यातला एक वडीलधारा पुरुष मी पहिल्यांदाच ‘रडताना’ पाहिला. एरवी ज्यांचा धाक-दरारा वाटायचा, त्या काकाविषयी खूप भरून आलं. करुणा वाटली. पुढं अनेक प्रसंगांत पण क्वचितच पुरुषाला असं रडताना, भावूक होताना पाहत आले. मला बरं वाटायचं, त्याला मोकळं होताना, ‘मर्दानगी’ची कवचकुंडलं उतरवून माणसासारखं रडताना पाहून.
हेच काय, अजून इतरही कित्येक बाबतीत पुरुष ‘स्टिरिओटाईप’ बनतो, आणि स्वत:ची अडचण करून घेतो, बाईलाही अडचणीत आणतो. आमच्या नात्यातल्या एका बाईचा नवरा खूप व्यसन करायचा. बाई सुशिक्षित, कमावती. एकदा माझ्याकडं बोलली, ‘तो दारू पितो, काही कमावत नाही हे खराय. पण त्यानं कधी माझ्यावर हात उचलला नाही, की कधी बाहेरख्यालीपणा केला नाही हे बरं वाटतं बघ.’ म्हणजे पुरुषाच्या ‘आदर्श पुरुष’ असण्याच्या व्याख्या किती ‘फ्लेग्जिबल’ असाव्यात आणि बाईनं किती अल्पसंतुष्ट, किती समजुतदार असावं आपल्या पुरुषाविषयी!
आपल्या इथं कुटुंबसंस्था आणि शिक्षणव्यवस्था व्यक्तीच्या जन्मानंतर त्याच्या बऱ्यावाईट विकासात मुख्य योगदान देतात. मात्र स्त्री वा पुरुष यांच्यात लिंगभावविषयक काहीएक समज रुजवण्याची, त्यांना भिन्नलिंगी व्यक्तीशी आयुष्यभर करायच्या व्यवहाराविषयी प्रगल्भ बनवणारी कुठलीच यंत्रणा या दोन संस्थांनी निर्माण केलेली दिसत नाही. त्यामुळे निरागस वयातून बाहेर पडल्यावर पौगंडावस्था, तारुण्य आणि प्रौढावस्थेत स्त्री-पुरुषांमधल्या नात्यात कायम एक संकोच, अवघडलेपण येत राहतं. भले त्या संकोचाची तीव्रता कमी-जास्त असेल, तो कधी दृश्य असेल तर कधी अदृश्य, पण तो असतो. हा संकोच तारुण्यात एका सहज कुतूहलाचं रूप घेतो. ते कुतूहल परस्परांच्या देहाविषयीचं असतं तसं एकमेकांची मनं, भावना, विचारपद्धती, स्वप्नं याविषयीचंही असतं. पण ते योग्य, सुरक्षित पद्धतीनं पूर्ण करण्याचीही ‘स्पेस’ इथला भवताल त्यांना देत नाही. त्यातूनच चोरटेपण, विकृती आणि हिंसा जन्मते. स्त्री पुरुषाच्या देह्मनाविषयी उगाचच एक अनाम भय घेऊन वावरत राहते. पुरुषालाही स्त्रीच्या देहमनाविषयी कुतूहल असतंच. मग तो गॉसिप, चावडीवरच्या गप्पा, किस्से, नॉनव्हेज विनोद आणि तत्सम गोष्टींमधून ते भागवत राहतो. या कुतूहलातून छेडछाड, विनयभंग होतो. तेच कधीकधी स्त्रीदेहाचा जबरीनं उपभोग घेण्यापर्यंत बळावतं.
थेटपणे वागत-बोलत असलेल्या, खुल्या पद्धतीनं अभिव्यक्त होणाऱ्या मुलीच्या ‘मोकळं’ असण्याचा अर्थ पुरुषाकडून ‘उपलब्ध’ असणं असा सर्रास घेतला जातो. समता, व्यक्तीस्वातंत्र्य, उदारमतवाद या संकल्पना त्याला जडणघडणीच्या वयातच काय, पुढंही आयुष्यभर ‘इंट्रोड्युस’च होऊ दिल्या जात नाहीत. शिवाय स्त्रीवादी विचार म्हणजे स्वैराचारी आणि संसार तोडणारा विचार अशा काहीतरी अंधश्रद्धा सतत त्याच्या आणि तिच्याही मनीमानसी रुजवल्या जातात.
बाईनं कुमारी असेपर्यंत तिचा कौमार्यभंग होऊ नये याची काळजी घ्यावी. विवाहिता झाली की तशी झालेली असण्याच्या खुणा, प्रतीकं देहमनावर वागवत राहावं. मंगळसूत्र जोडवी घालावीत. असं तिला सतत सांगितलं जातं. एक काकू मला म्हणतात, ‘तू का मंगळसूत्र घालत नाहीस? घालत जाव. परपुरुष मग वाईट नजरेनं पाहत नाहीत. आपण सुरक्षित राहतो.’ मंगळसूत्र म्हणजे काय चिलखत आहे की कवचकुंडलं? आणि बाई विवाहित असणं वा नसणं हा काय अत्याचारी पुरुषाचा निकष असतो का काय? आणि विवाहित बायांवर घरातच असंख्य वेळा होणारी हिंसा, बलात्कार या काय दंतकथा आहेत? आणि सरसकट सगळ्या पुरुषांना ‘राक्षस’ समजत त्यांच्या ‘वाईट नजरां’पासून स्वत:चा बचाव करणं हेच बाईचं जीवनधेय्य आहे का? ‘मेन विल बी मेन’ आणि त्याला जोडूनच ‘सो वूमन शुड बी लाईक अ वूमन’ चा पुकारा असा आपण सगळेच करत असतो की कळत-नकळत!
हे सगळं आहेच. पण माझ्या व्यक्ती म्हणुनच्या प्रवासात मात्र मला समृद्ध, संपन्न स्वतंत्र विचारांची घडायला प्रवृत्त करणारा पुरुषही मला अनेकानेक रूपांत भेटला, अजूनही भेटतोय. माझ्या जन्मानंतर समोर आलेला पहिला पुरुष, अर्थातच माझे वडील. शशांक त्यांचं नाव. माझा मुलीचा जन्म म्हणजे एक निरंतर चालणारा सोहळा वाटावा असं त्यांनी मला घडवलं, वाढवलं. वडिलकीचा सल्ला, जिव्हाळा सोबतीला होताच. मात्र लहानसहान गोष्टींसह शिक्षण, करियर, जोडीदारनिवड या सगळ्या टप्प्यावर माझ्या व्यक्ति म्हणुनच्या स्वातंत्र्याचा आदर केला. माझा बुद्ध्यांक, भावनांक विकसित होईल, निर्णयक्षमता वाढेल, उगाचच ‘मी पडले बाईमाणूस’ सारखी असुरक्षितता माझ्यात रुजणार नाही असं पालकत्व ते निभावत राहिले.
त्यानंतर माझ्या आयुष्यात आला तो माझा मामा, महेंद्र देशमुख. आईचा लहान भाऊ. मामा आता प्राध्यापक आहे. माझ्या जन्मानंतर वाढीच्या काळात तो बी. एड. करत होता. दिवसभरातला बहुतांश वेळ, अगदी जेवतानाही डोळ्यासमोर पुस्तक असलेला मामा मला आठवतो. ते पुस्तक म्हणजे एखाद्या आडवाटेच्या लेखकाची कथा-कादंबरी असायची. हा असा सतत पुस्तकांच्या गराड्यात असलेला, वाचनवेडा, भटकंतीचीही ओढ असलेला, कम्माल सेन्स ऑफ ह्युमरवाला मामा वयाचं केवढं तरी अंतर ओलांडत माझा दोस्त बनला. तो देखणा, उमदा कॉलेजकुमार होता. मी दोन वेण्या घालणारी चिमुरडी. त्याच्या सायकलवर ‘लॉंग ड्राईव्ह’ला जाणं, दऱ्या-डोंगरात भटकणं, त्याच्या तोंडून गोष्टीवेल्हाळ शैलीत अद्भुतरम्य गोष्टी ऐकत त्याच्याच कुशीत झोपून जाणं, त्याच्या बुकशेल्फ्मधून जाडजूड पुस्तकं काढून वाचण्याचा प्रयत्न करणं, पुढं त्याचाच हात धरून शाळा नावाच्या प्रकरणाशी ओळख करून घेणं असं केवढं काय-काय होत राहिलं. प्रत्येक वाढदिवसाला माझं वय पाहून त्यानुसार भेट म्हणून त्यानं हाती ठेवलेली पुस्तकं माझी इयत्ता वाढवत गेली. मी जगात अवतरले तेव्हापासून मला पडणाऱ्या हरेक प्रश्नाचं उत्तर सदासर्वदा त्यालाच मागायचे. मी पाचवीत असताना मामाचं लग्न झालं तेव्हा ‘माझ्या मामात ही का आता वाटणी मागणार?’ म्हणून नव्या मामीचा आलेला पोरकट राग आठवतो मला अजून. त्या अजाणत्या वयात एका अल्लड, गाभुळलेल्या मैत्रीचा देखणा काळ त्यानं माझ्या हातात ठेवला. मी व्यक्ती म्हणून स्वतंत्र विचारांची, संवेदनशील आणि खुली झाले यासाठी त्या अवखळ कॉलेजकुमाराला ‘थँक्स’!
घराचा उंबरा ओलांडून शिकायला बाहेर पडले तसं अवतीभवती साहजिकच अनेक समवयीन मित्र-मैत्रिणी मिळाले. वागण्याबोलण्यात स्वत:तला ‘पुरुष’ बाजूला ठेवून सोबत असणारे मित्र मोजकेच मिळाले. पण जे मिळाले ते कमालीचे सहजपणे समृद्ध करत राहिलेत. त्यांच्या सोबत असताना मूर्तीमंत समता अनुभवता येते. पुरुष म्हणून समोर आलेले खाचखळगे, भावनिक-शारीरिक संघर्ष, आव्हानं या सगळ्यांची ‘कन्फेशन्स’ या मित्रांनी माझ्यासमोर मोकळेपणानं दिली. माझ्यातली स्त्रीवादी व्यक्ती त्या संवादांतून अधिक सम्यक, समतोल आणि समंजस होत राहिली. आंतरजातीय लग्न केल्यानंतर माझ्यातल्या ‘मराठा पुरुषा’शी मी कसा वारंवार सामना केला, कसा हरलो, कसा जिंकलो, त्यातून कसा घडलो ते उदाहरणांसकट सांगणारा परमेश्वर जाधव, ब्राह्मण स्त्रियांशी लग्न केल्यानंतर अनेक दलित पुरुषांमध्ये ‘रिव्हर्स पितृसत्ता’ कशी जन्म घेते यावर स्पष्ट-थेट बोलणारा उद्धव धुमाळे आणि गिरीश अवघडे, महानगरी, ग्रामीण पुरुषांचे काच, तिथल्या स्त्री-पुरुष संबंधातली कॉम्प्लेक्सिटी स्वनुभवांसकट समजावणारा वनराज शिंदे आणि बसवंत विठाबाई, कार्यकर्त्याचा लग्न नावाच्या प्रकरणात प्रवेश झाल्यावर त्याचे अनुभव, घुसमट आणि वाढ असं सगळंच सोप्या, संवादी शैलीत बोलणारा केशव वाघमारे, माझ्या वेड्यावाकड्या प्रश्नांनाही समंजस उत्तरं देणारे जयदेव डोळे, अमर हबीब, सचिन परब, अभय टाकसाळ, संजय सोनटक्के, अजित अभंग… कुठल्याही प्रहरी कुठलाही विषय ज्यांच्याशी बोलताना ‘कम्फर्ट’ वाटावा असे अभिषेक भोसले, वैभव देशमुख, कुणाल गायकवाड, संदीप जगदाळे आणि अजूनही कोण कोण. जगण्याचे केवढे तरी झळाळते पदर उलगडून ते असे समोर ठेवतात, की मी आपली थक्क होऊन निरखत राहते. माझ्या बाईपणाचे रंगीत तानेबाने विणत राहते.
आता चारेक महिन्यापूर्वी मी माझ्या मित्रासोबत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. सदानंद रवींद्र घायाळ त्याचं नाव. आमची मैत्री गेल्या पाचेक वर्षापासूनची होती. याकाळात मित्र म्हणून आणि माणूस म्हणूनही आम्ही कळत-नकळत एकमेकांना जोखत होतो. अर्थात, लग्न करण्याचा निर्णय हा एका टप्प्यावर आल्यानंतर उत्स्फूर्तपणे घेतला. पण एकमेकांना लहानमोठ्या कृती-संवादातून निर्हेतुकपणे ‘जज’ करणं सुरूच असायचं. या सगळ्यात सदानंद, माझा नवरा, मला बऱ्यापैकी ‘सुलझा हुआ इन्सान’ वाटला. आमच्या मैत्रीत एकमेकांनी ‘डीजेंडर’ होत हरतऱ्हेच्या विषयावर बोलत राहण्याचा टप्पा खूप लवकर आला. म्हणजे, ओळखीच्या काही दिवसांतच.
मी तशी लहान गावातलीच, पण खूप मोकळं वातावरण असलेल्या घरात जन्मलेली, वाढलेली मुलगी. हे असं असणं हा माझ्यासोबत घडलेला सुखद अपघातच वाटतो मला. आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई वडील दोघेही वर्किंग. ते अगदी परिवर्तनवादी चळवळीतले नसले तरी आचार-विचारांतून प्रागतिकता उमटायची. त्यामुळं मुलगी असण्याचा टेबू कधी फारसा टोकदारपणे समोर उभा राहिला नाही. वा मुलगी म्हणून जगतानाचे अनेकानेक टेबूजही आई-वडिलांनी कधी जोपासू दिले नाहीत. त्यामुळं मी अगदी ‘फेमिनाईन’ घडले-वाढले नाही. त्यातच पुढं परिवर्तनवादी, स्त्रीवादी विचार जवळचा वाटू लागला. स्त्री आहे म्हणून स्त्रीवादी असणं नव्हे, तर समतावादी असल्याने स्त्रीवादी असणं मोलाचं वाटू लागलं. ते पत्रकारितेतून, कवितेतून, मोर्चे आंदोलनांतून उमटत राहिलं, राहतं. कधीकधी मी आणि माझी कविताही खूप आवाजी होते की काय असं वाटण्याइतपत ते पुढे जातं.
याउलट सदानंद मात्र तुलनेनं खूप जेन्टल, इंट्रोव्हर्ट. एकदम ठाम निष्कर्ष मांडण्यापेक्षा गोष्टींचे खूप पदर खोलखोल समजून घेऊ पाहणारा. त्याचं कुटुंब माझ्यापेक्षाही अगदी लहान गावातलं. आई गृहिणी. घरचं काम करून शेतीचंही पाहणारी. वडील एसटी खात्यात नोकरीला.
एकुणच, त्याची आणि माझी जडणघडण संपूर्ण वेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक भवतालात झाली. तरीही आमच्यातलं मैत्र हे सगळे अडथळे ओलांडून प्रवाही होत राहिलं. आम्ही सर्वकाळ हरेक विषयावर बोलू शकायचो. आधी म्हणल्याप्रमाणे, भिन्नलिंगी असणं हा कधी दोघांतला अडथळा बनला नाही. उलट मुलगी म्हणून माझ्या, आणि मुलगा म्हणून त्याच्या वाट्याला येणारे स्वतंत्र अनुभव, निरीक्षणं आम्ही मोकळेपणाने एकमेकांशी शेअर करायचो. जाणवलेल्या खाचाखोचा, आक्षेप स्पष्टपणे नोंदवायचो. आता मैत्रीचं हे नातं लग्नात बदलल्यानंतर आम्ही एकमेकांचे जोडीदार म्हणजेच नवरा-बायको बनलोय. मात्र या नात्यात सदानं अजून तरी ‘पारंपरिक’ नवऱ्याचं ‘बेअरिंग’ घेतलं नाही. आणि विशेष म्हणजे मी वादात वा अजून कधी वागता-बोलताना कळत-नकळत जरी ‘टिपीकल’ बाईवाली भूमिका कधी घेतली तर तेही तो मला मिश्कीलपणे लक्षात आणून देतो.
‘फुलटायमर’ ही जमात आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललीय. त्या जमातीला सांभाळणारा, जपणारा समाज तरी तसा कुठाय उपलब्ध? तर आमच्या औरंगाबादला परिवर्तनवादी चळवळीतले एक फुलटायमर आहेत. बुद्धप्रीय कबीर त्यांचं नाव. प्रेमआणि क्रांतीला कागदावर उतरवणाऱ्या अमृता प्रीतम आणि त्यांचे हमसफर चित्रकार इमरोजजी यांचे कबीर हे मानसपुत्र. अमृताजी आता लौकिकार्थाने जगात नाहीत. पण मोर्चे, आंदोलनं आणि संघर्षात जीव थकला की कबीर इमरोजजींच्या विसाव्याला जायला दिल्लीची रेल्वे पकडतात. त्यांना ‘पापा’ म्हणतात. परत आले की म्हणतात, ‘बयो, आपल्याला समतेची मंजिल मिळायला वाट अजून खूप दूर चालावी लागणार आहे बघ! ही वाट चालताना माझ्यातला पुरुष माझ्यातल्या माणसावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. मग मी स्वत:वरच चिडतो, अस्वस्थ होतो. फिर पापा को मिलके आता हू! उनके अंदरका इमरोज थोडाबहुत समेट लाता हू. इधर आके जो भी मिले उसे बांटता चला जाता हूं.’ इमरोज होण्याची आस अशी प्रत्येक पुरुषात जागत राहिली तर तुमच्या-माझ्या जगण्याचा केनव्हास केवढ्या तरी उजळ रंगात रंगून जाईल नाही?

8380097491
सौजन्य -मीडिया वॉच पब्लिकेशन

हे सुद्धा आवर्जून वाचा

पुरूष: रोस्टेड सॅण्डवीच–हिनाकौसर खान-पिंजार- http://bit.ly/2r5noTZ

लिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?-योजना यादवhttp://bit.ly/2OopG8F

पुरुष असाही! पुरुष तसाही!- हर्षदा परब – http://bit.ly/2quw8TN

पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडलाय, त्या पुरुषांसाठी- सानिया भालेराव- http://bit.ly/2r3YyUw